पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू , त्यांच्या पत्नी श्रीमत सारा नेतान्याहू उद्या गुजरातला भेट देणार आहेत.
अहमदाबाद शहरात आयोजित एका स्वागत समारंभामध्ये नेतान्याहू दांपत्याचे स्वागत करण्यात येणार आहे. अहमदाबाद विमानतळावरून नेतान्याहू साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी रवाना होतील. साबरमती आश्रमामध्ये ते महात्मा गांधी यांना आदरांजली वाहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नेतान्याहू देव धोलेरा या गावी निर्माण करण्यात आलेल्या “आयक्रिएटर सेंटर”चे उद्घाटन करणार आहेत. उभय राष्ट्रप्रमुख एका स्टार्ट-अप प्रदर्शनाला भेट देणार आणि तिथे नवसंशोधकांशी तसेच स्टार्ट-अपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्गाशी संवाद साधणार आहेत. दोन्हीही पंतप्रधान एका व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून बनासकांथा जिल्ह्यामधल्या सुईगम तालुक्याला एक फिरती जलविक्षारण व्हॅन भेट देतील. त्याचबरोबर दोन्हीही नेते उपस्थित जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरकांथा जिल्ह्यातल्या वडराड येथील सर्वेात्कृष्ट भाजी केंद्राला भेट देतील. नेतान्याहू यांना या भाजी केंद्राच्या कार्याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पंतप्रधान कच्छ जिल्ह्यातल्या कुकामा येथे उभारण्यात आलेल्या खजूर उत्कृष्टता केंद्राचे व्हिडिओ लिंकव्दारे उद्घाटन करतील. यावेळी उभय नेते शेतकरीवर्गाशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नेतान्याहू मुंबईला रवाना होणार आहेत.


