आपले एक ध्येय, एक गंतव्यस्थान, ‘विकसित भारत’: पंतप्रधान
अनेक जागतिक संकटे असूनही जगातील नेते आणि तज्ञ भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत: पंतप्रधान
जर तुम्हाला भविष्याचा भाग व्हायचे असेल, तर तुम्हाला भारतात असले पाहिजे: पंतप्रधान
भारत केवळ प्रगती करत नाही; भारत पुढील स्तरावर जात आहे: पंतप्रधान
जागतिक आव्हानांच्या ओझ्यातून आपले शेतकरी आणि नागरिक सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल: पंतप्रधान

आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

21 व्या शतकातला सध्याचा काळ अभूतपूर्व असाच आहे. एका बाजूला युद्धाचे वातावरण आहे, पुरवठा साखळी पुन्हा विस्कळीत होत आहे, संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनेच्या उपयुक्ततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि अशा बिकट काळातही आपला भारत प्रगती करत आहे. आज जग अशा ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले आहे; जिथे सगळीकडे केवळ भारताविषयीच चर्चा होत आहे. सध्याच्या इतक्या सगळ्या संकटांच्या काळात जगातले सर्व नेते आणि जाणकार भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी फिनलंडचे अध्यक्ष अ‍ॅलेक्झांडर स्टब भारतात आले होते. आता जगाची दिशा ग्लोबल साऊथ ठरवेल आणि जगाला ही दिशा देण्यामध्ये भारताचा सर्वात महत्त्वाचा वाटा असेल असे स्टब म्हणाले होते. त्याआधी कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले होते की, भारत येत्या तीस वर्षांत जगाच्या आर्थिक सत्तेचे केंद्र बनेल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ हेदेखील असे मानतात की, जगातल्या मोठमोठ्या समस्या सोडवण्यासाठी भारताचा सहभाग अनिवार्य बनला आहे. तंत्रज्ञान आणि आर्थिक विश्वातील जागतिक पातळीवरील प्रमुख व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी व्यक्त केलेल्या मताचा सारांश हाच आहे की, जर तुम्हाला चांगले भविष्य घडवायचे असेल; तर तुम्हाला भारतासोबत असावेच लागेल, भारतात असावे लागेल.  

 

 

मित्रांनो,

नुकताच भारताने वीस षटकांच्या सामन्यांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.  त्यामुळे प्रत्येकजण खुश आहे. भारतात तर क्रिकेटचे इतके वेड आहे की, एखादे चांगले सादरीकरण सुरू असो किंवा परदेशातील पाहुणे सादरीकरण करत असोत क्रिकेटप्रेमी मध्येच नजर बाजूला करुन सामन्याचा स्कोर पाहतीलच. हे नाही तर कोणी ना कोणी स्कोर काय झाला असे विचारणारच. आज अशीच स्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेची आहे. प्रत्येक जण अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. भारताची अर्थव्यवस्था गेल्या महिन्यात कशी होती, आज काय स्थिती आहे याची सर्व माहिती देशातल्या सगळ्यांनाच हवी असते. एवढी उत्सुकता देशात याआधी कधी असेल असे मला वाटत नाही आणि असेल तर कधी होती? आज भारतीयांच्या आकांक्षा कुठे पोहोचल्या आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास किती बळावला आहे हेच यातून दिसून येते. जगाचा भारतावरचा विश्वास वाढण्याचे हेच कारण आहे.

आणि मित्रांनो,

भारताकडून इतक्या सगळ्यांच्या अपेक्षा असतील, अख्ख्या जगाचे लक्ष आपल्या देशावर लागून राहिले असेल तेव्हा आपल्या सगळ्यांची जबाबदारीदेखील आणखी वाढते.

मित्रांनो,

आजचा भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना स्वतःलाच एका वेगळ्या पातळीवर घेऊन चालला आहे. आज देशात आधुनिक पायाभूत सुविधा तयार होत आहेत, आपण डिजिटल पायाभूत सुविधांमध्येही  पुढची पातळी गाठली आहे, युपीआयमुळे डिजिटल पेमेंट प्रणालीनेही पुढचा टप्पा गाठला आहे. आज भारत जगातील सर्वात वेगावान वास्तवकालिन डिजिटल पेमेंटस करणारा देश बनला आहे.

मित्रांनो,

भारत आता अत्याधुनिक सुधारणाही घडवत आहे, भारत सुधारणांच्या वारुवर स्वार झाला आहे. एक काळ असा होता की जेव्हा भारतात कित्येक कामे, कित्येक निर्णय अशक्यप्राय मानले जायचे, असे निर्णय देखील आज भारत घेत आहे. कलम 370 रद्द करणे असंभव आहे असे मानले जायचे परंतु आज जम्मू काश्मीरमधून कलम 370 ची अडचण दूर झाली आहे. देशात सर्वांची बँक खाती असणे अशक्य असल्याचेही बोलले जायचे; मात्र आज 50 कोटींपेक्षा जास्त जनधन खात्यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. तिहेरी तलाक पद्धत बंद होणे शक्यच नाही असे मानले जायचे; पण आता मुस्लिम भगिनींवरचा हा अन्याय दूर झाला आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण मिळणेही एकेकाळी अशक्य बाब मानली जात होती; मात्र आज याबाबतीतला कायदा अस्तित्वात आला आहे. अंतराळ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबतीत भारत फार पुढे जाऊ शकत नाही असेही मानले जायचे; परंतु चांद्र मोहीम, सेमीकंडक्टर अभियान, क्वांटम अभियान या सगळ्यांच्या यशातून भारताने आधुनिक तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे.

मित्रांनो,

आता भारत केवळ स्वप्न पाहात नाही; तर ती सत्यातदेखील उतरवतो. म्हणूनच भारत केवळ प्रगती करत नसून तो भविष्याकडे झेपावत आहे असे अख्खे जग म्हणत आहे.  

मित्रांनो,

आपण संकटांचा सामना कशाप्रकारे करतो यावरही देशाचा विकास अवलंबून असतो. आपल्याला माहिती आहेच की, जगातील स्थिती अचानक बदलू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण आधी कोरोना साथीच्या संकटाचा सामना केला, त्यानंतर रशिया युक्रेन संघर्ष आणि आता आपल्या अगदी जवळच एक युद्ध सुरू आहे. या युद्धाने सगळ्या जगालाच उर्जासंकटाच्या खाईत लोटले आहे. 

 

 

मित्रहो,

अशा कठीण परिस्थितीत एक देश म्हणून आपण या गोष्टीशी सामना कसा करू शकतो ही बाब महत्त्वपूर्ण आहे. संकटाचा काळ हा एक प्रकारे संपूर्ण राष्ट्राची परीक्षा असते शांत राहून धीराने आपल्याला परिस्थितीला तोंड द्यायचे असते. लोकांचा विश्वास वाढवून लोकांमध्ये जागरूकता आणत आम्हाला पुढे जायचे असते आणि यात प्रत्येकाची भूमिका असते. प्रत्येक राजकीय पक्ष, मीडिया, सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था, तरुण वर्ग, गाव, शहर प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते. जेव्हा सर्वजण मिळून वाटचाल करतात तेव्हा संकटाच्या व्याप्तीपेक्षा त्याला तोंड देण्याचे देशाचे सामर्थ्य कित्येक पटीने वाढते हे आपण कोरोना काळात बघितले आहे. आज देशासमोर आणखी एक आव्हान ठाकले आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी ठेवून आपली कर्तव्ये करावी लागतील. 

मित्रहो, 

सध्या एलपीजीबद्दल बरीच चर्चा होत आहे. काही जण असे आहेत जे घबराट उडावी म्हणून प्रयत्न करत आहेत. स्वतःचा अजेंडा चालवू बघत आहेत. मी या वेळी त्यांच्यावर राजकीय टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु एवढे नक्की सांगेन की असे करून ते स्वतःला जनतेच्या समोर उघडे पाडत आहेत आणि देशाचेही बरेच नुकसान करत आहेत.

मित्रहो, 

आज युद्धामुळे हे जे वैश्विक संकट आले आहे त्याच्या परिणामांपासून कोणताही देश सुटलेला नाही. कमी जास्त प्रमाणात प्रत्येक देश या परिस्थितीचा शिकार झाला आहे. भारत सरकारसुद्धा या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या प्रयत्नात कोणतीही बाकी ठेवलेली नाही आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. गेल्या काही दिवसात जगातल्या अनेक देशांमधल्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबतीत माझे बोलणे झाले आहे. पुरवठा साखळीत जे व्यत्यय आले आहेत ते आपल्याला  कशा ना कशा प्रकारे पार करता यावेत यासाठीही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

मित्रहो,

भारताच्या वेगवान विकासासाठी वेगवेगळ्या ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देणे ही नेहमीचीच आवश्यकता आहे आणि त्याला बळ देण्यासाठी आम्ही दोन स्तरांवर एकाच वेळी काम केले आहे. पहिला म्हणजे देशात उर्जा पोहोच  वाढण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधा तयार केल्या .आणि दुसरा म्हणजे ऊर्जेसाठी आम्हाला केवळ परदेशांवर अवलंबून राहायला नको म्हणून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर दिला. आता नैसर्गिक वायूच्या क्षेत्रातील काही आकडे मी तुम्हाला सांगतो. वर्ष 2014 पर्यंत देशात फक्त 14 कोटी एलपीजी जोडण्या होत्या म्हणजेच देशातील जवळजवळ निम्म्या कुटुंबांकडेच एलपीजी जोडणी होती. आज त्याच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 33 कोटी घरगुती एलपीजी जोडण्या आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये आम्ही आपली बॉटलिंग क्षमता दुप्पट केली आहे. वितरण केंद्रे सुद्धा तेरा हजार होती त्यांची संख्या  25000 हून जास्त एवढी वाढली आहे. 2014 मध्ये देशात फक्त चार LNG टर्मिनल्स होते आज त्यांचे संख्या दुप्पट झालेली आहे. गॅस पाईप लाईन, जी जवळपास साडेतीन हजार किलोमीटर होती ती जवळपास दहा हजार किलोमीटर पर्यंत विस्तारली आहे कारण जवळजवळ 60 टक्के एलपीजी परदेशातून येतो म्हणून देशातील बड्या बंदरांची आयात टर्मिनल क्षमता सुद्धा कित्येक पटीने वाढवली आहे. 

मित्रहो, 

वर्ष 2014 च्या आधी देशात फक्त 25- 26 लाख घरांमध्येच स्वस्त पाईप गॅस म्हणजेच पीएनजीची सुविधा होती. आज ही संख्या सुद्धा सव्वा कोटीच्या पुढे गेली आहे 2014 मध्ये देशात सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा दहा लाखांहून जास्त नव्हत्या. आज ही संख्या 70 लाखांहून जास्त आहे आणि हे शक्य होत आहे कारण केल्या दशकांमध्ये देशात साठशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस वितरण नेटवर्क स्थापन केले गेले आहे.

 

 

मित्रहो, 

कोणत्याही देशाने आत्मनिर्भर असणे एवढे आवश्यक का आहे, हे या जागतिक संकटाने पुन्हा  दाखवून दिले आहे. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही भारताच्या ऊर्जा क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी संपूर्णपणे आत्मनिर्भरता या दिशेने काम करत आहोत

मित्रहो, 

पेट्रोलियम वरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही इथेनॉल वर, बायोफ्युएलवर भर दिला. 2014 च्या आधी देशात फक्त दीड टक्का इथेनॉल ब्लेंडिंग कॅपॅसिटी होती. आज आपण पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याच्या जवळपास पोहोचलो आहोत. जर हे काम केले नसते तर आम्हाला गेल्या अकरा वर्षांमध्ये 18 करोड बॅरल अतिरिक्त इंधन विदेशांकडून खरेदी करावे लागले असते आजच्या परिस्थितीत बघितले तर इथेनॉलमुळे आम्हाला दरवर्षी जवळपास साडेचार कोटी बॅरल कमी इंधन आयात करावे लागत आहे म्हणजे देशाची जवळपास दीड लाख कोटी रुपयांची बचत यामुळेच झाली आहे. 

मित्रहो

भारतात रेल्वे ही पेट्रोलियमची मोठी ग्राहक आहे. आमच्या देशात रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम साठ वर्षांपूर्वी सुरू झाले होते तरीही 2014 पर्यंत फक्त 20% रेल्वे मार्गांचा विद्युतीकरणच झाले होते. बाकी रेल्वे मार्गांवर हजारो डिझेल इंजिन चालत होते. भारतात आज ब्रॉडगेज नेटवर्कचे जवळपास 100% विद्युतिकरण झाले आहे. 2024-25 मध्येच भारतीय रेल्वेने जवळपास 180 कोटी लिटर डिझेलची बचत केली आहे. जर विद्युतीकरण झाले नसते तर प्रत्येक वर्षी एवढे डिझेल उत्पादन करण्यासाठी अतिरिक्त इंधन आयात करावे लागले असते. तसेच आम्ही मेट्रोचे नेटवर्क वाढवले आणि इलेक्ट्रिक वाहतुकीवर भर दिला.

असेच एक आणखी मोठे काम आम्ही नूतनक्षम ऊर्जा क्षेत्रात केले आहे. आज आमची एकूण स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या अर्धी उर्जा नूतनीक्षम ऊर्जास्रोतांकडून येते. आमची एकूण नूतन एक क्षण ऊर्जा क्षमता आता 250 गीगावॅटच्या ऐतिहासिक आकड्याला पार करून गेली आहे. विचार करा वर्ष 2014 मध्ये भारताचे सौर ऊर्जा क्षमता फक्त दोन गिगावॅट ती आज ती जवळपास 40 पटींनी वाढवून 130 गिगावॅट झाली आहे. घरगुती वापरासाठी गॅस व्यतिरिक्त विजेचा जास्तीत जास्त वापर करता यावा यासाठी  पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना लागू करण्यात आली.  आतापर्यंत, या योजनेअंतर्गत अंदाजे  30 लाख कुटुंबांनी छतावर सौर पॅनेल बसवले आहेत.

मित्रहो,

याव्यतिरिक्त, आम्ही गोबरधन  योजनेवर देखील काम केले, या अंतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनावर काम करण्यात आले. आतापर्यंत, देशात 100 हून अधिक संयंत्रे कार्यान्वित झाली आहेत आणि 600 हून अधिक संयंत्रांवर काम सुरू आहे.

 

 

मित्रहो ,

पेट्रोल आणि डिझेलच्या  क्षेत्रात क्षमता निर्मितीच्या दिशेने आम्ही व्यापक प्रयत्न केले आहेत. 2014 पूर्वी, भारताकडे सामरिक पेट्रोलियम साठे म्हणजे संकटाच्या काळासाठी  कच्चे तेल साठवण्याची क्षमता अगदी नगण्य होती. आज, आपल्याकडे 50 लाख टनांपेक्षा जास्त सामरिक  पेट्रोलियम साठा आहे. आणि याहून अधिक क्षमतेवर काम सुरू आहे. गेल्या दशकात, आम्ही आपल्या शुद्धीकरण क्षमतेत देखील वार्षिक  40 दशलक्ष टनांपेक्षा जास्त वाढ केली आहे.  म्हणूनच आज भारत जगातील सर्वात मोठ्या शुद्धीकरण केंद्रांपैकी एक बनला आहे. म्हणजेच तुम्ही अंदाज बांधू  शकता  की आम्ही  भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी किती व्यापक प्रमाणात आणि किती प्रकारे  काम करत आहोत. या युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटावर आपण निश्चितच मात करू शकू. 140 कोटी देशवासीयांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्याप्रमाणे आपण एकत्र येऊन देशाला कोविड संकटातून बाहेर काढले होते, त्याचप्रमाणे आपण या जागतिक संकटावरही मात करू. आणि मी पुन्हा सांगतो: सरकारबद्दल बोलायचे तर, आम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांमध्ये कुठलीही कसूर ठेवणार नाही. आम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात जनतेचे हित सर्वोपरि राहील.

मित्रहो ,

युक्रेन युद्धापासून ते आजपर्यंत, जागतिक बाजारपेठेपासून ते जगातील नागरिकांपर्यंत सर्व गोष्टींवर त्याचा कसा परिणाम झाला आहे हे आपण पाहिले आहे. मात्र, युद्धाशी संबंधित परिस्थितीचा भार भारतीय नागरिकांवर पडू नये यासाठी भारत सरकारने नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा रशिया-युक्रेन संकट गडद झाले होते, तेव्हा त्या काळात खतांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या . तरीही, आम्ही आमच्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात 3000 रुपयांना उपलब्ध असलेली युरियाची गोण अवघ्या 300 रुपयांना दिली होती. जगभरात  3000 रुपये भाव चालला होता, आपल्याकडे 300 रुपयांमध्ये दिली जात होती, यावेळीही युद्धाचा देशातील शेतकरी आणि नागरिकांच्या जीवनावर कमीत कमी प्रभाव पडेल  याची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

मित्रहो,

आजच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी... आज या व्यासपीठावरून राज्य सरकारांनाही एक विनंती आहे. काळाबाजार होऊ नये आणि अफवा पसरू नयेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच, परिस्थितीवर गांभीर्याने बारीक  लक्ष ठेवणे गरजेचे आहे, जे काळाबाजार करत आहेत त्यांच्याविरोधात  कठोर कारवाई देखील आवश्यक आहे.

मित्रहो,

मागील एक दशक आत्मनिर्भरतेबरोबरच संवेदनशील शासनाचे देखील होते. आपल्या देशाचा एक मोठा भाग, तिथे राहणारे लोक दिल्लीतील काँग्रेस सरकारच्या दृष्टिकोनाच्याही दूर राहिले. मात्र आमच्या सरकारने विकासाच्या शर्यतीत मागे राहिलेल्यांना शासनाच्या प्राधान्यांशी जोडले. आज या भागांमध्ये गृहनिर्माण, रस्ते, शाळा आणि रुग्णालये यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आकांक्षी जिल्हा योजना, आकांक्षी तालुका  योजना, पंतप्रधान जन मन योजना यासारख्या विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.

मित्रहो,

काँग्रेसच्या सरकारांचे एक खूप मोठे पाप म्हणजे त्यांनी देशाचा मोठा भाग माओवादी दहशतीच्या आगीत होरपळत सोडला. देशातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख राज्यातील मोठा भाग माओवादी दहशतीच्या विळख्यात होता. मात्र मित्रहो ,

गेल्या काही वर्षांमध्ये , देशाने ही परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला. आम्ही मोठ्या उत्साहाने  पुढे गेलो. आणि आज देश त्याचे परिणाम पाहत आहे.  2013 मध्ये 180 हून अधिक जिल्हे माओवादी दहशतवादाने प्रभावित होते. आज, माओवादी दहशतवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या एक अंकी झाली आहे.

मित्रहो,

मागील एका वर्षातच 2100  हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे,  900 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि जे शस्त्रे खाली ठेवण्यास तयार नव्हते अशा 300  हून अधिक कट्टर नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. परिणामी, एकेकाळी भीतीच्या सावटाखाली नाईलाजाने जगत असलेले भाग आता विकासाची नवी ऊर्जा अनुभवत आहेत.

मित्रहो ,

आज भारत ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याच्या प्रगतीची गती थांबवणे अशक्य आहे. 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आज वाढल्या आहेत. मला माहित आहे की जेव्हा एक स्वप्न पूर्ण होते तेव्हा नवीन स्वप्ने आणि आकांक्षा जन्म घेतात. मी याला ओझे मानत नाही, तर जनतेच्या विश्वासाची कमाई मानतो. हो ... देशात माझे काही असे शुभचिंतक आहेत ज्यांना वाटते की अपेक्षांच्या ओझ्याखाली मोदी कधी तरी दबले जातील, कधी तरी हार मानतील परंतु त्यांचे हेतू इतके वाईट आहेत की  त्यांच्या आशा अपूर्ण राहत  आहेत आणि जोपर्यंत आपल्या देशवासीयांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत , तोपर्यंत त्या पूर्ण होणार नाहीत. आता, 140 कोटी  भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण होतील. भारत प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल आणि कोणत्याही परिस्थितीत विकसित बनेल.

या भावनेसह  मी माझे भाषण संपवतो.

 पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

 धन्यवाद !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s startup game-changer? ₹10,000 crore FoF 2.0 set to attract investors

Media Coverage

India’s startup game-changer? ₹10,000 crore FoF 2.0 set to attract investors
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing of renowned photographer Shri Raghu Rai
April 26, 2026

The Prime Minister has expressed deep sorrow over the passing of eminent photographer Raghu Rai, describing him as a creative stalwart who immortalised India’s vibrancy through his lens. Shri Modi noted that Shri Raghu Rai’s work was marked by extraordinary sensitivity, depth and diversity, capturing the many facets of life across India and bringing them closer to people.The Prime Minister remarked that his contribution to the world of photography and culture is unparalleled, and his passing is an irreparable loss to the artistic community.

The Prime Minister posted on X;

“Shri Raghu Rai Ji will be remembered as a creative stalwart, who captured India’s vibrancy through his lens. His photography had extraordinary sensitivity, depth and diversity. It brought people closer to the different aspects of life in India. His passing is an irreparable loss to the world of photography and culture. My thoughts are with his family, admirers and the photography fraternity in this hour of grief. Om Shanti.”