प्रसार भारती म्हणजेच आकाशवाणी (AIR) आणि दूरदर्शनच्या (DD) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय क्षेत्र योजना “प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास” (BIND) च्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. मंत्रालयाची "प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास" ही योजना प्रसार भारतीला तिच्या प्रसारण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी, आशयसामग्री विकासासाठी आणि संस्थेशी संबंधित नागरी कार्याशी संबंधित खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे साधन आहे.
प्रसार भारती, देशातील सार्वजनिक प्रसारक म्हणून, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देशातील विशेषत: दुर्गम भागातील लोकांसाठी माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि सहभागाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. प्रसार भारतीने कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य संदेश आणि जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
BIND योजना सार्वजनिक प्रसारकांना त्याच्या सुविधांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधांसह मोठे आधुनिकीकरण करण्यास सक्षम करेल ज्यामुळे नक्षलग्रस्त, सीमावर्ती आणि धोरणात्मक क्षेत्रांसह त्यांची व्याप्ती वाढवेल आणि दर्शकांना उच्च दर्जाची आशयसामग्री प्रदान करेल. या योजनेचे आणखी एक प्रमुख प्राधान्याचे क्षेत्र म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी उच्च-गुणवत्तेच्या आशयसामग्रीचा विकास करणे आणि अधिक वाहिन्या सामावून घेण्यासाठी डीटीएच प्लॅटफॉर्मची क्षमता सुधारून दर्शकांना विविध आशयसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करणे. ओबी व्हॅनची खरेदी आणि डीडी आणि एआयआर स्टुडिओचे डिजिटल आधुनिकीकरण त्यांना एचडी बनवण्यासाठी देखील प्रकल्पाचा एक भाग म्हणून केले जाईल.
सध्या, दूरदर्शन 28 प्रादेशिक वाहिन्यांसह 36 टीव्ही चॅनेल चालवते आणि आकाशवाणी 500 हून अधिक प्रसारण केंद्रे चालवते. या योजनेमुळे देशातील AIR FM ट्रान्समीटरची व्याप्ती भौगोलिक क्षेत्रानुसार 66% आणि लोकसंख्येनुसार 80% पर्यंत वाढेल जे आधी अनुक्रमे 59% आणि 68% होते. या योजनेत दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना 8 लाखांहून अधिक DD मोफत डिश STB चे मोफत वितरण करण्याची योजना आहे.
सार्वजनिक प्रसारणाची व्याप्ती वाढवण्याबरोबरच, प्रसारणाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि वाढ करण्याच्या प्रकल्पामध्ये प्रसारण उपकरणांच्या पुरवठा आणि स्थापनेशी संबंधित उत्पादन आणि सेवांद्वारे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची क्षमता देखील आहे. आकाशवाणी आणि डीडीसाठी आशयसामग्री निर्मिती आणि आशयसामग्री नवोन्मेषामध्ये टीव्ही/रेडिओ उत्पादन, प्रसारण आणि संबंधित माध्यमांशी संबंधित सेवांसह आशयसामग्री उत्पादन क्षेत्रातील विविध माध्यम क्षेत्रांचा विविध अनुभव असलेल्या व्यक्तींच्या अप्रत्यक्ष रोजगाराची क्षमता आहे. तसेच, डीडी फ्री डिशचा विस्तार करण्याच्या प्रकल्पामुळे डीडी फ्री डिश डीटीएच बॉक्सेसच्या निर्मितीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
भारत सरकार दूरदर्शन आणि आकाशवाणी (प्रसार भारती) पायाभूत सुविधा आणि सेवांच्या विकास, आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते, जी एक निरंतर प्रक्रिया आहे.