मुंबई मेट्रो लाईन 3 वरील आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पाची केली पायाभरणी
नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाची केली पायाभरणी
ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून, राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ठाण्यातून अनेक परिवर्तनकारी प्रकल्पांचा शुभारंभ होत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय, संकल्प आणि उपक्रम विकसित भारतच्या ध्येयाप्रति समर्पित आहे: पंतप्रधान

भारत माता की जय,

भारत माता की जय !!

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य सरकारमधील इतर मंत्रीगण, खासदार, आमदार तसेच अन्य वरिष्ठ अतिथी आणि महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

महाराष्ट्राच्या देवी शक्तीची साडेतीन शक्तिपीठे, तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, माहुरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तश्रृंगी देवी, यांना कोटी-कोटी वंदन करतो. मी ठाण्याच्या भूमीवरून श्री कोपिनेश्वराच्या चरणी प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी नमन करतो.

 

बंधू- भगिनींनो,

आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी आणि महाराष्ट्राचाच सन्मान आहे असे नाही. ही गोष्ट म्हणजे ज्या परंपरेने देशाला ज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली; त्या विशेष परंपरेचा सन्मान आहे. यासाठी देशातील आणि अवघ्या विश्वातील मराठी बोलणा-या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

नवरात्रामध्ये मला एका पाठोपाठ एक अनेक विकास कामांच्या लोकार्पणाचे आणि पायाभरणी करण्याचे सद्भाग्य लाभत आहे. ठाणे इथे पोहोचण्याच्या आधी मी वाशिममध्ये होतो. तिथून देशातील साडे 9 कोटी शेतकरी बांधवांना किसान सन्मान निधीचा हप्ता जारी केला गेला आणि अनेक विकास प्रकल्पांचे लोकर्पण करण्याची संधी मला मिळाली. आता ठाण्यामधून महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे अनेक मोठे र्कीर्तीमान रचले जात आहे. मुंबई -एमएमआर आणि महाराष्ट्राच्या विकासाचा  हा अतिवेगवान – ‘सुपरफास्ट स्पीड’ म्हणजे, आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवणारा आहे. आज महायुती सरकारने मुंबई-एमएमआरमध्ये 30 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प सुरू केले आहेत. नवी मुंबई विमानतळ ‘इन्फ्लूएन्स एरिया म्हणजेच नैना प्रकल्प, छेडानगर ते आनंदनगरपर्यंत उन्नत पूर्व मुक्त-मार्ग, ठाणे महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालयाची वास्तू, अशा अनेक मोठ्या विकास कामांचाही आज शिलान्यास झाला आहे. ही विकासकामे, मुंबई आणि ठाणे यांना आधुनिक ओळख देतील.

 

मित्रांनो,

आजच, आरे पासून बीकेसी या मुंबईच्या अॅक्वा मार्गिकेवरील मेट्रो धावण्यास प्रारंभ होत आहे. ही मार्गिका सुरू व्हावी, याची मुंबईकर दीर्घ काळापासून वाट पहात होते. आज जपान सरकारचेही मी इथे आभार व्यक्त करू इच्छितो.  जपानच्या ‘जपानीज इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी खूप मोठे सहकार्य मिळाले आहे. म्हणूनच ही मेट्रो एका दृष्टीने भारत आणि जपान यांच्यातील मित्रत्वाचेही  प्रतीक आहे.

 

बंधू -भगिनींनो,

ठाण्याविषयी बाळासाहेब ठाकरे यांना विशेष आपुलकी वाटत होती. कैलासवासी आनंद दिघे यांचेही हे शहर आहे. या शहराने आनंदीबाई जोशी यांच्यासारखी देशाची पहिली महिला डॉक्टर दिली होती. आज आम्ही या विकास कार्यांच्या माध्यमातून या महान व्यक्तींचे संकल्पही पूर्ण करीत आहोत. या सर्व विकास कामांसाठी ठाणे-मुंबईच्या सर्व नागरिकांचे, महाराष्ट्रातील सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.

 

मित्रांनो, 

आज प्रत्येक देशवासियाचे लक्ष्य एकच आहे- विकसित भारत! म्हणूनच आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येकाचे स्वप्न विकसित भारतासाठी समर्पित आहे. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला मुंबई- ठाणे यासारख्या शहरांना ‘भविष्यासाठी सज्ज’ बनवायचे आहे; परंतु यासाठी आपल्याला दुप्पट परिश्रम करावे लागत आहेत. कारण, आपल्याला विकास करायचा तर आहेच आणि कॉंग्रेस सरकारने तयार केलेले खड्डे ही भरून काढायचे आहेत. तुम्ही सर्वांनी आठवावे, कॉंग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष  मुंबई, ठाणे या सारख्या शहरांना कुठल्या दिशेने घेवून जात होते? शहराची लोकसंख्या सतत वाढत आहे, वाहतूक वाढत आहे. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारे उपाय योजना केली जात नव्हती. मुंबई शहर, देशाची आर्थिक राजधानी असलेले महानगर आता एका जागी ठप्प होणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. आमच्या सरकारने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आज मुंबई महानगरामध्ये जवळपास 300 किलोमीटरचे मेट्रोच जाळे तयार होत आहे. आज मरीन ड्राइव्ह ते वांद्रे असा प्रवास ‘सागरी किनारीमार्गामुळे अवघ्या 12 मिनिटांत करता येतो. अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतरही कमी झाले आहे. ऑरेंज गेट (केशरी व्दार) ते  मरीन ड्राइव्ह भूमिगत बोगद्याच्या प्रकल्पाचे काम वेगाने केले जात आहे. असे कितीतरी प्रकल्प आहेत, त्यांची गणती मी करीत बसलो तर खूप वेळ जाईल. वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, पूर्व मुक्त मार्ग, ठाणे-बोरीवली बगोदा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल प्रकल्प, या सारख्या प्रकल्पांमुळे या शहरांचा चेहरा-मोहराच बदलत आहे. याचा खूप मोठा फायदा मुंबईच्या लोकांना होईल. यामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांच्या अडचणी कमी होतील. इथे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. इथल्या उद्योग-व्यवसायांमध्ये वाढ होईल.

 

मित्रांनो,

आज एकीकडे महायुतीचे सरकार आहे  आणि हे सरकार महाराष्ट्राच्या विकासालाच आपले लक्ष्य मानते. दुसरीकडे कॉंग्रेस आणि महाआघाडीचे लोक आहेत. त्यांना ज्या ज्यावेळी  संधी मिळते त्या त्यावेळी ही मंडळी विकासाची कामे ठप्प करतात. मुंबई मेट्रो या गोष्टीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. मुंबईमध्ये मेट्रोच्या तिस-या मार्गिकेच्या कामाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रारंभ झाला होता. त्याचे 60 टक्के काम त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेही होते. परंतु त्यानंतर महा विकास आघाडीचे सरकार आले, महाविकास आघाडीवाल्यांनी आपल्या अहंकाराची जपणूक करीत मेट्रोचे काम लटकवून ठेवले. अडीच वर्षे कामच अडकून पडल्याने प्रकल्पाचा खर्च 14 हजार कोटी रूपयांनी वाढला. हे 14 हजार कोटी रूपये, कोणाचा पैसा होता? हा पैसा महाराष्ट्राचा नव्हता का? हा पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा नव्हता का? हा पैसा महाराष्ट्रातील करदात्यांच्या परिश्रमाचा पैसा नव्हता का?

 

बंधू-भगिनींनो,

एकीकडे काम पूर्ण करणारे महायुतीचे सरकार आणि दुसरीकडे विकास कामे रोखणारे महा विकास आघाडीचे लोकनेते! महाविकास आघाडीने आपल्या ‘ट्रॅक रेकॉर्ड’ने सिद्ध केले आहे की, ते ‘महा विकास विरोधी’ लोक आहेत. त्यांनी अटल सेतूला विरोध केला होता. त्यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प ठप्प करण्याचा पूर्ण कट रचला होता. जोपर्यंत हे सत्तेमध्ये होते, त्यांनी बुलेट ट्रेनचे काम पुढे जावू दिलेच नाही. इतकेच नाही तर, त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी पाणी पुरवण्यासंबंधीचे प्रकल्पही होवू दिले नाहीत. अशा गरजेच्‍या प्रकल्पांनाही सोडलं नाही.  महाराष्ट्रातील लोकांची तहान भागविण्यासाठी सुरू केलेल्या दुष्काळी भागातील पाणी प्रकल्पांची  कामे रोखण्याचे  काम महा विकास आघाडीने केले होते. महा विकास आघाडी, तुम्हा जनतेची प्रत्येक कामे रोखण्याचे काम करते. आता तुम्हालाच त्यांना रोखायचे आहे. महाराष्ट्रामधील विकास प्रकल्पांचे शत्रू असलेल्यांना सत्तेच्या बाहेरच रोखून धरले पाहिजे. त्यांना सत्तेपासून शेकडो मैल दूर ठेवले पाहिजे.

 

मित्रहो,

काँग्रेस हा भारतातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे. काळ कोणताही असो, राज्य कोणतेही असो, काँग्रेसचे चारित्र्य बदलत नाही! गेल्या आठवड्याभरातील परिस्थितीच बघा. काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचे नाव जमीन घोटाळ्याशी जोडले गेले. त्यांच्या एका मंत्र्‍याने महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा अपमान केला. हरियाणात काँग्रेसचे नेते ड्रग्ज (अमली पदार्थ) बाळगताना पकडले गेले. काँग्रेस पक्ष निवडणुकीत मोठी आश्वासने देतो, पण सरकार स्थापन केल्यानंतर लोकांचे शोषण करण्याचे नवनवीन मार्ग शोधतो. रोज नवनवीन कर लादून आपल्या घोटाळ्यांसाठी पैसा उभा करणे, हा त्यांचा अजेंडा आहे. हिमाचलमध्ये तर काँग्रेस सरकारने कमालच केली. काँग्रेस सरकारने हिमाचलमध्ये नवा कर लागू केला आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, त्यांनी कोणता नवीन कर लावला आहे! त्यांनी नवीन कर लावला आहे - शौचालय कर! एकीकडे मोदी म्हणत आहेत शौचालये बांधा, तर दुसरीकडे हे म्हणत आहेत, आम्ही शौचालयांवर कर लाऊ. म्हणजे काँग्रेस हे लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज आहे. ते तुमची जमीन लुटतील. ते तरुणांना ड्रग्जच्या दलदलीत ढकलतील. ते तुमच्यावर कराचा बोजा लादतील. आणि महिलांबरोबर गैरवर्तन करतील. लूट, लबाडी आणि कुशासनाचे हे संपूर्ण पॅकेज, हीच काँग्रेसची ओळख आहे. आणि लक्षात ठेवा, मी तर केवळ गेल्या काही दिवसांचे चित्र तुमच्यासमोर उभे केले, आणि तेही पूर्णपणे नाही, कारण वेळेची कमतरता आहे. काँग्रेस पक्ष वर्षानुवर्षे हेच करत आला आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

महाराष्ट्रात त्यांनी आतापासूनच आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. हेच पहा ना, महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. यामध्ये भगिनींना दर महा दीड हजार रुपये आणि 3 एलपीजी सिलेंडर मोफत मिळत आहेत. हे महाविकास आघाडीच्या लोकांच्या पचनी पडत नाही. ते संधीची वाट पाहत आहेत, महाविकास आघाडीला संधी मिळाली, जी कधीच मिळणार नाही, तर सर्वप्रथम ते शिंदे यांच्यावरचा राग बाहेर काढतील आणि त्यांनी लागू केलेल्या सर्व योजनांना टाळे ठोकतील. पैसा भगिनींच्या हातात न जाता दलालांच्या खिशात जावा, अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. त्यामुळे माता-भगिनींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांपासून अधिक सावध राहण्याची गरज आहे.

 

मित्रहो,

काँग्रेस सत्तेत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला गेला, की काँग्रेसला देशाच्या विकासात काय अडचण आहे? पण, जेव्हापासून हे लोक सत्तेतून बाहेर पडले आहेत, त्यांनी स्वतःच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आज काँग्रेसचे खरे रंग उघड झाले आहेत. काँग्रेस पक्षाला आता शहरी नक्षलवाद्यांची टोळी चालवत आहे. काँग्रेस आता उघडपणे जगभरातील अशा लोकांच्या पाठीशी उभी आहे, ज्यांना भारताची प्रगती थांबवायची आहे. त्यामुळे घोर अपयश पदरी पडूनही काँग्रेस, सरकार स्थापनेचे स्वप्न पाहत आहे! काँग्रेसला माहीत आहे, की आपली व्होट बँक तर सुरक्षित  राहील, पण बाकीचे लोक सहज विभागले जातील, त्यांचे तुकडे पडतील. म्हणूनच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे एकच ध्येय आहे - समाजात फूट पाडणे, लोकांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबीज करणे. त्यामुळे आपल्याला भूतकाळातून बोध घ्यायला हवा. आपल्याला आपली एकता, हीच देशाची ढाल बनवायची आहे. आपण हे लक्षात ठेवायला हवे, की आपल्यात जर फूट पडली, तर आपल्यामध्ये फूट पडणारे उत्सव साजरा करतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मनसुबे पूर्ण होऊ द्यायचे नाहीत.

 

मित्रहो,

काँग्रेस जिथे जिथे पाऊल ठेवते, तिथे केवळ मतविभाजन होते. त्यांनी देशाला गरिबीत ढकलले! त्यांनी महाराष्ट्राला उद्ध्वस्त केले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. ज्या ज्या राज्यात त्यांनी सरकार स्थापन केले, त्या राज्यालाही त्यांनी उद्ध्वस्त केले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या संगतीत राहून इतर पक्षही बरबाद होतात. पूर्वी राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे आता तुष्टीकरणाचे राजकारण करू लागले आहेत. तुम्हाला हेही माहीत आहे, की वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत आमच्या सरकारने विधेयक आणले आहे. पण, तुष्टीकरणाच्या राजकारणात आमच्या वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध करण्याचे पाप काँग्रेसचे नवे चेले करत आहेत. ते म्हणतात, की वक्फचे अवैध अतिक्रमण हटवू देणार नाही. एवढेच नाही, तर काँग्रेसचे लोक वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलतात, त्यांचा अपमान करतात. काँग्रेसचे चेले आजही त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आज काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करणार असल्याची घोषणा करत आहे, आणि काँग्रेसच्या चेल्यांची बोलती बंद झाली आहे. नवीन व्होटबँक बनवण्यासाठी विचारधारेचे असे अधःपतन, कॉंग्रेसची जी-हुजुरी, कॉंग्रेसचे भूत ज्यांच्या मानगुटीवर बसले, त्यांचे हे असेच होते.

 

मित्रहो,

आज देशाला, महाराष्ट्राला प्रामाणिक आणि स्थिर धोरणांचे सरकार हवे आहे. हे काम केवळ भाजपा आणि महायुती सरकारच करू शकते आणि ते पुढे नेऊ शकते. भाजपानेच देशात आधुनिक पायाभूत सुविधाही निर्माण केल्या, आणि सामाजिक पायाही मजबूत केला. महामार्ग, द्रुतगती मार्ग, रस्ते आणि विमानतळांच्या विकासातही आम्ही विक्रम केला आहे, आणि 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आता आम्हाला देशाला आणखी खूप पुढे घेऊन जायचे आहे. माझा विश्वास आहे, की महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा संकल्प घेऊन एनडीएच्या पाठीशी उभा आहे. आपण एकत्र येऊन महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करू. या विश्वासानेच मी पुन्हा एकदा, हे सर्व विकास प्रकल्प आणि अनेक विकासकामांसाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. माझ्या बरोबर बोला-

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Parliament passes Bharatiya Vayuyan Vidheyak 2024

Media Coverage

Parliament passes Bharatiya Vayuyan Vidheyak 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM bows to Sri Guru Teg Bahadur Ji on his martyrdom day
December 06, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Sri Guru Teg Bahadur Ji on his martyrdom day. Prime Minister, Shri Narendra Modi recalled the unparalleled courage and sacrifice of Sri Guru Teg Bahadur Ji for the values of justice, equality and the protection of humanity.

The Prime Minister posted on X;

“On the martyrdom day of Sri Guru Teg Bahadur Ji, we recall the unparalleled courage and sacrifice for the values of justice, equality and the protection of humanity. His teachings inspire us to stand firm in the face of adversity and serve selflessly. His message of unity and brotherhood also motivates us greatly."

"ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ ਸ਼ਹੀਦੀ ਦਿਹਾੜੇ 'ਤੇ, ਅਸੀਂ ਨਿਆਂ, ਬਰਾਬਰੀ ਅਤੇ ਮਨੁੱਖਤਾ ਦੀ ਰਾਖੀ ਦੀਆਂ ਕਦਰਾਂ-ਕੀਮਤਾਂ ਲਈ ਲਾਸਾਨੀ ਦਲੇਰੀ ਅਤੇ ਤਿਆਗ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਸਾਨੂੰ ਮਾੜੇ ਹਾਲਾਤ ਵਿੱਚ ਵੀ ਦ੍ਰਿੜ੍ਹ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਿਰਸੁਆਰਥ ਸੇਵਾ ਕਰਨ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਏਕਤਾ ਅਤੇ ਭਾਈਚਾਰੇ ਦਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸੁਨੇਹਾ ਵੀ ਸਾਨੂੰ ਬਹੁਤ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦਾ ਹੈ।"