महामहीम, पंतप्रधान क्रिस्टरसन,

महामहीम उर्सुला जी,

युवर रॉयल हायनेस,

व्हॉल्वो ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ,

युरोपियन राउंड टेबलचे अध्यक्ष,

येथे उपस्थित युरोपचे प्रमुख व्यावसायिक नेते,

बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार!

सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक "गॉथेनबर्ग" मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे  एक जिवंत प्रतीक आहे.

मित्रांनो,

'युरोपियन उद्योगांचे गोलमेज' (European Round Table for Industry) सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठाला संबोधित करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

तुमच्यापैकी काही मित्रांसोबत माझी यापूर्वी भेट झाली आहे. काहींना आज मी पहिल्यांदाच भेटत आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, की तुम्ही सर्वजण कोणत्या न कोणत्या रूपाने भारताशी जोडलेले आहात.

कोणाचे मॅन्युफॅक्चरिंग भारतात आहे, कोणाचे आर अँड डी भारतात आहे, कोणाचा टॅलेंट बेस भारतात आहे, कोणाची सप्लाय चेन भारताशी जोडलेली आहे, तर कोणी भारतात मोठी गुंतवणूक करत आहे. आजची ही बैठक ही भागीदारी आणखी मजबूत करण्याची एक उत्तम संधी आहे.

मित्रांनो,

आज भारत आणि युरोपचे संबंध एका नवीन वळणावर आहेत. सरकारच्या पातळीवर आम्ही एक महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक विषयपत्रिका निश्चित केली आहे.

भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावर सहमती झाली आहे. उर्सुला जी यांनी म्हटल्याप्रमाणे, हा खरोखरच सर्व करारांची जननी ("Mother of all Deals”) आहे. आमचा प्रयत्न आहे की याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी.

सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी तसेच मोबिलिटी कराराने देखील आमच्या सहकार्याला एक नवीन दिशा दिली आहे. भारत-युरोपीय संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेने) आमच्या भागीदारीला नवीन संस्थात्मक बळ दिले आहे. डिजिटल तंत्रज्ञान, पुरवठा साखळ्या आणि नवोन्मेष, या सर्व क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोप मिळून एकत्र काम करत आहेत.

'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर' सारखे ऐतिहासिक उपक्रम कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकात्मतेला नवीन गती देत आहेत. हरित संक्रमण आणि शाश्वत विकासाबाबतही  आमचे विचार आणि प्राधान्यक्रम सारखेच आहेत.

म्हणजेच, जर आपण व्यापक चित्र  पाहिले, तर आपल्यामध्ये सखोल राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक अभिसरण आहे. संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत जगासाठी भारत आणि युरोप हे धोरणात्मक भागीदार आहेत.

पण मित्रांनो,

सरकारे केवळ चौकट, चौकटीला पाठबळ आणि धोरणात्मक दिशा देऊ शकतात. प्रत्यक्ष जमिनीवर खरा बदल हा तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच शक्य होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला भारतासोबत एकत्र काम करण्यासाठी आमंत्रित करायला आलो आहे.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत आज एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत हा 140 कोटी लोकांच्या आकांक्षांचा देश आहे. आपली तरुण लोकसंख्या, विस्तारणारा मध्यमवर्ग आणि पायाभूत सुविधांचा विस्तार  भारताच्या विकासाला नवी गती देत आहेत.

गेल्या 12 वर्षांत भारत 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'  या मूलमंत्रावर चालला आहे. आणि सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे ही रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण वेगाने पुढे धावत आहे.

वस्तू आणि सेवा (GST) करामुळे भारत 'एक देश, एक कर, एक बाजारपेठ' या दिशेने पुढे गेला. इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी  कोडमुळे व्यवसाय संस्कृतीमध्ये उत्तरदायित्व आले. कॉर्पोरेट कर सुधारणांनी उत्पादन क्षेत्राला स्पर्धात्मक बनवले. कामगार कायद्यांनी अनुपालनाला सोपे आणि पारदर्शक करण्याची दिशा दाखवली.

थेट परदेशी गुंतवणूक (FDI) सुधारणांनी अनेक क्षेत्रे जागतिक भांडवलासाठी खुली केली. पीएलआय योजनांनी  इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, ऑटो कम्पोनंट्स, सोलर मॉड्यूल्स, टेलिकॉम, टेक्स्टाईल्स यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये उत्पादनाला गती  दिली.

आम्ही अनुपालनाचा बोजा कमी केला आहे. हजारो जुने व कालबाह्य नियम रद्द केले आहेत. 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस'ला  प्रशासनाचा एक भाग बनवले आहे. डिजिटल इंडियाने सार्वजनिक सेवांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ बनवले आहे.

भारतात आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. आमचे स्टार्टअप्स एआय, फिनटेक, स्पेस, ड्रोन्स, बायोटेक, क्लायमेट टेक आणि परिवहन व्यवस्थेमध्ये जागतिक स्तरावरील उपाय तयार करत आहेत.

आज भारताकडे प्रतिभा आहे, व्यापकता आहे, मागणी आहे, स्थैर्य आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतात 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आहे. म्हणूनच, आता आपण केवळ इच्छा बाळगण्यापलीकडे जाऊन गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करण्याची वेळ आली आहे.

या संदर्भात मी तुमच्यासमोर पाच प्रस्ताव मांडू इच्छितो

पहिला: दूरसंचार आणि डिजिटल पायाभूत सुविधा. व्होडाफोन, इरिकसन, नोकिया, ऑरेंज यांसारख्या कंपन्यांच्या कामाचा भारतात विस्तृत अनिभाव आहे. भारत 5जीकडून 6जी कडे स्थलांतर, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) सक्षम नेटवर्क, सुरक्षित जोडणी व्यवस्था आणि डिजिटल समावेशन यामध्ये महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. तुम्ही सर्वजण भारताला जागतिक पातळीवरील संशोधन आणि विकास केंद्र बनवण्यात योगदान देऊ शकता.

दुसरा: कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमिकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स तसेच गहन तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादन. एएसएमएल, एनएक्सपी, एसएपी, कॅपजेमिनी सारख्या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी आज येथे उपस्थित आहेत. भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या एंड-टू-एंड तंत्रज्ञान परिसंस्थेचा भागीदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो.

भारताची संकल्पना स्पष्ट आहे: तंत्रज्ञान विषयक नवोन्मेषाची आगामी लाट भारतात सह-निर्मित व्हायला हवी.

तिसरा: हरित स्थित्यंतर आणि स्वच्छ ऊर्जा. अनिश्चित जागतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ उर्जा क्षमता बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. ईएनजीआयई, टोटल एनर्जीज, शेल, उमिकोअर सारख्या कंपन्या स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन, ऊर्जा साठवण, विजेवर चालणारी वाहने (ईव्ही) तसेच निःकार्बनीकरणात आघाडीवर आहेत. तुम्ही भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता.

चौथा: पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि शहरी परिवर्तन. वोल्वो, मर्स्क, एअरबस, साब, अर्सेलरमित्तल आणि हेडेलबर्ग या कंपन्यांचे नैपुण्य भारताच्या परिवर्तनाशी थेटपणे संबंधित आहे. शाश्वत सिमेंट, हरित पोलाद, गतिशीलता, लॉजिस्टिक्स, हवाई क्षेत्र, संरक्षण या क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोप यांची भागीदारी जागतिक दर्जाचे परिणाम साध्य करू शकते.

पाचवा: आरोग्यसुविधा आणि जीवन-विज्ञान. अस्ट्राझीनिका, रोशे, मर्क, फिलिप्स, नेस्ले आणि युनिलिव्हर यांसारख्या कंपन्यांचे भारताशी फार जुने नाते आहे. आता आपल्याला या भागीदारीला पुढील स्तरावर घेऊन गेले पाहिजे.   

लसी, कर्करोगावरील उपचार, डिजिटल आरोग्य, पोषण आणि वैद्यकीय साधने या क्षेत्रांमध्ये फार मोठा वाव आहे. तुम्ही डिझाईन फॉर इंडिया, मेक इन इंडिया तसेच एक्स्पोर्ट फ्रॉम इंडिया यांसारख्या उपक्रमांच्या मदतीने पुढे जाऊ शकता.

वेळेच्या मर्यादेमुळे मी येथे उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांची नावे घेऊ शकत नाही मात्र भारतात सर्वांसाठी संधी उपलब्ध आहेत आणि माझे निमंत्रण देखील तुम्हा सर्वांसाठी आहे.

मित्रांनो,

या प्रस्तावांच्या पाठोपाठ मी तुमच्यासमोर एक आव्हान देखील सादर करू इच्छितो. आता येथे उपस्थित असलेली प्रत्येक कंपनी भारतासाठी एक नवीन, मोठी वचनबद्धता स्वीकारू  शकते का? आपण येत्या पाच वर्षांत भारतात सुरु होणारे महत्वाचे प्रकल्प निश्चित करू शकतो का?

हे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी भारत सरकार तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करेल. आपण या सर्व प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी एक संस्थात्मक प्रणाली देखील उभारू शकतो.

मित्रांनो,

आपण वर्षातून एकदा भारत-युरोप सीईओ गोलमेज बैठकीचे आयोजन करू शकतो. यामध्ये भारत आणि युरोपातील औद्योगिक संस्थांना समाविष्ट करून घेता येईल. क्षेत्र-विशिष्ट कृतिगट देखील स्थापन करता येतील.

मी अशी देखील सूचना मांडू इच्छितो की ईआरटीने एक इंडिया डेस्क अथवा इंडिया अॅक्शन ग्रुप देखील स्थापन करावा. त्याची कार्यक्रम पत्रिका साधीसोपी असेल: ज्या कंपन्या भारतात कार्यरत आहेत त्यांच्या विस्ताराला मदत करणे; ज्या नव्या कंपन्या भारतात येऊ इच्छित आहेत, त्यांच्या प्रवेशासाठी सुलभता निर्माण करणे; आणि व्यापारविषयक समस्यांचे सक्रियतेने निराकरण करणे.

मित्रांनो,

भारत आणि युरोप यांच्यातील भागीदारी केवळ आर्थिक आकडेवारीपुरती मर्यादित नाही. ही सामायिक मूल्यांची भागीदारी आहे. ही लोकशाही आणि विविधतेची भागीदारी आहे. ही विश्वास आणि पारदर्शकतेची तसेच नवोन्मेष आणि समावेशनाची भागीदारी आहे.

आजच्या जगात जी अनिश्चितता आहे, पुरवठा साखळ्यांवर ताण आहे, तंत्रज्ञानात स्पर्धा वाढत आहे, ऊर्जा सुरक्षा आणि हवामानविषयक कृती यांना आव्हान देण्यात येत आहे. अशा वेळी भारत आणि युरोप एकत्र येऊन स्थैर्य, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीसाठी बळकट आधारस्तंभ बनू शकतात.

याच विचारासह मी तुम्हा सर्वांना भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. आज गोठेनबर्गमध्ये सुरु होत असलेला हा संवाद, येत्या वर्षांमध्ये भारत आणि युरोप यांच्यातील औद्योगिक भागीदारीचा नवा अध्याय लिहील असा विश्वास मला वाटतो.

तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने येथे आलात, या परिषदेत मला तुमच्यासमोर माझे म्हणणे मांडण्याची संधी दिलीत, यासाठी मी तुम्हा सर्वांचा खास आभारी आहे.

खूप-खूप धन्यवाद।

Thank you. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros

Media Coverage

Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles loss of lives in a mishap in Bengaluru
July 02, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, condoled loss of lives due to a mishap in stone quarry in Bengaluru. "I extend my deepest condolences to those who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured", Shri Modi stated.

The Prime Minister posted on X:

Pained to hear about the loss of lives due to a mishap in stone quarry in Bengaluru Urban district of Karnataka. I extend my deepest condolences to those who have lost their loved ones. Praying for the speedy recovery of the injured: PM @narendramodi

ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಲ್ಲು ಗಣಿಯಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಹಾನಿ ಸಂಭವಿಸಿರುವುದು ನೋವು ತಂದಿದೆ. ಪ್ರೀತಿಪಾತ್ರರನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡವರಿಗೆ ನನ್ನ ಸಂತಾಪವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೇನೆ. ಗಾಯಾಳುಗಳು ಶೀಘ್ರ ಗುಣಮುಖರಾಗಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ
@narendramodi