राष्ट्रपतींचे अभिभाषण 140 कोटी भारतीयांचा आत्मविश्वास आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आहे: पंतप्रधान
भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार युवा, शेतकरी आणि उत्पादकांसाठी अफाट संधी खुल्या करत आहे: पंतप्रधान
आमच्या सरकारचा सुधारणा, कामगिरी, परिवर्तन यावर विश्वास आहे, देश झपाट्याने रिफॉर्म एक्स्प्रेसमधून पुढे जात आहेः पंतप्रधान
भारताची लोकशाही आणि लोकसंख्येचे स्वरुप जगासाठी आशेचा किरण आहे: पंतप्रधान
उपाययोजना शोधण्याची, सक्षमीकरणाचे निर्णय घेण्याची आणि सुधारणांना गती देण्याची ही वेळ आहेः पंतप्रधान

नमस्कार, मित्रांनो!

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

 

मित्रांनो,

या वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक वातावरणात झाली आहे. आत्मविश्वासाने भरलेला भारत आज जगासाठी आशेचा किरण ठरला आहे आणि आकर्षणाचे केंद्रही बनला आहे. या चतुर्थांशाच्या सुरुवातीलाच भारत आणि युरोपियन संघांदरम्यान झालेला मुक्त व्यापार करार आगामी काळ किती उज्ज्वल आहे, भारताच्या तरुणांचे भविष्य किती उज्ज्वल आहे, याची झलक दाखवतो. हा मुक्त व्यापार महत्त्वाकांक्षी भारतासाठी आहे, आकांक्षी तरुणांसाठी आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी आहे. मला ठाम विश्वास आहे की विशेषतः भारतातील उत्पादक या संधीचा उपयोग आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी पुरेपूर वापर करतील. मी सर्व प्रकारच्या उत्पादकांना हेच सांगू इच्छितो की भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणून ओळखला जाणारा करार झाला आहे, आता आपल्या देशातील उद्योगपती आणि उत्पादकांसाठी एक प्रचंड बाजार खुला झाला आहे. आता केवळ स्वस्त दरात माल पाठवण्यापुरते विचार करून थांबू नका. ही एक मोठी संधी आहे. आणि या संधीचा पहिला मंत्र म्हणजे गुणवत्तेवर भर देणे. बाजार खुला झाला आहे, तर सर्वोत्तम गुणवत्ता घेऊन बाजारात उतरा. जर सर्वोत्तम गुणवत्ता घेऊन गेलात, तर युरोपियन युनियनमधील 27 देशांतील ग्राहकांकडून आपण केवळ पैसेच कमावणार नाही, तर गुणवत्तेमुळे त्यांची मनेही जिंकू. त्याचा परिणाम दीर्घकाळ, अनेक दशके टिकून राहिल. कंपन्यांचे ब्रँड देशाच्या ब्रँडसोबत नवा गौरव प्रस्थापित करतात. त्यामुळे 27 देशांसोबत झालेला हा करार आपल्या देशातील मच्छीमार, आपल्या देशातील शेतकरी, आपल्या देशातील तरुण, तसेच सेवा क्षेत्रातील जगभर काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठ्या संधी घेऊन येत आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की, एका अर्थाने आत्मविश्वासी, स्पर्धात्मक आणि उत्पादक भारताच्या दिशेने हे एक फार मोठे पाऊल आहे.

 

 

मित्रांनो,

देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असणे स्वाभाविक आहे. मात्र या सरकारची ओळख ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ अशी राहिली आहे. आता आपण ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार झालो आहोत आणि ती अतिशय वेगाने धावत आहे. या रिफॉर्म एक्सप्रेसला गती देण्यासाठी संसदेमधील सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनीही याकरिता आपली सकारात्मक ऊर्जा दिली आहे आणि त्यामुळे सुधारणा प्रक्रियेला सातत्याने वेग मिळत आहे. देश दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांमधून बाहेर पडत दीर्घकालीन उपायांच्या मार्गावर ठामपणे पुढे जात आहे. आणि जेव्हा दीर्घकालीन उपाय असतील, तर अंदाजक्षमता निर्माण होते आणि त्यातून जगात विश्वास निर्माण होतो. आमच्या प्रत्येक निर्णयामागे राष्ट्राची प्रगती हेच उद्दिष्ट आहे, आणि आमचे सर्व निर्णय मानव-केंद्रित आहेत. आमची भूमिका, आमच्या योजना मानव-केंद्रित आहेत. आम्ही तंत्रज्ञानाशी स्पर्धाही करू, तंत्रज्ञान स्वीकारूही, तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याची दखलही घेऊ; मात्र त्याच वेळी मानवी केंद्रस्थानी असलेली व्यवस्था कधीही दुर्लक्षित करणार नाही. संवेदनशीलतेचे महत्त्व ओळखून तंत्रज्ञानाच्या समन्वयासोबत पुढे जाण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. आमचे टीकाकार मित्र आहेत, त्यांची पसंती-नापसंती असते, आणि लोकशाहीत ते स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट सर्वजण मान्य करतात—या सरकारने तळागाळातील लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यावर भर दिला आहे. योजना केवळ कागदपत्री न ठेवता थेट जनतेच्या आयुष्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हीच परंपरा पुढील काळात ‘रिफॉर्म एक्सप्रेस’मध्ये नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्ससह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. भारताची लोकशाही आणि भारताची लोकसंख्या आज जगासाठी मोठे आशास्थान आहे. अशा वेळी लोकशाहीच्या या मंदिरातून जगाला आपल्या क्षमतेचा, लोकशाहीप्रती समर्पणाचा आणि लोकशाही प्रक्रियांतून घेतलेल्या निर्णयांचा सन्मान करण्याचा संदेश देण्याची ही संधी आहे—आणि जग त्याचे स्वागत तसेच स्वीकार निश्चितच करते. आज देश ज्या पद्धतीने पुढे जात आहे, तो काळ अडथळ्यांचा नाही, तर उपायांचा आहे. आज प्राधान्य अडथळ्यांना नाही, उपायांना आहे. आज केवळ अडथळ्यांबद्दल तक्रार करत बसण्याचा काळ नाही, तर धैर्याने उपाययोजना करणाऱ्या निर्णयांचा काळ आहे. मी सर्व माननीय खासदारांना विनंती करतो की राष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांच्या या पर्वाला वेग द्यावा, निर्णयांना बळ द्यावे आणि आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत सुविधा पोहोचवण्याच्या मोहिमेत यशस्वीपणे पुढे जाऊया.

मित्रांनो, आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक शुभेच्छा.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026