विवेक गोएंकाजी, भाई अनंत, जॉर्ज वर्गिसजी, राजकमल झा, इंडियन एक्सप्रेस समूहातील सर्व सहकारी, मान्यवर, इथे उपस्थित अन्य महानुभाव, स्त्री आणि पुरुषहो,
आज आपण सर्वजण अशा एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोकचळवळीच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथजी यांनी एक दूरदर्शी म्हणून, एक संस्था निर्माते म्हणून, एक राष्ट्रवादी म्हणून आणि एक माध्यम अग्रणी म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र नाही, तर एक मिशन म्हणून भारतातील लोकांसमोर स्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह, भारताची लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. म्हणूनच 21 व्या शतकातील या कालखंडात जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा रामनाथजी यांची बांधिलकी, त्यांचे प्रयत्न, त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानतो, त्यांनी मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
रामनाथजी गीतेच्या एका श्लोकापासून खूप प्रेरणा घेत असत, सुख दुःखे समे कृत्वा, लाभा-लाभौ जया-जयौ। ततो युद्धाय युज्यस्व, नैवं पापं अवाप्स्यसि।। अर्थात सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय याकडे समान भावनेने पाहून कर्तव्य-पालनासाठी युद्ध करा, असे केल्याने तुम्ही पापात भागीदार बनणार नाही. रामनाथजी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान काँग्रेसचे समर्थक होते, नंतर जनता पार्टी चे देखील समर्थक राहिले, त्यानंतर जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढले, विचारधारा कोणतीही असो, त्यांनी देशहिताला प्राधान्य दिले. ज्या लोकांनी रामनाथजी यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केले, ते कितीतरी किस्से सांगतात जे रामनाथजी यांनी त्यांना सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर जेव्हा हैदराबाद आणि रजाकारांच्या अत्याचाराचा विषय आला, तेव्हा रामनाथजी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची कशी मदत केली, सत्तरच्या दशकात जेव्हा बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनाला नेतृत्वाची गरज होती, तेव्हा नानाजी देशमुख यांच्या साथीने रामनाथजी यांनी जेपी यांना त्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी तयार केले. आणीबाणी दरम्यान, जेव्हा रामनाथजी यांना इंदिऱा गांधी यांच्या सर्वात निकटच्या मंत्र्याने बोलावून धमकावले की तुम्हाला तुरुंगात टाकेन, तेव्हा या धमकीच्या प्रत्युत्तरादाखल रामनाथजी यांनी जे उत्तर दिले होते, हे सगळे इतिहासात लपलेले दस्तावेज आहेत. काही गोष्टी सार्वजनिक झाल्या, काही नाही झाल्या, मात्र या गोष्टींवरून लक्षात येते की रामनाथजी यांनी नेहमी सत्याची साथ दिली, नेहमी कर्तव्य सर्वोपरि मानले, भले समोर कितीही मोठी ताकद का असेना.

मित्रहो,
रामनाथजी यांच्याबाबत म्हटले जायचे की ते खूप अधीर होते. अधीरता, नकारात्मक अर्थाने नाही, सकारात्मक अर्थाने. ती अधीरता जी परिवर्तनासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करायला लावते, ती अधीरता जी स्थिर पाण्यात देखील गतिमानता निर्माण करते. अगदी तसेच, आजचा भारत देखील अधीर आहे. भारत विकसित होण्यासाठी अधीर आहे, भारत आत्मनिर्भर होण्यासाठी अधीर आहे, आपण सर्वजण पाहत आहोत, एकविसाव्या शतकातील पंचवीस वर्षे किती वेगाने सरली. एकापेक्षा एक कठीण आव्हाने आली, मात्र ती भारताची गती रोखू शकली नाहीत.
मित्रहो,
तुम्ही पाहिले आहे, गेली चार-पाच वर्षे संपूर्ण जगासाठी किती आव्हानात्मक होती. 2020 मध्ये, कोरोना महामारीचे संकट आले, जगभरातील अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्या. जागतिक पुरवठा साखळ्यांवर मोठा परिणाम झाला आणि संपूर्ण जग निराशेच्या गर्तेत जाऊ लागले. काही काळानंतर, परिस्थिती हळूहळू पूर्ववत होऊ लागली, तेव्हा आपल्या शेजारी देशांमध्ये उलथापालथ सुरु झाली. इतकी संकटे येऊनही आपल्या अर्थव्यवस्थेने उच्च विकासदर साध्य करून दाखवला. वर्ष 2022 मध्ये युरोपीय संकटामुळे संपूर्ण जगातील पुरवठा साखळी आणि ऊर्जा बाजारपेठ प्रभावित झाली. याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला. मात्र तरीही 2022-23 मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ जलद गतीने होत राहिली. वर्ष 2023 मध्ये पश्चिम आशियात परिस्थिती बिघडली, तेव्हाही आपल्या विकास दराने जलद गती कायम राखली आणि यावर्षी देखील जेव्हा जगभरात अस्थिरता आहे, तेव्हाही आपला विकासदर सात टक्क्यांच्या आसपास आहे.
मित्रहो,
आज, जेव्हा जगाला अडथळे येण्याची भीती वाटत आहे, तेव्हा भारत एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पुढे जात आहे. आज इंडियन एक्सप्रेसच्या या मंचावरून मी म्हणू शकतो, भारत केवळ एक उदयोन्मुख बाजारपेठच नाही, भारत एक उदयोन्मुख मॉडेल देखील आहे. आज जग भारतीय विकास मॉडेलला आशेचे मॉडेल मानत आहे.

मित्रहो,
एक मजबूत लोकशाही अनेक निकषांवर तपासली जाते आणि अशीच एक मोठी कसोटी लोकशाहीत लोकांच्या सहभागाची असते. लोकशाहीवरील लोकांचा विश्वास, लोक किती आशावादी आहेत हे निवडणुकांदरम्यान सर्वात जास्त दिसून येते. आता 14 नोव्हेंबर रोजी जे निकाल आले, ते तुम्हाला आठवत असतील आणि रामनाथजी यांचेही बिहारशी नाते होते, त्यामुळे उल्लेख होणे अगदी स्वाभाविक आहे. या ऐतिहासिक निकालांसोबत आणखी एक महत्त्वाची बाब दिसून आली. लोकशाहीत कुणीही आपल्या नागरिकांच्या वाढत्या सहभागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यावेळी, बिहारने त्याच्या इतिहासात सर्वाधिक मतदान नोंदवले आहे. जरा विचार करा, महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा सुमारे नऊ टक्के जास्त आहे. हा देखील लोकशाहीचा विजय आहे.
मित्रहो,
बिहारमधील निकालांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की भारतातील लोकांच्या आकांक्षा किती जास्त आहेत. भारतातील लोक आज अशा राजकीय पक्षांवर विश्वास ठेवतात जे प्रामाणिकपणे त्या आकांक्षा पूर्ण करतात, विकासाला प्राधान्य देतात. आणि आज इंडियन एक्सप्रेसच्या या मंचावरून प्रत्येक राज्य सरकारला , प्रत्येक पक्षाच्या राज्य सरकारला अतिशय विनम्रतेने सांगेन, डावे, उजवे किंवा केंद्रातील, प्रत्येक विचारसरणीच्या सरकारला मी आग्रहाने सांगेन की बिहारच्या निकालांमधून मिळालेला धडा लक्षात घ्या, आज तुम्ही कशा प्रकारे सरकार चालवत आहात. ते येणाऱ्या काळात राजकीय पक्षांचे भविष्य ठरवेल. आरजेडीच्या सरकारला बिहारच्या लोकांनी 15 वर्षे संधी दिली, लालू यादवजी यांची इच्छा असती तर बिहारच्या विकासासाठी खूप काही करू शकले असते मात्र त्यांनी जंगलराजचा मार्ग निवडला. बिहारचे लोक हा विश्वासघात कधीही विसरु शकत नाहीत. म्हणूनच आज देशात जी काही सरकारे आहेत, मग ते केंद्रातील आमचे सरकार असो किंवा राज्यातील विविध पक्षांची सरकारे असोत, विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे - विकास आणि फक्त विकास. म्हणूनच मी सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी स्पर्धा करा, व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी स्पर्धा करा आणि विकासाचे मापदंड उंचावण्यासाठी स्पर्धा करा , मग बघा जनता कशी तुमच्यावर विश्वास ठेवते.
मित्रहो,
बिहारमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर काही लोकांनी, माध्यमांतील काही मोदी प्रेमींनी पुन्हा हे म्हणायला सुरुवात केली की भाजपा, मोदी हे अहोरात्र सतत निवडणूक मोडमध्येच वावरत असतात. मला असे वाटते की निवडणूक जिंकण्यासाठी चोवीस तास निवडणूक मोडमध्ये राहणे आवश्यक नाही, तर चोवीस तास भावनिक मोड मध्ये राहणे गरजेचे आहे. जेव्हा मनात सतत एक बेचैनी असते, असे वाटते की एक मिनिट देखील वाया घालवता कामा नये, गरिबांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, गरिबांना रोजगार देण्यासाठी, गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी, मध्यम वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त मेहनत करत राहायचे आहे. या विचारासह, या भावनेसह सरकार सतत काम करत असेल तर त्याचे परिणाम आम्हाला निवडणूक निकालाच्या दिवशी दिसून येतात. बिहारमध्ये देखील आपण हेच होताना पाहिले आहे.

मित्रहो,
रामनाथजी यांच्याशी संबंधित आणखी एका घटनेचा उल्लेख कोणीतरी माझ्याशी बोलताना केला होता. रामनाथजी यांना विदिशा मतदारसंघातून जनसंघाचे तिकीट मिळाले होते तेव्हाची ही घटना आहे. त्यावेळी संघटना महत्त्वाची असते की उमेदवाराचा चेहरा या विषयावर नानाजी देशमुख यांच्याशी त्यांची चर्चा सुरु होती. तेव्हा नानाजी देशमुख यांनी रामनाथजींना सांगितले होते की तुम्ही फक्त अर्ज भरायला या आणि मग निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र घ्यायला या. त्यानंतर नानाजींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर रामनाथजींतर्फे निवडणूक लढली आणि त्यांना जिंकून आणले. खरेतर ही घटना सांगण्याच्या मागे माझा असा उद्देश नाहीये की उमेदवाराने केवळ अर्ज भरण्यापुरते मतदारसंघात जावे. तर भाजपाच्या असंख्य कर्तव्यपरायण कार्यकर्त्यांच्या समर्पणाच्या भावनेकडे तुम्हा सर्वांचे लक्ष वेधणे हा माझा उद्देश आहे.
मित्रहो,
भारतीय जनता पक्षाच्या लाखो-कोट्यवधी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घामाने भाजपाची मुळे जोपासली आहेत आणि ते आज देखील हे कार्य करत आहेत. एवढेच नव्हे तर केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर अशा काही राज्यांमध्ये आमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने देखील भाजपाची मुळे मजबूत केली आहेत. ज्या पक्षाकडे असे समर्पित कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी केवळ निवडणूक जिंकणे हेच ध्येय नसते तर ते जनतेचे हृदय जिंकण्यासाठी सेवाभावी वृत्तीने त्यांच्यासाठी अखंड काम करत राहतात.
मित्रहो,
देशाचा विकास होण्यासाठी विकासाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असते. दलित-पिडीत-शोषित-वंचित अशा सर्वांना सरकारी योजनांचा फायदा होतो तेव्हा सामाजिक न्यायाची सुनिश्चिती होत असते. मात्र, काही पक्षांनी, काही कुटुंबांनी गेल्या काही दशकांमध्ये सामाजिक न्यायाच्या नावावर स्वतःचाच स्वार्थ साधला आहे हे आपण पाहिले.

मित्रहो,
आज आपला देश सामाजिक न्यायाला वास्तवात साकार होताना बघत आहे याचे मला समाधान आहे. खरा सामाजिक न्याय काय असतो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या गरिबांना उघड्यावर शौचाला जाणे भाग पडत होते त्यांच्या जीवनात 12 कोटी शौचालयांच्या निर्मिती अभियानाने सन्मान आणला. पूर्वीच्या सरकारांनी ज्या लोकांना एक बँक खाते उघडण्याच्या देखील लायकीचे समजले नव्हते त्या लोकांचे 57 कोटी जनधन बँक खात्यांमुळे आर्थिक समावेशन झाले. 4 कोटी गरिबांना मिळालेल्या पक्क्या घरांमुळे नवी स्वप्ने बघायचे धाडस दिले, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढवली आहे.
मित्रहो,
गेल्या 11 वर्षांमध्ये सामाजिक सुरक्षिततेबाबत जे काम झाले आहे ते अचाट आहे. आज भारतातील सुमारे 94 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षिततेचे कवच लाभले आहे. आणि तुम्हाला माहित आहे 10 वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती? तेव्हा केवळ 25 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षितता लाभली होती आज ही संख्या 94 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजे तेव्हा केवळ 25 कोटी लोकांना सरकारच्या सामाजिक सुरक्षितता योजनांचा लाभ मिळू शकला होता. आता 94 कोटी लोक या योजनांचा लाभ घेत आहेत आणि हाच तर खरा सामाजिक न्याय आहे. आम्ही सामाजिक सुरक्षेच्या कवचाचा केवळ परिघच वाढवला नाही तर आम्ही सातत्याने संपृक्ततेसंदर्भात काम करत आहोत. संपृक्तता म्हणजेच कोणत्याही योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घेणे. आणि जेव्हा एखादे सरकार या उद्दीष्टासह काम करते, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा धरुन काम करते तेव्हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची शक्यता देखील राहत नाही. अशाच प्रयत्नांमुळे गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात करून दाखवली आहे. म्हणून तर आज जगाने सुद्धा मान्य केले आहे – डेमोक्रॅसी डिलिव्हर्स.
मित्रहो,
मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देईन. तुम्ही आमच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा नीट अभ्यास करा, देशभरातील शंभरपेक्षा जास्त जिल्हे असे होते, ज्यांना पूर्वीच्या सरकारांनी मागासलेले म्हणून घोषित केले आणि नंतर ते जिल्हे विस्मृतीत गेले. त्या जिल्ह्यांमध्ये विकास करणे अत्यंत कठीण आहे, त्यांच्यासाठी कोण कष्ट घेणार असाच विचार करण्यात येत होता. जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा देण्यासाठी नेमणूक करायची वेळ येत असे तेव्हा त्याला अशा जिल्ह्यांमध्ये पाठवून देण्यात येत असे, की जा, तिथेच रहा. या मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये देशाची किती लोकसंख्या वसलेली होती ते तुम्हाला माहित आहेत का? देशाचे 25 कोटींहून अधिक नागरिक या मागासलेल्या जिल्ह्यांचे निवासी होते.

मित्रहो,
जर हे मागासलेले जिल्हे मागासलेलेच राहिले असते तर भारत येत्या 100 वर्षांत देखील विकसित होऊ शकला नसता. म्हणूनच आमच्या सरकारने एका नव्या रणनीतीसह काम करायला सुरुवात केली. आम्ही राज्य सरकारांना सहभागी करून घेतले, कोणता जिल्हा कुठल्या विकास मापदंडाबाबत मागासलेला आहे, त्याचा अभ्यास करून एक स्वतंत्र रणनीती तयार केली. देशातील उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची, हुशार आणि कल्पक तरुण अधिकाऱ्यांची या जिल्ह्यांमध्ये नेमणूक केली, मुळात या जिल्ह्यांना मागासलेले नव्हे तर आकांक्षित मानले आणि आज पहा, देशातील हे आकांक्षित जिल्हे अनेकानेक विकास मापदंडांच्या बाबतीत स्वतःच्या राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा उत्तम कामगिरी करून दाखवत आहेत. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा तर तुम्हा सर्वांचा फार आवडता जिल्हा आहे. एकेकाळी तुम्हा पत्रकारांना तेथे जायचे असेल तर प्रशासनापेक्षा इतर संघटनांकडून परवानगी घ्यावी लागत होती. मात्र आज हाच बस्तर जिल्हा विकासाच्या मार्गावर आगेकूच करत आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाने बस्तर ऑलिम्पिकच्या किती बातम्या दिल्या ते मला माहित नाही, पण आज रामनाथजी असते तर बस्तरमधील तरुण कशा प्रकारे बस्तर ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेचे आयोजन करत आहेत हे पाहून ते खूप आनंदित झाले असते.
मित्रहो,
बस्तरचा विषय निघालाच आहे तर आज या मंचावरून मी नक्षलवाद म्हणजेच माओवादी दहशतवादाची देखील चर्चा करेन. संपूर्ण देशात आता नक्षलवाद-माओवादाची दहशत वेगाने कमी होऊ लागली आहे, मात्र काँग्रेसमध्ये हा दहशतवाद तितक्याच वेगाने सक्रीय होऊ लागला आहे.तुम्हाला हे माहितच आहे की गेल्या पाच दशकांपर्यंत आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक मोठे राज्य, माओवादी दहशतीखाली दबलेले होते. मात्र, भारताचे संविधान नाकारणाऱ्या माओवादी दहशतवादाला काँग्रेस पोसत राहिली आणि केवळ दुर्गम भागातील जंगलांमध्येच नव्हे तर शहरांमध्ये देखील कॉंग्रेसने नक्षलवादाला मुळांना खतपाणी घातले. काँग्रेसने मोठमोठ्या संस्थांमध्ये शहरी नक्षलवाद्यांना शिरकाव करून दिला आहे.
मित्रहो,
10-15 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात पाय रोवणारे शहरी नक्षलवादी आणि माओवाद्यांनी आता काँग्रेस पक्षाचे मुस्लिम लीग-माओवादी काँग्रेस (एमएमसी) मध्ये रूपांतर केले आहे. आणि मी आज पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे की या मुस्लीम लीग-माओवादी काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रीय हिताचा त्याग केला आहे. आजची मुस्लीम लीग-माओवादी काँग्रेस देशाच्या एकतेसाठी एक मोठा धोका ठरते आहे.

मित्रहो,
आज, भारत विकासाच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत असताना, रामनाथ गोएंका यांचा वारसा अधिकच प्रासंगिक आहे. रामनाथ गोएंका यांनी ब्रिटीश राजवटीला धाडसाने आव्हान दिले. त्यांनी त्यांच्या एका संपादकीय लेखात लिहिले होते, "त्यांच्या आदेशांचे पालन करण्यापेक्षा मी माझे वृत्तपत्र बंद करणे पसंत करेन." आणीबाणीच्या नावाखाली देशाला गुलाम बनवण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला, तेव्हा सुद्धा रामनाथ गोएंका ठाम राहिले आणि या वर्षी आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. कोरे संपादकीय सुद्धा लोकांना गुलाम बनवणाऱ्या मानसिकतेला आव्हान देऊ शकतात, हे इंडियन एक्सप्रेसने 50 वर्षांपूर्वी दाखवून दिले होते.
मित्रहो,
तुमच्या या आदरणीय व्यासपीठावरून, ‘गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती’ या विषयावर मी आज सविस्तर बोलणार आहे. पण यासाठी आपल्याला 190 वर्षे मागे जावे लागेल. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वीची गोष्ट आहे. ते वर्ष होते 1835. 1835 साली, ब्रिटिश खासदार थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले यांनी भारताला समूळ नष्ट करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली. त्यांनी घोषित केले की "मी असे भारतीय निर्माण करेन जे दिसायला भारतीय असतील पण मनाने इंग्रजी असतील." हे साध्य करण्यासाठी, मॅकॉले यांनी भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये केवळ आमूलाग्र बदल केले नाहीत तर ती पूर्णपणे नष्ट केली. गांधीजींनी स्वतः म्हटले होते की भारताची प्राचीन शिक्षण प्रणाली एक सुंदर वृक्ष होती, जी उपटून नष्ट करण्यात आली.
मित्रहो,
भारताच्या शिक्षण प्रणालीने आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकवले. भारताच्या शिक्षण प्रणालीने कौशल्यांइतकाच अभ्यासावरही भर दिला. म्हणूनच मॅकॉले यांनी भारताच्या शिक्षण प्रणालीचा कणा तोडण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वी झाला. त्या काळात ब्रिटीश भाषा आणि ब्रिटिश विचारसरणीला अधिक मान्यता मिळाली आणि भारताला येणाऱ्या शतकानुशतके त्याचे परिणाम भोगावे लागले.
मित्रहो,
मॅकॉले यांनी आमचा आत्मविश्वास मोडून काढला आणि आमच्यात कनिष्ठतेची भावना निर्माण केली. अगदी एका घावात, मॅकॉले यांनी आमचे हजारो वर्षांचे ज्ञान आणि विज्ञान, आमची कला आणि संस्कृती आणि आमची संपूर्ण जीवनशैली कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. तिथेच अशा मानसिकतेचे बीज पेरले गेले की भारतीयांना प्रगती करायची असेल, त्यांना काहीतरी मोठे साध्य करायचे असेल तर त्यांना ते परदेशी पद्धतींनीच करावे लागेल. आणि स्वातंत्र्यानंतरही ही भावना जास्तच प्रबळ झाली. आपले शिक्षण, आपली अर्थव्यवस्था, आपल्या सामाजिक आकांक्षा असे सर्व काही परदेशी प्रभावांशी जोडले गेले. आपल्या स्वतःच्या गोष्टींबद्दल अभिमानाची भावना कमी झाली. गांधीजींनी ज्या स्वदेशीवर स्वातंत्र्याचा पाया रचला, त्या स्वदेशीचा आदर कमी होऊ लागला. आपण परदेशात प्रशासनाचे आदर्श शोधू लागलो. आपण परदेशात नवोपक्रम शोधू लागलो. या मानसिकतेमुळे समाजात आयातित कल्पना, आयातित वस्तू आणि सेवा श्रेष्ठ मानण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे.
मित्रहो,
जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचा आदर करत नाही, तेव्हा तुम्ही स्वदेशी परिसंस्थेला नाकारता, तुम्ही मेड इन इंडिया उत्पादन परिसंस्थेला नाकारता. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो: पर्यटन. तुम्हाला दिसेल की ज्या देशात पर्यटनाची भरभराट होते, तो देश आणि तेथील लोक त्यांच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगतात. आपल्याकडे उलट घडले आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर, आपल्या वारशाचा अनादर करण्याचे प्रयत्न झाले. आपल्यालाच आपल्या वारशाचा अभिमान नसेल तर तो जतन केला जाणार नाही. जेव्हा त्याचे जतन केले जात नाही, तेव्हा आपण त्यांना विटा आणि दगडाच्या अवशेषांसारखे वागवत राहतो आणि तेच घडले. आपल्या वारशाचा अभिमान असणे ही पर्यटनाच्या विकासासाठी आवश्यक अट आहे.
मित्रहो,
स्थानिक भाषांच्या बाबतीतही हेच लागू होते. आपल्या स्वतःच्या भाषांचा अनादर होतो, असे कोणत्या देशात घडते? जपान, चीन आणि कोरियासारख्या देशांनी अनेक पाश्चात्य पद्धती स्वीकारल्या तरीही आपली स्वतःची भाषा टिकवून ठेवली आणि त्या बाबतीत तडजोड केली नाही. म्हणूनच, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आम्ही स्थानिक भाषांमध्ये शिक्षणावर विशेष भर दिला आहे. आणि मी अगदी स्पष्टपणे सांगेन: इंग्रजी भाषेला आमचा विरोध नाही; आम्ही भारतीय भाषांना समर्थन देतो.
मित्रहो,
1835 साली मॅकॉले यांनी केलेल्या गुन्ह्याला 2035 साली 200 वर्षे पूर्ण होतील. म्हणून, आज तुमच्या माध्यमातून मी संपूर्ण देशाला आवाहन करू इच्छितो: पुढच्या 10 वर्षांत, आपण भारताला मॅकॉले यांनी निर्माण केलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्याकडे खूप महत्त्वाची 10 वर्षे आहेत. मला एक छोटीशी घटना आठवते. गुजरातमध्ये कुष्ठरोग्यांसाठी एक रुग्णालय बांधले जात होते, त्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी काही लोकांनी महात्मा गांधींची भेट घेतली, तेव्हा महात्माजी म्हणाले की मी कुष्ठरोग रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येणार नाही, पण त्याला कुलूप लावावे लागले, तर त्या दिवशी मला फोन करा, मी ते कुलूप लावण्यासाठी येईन. गांधीजींच्या हयातीत त्या रुग्णालयाला कुलूप लागले नाही, परंतु जेव्हा गुजरात कुष्ठरोगमुक्त झाले, तेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो आणि मला त्या रुग्णालयाला कुलूप लावण्याची संधी मिळाली होती. 1835 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आपल्याला 2035 पर्यंत पूर्ण करायचा आहे, त्या रूग्णालयाला कुलूप लावण्याचे गांधीजींचे स्वप्न होते, तसेच माझेही स्वप्न आहे की आपण त्या शिक्षण व्यवस्थेला कुलूप लावू.
मित्रहो,
मी तुमच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली आहे. आता मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. इंडियन एक्सप्रेस ग्रुप हा देशातील प्रत्येक बदलाचा, देशाच्या प्रत्येक विकासगाथेचा साक्षीदार राहिला आहे आणि आज, भारत विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, आम्ही या प्रवासात सहभागी होत आहोत. रामनाथजींचे विचार जपण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. पुन्हा एकदा, या अद्भुत आयोजनासाठी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि, रामनाथ गोएंकाजींना आदरपूर्वक नमन करून मी माझे बोलणे संपवतो. अनेकानेक आभार!


