आज सकाळी महाराष्ट्रात एक दुःखद विमान अपघात झाला, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे: पंतप्रधान
अजित दादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. मी अजित पवारजींच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो: पंतप्रधान
या दुःखद अपघातात प्राण गमावलेल्या सहकाऱ्यांची आठवण सदैव ठेवली जाईल आणि दुःखाच्या या क्षणी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभा आहे: पंतप्रधान
एनसीसी ही भारताच्या युवा शक्तीला सक्षम करणारी चळवळ आहे: पंतप्रधान
आज जग भारताच्या युवा वर्गाकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे: पंतप्रधान
युरोपियन संघासोबत झालेला करार जगाचे लक्ष वेधून घेत आहे, अनेकजण याला सर्व करारांची जननी आणि जगासाठी बाजी पालटून टाकणारा म्हणत आहेत: पंतप्रधान
आज युद्धे अनेक आघाड्यांवर लढली जातात, ती कोडच्या माध्यमातून तसेच क्लाउडमध्येही लढली जातात; तंत्रज्ञानात मागे पडलेले देश केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सुरक्षेच्या बाबतीतही कमकुवत असतात: पंतप्रधान
विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपण कसे वागतो हा देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे: पंतप्रधान
युवा फिट तर देश हिट !: पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, एनसीसी, देशभरातील एनएसएस कॅडेट्स, टॅब्लॉइड कलाकार, नॅशनल स्टेडियमचे सहकारी आणि माझ्या प्रिय युवा मित्रांनो. तुमची मेहनत इथे पाहायला मिळाली. तुम्ही उत्तम समन्वयाने सादरीकरण केले आहे.

पण मित्रांनो,

आजचा दिवस आपल्यासाठी मोठे दु:ख घेऊन आला आहे. आज सकाळीच महाराष्ट्रात एक विमान अपघात झाला. या अपघाताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे काही सहकारी आमच्यापासून हिरावून नेले. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. विशेषत: गावांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपण ज्यांना गमावले, त्या सर्वांच्या कुटुंबियांबरोबर आपण आहोत.

मित्रहो,

या दुःखाच्या आणि शोकाच्या प्रसंगी मी येथे उपस्थित सर्व कॅडेट्स, विविध मित्र देशांमधून आलेले कॅडेट्स आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदनही करणार आहे. यावेळीही मोठ्या संख्येने महिला कॅडेट्स येथे आल्या आहेत. मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

एनसीसी ही अशी एक संघटना आहे, एक चळवळ आहे जी भारतातील तरुणांना आत्मविश्वासपूर्ण, शिस्तबद्ध, संवेदनशील आणि राष्ट्रासाठी समर्पित नागरिक बनवते. तुम्ही प्रत्येकजण दरवर्षी तुमची भूमिका मजबूत करत आहात. गेल्या काही वर्षांत, एनसीसी कॅडेट्सची संख्या 14 दशलक्ष वरून 20 लाख वर पोहोचली आहे. विशेषतः आपल्या सीमावर्ती भागात आणि किनारपट्टी भागात, एनसीसी कॅडेट्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

माझ्या युवा मित्रांनो,

एनसीसी हे तरुणांसाठी एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर आपला वारसाही अभिमानाने जगला जातो. उदाहरणार्थ, यावर्षी, एनसीसीने वंदे मातरमची 150 वी वर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली. तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत. परमवीर सागर यात्रा हे याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे, काही वर्षांपूर्वी सरकारने अंदमान निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. राष्ट्रीय नायकांचा सन्मान करणे, ही या उपक्रमामागची भावना होती. तुम्ही आपल्या नौकानयन मोहिमेद्वारे ती आणखी बळकट केली आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीपमध्ये आयलँड फेस्टिव्हलच्या माध्यमातून तुम्ही महासागर, संस्कृती, निसर्ग यांचा एकत्रितपणे उत्सव साजरा केला.

मित्रहो,

एनसीसीने इतिहासाला स्मारकांमधून बाहेर काढून लोकांच्या हृदयात स्थान दिले आहे. तुम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून बाजीराव पेशवा यांचे शौर्य, महायोद्धा लचित बोरफुकन यांचे कौशल्य आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाबद्दल जनचेतना जागृत केली आहे. तुमच्या या साहसी कार्यासाठी मी तुम्हा सर्वांची प्रशंसा करतो. आज ज्या सहकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे त्यांचेही मी अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. हा काळ आपल्या देशातील युवकांसाठी जास्तीत जास्त संधींचा काळ आहे. सरकारचा प्रयत्न आहे की या काळाचा जास्तीत जास्त लाभ आपल्या युवकांना मिळावा. याचे एक उदाहरण तुम्ही कालच पाहिले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सहमती झाली. यापूर्वी भारताने ओमान, न्यूझीलंड, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस, यासारख्या देशांबरोबरही मुक्त व्यापार करार केले आहेत. हे सर्व करार आपल्या लाखो-करोडो युवकांसाठी अगणित संधी निर्माण करणार आहेत. 

मित्रहो,

आज संपूर्ण जग युवा भारताच्या युवकांकडे मोठ्या विश्वासाने पाहत आहे. आणि जगाच्या या विश्वासाचे कारण म्हणजे कौशल्य आणि संस्कार! भारतातील तरुणांमध्ये लोकशाहीचे संस्कार आहेत, आपल्या तरुणांमध्ये प्रत्येक प्रकारच्या विविधतेचा आदर करण्याचे संस्कार आहेत, भारतातील तरुणांमध्ये संपूर्ण जगाला एक कुटुंब मानण्याचे संस्कार आहेत. आणि म्हणूनच, भारतातील युवक जिथे कुठे जातात, त्या देशातील लोकांमध्ये सहज मिसळून जातात, त्यांची मने जिंकतात. आम्ही आमच्या सामर्थ्याने त्या देशाच्या विकासात योगदान देतो. हेच आपले संस्कार आहेत, हा आपला स्वभाव आहे. मातृभूमीप्रति अपार निष्ठा आणि कर्मभूमीप्रति अतुलनीय समर्पण हा आपला वारसा आहे.

मित्रहो,

मी जगभरातील नेत्यांशी बोलतो, त्या संभाषणाच्या आधारावर सांगतो, आणि पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, भारतातील युवक जेवढे मेहनती आहेत, तेवढेच ते उत्कृष्ट व्यावसायिक देखील आहेत. आणि म्हणूनच भारतातील तरुणांना मोठी मागणी आहे. आखाती देशांकडे पहा, लाखो लोक तिथे इतकी वर्षे काम करत आहेत. आपले डॉक्टर आणि अभियंते अनेक देशांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रणाली आणि पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत.

 

मित्रांनो,

त्यांच्या या योगदानासह आपल्या देशातील युवा पिढीच्या यशाचेही जगभरातून कौतुक होत आहे. या युवा पिढीमुळेच भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा कणा बनला आहे. युवा पिढीच्या या सामर्थ्यामुळेच स्टार्ट अप, अंतराळ, डिजिटल तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात नवी क्रांती सुरू झाली आहे. 

मित्रांनो,

युरोपिय संघासोबत नुकत्याच झालेल्या व्यापार कराराची ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणून जगाकडून प्रशंसा केली जात आहे. हा करार जगासाठी एक क्रांतीकारी बदल ठरेल असे मानले जात आहे. हा मुक्त व्यापार करार म्हणजे तुमच्यासाठी आकांक्षापूर्तीचे स्वातंत्र्य आहे. जगाचा एक चतुर्थांश जीडीपी आणि जागतिक व्यापाराचा एक तृतीयांश भाग या करारात सामावलेला आहे.

मित्रांनो,

युरोपिय संघासोबत म्हणजेच जगातील सत्तावीस देशांसोबत भारताने हा करार केला आहे. भारतातील स्टार्ट अप्सना याचा लाभ होईल. भारतीय स्टार्ट अप्सना गुंतवणूकदार आणि नवोन्मेष यंत्रणेपर्यंत पोहोचणे सोपे ठरेल. या कराराचा चित्रपट, गेमिंग, फॅशन, डिजिटल कंटेंट, संगीत आणि आरेखन यासारख्या सर्जनशील क्षेत्राला खूप फायदा होईल तसेच संशोधन, शिक्षण, माहिती तंत्रज्ञानापासून इतर व्यावसायिक सेवांपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय युवा पिढीसाठी नव्या संधी निर्माण होतील. 

मित्रांनो,

या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हटले जात आहे कारण; हा करार खूप व्यापक, अर्थपूर्ण, नवनवीन विक्रम प्रस्थापित करू शकणारा आहे आणि या करारामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी तर खूप मोठी आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे गती मिळेल. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या निर्धाराला बळ मिळेल, कारण या करारानुसार भारताच्या 99 टक्के निर्यातीवरील शुल्क माफ होईल किंवा अगदी कमी शुल्क लागेल. वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, दागिने व रत्ने, पादत्राणे, अभियांत्रिकी उत्पादने यासारख्या सर्व भारतीय उद्योगांना, विशेषतः एमएसएमई क्षेत्राला या कराराचा मोठा लाभ होईल. आपल्या देशातील वीणकर, कारागीर आणि छोट्या उद्योगांना 27 युरोपिय देशांमधील बाजारपेठेत थेट प्रवेश मिळेल.  

 

मित्रांनो,

या कराराची आणखी एक भक्कम बाजू आहे; यातून भारतातील गुंतवणूकही वाढेल. देशात अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, कृषी आणि इतर क्षेत्रातील निर्मिती प्रकल्प सुरू होतील. शेतमाल, अन्नप्रक्रिया आणि मत्स्य व्यवसायातही नव्या गुंतवणुकीसाठी खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतकरी, मच्छीमार आणि ग्रामीण युवकांसाठी ही खूप मोठी संधी आहे.

तरुण मित्रांनो,

या मुक्त व्यापार करारामुळे भारतातील युवा पिढी युरोपमधील रोजगाराच्या बाजारपेठेशी थेट संपर्कात येईल. विशेषतः अभियांत्रिकी, हरित तंत्रज्ञान, आरेखन, लॉजिस्टीक्स आणि आधुनिक निर्मितीप्रक्रिया क्षेत्रात अनेक संधी तयार होतील. याचाच अर्थ भारतातल्या युवा पिढीसाठी म्हणजेच तुमच्यासाठी 27 देशांमध्ये नवनव्या संधी उपलब्ध होतील.   

मित्रांनो,

सरकार देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून या सर्व जागतिक संधींना आणखी व्यापक बनवत आहे. आज देशात ज्या वेगाने सुधारणा होत आहेत, त्या युवा पिढीसमोरील सगळे अडथळे दूर करत आहेत. तुम्हा एनसीसीच्या युवा पिढीचे संस्कार, शिस्त पाहता, देशासाठीच्या या वाढत्या संधी तुमच्यासाठी तर सोन्याहून पिवळे म्हणता येईल अशाच आहेत. 

मित्रांनो,

तुम्ही इथे ऑपरेशन सिंदूरवर आधारित दिमाखदार सादरीकरण केले. ऑपरेशन सिंदूरदरम्यानच्या तुमच्या प्रयत्नांचे तर मी खास कौतुक करेन. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या त्या काळात एनसीसीच्या छात्रांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. काहींनी आपल्या सैन्याला तयारी करण्यामध्ये मदत केली, काहींनी रक्तदान शिबिरे आयोजित केली, काहींनी प्रथमोपचार शिबिरांच्या माध्यमातून मदत केली. एनसीसीमध्ये संचलन प्रशिक्षणासोबतच राष्ट्र प्रथम हा विचारदेखील रुजवला जातो हे तुम्ही दाखवून दिलेत. एनसीसीने दिलेली ही देशभक्तीची भावना, नेतृत्वगुण यामुळेच संकटकाळात देशासाठी संपूर्ण सामर्थ्यानिशी काम करण्याची प्रेरणा मिळते. एनसीसी आपल्याला हेच शिकवते, आपण तिथूनच शिकतो. जेव्हा मी एनसीसीमध्ये होतो तेव्हा माझ्यातही राष्ट्र प्रथम ही भावना अशीच प्रबळ झाली आणि आता तुम्हालाही एनसीसीमध्ये हेच शिकताना पाहून मला अभिमान वाटतो आहे. 

 

मित्रांनो,

ऑपरेशन सिंदूरने भारताचे सामर्थ्य, आपल्या सैन्याचा पराक्रम पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केले. आपली स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्रे किती आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञानआधारित आहेत हेदेखील ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. 

मित्रांनो,

सध्याच्या आधुनिक युद्धपद्धतींमध्ये युवा पिढीच्या कौशल्याचे महत्त्व खूप वाढले आहे. आता लढाई देशाच्या सीमा, रणगाडे, बंदूक आणि तोफगोळे यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आता कित्येक आघाड्यांवर लढाई लढली जाते. सध्याची लढाई कोडमध्ये पण होते आणि क्लाउडमध्ये पण होते. जे देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागास आहेत, ते सुरक्षेच्या बाबतीतही कमजोर ठरत आहेत.

म्हणूनच मित्रांनो,

युवक म्हणून आपण आपल्या देशासाठी कोणते नवसंशोधन करतो तेदेखील महत्त्वाचे आहे. ही भावनाही देशभक्तीचे सामर्थ्य वाढवते, देशाच्या सुरक्षेतही खूप मोठे योगदान देते.  तुम्हा सर्व मंडळींना  माहिती आहेच की, आज तंत्रज्ञानामुळे  तरुणांसाठी अनेक नवनवीन संधी  सशस्त्र दलांमध्ये निर्माण होत आहे. आपल्या तरुणांनी  संरक्षण क्षेत्रामध्‍ये सुरू केलेले स्टार्टअप्स उत्तम  परिणाम देत आहेत. ‘मेड इन इंडिया’मधून ड्रोन विकसित करण्‍यासाठी कार्य केले जात आहे.  आणि एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा  आणि संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषी उद्योग  यामुळे  आपल्या दलांचे आधुनिकीकरण होत  आहे. याचा अर्थ असा की, तुम्‍हा युवा मित्रांनो, तुमच्यासाठी करिअरच्‍या अनेक  शक्यता लक्षणीयरितीने  निर्माण होत  आहेत. आणि आज,  मला फक्त इथे उपस्थित असलेल्या  लोकांनाच नाही तर,  देशभरातील लाखो तरुणांना याचा फायदा व्हावा असे वाटते.

 

मित्रांनो,

अगदी  तीन दिवसांपूर्वी, 25 जानेवारी रोजी, देशाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला. या दिवशी, मी माझ्या देशवासियांना एक पत्र देखील लिहिले. राष्ट्रीय मतदार दिन हा जबाबदारीची  भावना निर्माण करणारा आहे आणि आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारांचा उत्सव आहे. आज, भारत जगातील सर्वात जास्त तरुण मतदार असलेल्या देशांमध्ये समाविष्ट आहे. ज्यावेळी  हे तरुण 18 वर्षांचे होतात त्यावेळी  त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.  हा अधिकाकर म्हणजे,  या नवीन पिढीला  देशाचे भवितव्य घडवण्याची मिळालेली शक्ती असते. म्हणून, आपल्याला या देशात एक नवीन परंपरा सुरू करण्याची आवश्यकता आहे. एनसीसी-एनएसएस आणि ’मेरा युवा भारत संघटना’, ‘ मायभारत’  संघटना, अशा सर्व युवा संघटनांनी मिळून दरवर्षी  25 जानेवारी रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित कारावा, अशी माझी इच्छा आहे.  या दिवशी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. मला विश्वास आहे की,  या प्रयत्नामुळे आपल्या तरुण पिढीमध्ये जबाबदारीची भावना आणखी बळकट होईल आणि आपली लोकशाहीही  बळकट होईल.

मित्रांनो,

विकसित भारत याचा अर्थ  फक्त  आर्थिक समृद्धीपुरता मर्यादित नाही. नागरिक म्हणून आपले वर्तन कसे असावे, ही  गोष्‍ट  विकसित भारताचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे,  स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात सरकारने योगदान नक्कीच दिले असले तरी, ही स्वच्छता मोहीम  कोणी  पुढे नेली  असेल तर ती, आपल्या नागरिकांनी, तरुणांनी आणि अगदी लहान-  लहान मुलांनीही पुढे नेली आहे. ही गोष्‍ट मी  अभिमानाने म्हणू शकतो.  घराच्या आत आणि बाहेर स्वच्छता ही एक सवय आहे, जीवनशैली आहे, एक संस्कृती आहे. आपण ही नागरी कर्तव्याची जाणीव आपल्या जीवनाचा एक भाग बनवली पाहिजे. आपले  अंगण स्वच्‍छ असावे, सुंदर दिसावे, असे आपल्याला वाटत असते. अगदी अशाच भावनेने आपण आपल्या शहरांना सजवले पाहिजे आणि त्यांना सुंदर ठेवले पाहिजे. मी येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुण मित्राला आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम आयोजित करण्याचे आवाहन करतो.  एनसीसी आणि एनएसएस हे कार्य खूप चांगले करू शकतात. तुम्ही जेथे वास्तव्य करता, त्याच परिसरामध्‍ये  एखाद्या ठिकाणी काही उपक्रमांचे नियोजन करू शकता; तसे नियोजन तुम्ही जरूर करावे.  

मित्रांनो,

‘’एक पेड़ मॉं के नाम’’ या  मोहिमेअंतर्गत एनसीसीने जवळजवळ आठ लाख  झाडे लावली आहेत, हे जाणून मला आनंद झाला. आपण लावलेली झाडे चांगली वाढतील  खात्री करणे, त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देणे  हेही  आपले कर्तव्य आहे.

 

मित्रांनो,

आपल्या तरुणांची एक मोठी परीक्षा म्हणजे आपण भविष्यात किती तंदुरुस्त असणार आहोत, याकडे लक्ष देणे होय.   ‘फिटनेस’ हा फक्त काही मिनिटांच्या व्यायामापुरता मर्यादित नाही. तो आपल्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे. आपल्या आहारापासून ते आपल्या दैनंदिन दिनचर्येपर्यंत शिस्तबद्ध जीवनशैली आवश्यक आहे. तुम्ही ‘फिट इंडिया’  मोहिमेला पुढे नेत आहात हे जाणून मला आनंद झाला. एनसीसी कॅडेट्सनी खेळांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

मित्रांनो,

आज, मी पुन्हा एकदा तुम्हा तरुणांसमोर वाढता  स्थूलपणा हा विषय उपस्थित करत आहे. पाहणी  अभ्यासातून असे दिसून आले आहे की,  भविष्यात भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती जास्त वजनाच्या आजाराने ग्रस्त  असू शकते.  या स्थूलपणाच्या समस्येमुळे देशातील लोकांना  मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार होण्‍याचा  धोका देखील वाढत आहे.  आपल्या तरुणांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. म्हणूनच, आतापासूनच आपण सतर्क राहण्याची गरज आहे्. यासाठी तेलाचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी, लोकांना त्यांच्या दैनंदिन भोजनामध्‍ये  तेलाचे प्रमाण दहा  टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन मी केले होते. आज, मी तुम्हा सर्व तरुणांसमोर  हीच गोष्‍ट पुन्हा एकदा आग्रहपूर्वक सांगतो.

मित्रांनो,

एनसीसी तुम्हाला फक्त कशी कवायत करायची, संचलन कसे करायचे  इतकेच   शिकवत नाही तर ते तुम्हाला नागरिक म्हणून जबाबदारीने जगायलाही शिकवते. येथे, तुम्ही जी कौशल्ये आणि मूल्ये शिकता, ती  तुम्हाला चांगले नागरिक बनण्यास मदत करतात. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात तुम्हाला मिळणारे अनुभव तुमचे व्यक्तिमत्व आणखी विकसित करणारे असतात. जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जावून  तुम्ही यशस्वी व्हा आणि विकसित भारताच्या उभारणीत तुमचे योगदान असेच वृध्दिंगत होत राहो. तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा.

भारत माता की जय!

भारत माता की जय!

आणि आज, ज्यावेळी  देश वंदे मातरम् 150  वर्ष साजरी करत आहे, त्यावेळी  आपण म्हणूया -

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

वंदे मातरम्! वंदे मातरम्!

खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
French Space companies announce key agreements with Indian firms at Paris Space Summit

Media Coverage

French Space companies announce key agreements with Indian firms at Paris Space Summit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses grief over loss of lives in mishap in Nanded
September 11, 2026
Prime Minister announces ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra.

The Prime Minister conveyed his thoughts to the bereaved families in this hour of grief and prayed for the speedy recovery of the injured.

Shri Modi announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.

In a post on X, the Prime Minister’s Office said;

“Saddened by the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”