भारत-फ्रान्स संयुक्त निवेदन

Published By : Admin | September 10, 2023 | 17:26 IST

नवी दिल्लीत सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान, आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्यूअल मॅक्रॉ यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमधे, याआधी पॅरिस इथे जुलै 2023 मध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीतील मुद्यांवर चर्चा, तसेच प्रगतीचा आढावा आणि मूल्यमापन करण्यात आले. तसेच, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर देखील दोन्ही नेत्यांनी आपले विचार मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 आणि 14 जुलै रोजी फ्रांसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मुख्य पाहुणे म्हणून केलेल्या ऐतिहासिक फ्रांस दौऱ्याच्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्यूअल मॅक्रॉ यांचा हा भारत दौरा आहे. हे वर्ष भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक भागीदारीचे रौप्यमहोत्सवी वर्षही आहे.

परस्परांवरील प्रगाढ विश्वास, समान मूल्ये, सार्वभौमत्व आणि राजनैतिक स्वायत्तता, आंतरराष्ट्रीय कायद्यांविषयी आणि संयुक्त राष्ट्रांच्या घटनेतील मूल्ये याविषयी दृढ वचनबद्धता, बहुराष्ट्रीयत्वावर अढळ विश्वास आणि स्थिर बहु ध्रुवीय जगासाठी परस्पर  सहकार्य अशा भक्कम पायावर भारत- फ्रांस भागीदारीची सुरुवात झाली होती, त्यामुळे या भागीदारीची ताकद लक्षात घेत, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठीचा सहयोग अधिक विस्तारण्याच्या गरजेवर भर दिला. आजच्या अस्थिर परिस्थितीत, जगाची घडी पुन्हा एकदा सुव्यवस्थित करण्यासाठी, जागतिक कल्याणासाठीची शक्ती म्हणून, ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हा संदेश घेऊन, एकत्रित काम करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

‘क्षितिज 2047’ च्या आराखड्यासह, हिंद-प्रशांत क्षेत्र आराखडा आणि पंतप्रधान मोदी यांच्या पॅरिस दौऱ्यातील चर्चेचे फलित, हे आजच्या बैठकीतील संदर्भाचे मुद्दे ठरले. दोन्ही नेत्यांनी या मुद्यांवरील सर्वांगीण प्रगती आणि संरक्षण, अवकाश, अणूऊर्जा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, महत्वाचे तंत्रज्ञान, हवामान बदल, शिक्षण आणि लोकांमधील संपर्क अशा नव्या आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी पुढचे पाऊल टाकण्यावर चर्चा केली. 

हिंद-प्रशांत प्रदेश आणि आफ्रिका या भागात, भारत-फ्रांस भागीदारीविषयीची चर्चा देखील या बैठकीत पुढे नेण्यात आली. यात, पायाभूत सुविधा, दळणवळण, ऊर्जा, जैव विविधता, शाश्वतता आणि औद्योगिक प्रकल्प अशा विषयांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी, हिंद-प्रशांत प्रदेशात परस्पर सहकार्याद्वारे, भारत-फ्रांसने एकत्रित सुरू केलेले आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य विषयक आराखड्यातील सहयोग आणि आपत्तीत टिकून राहू शकतील अशा पायाभूत सुविधा उभारण्यातील सहकार्य यासाठी आपली भूमिका अधोरेखित केली.

भारताला  मिशन चांद्रयान 3 मोहीमेत मिळालेल्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी भारत-फ्रान्स अंतराळ सहकार्याच्या सहा दशकांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि जून 2023 मध्ये पहिला सामरिक अंतराळ संवाद आयोजित केल्यापासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी भारत-फ्रान्स यांच्यातील  नागरीवापरासाठीच्या दृढ आण्विक ऊर्जा सहकार्य,  जैतापूर अणु प्रकल्पासाठीच्या वाटाघाटींमध्ये चांगली प्रगती आदी बाबी यांची खातरजमा केली आणि एस एम आर-ए एम आर तंत्रज्ञान सह-विकसित करण्यासाठी भागीदारी स्थापन करण्याकरता द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंकडून सातत्याने दाखवल्या जात असलेल्या प्रतिबद्धतेचे स्वागत केले.  तसेच इच्छापत्राच्या समर्पित जाहिरनाम्यावर केल्या जाणाऱ्या आगामी स्वाक्षरी बाबतही उत्सुकता प्रदर्शित केली.  आण्विक पुरवठादार गटातील भारताच्या सदस्यत्वासाठी फ्रान्सने आपल्या दृढ आणि भक्कम पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी, रचना, विकास, चाचणी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि त्यासाठीचे माध्यम  यामधील भागीदारीद्वारे संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्र आणि त्या व्यतिरिक्त तिसर्‍या देशांसह भारतात उत्पादन वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  या संदर्भात, त्यांनी संरक्षण औद्योगिक कृती आराखड्याला त्वरित अंतिम रूप देण्याचेही आवाहन केले.

डिजिटल, विज्ञान, तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष, शिक्षण, संस्कृती, आरोग्य आणि पर्यावरण सहकार्य यासारख्या क्षेत्रांवर भर देत, दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी इंडो-फ्रेंच कॅम्पस मॉडेलच्या धर्तीवर, या कार्यपरिघातील संस्थात्मक संबंध मजबूत करण्याचे आवाहन केले.  या संदर्भात, त्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि संग्रहालयांच्या विकासासाठी एकत्र काम करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि अधिक स्थिर जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सर्वसमावेशकता, एकात्मता आणि एकजिनसीपणा  वाढवू पाहणाऱ्या जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदासाठी फ्रान्सने सातत्याने देऊ केलेल्या पाठिंबाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.  भारत आणि फ्रान्सने आफ्रिकी महासंघाच्या G-20 सदस्यत्वाचे स्वागत केले आणि आफ्रिका खंडाच्या प्रगती, समृद्धी आणि विकासासाठी आफ्रिकी महासंघा सोबत काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report

Media Coverage

Aadhaar, digital payments cut India's welfare leakage by 13%: BCG Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 डिसेंबर 2025
December 22, 2025

Aatmanirbhar Triumphs: PM Modi's Initiatives Driving India's Global Ascent