मदुराईतील पायाभूत सुविधा कामांमुळे संपर्क व्यवस्था सुधारेल आणि संपूर्ण तामिळनाडूतील जनतेला मोठा लाभ होईल : पंतप्रधान
उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे लोकांना सक्षम बनवणे होय : पंतप्रधान
मागील 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूच्या महामार्ग जाळ्यात मोठी गुंतवणूक केली असून, यात्रेकरूंना सुलभ प्रवास आणि कृषी व सागरी उत्पादनांच्या सुरळीत वाहतुकीची खात्री केली आहे : पंतप्रधान
गेल्या दशकात भारतीय रेल्वेने ऐतिहासिक परिवर्तन अनुभवले असून ती आधुनिक, कार्यक्षम आणि लोककेंद्रित वाहतूक प्रणाली म्हणून उदयास आली आहे, आणि हे परिवर्तन विशेषतः तामिळनाडूमध्ये स्पष्टपणे दिसून येते : पंतप्रधान
‘मेक इन इंडिया’ या आपल्या दृष्टीकोनामुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळत असून युवकांसाठी रोजगारनिर्मिती होत आहे, ही अभिमानाची बाब आहे : पंतप्रधान
केंद्रीय अर्थसंकल्पात तामिळनाडूला दुर्मिळ खनिज विकास मार्गिकेचा भाग म्हणून स्थान देण्यात आले असून, प्रगत उत्पादन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे : पंतप्रधान

श्री. आर. एन. रवी, एल. मुरुगन, एडप्पाडी के. पलानीस्वामी, नैनार नागेंद्रन, ई. व्ही. वेलू आणि तामिळनाडूतील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम!

मी पवित्र आणि ऐतिहासिक शहर मदुराईमध्ये येऊन सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. मी मीनाक्षी अम्मन आणि भगवान सुंदरेश्वर यांना नमन करतो. आजचा कार्यक्रम तामिळनाडूच्या विकास यात्रेतील एका गौरवपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. आम्ही 4,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे प्रकल्प संपर्कव्यवस्थेत बदल घडवून आणतील, अर्थव्यवस्थेला चालना देतील, रोजगार निर्माण करतील आणि लाखो लोकांचे जीवन बदलून टाकतील. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळेल आणि तीर्थयात्री व पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच व्यवसायांसाठी जलद वाहतुकीची सोय होईल. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे लोकांना सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

मित्रांनो,

गेल्या 12 वर्षांत, भारत सरकारने तामिळनाडूच्या महामार्ग जाळ्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 2014 पासून आतापर्यंत येथे 4,000 किलोमीटरहून अधिक महामार्गांचे निर्माण करण्यात आले आहे. आज, मला दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करताना आनंद होत आहे. पहिला प्रकल्प, 2,100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह मरक्कनम-पुद्दुचेरी खंडाचे चौपदरीकरण करणे. यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील किनारपट्टीवरील पर्यटन, व्यापार आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. दुसरा प्रकल्प, परमाकुडी-रामनाथपुरम खंडाचे चौपदरीकरण करणे. या प्रकल्पात, आम्ही 1,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहोत. हे रामेश्वरम आणि धनुषकोडी सारख्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ करेल. यामुळे तीर्थयात्रींचा प्रवास सोपा होईल आणि कृषी उत्पादने व सागरी उत्पादनांची सुलभ वाहतूक सुनिश्चित होईल.

मित्रांनो,

गेल्या एका दशकात, भारतीय रेल्वेमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. ही एक आधुनिक, कार्यक्षम आणि जन-केंद्रित वाहतूक व्यवस्था म्हणून उदयास येत आहे. हा बदल विशेषतः तामिळनाडूमध्ये दिसून येत आहे. आमचे सरकार आल्यापासून तामिळनाडूच्या रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये जवळपास 9 पटीने वाढ झाली आहे. 2009 ते 2014 दरम्यान, रेल्वेचे सरासरी वार्षिक वाटप 880 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये, हे वाटप वाढून 7,600 कोटी रुपये झाले आहे.

तामिळनाडूमध्ये 1,300 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आले आहेत. 97 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्यात आले आहे. शेकडो फ्लायओव्हर आणि अंडरपासमुळे सुरक्षा आणि कार्यक्षमतेत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी, मला तामिळनाडूतील नवीन पंबन पुलाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. हा भारताचा पहिला 'वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज'  आहे, जो अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. हा पूल स्वतःच तामिळनाडूतील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनला आहे.

मित्रांनो,

सध्या, 9 वंदे भारत ट्रेन्स आणि 9 अमृत भारत ट्रेन्स तामिळनाडूतील लोकांना सेवा देत आहेत. अशा हाय-स्पीड ट्रेन्सच्या डब्यांचे (Coaches) निर्माण चेन्नईच्या 'इंटीग्रल कोच फॅक्टरी'मध्ये केले जात आहे. ही गौरवाची बाब आहे की ‘मेक इन इंडिया’चा आमचा संकल्प आत्मनिर्भरतेला चालना देत आहे आणि आपल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. ही स्थानके आराम, सुलभता आणि स्थानिक ओळखीचे प्रतिबिंब आहेत. आज, आम्ही तामिळनाडूतील 8 पुनर्विकसित स्थानकांचे उद्घाटन करत आहोत. चेन्नई बीच-चेन्नई एग्मोर चौथ्या लाईनच्या लोकार्पणामुळे चेन्नईतील हजारो दैनंदिन प्रवाशांना फायदा होईल. मला कुंभकोणम, येरकॉड आणि वेल्लोर येथे आकाशवाणीच्या नवीन एफएम रिले ट्रान्समीटर्सचे उद्घाटन करताना देखील आनंद होत आहे. ही रेडिओ स्टेशन्स आजपासून तुमच्या सेवेसाठी समर्पित असतील.

 

मित्रांनो,

तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांसाठीचा निधी गेल्या दशकाच्या तुलनेत आता 3 पटीने वाढला आहे आणि आर्थिक वर्ष 2026 चा अर्थसंकल्प देखील तामिळनाडूवर विशेष लक्ष केंद्रित करून याच प्रवृत्तीला पुढे नेत आहे. या अर्थसंकल्पात, आम्ही बेंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडला आहे. हे प्रस्ताव या संपूर्ण क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणतील. अर्थसंकल्पात तामिळनाडूचा समावेश 'रेअर अर्थ कॉरिडॉर'  चा भाग म्हणून करण्यात आला आहे. रेअर अर्थ कॉरिडॉर प्रगत उत्पादन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देईल

 

मित्रांनो,

तामिळनाडूचा इतिहास आणि वारसा अत्यंत समृद्ध आहे. आदिचनल्लूर सारख्या ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा स्थळे म्हणून विकसित केले जाईल. पुलिकट सरोवर आणि पोधिगई मलाई परिसरातील इको-टूरिझम  उपक्रम नैसर्गिक परिसंस्थेचे जतन करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील. संपूर्ण देशात, उत्पादनाला  चालना देण्यासाठी सुमारे 200 इंडस्ट्रियल क्लस्टरची  निवड केली जाईल आणि त्यांना सहाय्य दिले जाईल. आपल्याला सर्वांना माहित आहे की तामिळनाडूमध्ये अनेक उद्योग आहेत, त्यामुळे या योजनेचा येथील तरुणांना मोठा लाभ होईल.

 

मित्रांनो,

प्रत्येक भारतीय 2047 पर्यंत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरित आहे. देशाचे भविष्य घडवण्यात तामिळनाडू महत्त्वाची भूमिका बजावेल. विकसित भारतासाठी एक 'विकसित तामिळनाडू' हे आमचे सामूहिक ध्येय आहे. केंद्र सरकार सर्वसमावेशक विकास आणि राज्याच्या प्रगतीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. नंद्री (धन्यवाद)!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump

Media Coverage

India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi