आत्मविश्वासयुक्त भारत हा साशंकता आणि निराशेतून बाहेर पडल्यामुळेच विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यास उत्सुक: पंतप्रधान
गेल्या 11 वर्षात, देशाच्या चेतनेत नवीन ऊर्जेचा संचार, आपले उचित सामर्थ्य पुन्हा प्राप्त करण्याचा भारताचा ठाम निर्धार: पंतप्रधान
भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हा आज जगात चर्चेचा विषय: पंतप्रधान
आज, भारताच्या प्रत्येक हालचालीवर जग बारकाईने लक्ष ठेवत असून त्यांचे विश्लेषण केले जात आहे, एआय समिट हे याचे स्पष्ट उदाहरण: पंतप्रधान
राष्ट्राची उभारणी कधीही अल्पकाळाच्या विचाराने होत नाही; दीर्घकालीन दृष्टिकोन, संयम आणि वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे ती आकारास येते: पंतप्रधान

इस्रायलची हवा इथेसुद्धा पोहोचली आहे.

नमस्कार !

नेटवर्क 18 चे सर्व पत्रकार, या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था पाहणारे आयोजक, इथे उपस्थित असलेले मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो !

आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे. 

 

मित्रांनो,

सामर्थ्य कोणत्याही देशामध्ये अचानक निर्माण होत नाही, सामर्थ्य पिढ्यान् पिढ्या निर्माण होत जातं. ते ज्ञानानं, परंपरेनं, परिश्रमांनी आणि अनुभवांनी आणखी उजळत जातं, परंतु, इतिहासाच्या एका दीर्घ कालखंडात, गुलामगिरीच्या शेकडो वर्षांमध्ये, आपल्या सामर्थ्यवान असण्याच्या भावनेची जागा न्यूनगंडानं घेतली होती. इतर देशांमधून आयात केल्या गेलेल्या विचारसरणीने समाजामध्ये आपण अशिक्षित आहोत आणि अनुगामी म्हणजे अनुकरण करणारे आहोत असा समज अगदी पक्का ठसवला होता. आपल्याकडे असं देखील म्हटलं गेलं आहे – यादृशी भावना यस्य, सिद्धिर्भवति तादृशी. याचा अर्थ असा आहे की, ज्याची जशी भावना असते, त्याला तशीच सिद्धी प्राप्त होते. भावनाच जर कमीपणाची असेल, तर सिद्धीही तशीच मिळणार. आपण परदेशी तंत्रज्ञानाची नक्कल करत असू, त्यावर परदेशातून शिक्कामोर्तब होण्याची वाट पाहत असू, ही राजकीय आणि भौगोलिकपेक्षाही  मानसिक गुलामगिरी होती.  दुर्दैवानं, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही, भारत या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकला नाही. आणि त्यामुळे झालेलं नुकसान आपण आतापर्यंत सोसत आहोत. याचं ताजं उदाहरण, आपण व्यापार करारांमध्ये होणाऱ्या चर्चेत पाहत आहोत. काही लोक इतके चकित झाले आहेत की अरे, हे काय झालं, कसं झालं, विकसित देश भारताबरोबर व्यापार करार करण्यासाठी इतके उत्सुक का आहेत. याचं उत्तर आहे, हताश-निराश मानसिकतेतून बाहेर पडत असलेला आत्मविश्वासाने भरलेला भारत.  जर देश आजही 2014 पूर्वीसारख्या निराश मनस्थितीत असता,  फ्रेजाइल फाइव्हमध्ये गणला गेला असता, धोरण लकव्याने ग्रासलेला असता, अशी वाईट परिस्थिती असती तर कोणी आपल्याशी व्यापार करार केले असते का, अरे ते तर सोडाच, कोणी आपल्याकडे पाहिले देखील नसते.

पण मित्रांनो,

गेल्या 11 वर्षांमध्ये देशामध्ये नव्या ऊर्जेचा प्रवाह निर्माण झाला आहे. भारत आपलं गमावलेलं सामर्थ्य पुन्हा प्राप्त करण्याचे प्रयत्न करत आहे. एकेकाळी भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक दबदबा होता, तेव्हा आपलं सामर्थ्य काय होतं? भारताचं उत्पादन, भारतात तयार झालेल्या उत्पादनांचा दर्जा, भारताचं आर्थिक धोरण, आता आजचा भारत पुन्हा या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. म्हणूनच आम्ही उत्पादन वाढविण्यावर अधिक काम केलं, आम्ही मेक इन इंडिया वर जोर दिला, आम्ही आपली बँकिंग सिस्टम सशक्त केली. दोन अंकी दराने वाढत असलेली महागाई नियंत्रणात आणली आणि भारताला जगाच्या वाढीचं इंजिन बनवलं. भारताचं सामर्थ्य हेच आहे की जगातील विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी  आता स्वतःहून पुढे येत आहेत. 

मित्रांनो,

जेव्हा कुठल्या देशातील अंतर्भूत, सुप्तावस्थेत असलेली शक्ती जागृत होते, तेव्हा तो नवीन यश प्राप्त करतो. मी तुम्हाला आणखी काही इतर उदाहरणं देतो. जेव्हा मी इतर देशांच्या सरकारांच्या प्रमुखांना भेटतो, तेव्हा ते जनधन, आधार आणि मोबाइलच्या एवढ्या प्रचंड ताकदीबद्दल जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक असतात. ज्या भारतात एटीएमदेखील, विकसित देशांच्या तुलनेत खूप उशीरा आलं, त्याच भारतानं डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये जागतिक नेतृत्व कसं प्राप्त केलं? जिथे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत गळती होणं हे कटुसत्य मानलं जात होतं, त्या भारतात डीबीटीच्या माध्यमातून 24 लाख कोटी रूपये, म्हणजे चोवीस ट्रिलियन रुपये लाभार्थींपर्यंत पोहोचवणं कसं शक्य होत आहे? भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा, आज संपूर्ण जगात चर्चेचा विषय झाला आहे.  

 

मित्रांनो,

जगाला याचं आश्चर्य वाटतं की, ज्या भारतात 2014 पर्यंत, जवळपास तीन कोटी कुटुंबं अंधारात होती, तो आज सौर ऊर्जा क्षमतेत जगातील पहिल्या काही देशांमध्ये कसा काय आला? ज्या भारतातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधरणा होण्याची कोणती आशा नव्हती, तो भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो नेटवर्क असलेला देश कसा झाला? ज्या भारताच्या रेल्वेचा केवळ विलंब आणि संथ गतीसाठी लौकिक होता, तिथे वंदे भारत,  नमो भारत, यासारखी सेमी-हायस्पीड कनेक्टिव्हिटी कशी शक्य झाली आहे?

मित्रांनो,

एक काळ असा होता, जेव्हा भारत नवीन तंत्रज्ञानाचा फक्त आणि फक्त ग्राहक होता. आज भारत नवीन तंत्रज्ञानाचा निर्माता देखील आहे आणि तो नवीन मापदंडही स्थापित करत आहे, आणि हे यामुळे झालं आहे की आपण आपलं सामर्थ्य ओळखलं आहे, ज्या स्ट्रेंथ विदिन ची तुम्ही चर्चा करत आहात, त्याचंच हे उदाहरण आहे. 

मित्रांनो,

आपण आता अभिमान बाळगून पुढे जात आहोत, तेव्हा जगाचा आपल्याकडे पाहण्याचा यापूर्वीचा दृष्टीकोन देखील आता बदलला आहे. तुम्हीच आठवा, काही वर्षांपूर्वी जगात, जागतिक प्रसार माध्यमांमध्ये भारतातील कोणत्याही कार्यक्रमाची किती कमी प्रमाणात चर्चा होत असे. 

पूर्वी भारतात होणाऱ्या कार्यक्रमांना तितकेसे महत्त्व दिले जात नसे. पण आज पहा, भारत जे काही करतो, इथे जे निर्णय घेतले जातात, त्याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटतात. ए आय परिषदेचे उदाहरण तुमच्या समोर आहे, याच वास्तूत ती पार पडली. या ए आय परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते. विकसित जग (ग्लोबल नॉर्थ) असो वा विकसनशील जग (ग्लोबल साउथ), सर्वजण एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि एकाच टेबलावर बसले होते. जगातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असोत किंवा छोटे स्टार्टअप्स (नवंउद्योग), सर्वजण एकत्र आले होते.

मित्रांनो,

आतापर्यंत जेवढ्या औद्योगिक क्रांती झाल्या, त्यामध्ये भारत आणि संपूर्ण ग्लोबल साउथ केवळ अनुकरण करणारे-मागोवा घेणारे म्हणून सहभागी होते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए आय-आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या युगात भारत निर्णयांमध्ये सहभागीही आहे आणि त्यांना आकारही देत आहे. आज आपल्याकडे स्वतःची ए आय नवंउद्योग  परिसंस्था आहे, विदा केंद्रा (डेटा-सेंटर) मध्ये गुंतवणूक करण्याची ताकद आहे. ए आय विदा साठवण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या ऊर्जेची  सर्वात जास्त गरज आहे, त्या आघाडीवरही भारत वेगाने काम करत आहे. आम्ही अणुउर्जा (न्यूक्लियर पॉवर) क्षेत्रात ज्या सुधारणा केल्या आहेत, त्या भारताच्या ए आय परिसंस्थेला  अधिक बळकट करण्यास मदत करतील.

 

मित्रांनो,

ए आय परिषदेचे आयोजन हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. मात्र दुर्दैवाने, देशातील सर्वात जुन्या पक्षाने देशाच्या या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. परदेशी पाहुण्यांसमोर काँग्रेसने केवळ आपली वस्त्रेच उतरवली नाहीत, तर यामुळे काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरीही उघडी पडली आहे. जेव्हा अपयशाची निराशा आणि हतबलता मनात घर करते आणि अहंकार शिगेला पोहोचतो, तेव्हा देशाला बदनाम करण्याची अशी विचारसरणी समोर येते. साहजिकच, काँग्रेसच्या या कृत्यामुळे देशात संताप आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या पापाचे समर्थन करण्यासाठी महात्मा गांधीजींचा आधार घेतला. काँग्रेस प्रत्येक वेळी हेच करते. जेव्हा स्वतःचे पाप लपवायचे असते तेव्हा काँग्रेस बापूंना पुढे करते आणि जेव्हा स्वतःचे गुणगान करायचे असते, तेव्हा त्याचे सर्व श्रेय एकाच कुटुंबाला देते.

मित्रांनो,

काँग्रेस आता विचारसरणीच्या नावाखाली केवळ विरोधाचे एक हत्यार ( 'टूलकिट') बनून राहिली आहे. आणि या आंधळ्या विरोधाची मानसिकता इतकी वाढली आहे की, प्रत्येक व्यासपीठावर देशाला कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. देशाने काहीही चांगले केले, देशासाठी काहीही शुभं घडत असेल, तरी काँग्रेसला फक्त विरोधच करायचा असतो.

मित्रांनो,

माझ्याकडे एक मोठी यादीच आहे. देशाची संसदेची नवीन इमारत बांधली गेली, त्याला विरोध. संसदेच्या वर असलेल्या अशोक स्तंभातील सिंहांच्या प्रतिकृतीला विरोध. आता जे लोक स्वतःला मोठे बहाद्दर गडी समजत होते, ते सामान्य नागरिकांकडून जाब विचारला गेल्यावर किंवा रोषाला सामोरे गेल्यावर पळ काढत होते. पण आता संसद भवनातील सिंहाच्या पुतळ्याचे ‘दात’ (सत्तेचे, अधिकाराचे प्रतीक) पाहून तेच लोक घाबरून गेले आहेत. कर्तव्य पथ बनला, त्यालाही विरोध. सैन्याने लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) केला, त्यालाही विरोध. बालाकोटमध्ये हवाई हल्ला (एअर स्ट्राईक) झाला, त्यालाही विरोध. ऑपरेशन सिंदूर झाले, त्यालाही विरोध. म्हणजेच, देशाच्या प्रत्येक यशावर काँग्रेस कडून  एकच शस्त्र परजले जाते… ते म्हणजे—विरोध.

 

मित्रांनो,

देशाने कलम 370 ची भिंत पाडली (कलम हटवले), तेव्हा देश आनंदित झाला. पण काँग्रेसने विरोध केला. आम्ही सी ए (सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट-नागरिकत्व दुरुस्ती कायदा ) कायदा केला—त्याला विरोध. आम्ही महिला आरक्षण कायदा आणला—त्याला विरोध. त्रिवार तलाक विरुद्ध कायदा आणला—त्याला विरोध. आम्ही यूपीआय घेऊन आलो-त्याला विरोध. स्वच्छ भारत अभियान सुरू केले, त्याला विरोध. देशाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली, तर त्यालाही विरोध.

मित्रांनो,

लोकशाहीत विरोधी पक्ष म्हणजे केवळ 'आंधळा-विरोध' नव्हे, तर लोकशाहीत विरोधी पक्ष म्हणजे एक पर्यायी दृष्टीकोन असतो. म्हणूनच देशातील सुज्ञ जनता काँग्रेसला धडा शिकवत आहे; हे काम जनता आजपासून नाही, तर गेली चार दशके सातत्याने करत आहे. मी जे सांगणार आहे, त्याचे माझ्या माध्यमांतील मित्रांनीही जरा विश्लेषण करावे. तुम्हाला समजेल की, काँग्रेसची मते चोरीला जात नाहीत, तर देशातील लोक आता काँग्रेसला, मतदान करण्याच्या लायकीचेच मानत नाहीत. आणि याची सुरुवात 1984 नंतरच झाली होती. 1984 मध्ये काँग्रेसला 39% मते मिळाली होती आणि 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची मते कमीच होत गेली. आज काँग्रेसची अवस्था अशी आहे की, देशात फक्त 4 राज्ये अशी उरली आहेत जिथे काँग्रेसकडे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. गेल्या 40 वर्षांत तरुण मतदारांची संख्या वाढत गेली आणि काँग्रेसचा प्रभाव संपत गेला. काँग्रेस आता कुटुंबाच्या गुलामगिरीत अडकलेल्या लोकांचा एक क्लब बनून राहिली आहे. म्हणूनच आधी 'मिलेनियल्स'नी (तंत्रज्ञान स्नेही पिढी) काँग्रेसला धडा शिकवला आणि आता 'जेन झी' (तरुणाई) देखील सज्ज आहे.

मित्रांनो,

काँग्रेस आणि त्यांच्या सोबत्यांची विचारसरणी इतकी संकुचित आहे की, त्यांनी दूरदृष्टीने काम करण्यालाही गुन्हा ठरवून टाकले आहे. आज जेव्हा आम्ही 'विकसित भारत 2047' बद्दल बोलतो, तेव्हा काही लोक विचारतात— "इतक्या लांबचा विचार आताच कशाला?" काही लोक तर असेही म्हणतात की, "तोपर्यंत मोदी जिवंत थोडेच असणार आहेत!" पण वास्तव हे आहे की, राष्ट्रनिर्मिती कधीही तात्कालिक विचाराने होत नसते. ती एका मोठ्या संकल्पाने, संयमाने आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांनी होत असते. मला नेटवर्क 18 च्या प्रेक्षकांसमोर आणखी काही वस्तुस्थिती मांडायची आहे. भारत दरवर्षी परदेशी सागरी जहाजांनी मालवाहतूक करण्यासाठी भाड्यापोटी 6 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करतो. खतांच्या आयातीवर दरवर्षी सव्वा दोन लाख कोटी रुपये खर्च होतात. पेट्रोलियम आयातीवर दरवर्षी 11 लाख कोटी रुपये खर्च होतात. म्हणजेच दरवर्षी लाखो कोटी रुपये देशाबाहेर जात आहेत. जर हीच गुंतवणूक 20-25 वर्षांपूर्वी आत्मनिर्भरतेच्या दिशेने केली असती, तर आज हे भांडवल भारतातील पायाभूत सुविधा,संशोधन, उद्योग, शेतकरी आणि तरुणाईच्या क्षमतांना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरले असते. आज आमचे सरकार याच विचाराने काम करत आहे. परदेशी जहाजांना 6 लाख कोटी रुपये द्यावे लागू नयेत, म्हणूनच भारतीय नौवहन-जहाज बांधणी आणि बंदर पायाभूत सुविधा यांना बळकटी दिली जात आहे. खतांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी नवीन खत संयंत्रे उभारली जात आहेत, नॅनो-युरियाला प्रोत्साहन दिले जात आहे.

 

पेट्रोलियमवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, इथेनॉल मिश्रण, ग्रीन हायड्रोजन मिशन, सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्राधान्य दिले जात आहे.

आणि मित्रांनो,

आपल्याला भविष्याकडे पाहताना आजच निर्णय घेतले पाहिजेत. म्हणूनच आज भारतात सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण केली जात आहे. संरक्षण उत्पादन, मोबाइल उत्पादन, ड्रोन तंत्रज्ञान, अत्यावश्यक खनिज क्षेत्र यांमधील गुंतवणूक ही येणाऱ्या दशकांसाठी आर्थिक सुरक्षेचा पाया ठरेल. 2047 चे लक्ष्य म्हणजे केवळ राजकीय घोषणा नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अनेक क्षेत्रांमध्ये वेळेवर गुंतवणूक न झालेल्या ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचा हा एक संकल्प आहे. जर आपण आज स्वदेशी जहाजे बांधली, स्वतःची ऊर्जा निर्माण केली आणि स्वतःचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले, तर भावी पिढ्या आयातीच्या ओझ्याबद्दल नाही तर निर्यात क्षमतेबद्दल चर्चा करतील. राष्ट्राची प्रगती "आजच्या सोयीनुसार" नाही तर "उद्याच्या तयारीनुसार" निश्चित केली जाते. आणि दूरदृष्टीने केलेले परिश्रम हाच 2047 मधील आत्मनिर्भर, सशक्त आणि समृद्ध भारताचा पाया असेल. आणि यासाठी काँग्रेसने स्वतःचे कपडे कितीही फाडले तरी आपण अथक परिश्रम करत राहू.

मित्रांनो,

राष्ट्र उभारणीसाठी एक महत्त्वाची अट म्हणजे उदात्त हेतू. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यामध्येही अपयशी ठरले आहेत. काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी कधीही चांगल्या हेतूने कामे केली नाहीत. त्यांना गरिबांच्या दुःखाची आणि वेदनेचीही काळजी नसते. उदाहरणार्थ, आयुष्मान भारत योजना आजपर्यंत बंगालमध्ये लागू केलेली नाही. जर चांगले हेतू असते तर गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी ही योजना बंगालमध्ये रोखली गेली असती का?

नाही. तुम्हाला हे देखील माहीत आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशभरातील गरिबांसाठी पक्की घरे बांधली जात आहेत. मी नेटवर्क 18 च्या दर्शकांसाठी आणखी एक आकडेवारी देतो. तमिळनाडूमध्ये गरीब कुटुंबांसाठी जवळजवळ सुमारे साडे नऊ लाख पक्क्या घरांना मंजुरी देण्यात आली आहे, साडे नऊ लाख. परंतु यापैकी तीन लाख घरांचे बांधकाम रखडले आहे. का? कारण डीएमके सरकार गरिबांसाठीच्या या घरांच्या बांधकामात रुची दाखवत नाही. याचे कारण काय आहे? कारण आहे की हेतू चांगले नाहीत.

मित्रांनो,

मी तुम्हाला कृषी क्षेत्राचे उदाहरण देखील देतो. काँग्रेसच्या राजवटीत शेती क्षेत्राला स्वतः च्याच भरवशावर सोडून देण्यात आले होते. लहान शेतकऱ्यांना कोणी विचारतच नसे, पीक विमा वाईट स्थितीत होता, किमान आधारभूत किमतीवरील स्वामीनाथन समितीचा अहवाल फायलींमध्ये दाबून टाकण्यात आला होता. काँग्रेस अर्थसंकल्पात घोषणा जरूर करत असे, परंतु प्रत्यक्षात काहीही होत नसे कारण त्यांचा तसा काही हेतूच नव्हता. आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूने काम करण्यास सुरुवात केली आणि आज जग त्याचे परिणाम पाहत आहे. आज भारत जगातील सर्वात मोठ्या कृषी निर्यातदारांपैकी एक बनत आहे. आम्ही प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 4 लाख कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. आम्ही खर्चाच्या दीडपटीने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे आणि विक्रमी खरेदी देखील केली आहे. मी तुम्हाला फक्त डाळींचे आकडे देतो. 10 वर्षांत यूपीए सरकारने शेतकऱ्यांकडून फक्त 6 लाख मेट्रिक टन किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली - 6 लाख मेट्रिक टन. आणि आमच्या सरकारने आतापर्यंत जवळजवळ 170 लाख मेट्रिक टन म्हणजेच 30 पट अधिक डाळ किमान आधारभूत किमतीने खरेदी केली आहे. आता तुम्हीच ठरवा की शेतकऱ्यांसाठी कोण काम करते. 

मित्रांनो,

यूपीए सरकार किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मदत देण्यातही कंजूषपणा करीत असे. स्वतःच्या 10 वर्षांमध्ये यूपीए सरकारने शेतकऱ्यांना 7 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज दिले. 7 लाख कोटी रुपये. तर आमच्या सरकारने यापेक्षा चार पट जास्त म्हणजे 28 लाख कोटी रुपये दिले आहेत. यूपीए सरकारच्या काळात फक्त 5 कोटी शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला होता, परंतु आज ही संख्या दुप्पट होऊन जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ देशातील लहान शेतकऱ्यांनाही पहिल्यांदाच मदत मिळाली आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे सुरक्षा कवचही दिले. याअंतर्गत, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना अंदाजे 2 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. आम्ही चांगल्या हेतूने काम करत आहोत, त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, त्यांची उत्पादकता वाढत आहे आणि त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.

मित्रांनो, 

21 व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला आहे. आता पुढचा टप्पा भारताच्या विकासाचा निर्णायक टप्पा आहे. आज घेतलेले निर्णय भविष्याची दिशा निश्चित करतील. आपण आपल्या क्षमता ओळखून आणि वाढवून पुढे जायला हवे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात श्रेष्ठत्वाचे ध्येय ठेवले पाहिजे, प्रत्येक संस्थेने उत्कृष्टतेला आपली संस्कृती म्हणून स्वीकारले पाहिजे. आपण फक्त उत्पादने बनवू नयेत, आपण सर्वोत्तम दर्जाची उत्पादने बनवली पाहिजेत. आपण फक्त नियमित काम करू नये, आपण जागतिक दर्जाचे काम केले पाहिजे. आपण क्षमतांचे कामगिरीत रूपांतर केले पाहिजे. मी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. भारताला नवीन उंचीवर नेण्याची हीच वेळ आहे. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Third India-Nordic Summit: Nordic nations to invest $100 bn in 15 years

Media Coverage

Third India-Nordic Summit: Nordic nations to invest $100 bn in 15 years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam emphasising that well-ordered standards must guide human conduct
May 20, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam, noting that righteous conduct is like a lamp that illuminates not only an individual but the entire society. Shri Modi highlighted that adopting this very ideal, the people of our country are engaged in nation-building today with complete restraint, capability, and devotion to duty.

The Prime Minister posted on X:

"श्रेष्ठ आचरण वह दीपक है, जिससे व्यक्ति के साथ-साथ समाज भी आलोकित होता है। इसी आदर्श को अपनाते हुए हमारे देशवासी आज पूरे संयम, सामर्थ्य और कर्तव्यनिष्ठा से राष्ट्र निर्माण में जुटे हुए हैं।

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि।।"

The determination of what ought to be done and what ought not to be done should not rest upon subjective opinion or momentary impulse but upon a well-ordered standard grounded in the Śāstra, which imparts direction and discipline to conduct. Therefore, a person ought to act in accordance with that established system of standards, so that one's conduct becomes balanced, validated and meaningful.