आई

Published By : Admin | June 18, 2022 | 07:30 IST

आई, हा केवळ एक शब्द नव्हे तर आयुष्यातली अशी भावना आहे ज्यामध्ये सामावल्या आहेत वात्सल्य,धैर्य, विश्वास आणि अशा अपार भावना. जगातला कोणताही भाग असो, कोणताही देश असो, प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या आईसाठी सर्वात अनमोल स्नेह भावना असते. आई, आपल्याला केवळ जन्मच देते असे नव्हे तर आपले मन, आपला आत्मविश्वास, आपले व्यक्तिमत्व ती घडवते.आपल्या मुलांसाठी ती आयुष्यभर झिजते, स्वतःला समर्पित करते.आज माझा आनंद, माझे भाग्य आपणा सर्वांसमवेत मी सामायिक करू इच्छितो. माझी आई, हीराबा, आज 18 जूनला वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत आहे.म्हणजेच आईचे जन्म शताब्दी वर्ष सुरु होत आहे. वडील आज असते तर गेल्या आठवड्यात तेही शंभर वर्षांचे झाले असते. म्हणजे 2022 हे असे वर्ष आहे, ज्यामध्ये माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे आणि याच वर्षात माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले आहे.

 गेल्याच आठवड्यात माझ्या पुतण्याने गांधीनगर इथून आईचे काही व्हिडीओ पाठवले आहेत. सोसायटीमधले काही युवक घरी आले आहेत. वडिलांचे छायाचित्र खुर्चीवर ठेवले आहे, भजन-कीर्तन सुरु आहे, आई तल्लीन होऊन भजन म्हणत आहे.टाळ वाजवत आहे. आई आजही तशीच आहे.शरीर भले थकले असले तरी मनाची उर्जा तशीच कायम आहे.

खरे तर आमच्याकडे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही. मात्र कुटुंबातली नव्या पिढीतली मुले आहेत त्यांनी वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षात यावेळी 100 झाडे लावली.

आज माझ्या जीवनात जे काही चांगले आहे, माझ्या व्यक्तीमत्वात जे काही चांगले आहेत ती आई-वडिलांची देणगी आहे.आज मी इथे दिल्लीत बसलो आहे, कितीतरी जुन्या आठवणी मनात फेर धरत आहेत.

माझी आई जितकी सामान्य आहे तितकीच असामान्यही आहे. जशी सर्वांची आई असते अगदी तशीच. आज मी आई विषयी लिहित आहे, ते वाचून तुम्हाला असे वाटू शकेल, माझी आईही असेच तर करते. हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई येईल.

आईची तपस्या, तिच्या अपत्याला आदर्श माणूस घडवते. आईचे वात्सल्य, तिच्या मुलामध्ये मानवी भाव-भावना जागृत करते. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, एक व्यक्तिमत्व नव्हे तर आई म्हणजे एक स्वरूप आहे. आपल्याकडे म्हटले जाते जसा भक्त तसा ईश्वर. त्याप्रमाणेच आपल्या मनात जसा भाव असेल त्याप्रमाणे आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो.

माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या विसनगर इथे झाला. वडनगर पासून हे फार दूर नाही. माझ्या आईला तिच्या आईचे म्हणजे माझ्या आजीचे प्रेम लाभू शकले नाही. शंभर पूर्वी आलेल्या जागतिक महामारीचा तेव्हा अनेक वर्षे प्रभाव राहिला होता. त्या महामारीने माझ्या आजीला, माझ्या आईपासून हिरावून नेले.आई तेव्हा काही दिवसांचीच असेल.तिला आपल्या आईचा, माझ्या आजीचा चेहरा, तिची कुशी काहीच आठवत नाही.आपण विचार करा,माझ्या आईचे बालपण आईविना गेले,तिला आपल्या आईकडे हट्ट करता आला नाही. आईने शाळेचा उंबरठाही पाहिला नाही, अक्षर ज्ञान प्राप्त करण्याचे भाग्य तिला लाभले नाही.तिने पाहिली ती केवळ गरिबी आणि घरात चोहीकडे अभाव.

आजच्या काळाशी तुलना केली तर आपण कल्पना करू शकतो की आईचे बालपण किती खडतर होते. कदाचित तिचे जीवन असेच घडवण्याची ईश्वराची इच्छा असेल. मात्र आपली आई गमावल्याचे, तिचा चेहराही न पाहिल्याचे दुःख तिला आजही सलते.

लहानपणी केलेल्या संघर्षामुळे माझी आई अकाली प्रौढ झाली. आपल्या कुटुंबात ती सर्वात मोठी होती आणि लग्न झाल्यावर ती सर्वात मोठी सून झाली. लहानपणी ती आपल्या घरतल्या सर्वांची जशी चिंता करत असे, त्यांची काळजी घेत असे, घराचे सर्व कामकाज करत असे तशाच जबाबदाऱ्या तिला सासरी आल्यावर तिच्या अंगावर आल्या. या सर्व जबाबदाऱ्यामध्ये, या समस्यांमध्ये आई नेहमीच शांतपणे प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाचा सांभाळ करत राहिली.

वडनगरच्या ज्या घरात आम्ही राहत होतो ते घर अतिशय छोटे होते. त्या घराला खिडकी नव्हती, न्हाणीघर नव्हते, शौचालयही नव्हते.मातीच्या भिंती आणि खापराचे छत असलेला एक-दीड खोल्यांचा तो ढाचा म्हणजे आमचे घर होते. त्यामध्ये आई-वडील,आम्ही सर्व बहिण-भावंडे राहत होतो.

त्या छोट्याश्या घरात आईला स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे म्हणून वडिलांनी घरात बांबूच्या पट्ट्या आणि लाकडाच्या फळ्या टाकून मचाणासारखे एक तयार केले होते.हे मचाण आमच्या घरातले स्वयंपाकघर होते. आई त्यावर बसून स्वयंपाक करत असे आणि आम्ही त्यावरच बसून जेवत असू.

सर्वसाधारणपणे जिथे अभाव असतो तिथे तणावही असतो. माझ्या आई-वडिलांचे हे वैशिष्ट्य होते की अभाव असूनही त्यांनी घरात तणाव कधी वरचढ होऊ दिला नाही. दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या.

कोणताही ऋतू असो, उन्हाळा असो, पावसाळा असो,वडील पहाटे चार वाजता घराबाहेर पडत.त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक ओळखत असत, चार वाजले, दामोदर काका निघाले आहेत. घरातून निघाल्यावर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेऊन मग चहाच्या दुकानावर जाणे हा त्यांचा दिनक्रम असे.

आईही वेळेबाबत दक्ष होती. तिलाही पहाटे 4 वाजता उठण्याची सवय होती. पहाटे-पहाटेच बरीचशी कामे ती उरकत असे.गहू, बाजरी दळणे असो नाहीतर तांदूळ-डाळ निवडणे असो सर्व कामे ती स्वतः करत असे. काम करताना आपल्या आवडीची भजने किंवा भूपाळ्या ती गुणगुणत असे.नरसी मेहता जी यांचे एक प्रसिद्ध भजन आहे, “जलकमल छांडी जाने बाला, स्वामी अमारो जागशे” हे तिच्या आवडीचे आहे. एक अंगाई गीतही आहे, “शिवाजी नु हालरडु”, आई हे पण बऱ्याच वेळी गुणगुणत असे.

आम्ही भावा- बहिणींनी आपला अभ्यास सोडून तिला मदत करावी अशी तिची अपेक्षाही नव्हती.आपल्या कामात मदत करायला ती कधी सांगत नसे. आई सतत कामात गुंतलेली बघून आम्हा भावा- बहिणींना स्वतःलाच वाटत असे की तिला कामात मदत करावी. मला तलावात पोहण्याची, तलावात आंघोळ करण्याची फार आवड होती म्हणून घरातले कपडे तलावात धुण्यासाठी मी घेऊन जात असे. कपडेही धुवून होत आणि मला पाण्यात खेळताही येत असे.

घर चालवण्यासाठी थोडे आणखी पैसे मिळावेत म्हणून आई दुसऱ्यांच्या घरी भांडीही घासत असे. वेळ काढून चरखाही चालवत असे कारण यातूनही थोडी कमाई होत असे. कापसाच्या बोंडातून कापूस काढणे,कापसापासून धागा तयार करण्याचे काम ही सर्व कामे ती स्वतः करत असे. कापसाच्या बोंडाच्या टरफलाचे काटे आम्हाला टोचतील अशी तिला भीती वाटत असे.

आपल्या कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे,आपले काम दुसऱ्याकडून करून घेणे तिला कधीच आवडत नसे. वडनगरमधल्या मातीच्या घरात पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या मला आठवतात. मात्र कमीत कमी त्रास व्हावा यासाठी आईची धडपड असे.म्हणूनच जून महिन्यात कडक उन्हाळ्यात घराचे छप्पर ठीक करण्यासाठी ती छतावर चढत असे. तिच्या परीने ती प्रयत्न तर करत असे मात्र आमचे घर इतके जीर्ण झाले होते की त्याचे छत मुसळधार पाऊस झेलू शकत नव्हते.

पावसाळ्यात आमच्या घरात कधी इथून तर कधी तिथून पाणी गळत असे. घरभर पाणी होऊ नये, भिंतीना ओल लागू नये यासाठी आई जमिनीवर भांडी ठेवत असे, छतावरून पडणारे पाणी त्यात गोळा होत असे. त्या वेळीही मी आईला कधी त्रासलेली पाहिले नाही, स्वतःला दोष देताना पाहिले नाही. याच पाण्याचा वापर पुढचे 2-3 दिवस आई घरातल्या कामांसाठी करत असे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जल संरक्षणाचे याहून उत्तम उदाहरण काय असू शकेल.
आईला घर सजवण्याची, घर सुंदर ठेवण्याची देखील खूप आवड होती. घर स्वच्छ दिसावे याकरता ती दिवसभर काहीनाकाही करत असे. ती घरातील जमिनी शेणाने सारवत असे. तुम्हाला माहीतच असेल की शेणाच्या गोवऱ्यांना आग लावली तर कधी कधी सुरुवातीला खूप धूर निघतो. आई तर खिडकी नसलेल्या त्या घरात अशा गोवऱ्यांच्या इंधनावरच स्वयंपाक करत असे. धूर बाहेर जायला मार्ग नसल्याने घराच्या भिंती फार लवकर काळपट होत असत. मग दर एक दोन आठवड्यांनी आई नित्यनेमाने भिंती साफ करत असे. यामुळे घराला नवी झळाळी मिळत असे. आई मातीच्या खूप सुंदर वाट्या बनवून सजवायची. आपल्या भारतीयांमध्ये जुन्या गोष्टींचा पुनर्वापर करण्याची जी सवय आहे, त्यात देखील आई चॅम्पियन आहे. आईची एक अतिशय वेगळी आणि अनोखी गोष्ट माझ्या लक्षात आहे. ती नेहमी जुन्या कागदांना भिजवून, चिंचोक्यांना वाटून एक गोंद बनवत असे. मग या गोंदाचा वापर करून भिंतीवर काचेचे तुकडे चिटकवून खूप सुंदर चित्र तयार करत असे. बाजारातून थोडे बहुत साहित्य आणून ती घराच्या दरवाजांवर कलाकुसर करत असे.

आई एका गोष्टीकडे विशेष लक्ष देत असे, ते म्हणजे अंथरूण अतिशय स्वच्छ आणि टापटीप असावे, त्यावर एक ही धुळीचा कण असलेला तिला खपत नसे. थोड्याशा सुरकुत्या दिसल्या तरी ती पूर्ण चादर झटकून पुन्हा अंथरत असे. आम्ही सुद्धा आईच्या या सवयीचे पालन करत असू. आज इतक्या वर्षांनंतरही आई ज्या घरात राहते आहे, तिथे अंथरुण जरा देखील विस्कटलेले नाही ना याकडे ती बारकाईने लक्ष देते. या वयातही प्रत्येक कामात अचूकतेची तिची सवय कायम आहे. आणि आता गांधीनगरमध्ये माझ्या भावाचे कुटुंब आहे, माझ्या पुतण्याचे कुटुंब आहे, पण आजही स्वतःची सर्व कामे स्वतः करण्याचा ती प्रयत्न करत असते. स्वच्छतेविषयी माझी आई किती दक्ष आहे, हे मी आजदेखील पाहतो. ज्यावेळी मी दिल्लीवरून गांधीनगरला जातो, तेव्हा ती मला स्वतःच्या हाताने मिठाई भरवते, आणि ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाला भरवल्यानंतर त्याचे तोंड पुसते, त्याप्रमाणे आई मला मिठाई खाऊ घातल्यानंतर एखाद्या रुमालाने माझे तोंड पुसते. तिच्या साडीत एक रुमाल नेहमी खोचलेलाच असतो.

आईच्या स्वच्छतेविषयीच्या प्रेमाचे इतके किस्से आहेत की लिहिण्यात खूप वेळ जाईल. आईमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. जी व्यक्ती स्वच्छतेचे, साफसफाईचे काम करते तिला देखील आई खूप मान देते. मला आठवतंय, वडनगर मध्ये आमच्या घराजवळील नाल्याची साफसफाई करायला जे येत असत त्यांना आई चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसे. त्यानंतर ते देखील समजून जायचे की काम झाल्यानंतर चहा प्यायचा असेल तर केवळ आमच्याच घरी मिळू शकेल. माझ्या आईची आणखी एक चांगली सवय आहे, जी मला नेहमी स्मरत असते. पशूपक्ष्यांवर दया करणे हा तिच्या संस्कारांचा भाग आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात ती पक्ष्यांकरता मातीच्या भांड्यामध्ये दाणे आणि पाणी जरूर ठेवत असे. आमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे रस्त्यावरचे कुत्रे उपाशी राहू नयेत, याची सुद्धा आई काळजी घ्यायची. बाबा आपल्या चहाच्या दुकानातून जी मलई आणत असत, त्यातून आई खूप छान तूप बनवत असे, आणि या तुपावर केवळ आमचाच हक्क असायचा, असे मुळीच नव्हते. या तुपावर आमच्या वस्तीतील गायींचाही तितकाच हक्क होता. आई रोज गोमातेला पोळी खाऊ घालायची. पण कोरडी पोळी नाही, त्यावर नेहमी तूप लावलेले असायचे.

जेवणाच्या बाबतीत आईचा नेहमी एक आग्रह असे की अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये. आमच्या गावी जेव्हा कोणाच्या लग्न समारंभात पंगतीत जेवण असे तेव्हा जेवताना अन्नाची नासाडी करू नका असे आई सर्वांना लक्षात आणून देत असे. घरात देखील आईने हाच नियम केला होता, जितकी भूक असेल, तितकेच अन्न ताटात घ्यावे याकडे तिचा कटाक्ष असे. आई आज सुद्धा जितके खायचे असेल तितकेच पदार्थ ताटात वाढून घेते. आज देखील ती तिच्या ताटात अन्नाचा एक कण देखील वाया जाऊ देत नाही. नियमानुसार खाणे, ठरलेल्या वेळी खाणे आणि चावून चावून खाणे या सवयी आजही कायम आहेत.

आई नेहमीच इतरांना आनंदी बघून स्वतः आनंदी राहते, घरात जागा भले कमी असेल, पण तिचे मन मोठे आहे. आमच्या घराच्या जवळच एक गाव होते, जिथे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे स्नेही रहात असत. त्यांचा मुलगा होता, अब्बास. वडिलांच्या मित्राच्या अकाली निधनानंतर त्यांनी अब्बासला आमच्या घरीच आणले होते. घरातील इतर मुलांप्रमाणेच आई, अब्बासची देखील खूप काळजी घेत असे. ईद च्या दिवशी आई अब्बासकरता त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सण उत्सवांच्या काळात जवळपासची काही मुले आमच्या घरी जेवायला येत असत, त्यांना आईच्या हातचे जेवण खूप आवडत असे. 

आमच्या घराच्या परिसरात जेव्हा एखादे साधू महात्मे येत असत, तेव्हा आई त्यांना घरी बोलावून अवश्य खाऊ घालायची. जेव्हा ते निघायचे तेव्हा आई स्वतःकरता नव्हे तर आम्हा मुलांकरता आशीर्वाद मागत असे. ती त्यांना म्हणायची की माझ्या मुलांना असा आशीर्वाद द्या की ते दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख मानतील आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतील. आपल्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवाभाव जागृत होऊ दे, असा आशीर्वाद ती मागत असे. माझ्या आईचा माझ्यावर गाढ विश्वास आहे. तिला तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. मला अनेक दशकांपूर्वीची एक घटना आठवते. त्याकाळात मी संघटनेत असताना लोकसेवेच्या कामात गुंतलो होतो. कुटुंबियांशी अजिबात संपर्क नव्हता. याच काळात, एकदा माझा मोठा भाऊ माझ्या आईला बद्रीनाथ, केदारनाथच्या दर्शनासाठी घेऊन गेला होता. आईचे बद्रीनाथाचे दर्शन झाले तेव्हा केदारनाथमधील लोकांनाही माझी आई येत असल्याची बातमी मिळाली.

त्याचवेळी अचानक हवामान खूप खराब झाले. हे पाहून काही लोक केदारघाटी उतरून खाली जाऊ लागले. ते आपल्यासोबत काही रजया देखील घेऊन गेले. ते रस्त्याने दिसणाऱ्या वयोवृद्ध महिलांना विचारत होते की तुम्ही नरेंद्र मोदींच्या आई आहात का? असेच विचारत विचारत ते आईला भेटले. त्यांनी आईला रजई दिली, चहा दिला, मग तर ते पूर्ण यात्रेच्या कालावधीत आईसोबतच राहिले. केदारनाथला पोहोचल्यावर त्यांनी आईच्या निवासाची चांगली सोय केली. या घटनेचा आईच्या मनावर मोठा परिणाम झाला. तीर्थयात्रेवरून परतल्यावर माझी आई मला भेटली तेव्हा ती म्हणाली, "तू काही चांगलं काम करत आहेस, लोक तुला ओळखतात".

आता या घटनेला इतकी वर्षे होऊन गेल्यावर जेव्हा लोक आईच्या जवळ जाऊन तिला विचारतात की तुमचा मुलगा पंतप्रधान आहे, याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत असेल, यावर आईचे उत्तर अतिशय सखोल आहे. आई त्यांना सांगते की जितका तुम्हाला अभिमान वाटतो, तितकाच मलाही वाटतो. तसेही माझे काहीच नाही, मी तर निमित्तमात्र आहे. तो तर देवाचा आहे. तुम्ही हेही पाहिलं असेल की, माझी आई कधीही कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत जात नाही. आत्तापर्यंत दोनदाच ती माझ्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात आली आहे.

एकदा, एकता यात्रेनंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून मी परतलो होतो, तेव्हा अहमदाबादमधील नागरी सन्मान कार्यक्रमात माझी आई व्यासपीठावर आली आणि तिने मला कुमकुम तिलक लावला होता.
तो क्षण आईसाठी भावनिक होता कारण एकता दौऱ्यादरम्यान फगवाडा येथे एक हल्ला झाला होता आणि त्यात काही लोक मारले गेले होते. त्या वेळी आईला माझी फार काळजी वाटत होती. तेव्हा मला दोन जणांचा फोन आला होता. एक फोन अक्षरधाम मंदिराचे अध्यक्ष प्रमुख स्वामी जी यांचा होता आणि दुसरा फोन माझ्या आईचा होता. माझी परिस्थिती जाणून घेऊन आईला हायसे वाटले.
जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी झाला तेव्हा सार्वजनिक पातळीवर दुसऱ्यांदा माझी आई माझ्या सोबत आली होती. 20 वर्षांपूर्वी झालेला हा शपथविधी म्हणजे माझी आई माझ्यासोबत सार्वजनिकरीत्या उपस्थित राहिली आहे असा शेवटचा समारंभ होता. त्यानंतर ती कधीही एखाद्या कार्यक्रमात माझ्यासोबत आली नाही.
यावेळी मला एक प्रसंग आठवतो आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात आले की माझ्या सर्व शिक्षकांचा सार्वजनिकरीत्या सत्कार करावा. मला त्यावेळी असेही वाटले की, आई तर माझी सर्वात मोठी शिक्षका आहे, तिचाही सन्मान व्हायला हवा. आपल्या शास्त्रवचनांमध्ये देखील म्हटले आहे की आईपेक्षा मोठा गुरु कोणीच नाही – ‘नास्ति मातृ समो गुरु:’ म्हणून मी आईला म्हटले देखील, की तू सुद्धा व्यासपीठावर ये.पण ती म्हणाली, “हे बघ बाबा, मी तर केवळ निमित्तमात्र आहे. माझ्या पोटी जन्म घेणे हे विधिलिखित होते. तुझी घडण मी नाही तर देवानेच केली आहे.” असे कारण देऊन ती त्या कार्यक्रमाला आलीच नाही. माझे सर्वच शिक्षक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते पण आईने मात्र त्यापासून लांब राहणेच पसंत केले.

पण मला आठवते आहे त्यानुसार, आईने त्या समारंभापूर्वी मला हे मात्र नक्कीच विचारले होते की आमच्या वस्तीमध्ये जेठाभाई जोशी नावाचे जे शिक्षक राहत होते त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणी या कार्यक्रमात येणार आहे का? लहानपणी माझी सुरुवातीची अक्षरओळख, लेखन-वाचन या जेठाभाई जोशी गुरुजींकडूनच झाले होते. आईला हे सगळे लक्षात होते, हे देखील ठाऊक होते की जोशी गुरुजी आता आपल्यात नाहीत. आई स्वतः आली नाही पण जेठाभाई जोशी यांच्या कुटुंबाला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण अवश्य द्यायला हवे असे तिचे म्हणणे होते .
अक्षर ओळख असल्याविनाच कोणी खऱ्या अर्थाने शिक्षित कसे असू शकते हे मला नेहमीच माझ्या आईकडे पाहून पटत असे. तिची विचार करण्याची पद्धत, तिची दूरदृष्टी यांनी मला अनेक वेळा आश्चर्यचकित केले आहे. आई तिच्या नागरी कर्तव्यांबाबत नेहमीच खूप सजग असते. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये तिने मतदानाचे कर्तव्य निभावले आहे.काही काळापूर्वी, गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी देखील आई मतदान करायला गेली होती
ती मला अनेक वेळा म्हणते की हे बघ बाळा, जनतेचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तुझे कधीही काही वाईट होणार नाही. ते सांगते की, स्वतःचे शरीर नेहमी सुदृढ राख, स्वतःला निरोगी ठेव, कारण शरीर निरोगी असेल तरच तू उत्तम प्रकारे काम देखील करू शकशील.

एके काळी आई अत्यंत नेमाने चातुर्मासाचे व्रत करत असे. नवरात्रीच्या वेळी माझे नेमनियम काय असतात ते आईला ठाऊक आहेत. पूर्वी ती काही म्हणत नसे, आता मात्र सारखी मला सांगत असते की नवरात्रीच्या काळात जे कडक व्रत-उपवास करत असतोस ते आता जरा सोप्या पद्धतीने करू लाग.
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत आईला कोणाची तक्रार करताना ऐकलेले नाही. ती कधी कुणाची तक्रार करत नाही आणि कोणाकडून काहीच अपेक्षा देखील ठेवत नाही.
आज घडीला माझ्या आईच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही. मी तिच्या शरीरावर कधी सोने नाही पाहिले. तिला सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा मोह नाही. ती पूर्वीदेखील साधेपणाने राहायची आणि आजही तशीच तिच्या छोट्याश्या खोलीत अत्यंत साधेपणाने जीवन जगते आहे.
देवावर आईची गाढ श्रद्धा आहे मात्र अंधविश्वासापासून ती शेकडो कोस दूरच असते. आमच्या घराला तिने नेहमीच अंधविश्वासाचा पगड्यापासून दूर ठेवले आहे. ती पूर्वीपासून कबीरपंथाची उपासक आहे आणि त्याच परंपरेला अनुसरून तिची पूजाअर्चा सुरु असते. आणि हो, जपमाळ घेऊन जप करण्याची सवय लागली आहे तिला. दिवसभर तिचे भजन गाणे आणि जपमाळ घेऊन नामस्मरण करणे कधीकधी इतके पराकोटीला जाते की ती झोपणे सुद्धा विसरते. घरच्या लोकांना तिची माळ लपवून ठेवावी लागते तेव्हा कुठे ती झोपायला तयार होते आणि मग तिला झोप लागते.

एवढे वय होऊन देखील आईची स्मरणशक्ती आजही फार उत्तम आहे. अनेक दशकांपूर्वीच्या गोष्टी तिला चांगल्या प्रकारे आठवतात. आजही कोणी नातेवाईक तिला भेटायला जातो तेव्हा ती लगेच त्यांच्या आजी आजोबांची नावे घेऊन सांगते की, अरे, तू त्यांचा नातेवाईक आहेस.
जगात काय चालले आहे यावर आजही आईचे लक्ष असते. एवढ्यातच, मी माझ्या आईला विचारले की तू हल्ली टिव्ही बघतेस की नाही? त्यावर आई म्हणाली की टीव्हीवर जेव्हा बघावे तेव्हा सतत सगळे आपसात भांडत असतात. अर्थात काहीजण असेही आहेत जे शांततेने त्यांचे म्हणणे सांगतात, अशा लोकांचे कार्यक्रम मी बघते. आई इतका विचार करते आहे हे बघून मी आश्चर्यचकित झालो.
तिच्या प्रखर स्मरणशक्तीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मला आठवते आहे. ही 2017 सालची गोष्ट आहे. मी तेव्हा उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या कार्याच्या अखेरच्या काळात काशी येथे राहत होतो. तेथून मी जेव्हा अहमदाबाद ला गेलो तेव्हा आईसाठी काशीहून प्रसाद घेऊन गेलो.आईला भेटलो तेव्हा तिने विचारले की, काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन तरी घेतलेस का? आई संपूर्ण नावच घेते- काशी विश्वनाथ महादेव. मग थोड्या वेळाने तिने विचारले की, काशी विश्वनाथ महादेवाच्या मंदिरापर्यंत जायचा रस्ता अजूनही तसाच आहे का?असे वाटते की कोणाच्यातरी घरातच हे मंदिर आहे. मी हैराण होऊन तिला विचारले की तू केव्हा तिथे गेली होतीस? तेव्हा तिने सांगितले की खूप वर्षांपूर्वी तिचे जाणे झाले होते. अनेक वर्षांपूर्वी केलेल्या तीर्थयात्रेतील गोष्टी तिला तपशीलवार आठवत होत्या.
आईकडे जितकी जास्त संवेदनशीलता आहे, सेवावृत्ती आहे तितकीच तिची नजर देखील खूप पारखी आहे. तिला लहान मुलांच्या छोट्या मोठ्या आजारांवरच्या देशी उपचारपद्धती माहित आहेत. वडनगरच्या आमच्या घरात तर नेहमीच सकाळपासून लोकांची रांग लागलेली असते. अगदी 6-8 महिन्यांच्या लहान बाळांची तपासणी करायला लोक आईकडे घेऊन येतात.
लहान मुलांच्या उपचारासाठी आईला अनेकदा खूप वस्त्रगाळ पावडरची गरज भासत असे. ही पावडर करण्याचे काम आम्हा मुलांकडे असे. आई आम्हांला चुलीतील राख, एक वाडगा अनि एक पातळ कपडा देत असे. मग आम्ही त्या वाडग्याच्या तोंडावर ते कापड घट्ट ताणून बांधून 5-6 चिमटी भरून राख त्यावर ठेवत असू. मग हळुवारपणे ती राख कपड्यावर घासली की राखेतील सर्वात सूक्ष्म कण खालच्या वाडग्यात जमा होत असत.आई आम्हांला नेहमी सांगायची, “तुमचे काम उत्तम पणे करा. राखेच्या मोठ्या दाण्यांमुळे लहान मुलांना काही हानी व्हायला नको.

अशीच एक गोष्ट मला आठवते आहे, ज्यातून आईच्या मायेबरोबरच विवेकाचे देखील दर्शन होते. असे झाले की एकदा वडिलांना एक धार्मिक विधी करायचा होता. म्हणून आम्ही सर्वजण नर्मदेच्या किनारी असलेल्या एका ठिकाणी जाण्यासाठी निघालो.ते अत्यंत उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून तिथे जाण्यासाठी आम्ही अगदी सकाळीच निघालो. सुमारे तीन-साडेतीन तासांचा प्रवास असेल. आम्ही जेथे उतरलो तेथून पुढे पायी चालत जाणे भाग होते. पण उकाडा इतका भयंकर होता की जमीन संपतच नव्हती. म्हणून आम्ही नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर, पाण्यात पाय भिजवून चालत होतो. काही वेळातच आम्ही मुले थकून गेलो. कडाडून भूक लागली होती. आई आम्हा मुलांची अवस्था बघत होती, जाणत होती. आई वडिलांना म्हणाली की थोडा वेळ मध्ये थांबूया. आईने वडिलांना लगेचच कुठूनतरी गूळ विकत घेऊन यायला सांगितले. वडीलांनी घाईघाईत गूळ विकत आणला. मी तेव्हा फार लहान होतो. पण गूळ खाऊन पाणी प्यायल्याबरोबरच आमच्या अंगात नवी शक्ती संचारली. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. त्या उकाड्यात पूजेसाठी घरातून निघणे, आईची समयसूचकता, वडिलांनी लगेच गूळ खरेदी करून आणणे, मला आजदेखील आठवते.
दुसऱ्यांच्या इच्छेचा सन्मान करण्याची प्रवृत्ती, दुसऱ्यांवर आपल्या इच्छा बळजबरीने न लादण्याची सतर्कता मी आईमध्ये लहानपणापासूनच पाहिली होती. विशेषतः माझ्या बाबतीत ती अत्यंत सजग असे. मी आणि माझे निर्णय यांच्या आड न येण्याची काळजी ती घेई. तिच्याकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. लहानपणीपासूनच तिने माझ्यातेक वेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीची जोपासना होताना पाहिली आहे. मी माझ्या सर्व भावाबहिणींपासून जरा फटकूनच राहत असे.
माझ्या दिनचर्येमुळे, माझ्या विविध प्रयोगांमुळे, कधीकधी माझ्या आईला माझ्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत असे. पण तिच्या कपाळावर कधी आठी पडली नाही, आईला कधीच याचे ओझे वाटले नाही. जसे मी महिनोन महिने मीठाचा त्याग करून अळणी जेवत असे. कधी कधी असे व्हायचे की आठवडे न आठवडे मी जेवण सोडून फक्त दूध प्यायचो. कधी कधी ठरवायचो,आता 6 महिने गोड पूर्णपणे बंद. हिवाळ्यात मी उघड्यावर झोपायचो, मडक्यातील थंड पाण्याने आंघोळ करायचो. मी स्वतः ची परीक्षा घेत होतो. आई मला समजून घेत असे . ती कधीच तिचे म्हणणे लादत नसे. ती हेच म्हणायची, - ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा.

आईला कल्पना होती मी वेगळ्या वाटेने जात आहे. मला आठवते, एकदा आमच्या घराजवळच्या गिरी महादेव मंदिरात एक महात्मा आले होते. ते तपश्चर्या करायचे. मी मनापासून त्यांची सेवा करायचो. त्याच दरम्यान माझ्या मावशीचे लग्न होते. घरातील प्रत्येकाला तिथे जायचे होते. मामाच्या घरी जायचे होते, आपल्या बहिणीचे लग्न म्हणून आईही खूप उत्साहात होती. सगळे आपापल्या तयारीत व्यग्र होते, पण मी आईकडे गेलो आणि सांगितले की मला मावशीच्या लग्नाला यायचे नाही. आईने कारण विचारल्यावर मी तिला महात्माजींची गोष्ट सांगितली.

आईला, मी तिच्या बहिणीच्या लग्नाला येत नसल्याबद्दल वाईट वाटले, पण तिने माझ्या इच्छेचा आदर केला. ती म्हणाली की ठीक आहे,जशी तुझी इच्छा. पण तिला काळजी वाटत होती की मी घरी एकटा कसा राहणार? मला काही त्रास होऊ नये म्हणून तिने 4-5 दिवस कोरडे अन्न तयार करून घरात ठेवले होते.

जेव्हा मी घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाही माझ्या आईला ते खूप आधीपासूनच ठाऊक झाले होते, मी बोलता बोलता आई-बाबांना सांगत असे की बाहेर जाऊन जग काय आहे ते मला पाहावेसे वाटते. मी त्यांना म्हणायचो, रामकृष्ण मिशनच्या मठात मला जायचे आहे. मी त्यांच्याशी स्वामी विवेकानंदांबद्दलही खूप बोलायचो. आई-वडील हे सर्व ऐकत असत. हे असे अनेक दिवस सुरू होते.

शेवटी एक दिवस मी माझ्या पालकांना घर सोडण्याची माझी इच्छा सांगितली आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. माझे बोलणे ऐकून माझे वडील खूप दुःखी झाले. ते थोडे खिन्नपणे म्हणाले - तू जाणो आणि तुझे काम जाणो. पण असे आशीर्वाद न घेता घराबाहेर पडणार नाही, असे मी सांगितले. आईला माझ्याबद्दल सगळे माहीत होते. तिने पुन्हा माझ्या मनाचा आदर केला. ती म्हणाली,जे तुझे मन सांगत आहे तेच कर. तिने वडिलांच्या समाधानासाठी सुचवले की, त्यांची इच्छा असल्यास माझी जन्मपत्रिका कोणाला तरी दाखवून घ्यावी. आमच्या एका नातेवाईकाला ज्योतिषविषयक ज्ञान होते. माझी जन्मपत्रिका घेऊन बाबा त्यांना भेटले. कुंडली पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की "त्याचा मार्गच काही वेगळा आहे, जिथे देवाने ठरवले आहे, तिथेच तो जाईल".

त्यानंतर काही तासांतच मी घर सोडले. तोपर्यंत माझ्या वडिलांच्या मनाचीही तयारी झाली. वडिलांनी मला आशीर्वाद दिला. घरातून निघण्यापूर्वी आईने मला दही आणि गूळही खायला दिला. आता पुढे माझे जीवन कसे असणार हे तिला समजले होते. आईने मनाचा कितीही निर्धार केला तरी जेव्हा तिचे मूल घरापासून दूर जाते तेव्हा तिला दुःख होतेच . आईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते पण त्यात माझ्यासाठी खूप आशीर्वाद होते. 

घर सोडल्यानंतर , मी जिथे जिथे राहिलो, ज्या परिस्थितीत राहिलो, आईच्या आशीर्वादाची अनुभूती कायम माझ्यासोबत राहिली. आई माझ्याशी गुजरातीतच बोलते. गुजरातीमध्ये तू किंवा एकेरी हाक मारताना 'तू ' म्हणतात आणि तुम्हाला यासाठी 'तमे' म्हणतात. मी जेवढे दिवस घरात राहिलो तेवढे दिवस आई मला 'तू 'म्हणायची . पण जेव्हा मी घर सोडले, माझा मार्ग बदलला, त्यानंतर आईने कधीही मला 'तू 'म्हटले नाही. आजही ती मला आपण किंवा तमे असे संबोधते.

माझ्या आईने मला नेहमीच आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्यासाठी, गरिबांसाठी काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे. मला आठवतंय, जेव्हा माझे मुख्यमंत्री होणे निश्चित झाले तेव्हा मी गुजरातमध्ये नव्हतो. विमानतळावरून मी थेट आईला भेटायला गेलो. आनंदी झालेल्या आईचा पहिला प्रश्न होता, तू आता इथेच राहणार का? आईला माझे उत्तर माहीत होते. मग ती मला म्हणाली- "मला तुझे सरकारमधील काम समजत नाही पण तू कधीही लाच घेऊ नयेस हीच माझी इच्छा आहे ."

इथे दिल्लीत आल्यानंतर आईला भेटणेही कमी झाले आहे . जेव्हा गांधीनगरला जातो तेव्हा कधीकधी आईच्या घरी जाणे होते. आईशी भेट होते, फक्त काही क्षणांसाठी. पण आजपर्यंत मला माझ्या आईच्या मनात कसलीही नाराजी किंवा दुःख जाणवलेले नाही. आईचे प्रेम पूर्वीसारखेच आहे, आईचे आशीर्वाद पूर्वीसारखेच आहेत. आई नेहमी विचारते- दिल्लीत बरे वाटते का? मन रमते ना? 

ती मला वारंवार आश्वस्त करते की माझी काळजी करू नकोस, तुझ्यावरची जबाबदारी मोठी आहे. आईशी जेव्हा कधी फोनवर बोलणे होते तेव्हा ती सांगते, "हे बघ, कधीही चुकीचे काम करू नको, वाईट काम करू नकोस, गरिबांसाठी काम कर".

आज मी माझ्या आई आणि वडिलांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा जाणवणारी त्यांची सर्वात मोठी वैशिष्ठ्ये म्हणजे प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान. गरिबीशी संघर्ष करत असताना परिस्थिती कशीही असो, माझ्या पालकांनी कधीही प्रामाणिकपणाचा मार्ग सोडला नाही किंवा त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग त्यांच्याकडे होता - मेहनत, रात्रंदिवस मेहनत.

जोपर्यंत वडील हयात होते तोपर्यंत आपण कोणावरही भार होऊ नये, हे सूत्र त्यांनी पाळले. आजही माझी आई कोणावरही ओझे होऊ नये, यासाठी प्रयत्न करते ,जेवढे शक्य असेल तेवढे स्वत:चे काम स्वत: करावे या प्रयत्नात जगते.

आजही जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती नेहमी म्हणते की " मरेपर्यंत माझी कोणाला सेवा करावी लागू नये, चालत्या फिरत्या स्थितीमध्येच जग सोडून जाण्याची माझी इच्छा आहे.".

माझ्या आईच्या जीवनयात्रेत मला देशाच्या अखिल मातृशक्तीचे तप, त्याग आणि योगदानाचे दर्शन घडते. जेव्हा माझ्या आईच्या आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडते तेव्हा मला जाणवते, भारतातील भगिनी-कन्यांना अशक्य असे काहीच नाही.

अभावाच्या प्रत्येक कथेहून मोठी एका आईची गौरवगाथा असते.

संघर्षाच्या प्रत्येक क्षणापेक्षा खूप मोठी एका आईची इच्छाशक्ती असते.

आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे.

तुमच्यासाठी जाहीरपणे इतके लिहिण्याचे, बोलण्याचे धाडस कधी केले नव्हते.

आपले आरोग्य उत्तम राहो, आपला आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या चरणी वंदन !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India and natural farming…the way ahead!
December 03, 2025

In August this year, a group of farmers from Tamil Nadu met me and talked about how they were practising new agricultural techniques to boost sustainability and productivity. They invited me to a Summit on natural farming to be held in Coimbatore. I accepted their invite and promised them that I would be among them during the programme. Thus, a few weeks ago, on 19th November, I was in the lovely city of Coimbatore, attending the South India Natural Farming Summit 2025. A city known as an MSME backbone was hosting a big event on natural farming.

Natural farming, as we all know, draws from India’s traditional knowledge systems and modern ecological principles to cultivate crops without synthetic chemicals. It promotes diversified fields where plants, trees and livestock coexist to support natural biodiversity. The approach relies on recycling farm residues and enhancing soil health through mulching and aeration, rather than external inputs.

This Summit in Coimbatore will forever remain a part of my memory! It indicated a shift in mindset, imagination and confidence with which India’s farmers and agri-entrepreneurs are shaping the future of agriculture.

The programme included an interaction with farmers from Tamil Nadu, in which they showcased their efforts in natural farming and I was amazed!

I was struck by the fact that people from diverse backgrounds, including scientists, FPO leaders, first-generation graduates, traditional cultivators and notably people who had left high-paying corporate careers, decided to return to their roots and pursue natural farming.

I met people whose life journeys and commitment to doing something new were noteworthy.

There was a farmer who managed nearly 10 acres of multi-layered agriculture with bananas, coconuts, papaya, pepper and turmeric. He maintains 60 desi cows, 400 goats and local poultry.

Another farmer has dedicated himself to preserving native rice varieties like Mapillai Samba and Karuppu Kavuni. He focuses on value-added products, creating health mixes, puffed rice, chocolates and protein bars.

There was a first-generation graduate who runs a 15-acre natural farm and has trained over 3,000 farmers, supplying nearly 30 tonnes of vegetables every month.

Some people who were running their own FPOs supported tapioca farmers and promoted tapioca-based products as a sustainable raw material for bioethanol and Compressed Biogas.

One of the agri-innovators was a biotechnology professional who built a seaweed-based biofertilizer enterprise employing 600 fishermen across coastal districts; another developed nutrient-enriched bioactive biochar that boosts soil health. They both showed how science and sustainability can blend seamlessly.

The people I met there belonged to different backgrounds, but there was one thing in common: a complete commitment to soil health, sustainability, community upliftment and a deep sense of enterprise.

At a larger level, India has made commendable progress in the field. Last year, the Government of India launched the National Mission on Natural Farming, which has already connected lakhs of farmers with sustainable practices. Across the nation, thousands of hectares are under natural farming. Efforts by the Government such as encouraging exports, institutional credit being expanded significantly through the Kisan Credit Card (including for livestock and fisheries) and PM-Kisan, have also helped farmers pursuing natural farming.

Natural farming is also closely linked to our efforts to promote Shri Anna or millets. What is also gladdening is the fact that women farmers are taking to natural farming in a big way.

Over the past few decades, the rising dependence on chemical fertilisers and pesticides has affected soil fertility, moisture and long-term sustainability. At the same time, farming costs have steadily increased. Natural farming directly addresses these challenges. The use of Panchagavya, Jeevamrit, Beejamrit, and mulching protects soil health, reduces chemical exposure, and lowers input costs while building strength against climate change and erratic weather patterns.

I encouraged farmers to begin with ‘one acre, one season.’ The outcomes from even a small plot can build confidence and inspire larger adoption. When traditional wisdom, scientific validation and institutional support come together, natural farming can become feasible and transformative.

I call upon all of you to think of pursuing natural farming. You can do this by being associated with FPOs, which are becoming strong platforms for collective empowerment. You can explore a StartUp relating to this area.

Seeing the convergence between farmers, science, entrepreneurship and collective action in Coimbatore was truly inspiring. And, I am sure we will together continue making our agriculture and allied sectors productive and sustainable. If you know of teams working on natural farming, do let me know too!