India is not in the mood to stop today! We will neither pause nor slow down, 140 crore Indians will move forward together with full momentum: PM
Today, as the world faces various roadblocks and speed breakers, it is only natural to talk about an unstoppable India: PM
Today, India has moved from being among the fragile five to becoming one of the world's top five economies: PM
Today, from chips to ships, India is self-reliant and filled with confidence in every sphere: PM
Today, India's growth is shaping global opportunities: PM
The entire world today sees India as a reliable, responsible and resilient partner: PM
For the world, the edge of the unknown may seem uncertain; But for India, it is a gateway to new opportunities: PM
We have turned every risk into reform, every reform into resilience and every resilience into a revolution: PM
In the past 11 years, we have worked to democratise both policy and process: PM
Today, we can proudly say that India is among the top five countries in the world with its own domestic 4G stack: PM
Maoist terrorism is a great injustice and a grave sin against the nation's youth; I could not leave the country's youth in that state: PM

श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!

हा सणांचा काळ आहे. मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. उत्साहाच्या या वातावरणात एनडीटीव्ही वर्ल्ड समिट आयोजित होत आहे आणि आपण या सत्राची संकल्पना देखील अतिशय महत्त्वाची  ठेवली आहे – अनस्टॉपेबल भारत. खरोखरच, भारत आज थांबण्याच्या मनःस्थितीत नाही आहे. आम्ही ना थांबणार आहोत, ना थबकणार आहोत. आम्ही 140 कोटी देशवासीय एकत्र येऊन वेगाने पुढे जाऊ.

 

मित्रांनो,

आज जेव्हा जगात मार्गात अनेक मोठ-मोठे अडथळे आहेत, स्पीड ब्रेकर आहेत, तेव्हा 'Unstoppable Bharat’ ची चर्चा होणे खूप स्वाभाविक आहे आणि मी ही गोष्ट अकरा वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि सध्याच्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जरा आठवून पाहा, 2014 पूर्वी या प्रकारच्या शिखर परिषदेमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा व्हायची? हेडलाईन काय असायच्या? गल्ली-बोळातील परिषदांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा व्हायची? तुम्ही जर नक्की आठवून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, चर्चा व्हायची की Global Headwinds ना भारत कसा तोंड देईल? Fragile Five म्हणजे जगातील सर्वात कमकुवत पाच अर्थव्यवस्थांच्या यादीतून भारत कसा बाहेर येईल? Policy Paralysis म्हणजेच धोरण लकवा या स्थितीत भारत किती दिवस राहील? भारतात मोठे मोठे घोटाळे कधी बंद होतील?

मित्रांनो,

तेव्हा महिला सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न होते. दहशतवादी स्लीपर सेल  कशा प्रकारे नियंत्रणाच्या बाहेर आहेत, याबद्दल खुलासे व्हायचे. "महंगाई डायन खाए जात है" हे गाणे खूप गाजले होते. आता तुम्हाला नक्की आठवण झाली असेल की 2014 पूर्वी काय परिस्थिती होती. तेव्हा देशातील लोकांना आणि जगालाही वाटत होते की, इतक्या संकटांच्या जाळ्यात अडकलेला भारत या संकटातून बाहेर पडू शकणार नाही. पण, गेल्या अकरा वर्षांत भारताने प्रत्येक  शंका-कुशंका धुडकावून लावली आहे. प्रत्येक आव्हानाचा पाडाव केला आहे. आज भारत आता 'Fragile Five' मधून बाहेर पडून जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. आज महागाईचा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि विकास दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आज चिपपासून शिपपर्यंत सर्वत्र आत्मनिर्भर भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. आता भारत दहशतवादी हल्ल्यांनंतर शांत बसत नाही. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई करून भारत सडेतोड उत्तर देतो.

मित्रांनो,

तुम्ही कोविडचा काळ आठवा, ज्यावेळी जग जीवन आणि मृत्यूच्या छायेत जगत होते. ज्यावेळी जगाला वाटत होते की इतकी जास्त लोकसंख्या असलेला देश एवढ्या मोठ्या संकटातून कसा वाचेल आणि लोकांना असेही वाटत होते की भारतामुळे जग बुडून जाईल. विविध प्रकारचे आडाखे लावले जात होते. पण, भारताने प्रत्येक अंदाज चुकीचा सिद्ध करून दाखवला. आम्ही त्याचा सामना केला.आम्ही वेगाने आमची लस बनवली. आम्ही विक्रमी वेळेत लस दिली आणि इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडून 'सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था'  बनलो.

 

मित्रांनो,

कोरोनाचा प्रभाव अजून पूर्णपणे संपलाही नव्हता की, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संघर्ष  उभे राहायला लागले. हेडलाईन्समध्ये युद्धाच्या बातम्या दिसू लागल्या. आता पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला की भारताच्या विकासाचे  काय होणार? पण, भारताने अशा संकटकाळातही पुन्हा एकदा सगळे अंदाज  चुकीचे सिद्ध केले. भारत 'सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था'  बनून पुढे वाटचाल करत राहिला. गेल्या तीन वर्षांत भारताचा सरासरी विकास दर 7.8 टक्के राहिला आहे. हे अभूतपूर्व  आणि अनपेक्षित आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच व्यापारी निर्यातीची आकडेवारी आली आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताची व्यापारी निर्यात जवळपास 7 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची कृषी निर्यात केली आहे. कितीतरी देशांच्या अस्थिर मानांकनांच्या दरम्यान, एस अँड पी (S&P) या संस्थेने 17 वर्षांनंतर  भारताच्या पतमानांकनात सुधारणा केली आहे. आयएमएफनेही  भारताच्या विकासाच्या दराच्या अंदाजात वरच्या दिशेने सुधारणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलने भारताच्या एआय क्षेत्रात 15 अब्ज डॉलर्सच्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आज हरित ऊर्जा  आणि सेमीकंडक्टर  क्षेत्रातही मोठ-मोठ्या गुंतवणुका होत आहेत.

मित्रांनो,

आज भारताचा विकास जागतिक संधींना आकार देत आहे आणि हे वाक्य मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. नुकताच झालेला ईएफटीए व्यापार करार  याचे खूप मोठे उदाहरण आहे. युरोपातील देशांनी भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक  करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे. यामुळे भारतात मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतील. काही दिवसांपूर्वीच, यूकेचे पंतप्रधान माझे मित्र स्टार्मर  त्यांच्या सर्वात मोठ्या व्यापारी शिष्टमंडळासह  भारतात आले होते.  यातून हे दिसत आहे की जग आज भारतात त्यांच्यासाठी किती मोठ्या संधी आहेत, याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.

आज जी-7 देशांसोबतचा आमचा व्यापार 60 टक्क्यांहून जास्त वाढला आहे. संपूर्ण जग आज भारताला विश्वसनीय , जबाबदार आणि टिकाऊ भागीदाराच्या रुपात पाहत आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून फार्मापर्यंत, ऑटोमोबाईलपासून मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत गुंतवणुकीची लाट भारतात येत आहे. हीच गुंतवणूक भारताला जागतिक पुरवठा साखळीचे  एक मुख्य केंद्र बनण्यास मदत करत आहे.

 

मित्रांनो,

या शिखर परिषदेत तुम्ही 'Edge of the Unknown' या विषयावर चर्चा करत आहात. जगासाठी 'Edge of the Unknown' ही एक अनिश्चित  गोष्ट असू शकते, पण भारतासाठी हे संधींचे प्रवेशद्वार  आहे. युगायुगांपासून भारताने अज्ञात मार्गांवर चालण्याचे धाडस दाखवले आहे.

आमच्या संतांनी, आमच्या वैज्ञानिकांनी, आमच्या नाविकांनी नेहमी हे दाखवून दिले आहे की "पहिले पाऊल" हेच परिवर्तनाची सुरुवात असते.

तंत्रज्ञान असो, कोरोना लसीची गरज असो, कुशल मनुष्यबळ, फिनटेक  किंवा हरित ऊर्जा क्षेत्र  असो, आम्ही प्रत्येक जोखमीचे  रूपांतर सुधारणेत केले आहे, प्रत्येक सुधारणेचे लवचिकतेत  आणि प्रत्येक लवचिकतेचे क्रांतीत  रूपांतर केले आहे. अलीकडेच आयएमएफ  प्रमुखांनी सांगितले आहे की, त्या  भारताच्या सुधारणांबाबतच्या धाडसामुळे  खूप उत्साही आहेत. त्यांनी एक उदाहरण  देखील दिले, आणि तुम्हाला माहीत असेल की भारतात एके काळी एक सुधारणा  झाली होती. एक परिसंस्था त्याची गाणी खूप गात असते.

आमचे मित्र हसत आहेत तिथे, मात्र ते सक्तीमुळे  होते आणि ती सक्ती आयएमएफची होती.आज सुधारणा होत आहेत त्या ठाम विश्वासामुळे आणि हेच आयएमएफ म्हणत आहे की सुधारणांबाबत भारताचे जे धाडस आहे, त्याची दखल घेत आहे आणि आयएमएफ प्रमुखांनी एक उदाहरणही दिले आहे.व्यापक स्तरावर डिजिटल ओळख देणे शक्य नाही असेच प्रत्येक जण म्हणत होता मात्र भारताने सर्वाना चुकीचे सिद्ध केले.आज जगातले पन्नास टक्के रिअल टाईम व्यवहार फिन टेक जगतात भारतातच होतात,50 टक्के ! भारताचे युपीआय,जगातल्या डिजिटल पेमेंटस सिस्टीमवर अधिराज्य गाजवत आहे. म्हणजेच प्रत्येक अंदाज,मुल्यांकनापेक्षा सरस करणे भारताचा ‘मिजाज’ बनला आहे. मी स्वभाव हा शब्द वापरला नाही,मी मिजाज म्हटले आहे आणि मोदी असतील तर मिजाज विषयीच बोलतील आणि म्हणूनच आज भारत अनस्टॉपेबल आहे.   

मित्रहो,

देशाच्या कामगिरीसाठी खरी ताकद देशातल्या जनतेकडून मिळते आणि देशातले लोक आपल्या या सामर्थ्याचा योग्य उपयोग तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांच्या जीवनात सरकारची दखल आणि दबाव  नसतो.जिथे सरकारीकरण जास्त असेल तिथे तितकाच वेग मंदावेल आणि जिथे  जास्त लोकशाहीकरण असेल तिथे तितकाच जास्त वेग येईल.दुर्दैवाने देशात 60 वर्षे सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने नेहमीच धोरणे आणि प्रक्रियांच्या सरकारीकरणावर भर दिला. तर गेल्या 11 वर्षात आम्ही धोरणे आणि प्रक्रियांच्या लोकशाहीकरणाचे काम केले.अनस्टॉपेबल  भारत यामागे हेही एक  मोठे कारण आहे. बँकिंगचेच उदाहरण घ्या ना.साठच्या दशकात इंदिरा गांधी जी यांच्याकडून बँकांचे सरकारीकरण करताना काय सांगितले गेले ? सांगितले गेले होते की गरीब,शेतकरी,श्रमिक म्हणजेच देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी सरकारीकरण करण्यात आले आहे असे सांगण्यात आले होते.मात्र वास्तवात कॉंग्रेसने काय केले, सरकारने काय केले ? देशातल्या जनतेला बँकांपासून आणखी दूर नेले, अंतर वाढविले. गरीब तर बँकांच्या दरवाजापर्यंत जायलाही घाबरत असत. 2014 मध्ये जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा देशातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे स्वतःचे एक बँक खातेही नव्हते आणि ही केवळ बँक खाते नाही इतकीच समस्या नव्हती. याचा अर्थ देशातली मोठ्या प्रमाणातली जनता बँकिंग लाभापासून वंचित होती.गरज लागेल तेव्हा बाजारातून चढ्या व्याजदराने, आपले घर-जमीन गहाण टाकण्यासाठी विवश होती.

मित्रहो,

या सरकारीकरणातून देशाला बाहेर काढणे आवश्यक होते आणि आम्ही हे करून दाखवले आहे. आम्ही बँकिंग क्षेत्राचे लोकशाहीकरण केले, त्यात सुधारणा केल्या.आम्ही मिशन मोडवर 50 कोटीपेक्षा जास्त जनधन खाती उघडली म्हणजे संपूर्ण जगभरात जितकी खाती उघडली जातात त्यांची बेरीज एकीकडे आणि एका बाजूला फक्त  भारतात उघडल्या जाणाऱ्या खात्यांची बेरीज एकीकडे, इतके काम केले.आज देशातल्या गावा-गावांमध्ये एखादी तरी बँकिंग सेवा आहे.डिजिटल व्यवहारांनी,भारताला वित्तीय  समावेशन असणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक केले आहे.कॉंग्रेसच्या सरकारीकरणाने बँकांपुढे एनपीएचा मोठा डोंगर उभा केला होता.भाजपने केलेल्या लोकशाहीकरणाने बँकांना विक्रमी नफ्यामध्ये आणले.गेल्या 11  वर्षात महिला बचत गटांना,छोटे शेतकरी-पशुपालक, मच्छिमारांना,फेरीवाल्यांना,विश्वकर्मा मित्रांना हमीविना लाखो-कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत.

मित्रहो,                      

मी आपल्याला पेट्रोल आणि गॅस क्षेत्राचेही उदाहरण देतो.2014 पूर्वी जेव्हा सरकारीकरणाच्या दृष्टीकोनाचा मोठा पगडा होता तेव्हा काय परिस्थिती होती ? पेट्रोल-डीझेलवरच्या अनुदानात वाढ करावी लागू नये,आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सरकारी तिजोरीतून अनुदान द्यावे लागू नये यासाठी कॉंग्रेस सरकार रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद करण्याच्या तयारीत होते.आता बोला!,अरे बाबा,तो सात वाजता भरेल पेट्रोल ! आता सध्या काय परिस्थिती आहे ? आज पेट्रोल पंप 24 तास सुरु असतात आणि आम्ही पर्यायी इंधनावर,इलेक्ट्रिक मोबिलिटीवर अभूतपूर्व गुंतवणूक करत आहोत.

 

मित्रहो,

आज, भारतात गरीबांसाठी , वंचितांच्या सेवेसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही वंचितांना प्राधान्य देतो . त्यांचे जीवन सुधारण्यासाठी अत्यंत संवेदनशीलतेने काम करत आहोत. अनेकदा मोठ-मोठ्या चर्चेत याकडे तुमचे लक्ष जात नाही.  मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अलिकडेच, बीएसएनएलने त्यांचा मेड इन इंडिया 4G स्टॅक आणल्याची चर्चा होती.

आणि मित्रहो,

मी सांगू इच्छितो की, हे खरोखरच  देशासाठी एक मोठे यश आहे. आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की भारत हा देशांतर्गत विकसित 4G स्टॅक असलेल्या जगातील आघाडीच्या पाच देशांमध्ये सामील झाला आहे. भारताने 2जी,2जी, 2जी ऐकले आहे, कारण सर्व मथळे "2जी" शी संबंधित असायचे ,  2जी मध्ये हे झाले ,2जी मध्ये असे झाले. आता, जेव्हा मी  4जी बद्दल बोलतो तेव्हा थोडा वेळ लागतो;  ती साफसफाई  करून करून  मी दमलो  आहे. काँग्रेसने ज्या सरकारी कंपनीला उद्धवस्त  करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, ती बीएसएनएल आज नवनवीन शिखरे गाठत आहे.

मात्र मित्रहो,

देशाच्या यशाचा हा केवळ  एक पैलू आहे. दुसरा पैलू हा आहे की ज्या दिवशी या 4 जी स्टॅकचे अनावरण झाले त्याच दिवशी बीएसएनएल ने सुमारे 1 लाख 4 जी मोबाईल टॉवर सुरु केले  आणि त्याचा परिणाम काय झाला? यामुळे, दुर्गम जंगले, डोंगराळ भागात राहणाऱ्या लाखो लोकांना, ज्यांना आतापर्यंत वेगवान इंटरनेटची सुविधा नव्हती, त्यांना अतिवेगवान  इंटरनेट सेवा मिळू लागली आहे.

मित्रहो,

आता मी तुम्हाला  आश्चर्य वाटेल अशी आणखी एक गोष्ट सांगतो. आपण 2G, 4G आणि 6G हे सगळे  ऐकत असतो , तेव्हा  आपल्याला  सभोवतालचे जग दिसते , आपण इतर गोष्टींचा विचार करतो आणि त्याबद्दल विचार केल्यानंतर, आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज मी देशाच्या यशाचा तिसरा पैलू तुमच्यासमोर  सादर करू इच्छितो, ज्याकडे आतापर्यंत माध्यमांचे लक्ष गेलेले नाही . असो ,अशा अनेक गोष्टी आहेत आणि माझ्या खात्यात त्या  खूपच मागे  पडतात.

जेव्हा दुर्गम भागांमध्ये अशा सुविधा पोहचतात , तेव्हा तिथल्या लोकांचे जीवन कसे बदलते.  तुम्ही कदाचित ई-संजीवनी बाबत ऐकले असेल. मी त्या  ई-संजीवनी चे उदाहरण देतो. समजा, एक कुटुंब आहे आणि दूरवर जंगलात कुठेतरी राहत आहे, ज्यातील एक सदस्य आजारी आहे, आणि दूर कुठेतरी डोंगरावर, कुठेतरी जंगलात, तो आजाराने त्रस्त आहे, आता खराब हवामानामुळे तो त्याच्या कुटुंबातील आजारी रुग्णाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकत नाही, तेव्हा तो काय करेल ? अशा परिस्थितीत, ई-संजीवनी सेवा त्यांना मदत करते , अति-जलद कनेक्टिव्हिटीवर आधारित ई-संजीवनी सेवा.

मित्रहो,

तो रुग्णाला त्याच्या फोनवरील ई-संजीवनी अॅपद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून देतो  आणि त्याला तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची सुविधा मिळते. एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना हे ऐकून आनंद होईल  की  आतापर्यंत ई-संजीवनीच्या माध्यमातून 42 कोटी लोकांनी ओपीडी सल्ला घेतला आहे. म्हणजे 4जी, 2जी ही सुविधा नाही , तर आयुष्यातील एक नवी ताकद म्हणून उदयाला आली आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे तर  सकाळपासून संध्याकाळपर्यंत देशातील 1 लाखांहून अधिक लोकांनी  ई-संजीवनी वर मदत मिळवली आहे. हे मी 12 तासांबद्दल बोलत आहे. ई-संजीवनी केवळ  एक सुविधा नाही , हा एक विश्वास आहे की संकट आल्यावर त्यांना त्वरित मदत मिळेल. हे  एक उदाहरण आहे की व्यवस्थेत लोकशाहीकरणाची कमाल काय असते !

मित्रहो,

एक संवेदनशील सरकार, लोकशाही प्रति समर्पित सरकार, संविधानाप्रति समर्पित सरकार, असेच निर्णय घेते आणि अशीच धोरणे आखते.  लोकांचे जीवन सुखकर करण्यावर , लोकांची बचत वाढवण्यावर आमचा भर आहे.  उदाहरणार्थ, 1 जीबी डेटा , हे मी 2014 पूर्वीचे सांगत आहे . 1 जीबी डेटा  300 रुपयांमध्ये येत होता , पण आता तेवढाच डेटा 10 रुपयांमध्ये मिळतो. म्हणजेच प्रत्येक भारतीयाच्या खिशातून वार्षिक हजारो रुपयांची बचत होत आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे गरीब रुग्णांची सव्वा लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. पीएम जन औषधि केंद्रांमध्ये  80 टक्के सवलतीत औषधे मिळतात. याद्वारे लोकांची सुमारे  40 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. हार्ट स्टेंटच्या किंमती कमी झाल्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाची वर्षाला 12 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. 

 

मित्रहो,

आम्ही प्रामाणिक करदात्यांना देखील थेट लाभ मिळवून दिला आहे. प्राप्तिकर असो किंवा जीएसटी, त्यात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. या वर्षी, 12  लाख रुपयांच्या उत्पन्नावरील कर शून्य करण्यात आला आहे. सध्या जीएसटी बचत महोत्सवही  जोरात सुरू आहे. म्हणजे,  सगळीकडे मी पाहत आहे,  आजकाल  बाजारांची  चित्रे दिसत आहेत. गुगलवर पाहिले तर सगळीकडे दिसतील. का ? हा जीएसटीचा बचत उत्सव आहे, ज्याने ही स्थिती निर्माण केली आहे.  आजकाल आपण पाहत आहोत , विक्रीचे मागील सर्व विक्रम मोडले जात आहेत. प्राप्तिकर आणि जीएसटीवरील या उपाययोजनांमुळे एका वर्षात देशवासीयांची सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होणार हे नक्की आहे.

मित्रहो,

अलिकडच्या काळात, देशात आणि जगात ऑपरेशन सिंदूरची खूप चर्चा झाली आहे. आताच आमचे मित्र राहुल जी यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अतिशय विस्तृत चर्चा केली. ते एका लष्करी कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांची त्याबद्दल आवड स्वाभाविक आहे.  त्यांच्या नसा-नसांमध्ये त्या गोष्टी आहेत. अभिमानाने त्यांनी याची प्रशंसा केली आणि देश तसेच जग देखील करत आहे. मात्र आज मला आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे , जो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा तर आहेच , तो माझ्या युवकांच्या भविष्याशी देखील निगडित आहे. हा विषय आहे नक्षलवाद आणि  मला वाटते हा नक्षलवाद शब्द असाच लोकांनी दिलेला आहे, खरेतर हा माओवादी दहशतवाद आहे, या  माओवादी दहशतवादाची गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे. काँग्रेसच्या राजवटीत शहरी नक्षलवाद्यांची जी परिसंस्था होती, हे जे शहरी नक्षलवादी आहेत, ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे वर्चस्व गाजवत होते, आजही आहेत, माओवादी दहशतवादाची कोणतीही घटना देशातील लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी ते मोठी दडपशाही राबवत असतात, , आपल्या देशात दहशतवादाबद्दल खूप चर्चा होत असे. कलम 370 वर चर्चा होत होती. मात्र आपल्या शहरांमध्ये काँग्रेसच्या राजवटीत प्रबळ झालेले जे  शहरी नक्षलवादी होते, त्यांनी अशा संस्थांवर ताबा मिळवला होता आणि देशाला अंधारात ठेवून माओवादी दहशतवाद लपवण्याचे काम करत होते.

नई दिल्ली में एनडीटीवी वर्ल्ड समिट 2025 में प्रधानमंत्री के भाषण का मूल पाठ. Part 4

आत्ता काही दिवसांपूर्वीच माओवादी दहशतवादाचे परिणाम भोगावे लागलेले लोक दिल्लीमध्ये आले होते, अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. खूप मोठ्या प्रमाणावर हे लोक आले होते, काहींनी आपला पाय गमावला होता, तर काहींनी आपला हात गमावला होता, तर काहींचे डोळे गेले होते. काहींनी आपल्या शरीराचे भाग गमावले होते. हे लोक माओवादी दहशतीचे बळी झाले होते. गावातील गरीब, आदिवासी, शेतकरी बंधू भगिनींची ती मुले होती, माता भगिनी होत्या, काही जणांनी तर दोन्ही पाय गमावले होते. असे लोक दिल्लीमध्ये आले होते. हे लोक दिल्लीमध्ये सात दिवस राहिले. हे लोक हात जोडून विनवणी करत होते की त्यांचे म्हणणे भारतातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवावे. त्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली, तुमच्यापैकी कोणीही पाहिले नसेल, ऐकले देखील नसेल. माओवादी दहशतीचे ठेकेदार बनून बसलेल्या लोकांनी अत्याचार सहन केलेल्या या लोकांच्या वेदनेची व्यथा आणि कथा हिंदुस्थानातील लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही. काँग्रेसच्या प्रणालीने याची चर्चाच होऊ दिली नाही.

मित्रांनो,

परिस्थिती अशी होती की देशातील जवळपास प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसा, माओवादी दहशतीने ग्रस्त झाले होते. देशाच्या इतर भागात संविधान लागू होते मात्र रेड कॉरिडॉर मध्ये संविधानाचे नाव घेणारे देखील कोणीही नव्हते आणि मी ही गोष्ट अत्यंत जबाबदारीने सांगत आहे की जे लोक संविधानाची प्रत मस्तकावर ठेवून नाचत असतात ते लोक आज देखील संविधानाला न जुमानणाऱ्या या माओवादी दहशतवाद्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत.

मित्रांनो,

मागील 50 - 55 वर्षांमध्ये या माओवादी दहशतीमुळे हजारो लोक मारले गेले, सुरक्षा दलातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, देशाने अनेक नवयुवक गमावले, हे नक्षलवादी, माओवादी त्या भागात शाळा चालवू देत नव्हते, रुग्णालयांची उभारणी करू देत नव्हते, आणि रुग्णालये असतील तर त्यामध्ये डॉक्टरांना प्रवेश करू देत नव्हते. जी रुग्णालये अस्तित्वात होती त्यांना देखील बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करत होते. अनेक दशकांपर्यंत विकासाच्या प्रकाशापासून देशाचा खूप मोठा भाग, खूप मोठी लोकसंख्या वंचित राहिली होती. याचे सर्वात जास्त नुकसान आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना, दलित बंधू भगिनींना आणि गरीब जनतेला सहन करावे लागले.

मित्रांनो,

माओवादी दहशतवाद हा देशातील तरुणांबरोबर होणारा खूप मोठा अन्याय आहे, खूप मोठे पाप आहे. मी देशातील तरुणांना या परिस्थितीत ठेवू शकत नव्हतो, मला खूप अस्वस्थ वाटत होते, मी तोंडाला कुलूप लावून बसलो होतो. मी आज प्रथमच आपल्यासमोर माझी व्यथा मांडत आहे. मी अशा मातांना ओळखतो ज्यांनी आपले सुपुत्र गमावले आहेत, या मातांच्या आपल्या सुपुत्रांकडून काही अपेक्षा होत्या, आशा होत्या. हे तरुण एक तर माओवादी दहशतवाद्यांच्या खोट्या बढायांना भुलले किंवा माओवादी हिंसेचे बळी ठरले. म्हणूनच 2014 नंतर आमच्या सरकारने संपूर्ण संवेदनशीलतेने या वाट चुकलेल्या तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि मी आज पहिल्यांदाच माझ्या देशबांधवांना हे सांगू इच्छितो, या गोष्टीचा तुम्हालाही आनंद होईल, देशबंधू आम्हाला आशीर्वाद देतील, ज्या मातांनी आपले सुपुत्र गमावले त्या माता आम्हाला आशीर्वाद देतील, देशाच्या भक्तीला आशीर्वाद देतील, आज देश त्या प्रयत्नांचे परिणाम पाहत आहे. 11 वर्षांपूर्वी पर्यंत देशातील 125 जिल्हे, सव्वाशे जिल्हे माओवादी दहशतवादाने ग्रस्त होते.

मित्रांनो,

गेल्या दशकात हजारो नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. मी तुम्हाला गेल्या 75 तासांमधील आकडेवारी सांगतो, केवळ मागच्या 75 तासातील आकडेवारी, मला माहिती आहे की ही बातमी प्रसार माध्यमांचा मेन्यू नाही मात्र माझ्या जीवनातील खूप मोठ्या आनंदाची बाब आहे. गेल्या 75 तासात 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एक काळ असा होता जेव्हा हे नक्षलवादी थ्री नॉट थ्री(303) बंदूक चालवत होते आणि आज थ्री नॉट थ्री नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आणि हे काही साधेसुधे नक्षलवादी नव्हते, कोणावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते तर कोणावर 15 लाखांचे तर आणखी काही जणांवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या नक्षलवाद्यांकडून खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. हे सर्व लोक आता बंदुका सोडून, बॉम्ब सोडून भारताच्या संविधानाच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी तयार झाले आहेत आणि जेव्हा संविधानाला समर्पित सरकार देशात असते तेव्हा कुमार्गाला लागलेली व्यक्ती देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात परतून आपली नजर संविधानावर केंद्रित करते. आता हे आत्मसमर्पण केलेले लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. आणि आपण चुकीच्या मार्गावर चालत होते हे तथ्य ते मान्य करत आहेत. पाच दशके उलटून गेली, तरुणाई संपून गेली, मात्र त्यांनी जो विचार केला होता तसे परिवर्तन घडलेच नाही. आता हे लोक भारताच्या संविधानावर विश्वास ठेवून पुढची वाटचाल करणार आहेत.

मित्रांनो,

कधीकाळी प्रसार माध्यमांत बातम्यांचे मथळे असायचे की छत्तीसगड मधल्या बस्तर इथे असे घडले, तसे घडले, संपूर्ण बस बॉम्ब लावून उडवून दिली, आज सुरक्षा दलातील इतके जवान मारले गेले, बस्तर हा माओवादी दहशतवाद्यांचा, नक्षलवाद्यांचा गड मानला जायचा आणि आता आज मी त्याच बस्तरचे उदाहरण देत आहे. आदिवासी तरुण बस्तर ऑलिंपिकचे आयोजन करत आहेत आणि लाखो तरुण बस्तर ऑलिंपिक मध्ये सहभागी होऊन क्रीडांगणावर आपली ताकद प्रदर्शित करत आहेत, हेच खरे परिवर्तन आहे.

मित्रांनो,

माओवादी दहशतवादातून मुक्त झालेल्या क्षेत्रांमध्ये यावर्षी दिवाळीची मजा काही औरच असणार आहे. मागच्या 50- 55 वर्षात या भागातील लोकांनी दिवाळी साजरी केली नव्हती, आता मात्र ते दिवाळी साजरी करतील आणि मित्रांनो मला पूर्ण विश्वास आहे की आमची मेहनत नक्कीच सफल होईल आणि या भागात आनंदाचे दीप प्रज्वलित केले जातील. आज मी देशवासियांना, एनडीटीव्हीच्या दर्शकांना विश्वास देऊ इच्छितो की तो दिवस दूर नाही जेव्हा देश नक्षलवाद, माओवादी दहशतवादातून पूर्णपणे मुक्त होईल, आणि ही मोदीची गॅरंटी आहे.

मित्रांनो,

विकसित भारताची आपली यात्रा केवळ विकास यात्रा नाही. जिथे विकास आणि प्रतिष्ठा सोबतीने वाटचाल करतील, जेथे गती असेल आणि नागरिकांची प्रतिष्ठा देखील असेल, जिथे नवोन्मेषाचा उद्देश केवळ कार्यक्षमता नाही तर अनुभूती, करुणा देखील असेल. आणि याच विचाराने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. आणि ही विचारसरणी पुढे नेण्यात एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद यासारखे आयोजन खूप मोठी भूमिका निभावत आहेत. आपण मला देशाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले यासाठी मी एनडीटीव्हीचे आभार मानतो. तुम्हा सर्वांना या आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. दिवाळीच्या उत्सवासाठी देखील माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

खूप खूप आभार!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors

Media Coverage

PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 डिसेंबर 2025
December 13, 2025

PM Modi Citizens Celebrate India Rising: PM Modi's Leadership in Attracting Investments and Ensuring Security