अशोक विहार येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वाभिमान अपार्टमेंट्स या गृह संकुलात नव्याने बांधण्यात आलेल्या 1,675 सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दिल्ली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आज गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित परिवर्तनकारी प्रकल्पांचा प्रारंभ झाला, त्यामुळे आजचा दिवस दिल्ली शहरासाठी ऐतिहासिक दिवस आहे - पंतप्रधान
केंद्र सरकारने झोपडपट्ट्यांच्या जागी कायमस्वरूपी घरे बांधण्याची मोहीम सुरू केली आहे : पंतप्रधान
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गरीब कुटुंबातील मुलांना नवीन संधी उपलब्ध करून देणारे धोरण : पंतप्रधान

भारत माता की जय।

भारत माता की जय।

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, धर्मेंद्र प्रधान जी, तोखन साहू जी, डॉक्टर सुकांता मजुमदार जी, हर्ष मल्होत्रा जी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना जी, संसदेतील माझे सर्व सहकारी , सर्व आमदार  आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

तुम्हा सर्वांना वर्ष 2025 च्या खूप-खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. ,जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने आपला प्रवास यावर्षी आणखी वेगवान होणार आहे. आज भारत, जगात राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक बनत आहे. 2025 या वर्षात भारताची ही भूमिका अधिक मजबूत होईल. हे वर्ष जगात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचे वर्ष असेल, हे  वर्ष भारताला जगातील सर्वात मोठे निर्मिती केंद्र बनवण्याचे वर्ष असेल, हे  वर्ष, युवकांना नवीन स्टार्टअप आणि उद्यमशीलतेमध्ये वेगाने पुढे नेण्याचे वर्ष असेल , हे वर्ष कृषी क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे वर्ष असेल. हे वर्ष महिला-प्रणित विकासाच्या आपल्या मंत्राला नवी उंची देण्याचे वर्ष असेल,हे वर्ष जीवन सुलभता वाढवण्याचे, जीवनमान उंचावण्याचे वर्ष असेल. आजचा हा कार्यक्रम देखील याच संकल्पाचा एक भाग आहे.

 

मित्रांनो,

आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे  , त्यामध्ये गरीबांसाठी घरे आहेत , शाळा आणि महाविद्यालयांशी निगडित प्रकल्प आहेत. मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. विशेषतः, मी त्या मित्रांचे , त्या माता-भगिनींचे अभिनंदन करतो, ज्यांचे आता एक प्रकारे नवे आयुष्य सुरु होत आहे. झोपड्यांच्या जागी पक्के घर , भाड्याच्या घराच्या जागी स्वतःचे घर , ही नवी सुरुवातच तर आहे.  ज्यांना ही घरे मिळाली आहेत , हे त्यांच्या स्वाभिमानाचे  घर आहे.  हे आत्मसन्मानाचे घर आहे.  हे नवीन आशा आणि नवीन स्वप्नांचे घर आहे. मी तुम्हा सर्वांच्या आनंदात, तुमच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी इथे आलो आहे. आज इथे आलो आहे तर  अनेक जुन्या आठवणी जाग्या होणे अगदी स्वाभाविक आहे. तुमच्यापैकी बहुधा काही लोकांना माहित असेल, जेव्हा आणीबाणीचा काळ होता, त्यावेळी देश इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढत होता , आणीबाणीविरोधात एक लढा सुरु होता, त्यावेळी माझ्यासारखे अनेक सहकारी भूमिगत चळवळीचा भाग होते. आणि त्याकाळी हे अशोक विहार हे माझे राहण्याचे ठिकाण होते. आणि म्हणूनच आज अशोक विहारमध्ये आल्यावर अनेक जुन्या आठवणी जाग्या होणे अगदी स्वाभाविक आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण  देश, विकसित भारताच्या निर्मितीत व्यस्त आहे. विकसित भारतात , देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर असेल, चांगली घरे असतील , हा संकल्प घेऊन आम्ही काम करत आहोत. हा संकल्प साध्य करण्यात दिल्लीची खूप मोठी भूमिका आहे.  म्हणूनच भाजपा प्रणित केंद्र सरकारने झोपड्यांच्या जागी पक्की घरे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे.  2 वर्षांपूर्वी देखील मला कालकाजी एक्सटेंशन इथे झोपडपट्टीत राहणाऱ्या बंधू-भगिनींसाठी  3 हजारांहून अधिक घरांचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली होती. अशी कुटुंबे ज्यांच्या अनेक पिढ्या केवळ झोपड्यांमध्येच राहिल्या आहेत, ज्यांच्या समोर कुठलीही आशा नव्हती ,ते पहिल्यांदाच पक्क्या घरांमध्ये जात आहेत. तेव्हा मी म्हटले होते की ही तर केवळ सुरुवात आहे. आज इथे आणखी दीड हजार घरांच्या चाव्या लोकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. ही 'स्वाभिमान अपार्टमेंट्स, गरीबांचा स्वाभिमान , त्यांची प्रतिष्ठा वाढवणार आहेत. थोड्या वेळापूर्वी जेव्हा काही लाभार्थ्यांशी मी संवाद साधत होतो, तेव्हा मला हीच भावना त्यांच्यात दिसून येत होती.  मी नवा उत्साह, नवी ऊर्जा अनुभवत होतो.  आणि तिथे मला काही मुलामुलींना भेटण्याची देखील संधी मिळाली , असे वाटत होते की स्वाभिमान अपार्टमेंटची उंची जितकी आहे ना,त्याहीपेक्षा उंच त्यांची स्वप्ने मी पाहत होतो.

 

आणि मित्रांनो,

या घरांचे मालक भलेही दिल्लीतील निरनिराळे लोक असतील, मात्र हे सगळे माझ्या कुटुंबातीलच सदस्य आहेत.

मित्रांनो,

देशाला चांगले ठाऊक आहे की मोदींनी कधीही स्वतःसाठी घर बांधले नाही, मात्र मागील 10 वर्षांमध्ये 4 कोटींहून अधिक गरीबांच्या घरांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी देखील एखादा आलिशान महाल  बांधू शकलो असतो.मात्र माझ्यासाठी तर माझ्या देशवासियांना कायमस्वरूपी घर मिळावे हेच एक स्वप्न होते. आणि मी तुम्हा सर्वांना देखील सांगतो, जेव्हा कधी तुम्ही लोकांमध्ये जाल , लोकांना भेटाल , तेव्हा आता जे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत ना , त्यांना माझ्या वतीने आश्वस्त करा, माझ्यासाठी तर तुम्हीच मोदी आहात ,  त्यांना आश्वासन द्या की आज ना उद्या त्यांच्यासाठी पक्के घर बनेल, त्यांना पक्के घर मिळेल. गरीबांच्या या घरांमध्ये त्या प्रत्येक सुविधा आहेत , ज्या उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत.  त्याच तर गरीबांचा स्वाभिमान जागृत करतात  , आत्मविश्वास वाढवतात , जी विकसित भारताची खरी ऊर्जा आहे. आणि आम्ही इथेच थांबणारे नाही. आता दिल्लीमध्ये अशाच सुमारे 3 हजार इतर घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे.  आगामी काळात हजारो नवी घरे दिल्लीकरांना मिळणार आहेत. या भागात, खूप मोठ्या संख्येने आपले कर्मचारी बांधव राहतात. त्यांची जी घरे होती, ती खूप जुनी झाली होती. त्यांच्यासाठी देखील नवीन घरे बांधण्यात येत आहेत. दिल्लीचा अभूतपूर्व विस्तार पाहता ,  केंद्र सरकार, रोहिणी आणि द्वारका सब-सिटी नंतर , आता नरेला सब-सिटीच्या निर्मितीला गती देत आहे.

मित्रांनो,

विकसित भारत घडवण्यात आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका आहे. आपली ही शहरे आहेत, जिथे दूर-दूरच्या भागातून अनेक लोक मोठी स्वप्ने उराशी बाळगून येतात, अत्यंत प्रामाणिकपणे ती स्वप्ने पूर्ण करण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात. म्हणूनच , केंद्रातील भाजपा सरकार, आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार जीवन देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रयत्न आहे की गरीब असो किंवा मध्यमवर्गीय , त्यांना चांगली घरे देण्यात मदत व्हावी. जे नवनवीन लोक गावांमधून शहरामध्ये आले आहेत , त्यांना योग्य दरात भाड्याची घरे मिळावीत. जी मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत,  त्यांना देखील त्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी सरकार संपूर्ण मदत करत आहे. मागील एका दशकापासून हे  काम सातत्याने , निरंतर सुरु आहे. मागील  10 वर्षांमध्ये  पंतप्रधान  आवास योजना शहरी अंतर्गत देशभरात 1 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. याच योजनेअंतर्गत दिल्लीतही सुमारे  30 हजार नवीन घरे बांधली आहेत.

 

मित्रांनो,

आता या प्रयत्नांना आणखी विस्तारण्याची योजना आम्ही सुरु केली आहे . पंतप्रधान आवास योजना शहरी च्या पुढील टप्प्यात  शहरी गरीबांसाठी एक कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांसाठी केंद्रातील भाजपा सरकारच मदत पुरवणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षा कमी आहे . त्या कुटुंबांना या योजनेचा विशेष लाभ होईल. 

केंद्र सरकार, मध्यम वर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाच्या व्याजात मोठी सूट देत आहे, हे पैसे सरकार देत आहे.

मित्रहो,

प्रत्येक कुटुंबाचे एक स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, खूप शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे. देशात उत्तम शाळा- महाविद्यालये असावीत,विद्यापीठे असावीत,उत्तम व्यावसायिक संस्था असाव्यात यावर भाजपा सरकार भर देत आहे. आपल्याला मुलांना केवळ शिक्षण द्यायचे नाही तर वर्तमान आणि भविष्यातल्या गरजांनुसार नव्या पिढीला सज्जही करायचे आहे.हे लक्षात घेऊनच नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली आहे. गरीब कुटुंबातले मुल असो,मध्यमवर्गीय कुटुंबातले मुल असो,त्यांना नवी संधी देणारे धोरण, नव्या शैक्षणिक धोरणात अवलंबण्यात आले आहे. आपल्या देशात मध्यम वर्गीय कुटुंबातली मुले असोत, गरीब कुटुंबातली मुले असोत, डॉक्टर बनणे, अभियंता बनणे,मोठ्या न्यायालयात वकिली करणे ही सगळी त्यांचीही स्वप्ने असतात.मात्र मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देणे सोपे नसते.गरिबांसाठी मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देणे कठीण असते.माझ्या मध्यम वर्गातली मुले, गरीब कुटुंबातली मुले, इंग्रजीच्या अभावी डॉक्टर- इंजिनियर बनू शकत नाहीत का ?  डॉक्टर- इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला हवे की नको ? आणि म्हणूनच स्वातंत्र्याला इतकी वर्षे होऊनही जे काम झाले नाही ते आपल्या या सेवकाने केले आहे. आता ही मुले आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊनही  डॉक्टर बनू शकतात, अभियंतेही होऊ शकतात आणि मोठ्यात मोठ्या न्यायालयात खटलाही चालवू शकतात.

मित्रहो,

देशाची शिक्षण व्यवस्था उत्तम करण्यामध्ये सीबीएसईची मोठी भूमिका आहे.याची व्याप्ती सातत्याने वाढत आहे.हे लक्षात घेऊनच सीबीएसईचे नवे भवन उभारण्यात आले आहे. आधुनिक शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी,परीक्षेच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्यासाठी याची मदत होणार आहे.

मित्रहो,

उच्च शिक्षणात दिल्ली विद्यापीठाचीही प्रतिष्ठा सातत्याने वृद्धिंगत होत आहे. दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मलाही लाभले. दिल्लीच्या युवकांना इथेच उच्च शिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त  व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आज ज्या नव्या परिसराची पायाभरणी झाली आहे,त्यातून दर वर्षी शेकडो नव्या युवकांना दिल्ली विद्यापीठामध्ये शिक्षणाची संधी मिळेल. आता ही प्रतीक्षा संपुष्टात  येणार आहे. सुरजमल विहार इथे पूर्व परिसर आणि द्वारका इथे पश्चिम परिसरावर आता झपाट्याने काम होईल. तसेच नजफगढ इथे वीर सावरकर जी यांच्या नावाचे नवे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

 

मित्रहो,

एकीकडे दिल्लीमध्ये शिक्षण व्यवस्थेसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे इथल्या राज्य सरकारचा खोटेपणा आहे.दिल्लीत गेली 10 वर्षे जे राज्य सरकार आहे, त्या सरकारने इथल्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे.दिल्लीमध्ये असे सरकार राज्यात आहे ज्यांना मुलांच्या भविष्याची पर्वा नाही.समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणासाठी भारत सरकारने जे पैसे दिले त्यापैकी अर्धे पैसेही हे लोक खर्च करू शकले नाहीत.

मित्रहो,

ही देशाची राजधानी आहे,दिल्लीवासियांचा हा हक्क आहे,त्यांनी  सुशासनाची कल्पना  केली आहे. सुशासनाचा स्वप्न पाहिले आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून दिल्ली, एका मोठ्या आप- दा ने ग्रासली गेली आहे. अण्णा हजारे जी यांना पुढे करत काही अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला  आप- दा मध्ये लोटले आहे. मद्य धोरण घोटाळा,प्रदुषणाविरोधात लढा देण्याच्या नावाखाली घोटाळा, भर्तीमध्ये घोटाळा, हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गोष्टी करत होते मात्र आप- दा बनून या लोकांनी दिल्लीला ग्रासले आहे.हे लोक राजरोस भ्रष्टाचार करतात आणि त्याचे उदात्तीकरणही करतात,चोरी आणि वर शिरजोरी,हे आप,ही आप-दा दिल्लीवर आली आहे आणि म्हणूनच दिल्लीकरांनी आप-दा विरोधात लढा पुकारला आहे.दिल्लीच्या मतदाराने ,दिल्ली आप-दा मुक्त करण्याचा निश्चय केला आहे.दिल्लीचा प्रत्येक नागरिक म्हणत आहे,दिल्लीमधले  प्रत्येक मूल हे म्हणत आहे,दिल्लीतल्या गल्लोगल्लीमधून हा आवाज येत आहे आप-दा आता सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू, आप-दा सहन करणार नाही,बदल घडवून आणू.

मित्रहो,

दिल्ली देशाची राजधानी आहे,इथे मोठ्या खर्चाची जी कामे होतात, ती भारत सरकार,केंद्र सरकारची जबाबदारी आहे.दिल्लीमध्ये बहुतांश रस्ते,मेट्रो, मोठ-मोठी रुग्णालये,मोठ-मोठी महाविद्यालये,हे सर्व केंद्र सरकार उभारत आहे.मात्र इथल्या आप-दा सरकारकडे ज्या कामांची जबाबदारी आहे टी कामे इथे रखडली आहेत.दिल्लीला ज्या आप-दा ने घेरले आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. ही कशी आप-दा  आहे,याचे आणखी एक उदाहरण आपली यमुना जी आहे, यमुना नदी.इथे येण्यापूर्वी आत्ता मी स्वाभिमान सदनिका लाभार्थ्यांसमवेत संवाद साधत होतो,त्यातले बरेचजन उत्तर भागात राहणारे होते,मी विचारले छठ पूजा कशी राहिली ?ते म्हणाले साहेब,हात जोडून सांगत होते,यमुनाजीची स्थिती इतकी खराब झाली आहे तर आम्ही छठ पूजा काय करणार ? या भागात काही छोटे-मोठे करून यमुना नदीची क्षमा मागतो. यमुना नदीची ही स्थिती.

 

मित्रहो,

आज दहा वर्षा नंतर हे म्हणत आहे आणि लाज तर जराही नाही.ही कसली  आप-दा,हे सांगतात यमुना नदीची सफाई करून मते मिळत नाहीत. अरे मते मिळणार नाहीत म्हणून यमुना नदीची दुर्दशा  करणार का ? यमुना नदीची सफाई झाली नाही तर दिल्लीला पिण्याचे पाणी  कसे मिळणार ?या लोकांच्या कृत्यांमुळेच आज दिल्लीकरांना अस्वच्छ पाणी मिळत आहे. या आप-दा ने दिल्लीकरांचे जीवन टँकरमाफियांच्या हाती सोपवले आहे. हे आप-दा वाले  राहिल्यास भविष्यात दिल्लीला आणखी भयंकर स्थितीकडे नेतील.

मित्रहो,

देशासाठी ज्या चांगल्या योजना आखल्या जात आहेत त्याचा लाभ दिल्लीच्या माझ्या बंधू-भगिनींना मिळावा असाच माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. केंद्रातल्या भाजपा सरकारच्या योजनांमधून गरीब आणि मध्यम वर्गाला सुविधाही मिळत आहेत आणि त्यांची पैशाची बचतही  होत आहे.

सहकाऱ्यांनो,

केंद्रातील भाजपाचे सरकार वीजचे बिल शून्यावर आणत आहे आणि इतकेच नाही, तर विजेपासून उत्पन्न मिळवण्याची संधी देखील देत आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आज प्रत्येक कुटुंब वीज उत्पादक बनू लागले आहे. भाजपाचे सरकार प्रत्येक इच्छूक कुटुंबाला 78 thousand rupees, जवळ जवळ 75 ते 80 हजार रुपये, एका कुटुंबाला सौर पॅनल बसवण्यासाठी 75 ते 80 हजार रुपये देत आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे साडेसात लाख घरांच्या छतांवर असे पॅनेल लावण्यात आले आहेत. यामुळे वापरासाठी गरजेची असलेली वीज मोफत मिळणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त विजेचे पैसे सरकार तुम्हाला देणार आहे. मी दिल्लीतील जनतेला विश्वासाने सांगू इच्छितो की, दिल्लीमध्ये जसा भाजपापाचा मुख्यमंत्री होईल, तसे लगेचच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आणखी जास्त वेगाने राबविली जाईल.

सहकाऱ्यांनो,

आज दिल्लीतील सुमारे 75 लाख गरजू लोकांना भारत सरकार मोफत रेशन देत आहे. एक देश एक रेशन कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे दिल्लीच्या जनतेची मोठी मदत केली आहे. नाहीतर काही वर्षांपूर्वीपर्यंत तर दिल्लीत रेशनकार्ड बनवणे देखील खूपच अवघड झाले होते. जुनी वर्तमानपत्रे काढा आणि बघा काय काय होत होते ते. आप - दा वाले तर रेशन कार्ड बनवण्यासाठी देखील लाच घेत असत. आता मात्र लाचखोरीच्या वाटा देखील बंद झाल्या आहेत आणि रेशनच्या खर्चात देखील बचत होऊ लागली आहे.

सहकाऱ्यांनो,

दिल्लीमधील गरीब असोत, मध्यम वर्गीय कुटुंब असोत, त्यांना परवडणाऱ्या दरातली औषधे उपलब्ध व्हावीत, याकरता जवळपास 500 जनऔषधी केंद्रे, इथे दिल्लीमध्ये सुरू केली गेली आहेत. या केंद्रांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध आहेत, 100 रुपये किमतीची औषधे 15 रुपयांमध्ये, 20 रुपयांमध्ये मिळतात. या स्वस्त औषधांमुळे दिल्लीतील लोकांची दर महिन्याला हजारो रुपयांची बचत होत आहे.

 

सहकाऱ्यांनो,

मला तर दिल्लीकरांना मोफत उपचारांची सुविधा देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ देखील द्यायचा आहे. पण  आप - दा सरकारचे सरकारचे दिल्लीतील जनतेशी मोठे वैर आहे. संपूर्ण देशात आयुष्मान योजना लागू झाली आहे, परंतु या योजनेला आप - दा वाले लोकं इथे लागू होऊ देत नाहीत. याचे नुकसान दिल्लीच्या जनतेला सहन करावे लागत आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी की, आपले दिल्लीतील व्यापारी देशभर ये जा करत असतात, दिल्लीतील फ्रोफेशनल देशभर ये जा करत असतात, दिल्लीतील युवा वर्ग  देशभर ये जा करत असतो. हिंदुस्थानाच्या कोणत्याही कान कोपऱ्यात गेलात, आणि तिथे काही झालं, आणि आयुष्यमान कार्ड असेल तर, ते कार्ड तेथेही तुमच्या उपचारांची हमी असणार आहे. पण हा लाभ दिल्लीला मिळतच नाही आहे, कारण दिल्लीचे आप - दा सरकार तुम्हाला आयुष्मान सोबत जोडूनच घेत नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही हिंदुस्थानात कुठे तरी गेलात, काही तरी झालं, तर या मोदीची इच्छा असून देखील तो तुमची सेवा करू शकत नाही, कारण या आप - दा च्या पापांमुळेच

सहकाऱ्यांनो,

भाजपाच्या सरकारने 70 वर्षांवरील वृद्धांना देखील आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले आहे. कोणत्याही कुटुंबातील 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आता त्यांच्या मुलांना त्याच्या आजाराची चिंता करत बसण्याची गरज असणार नाही, हा तुमचा मुलगा त्यांची चिंता वाहील. पण मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, हा सुपुत्र, त्याला दिल्लीतील ज्येष्ठ व्यक्तींची कितीही सेवा करायची इच्छा असली, तरी आप - दाच्या लोकांनी दिल्लीतील ज्येष्ठ व्यक्तिंना त्या सेवेपासून वंचित करून ठेवले आहे, त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही. आप - दा वाल्यांचा स्वार्थ, आप - दा वाल्यांचा हट्टीपणा, आप - दा वाल्यांचा अहंकार, ते याला तुमच्या जीवापेक्षा मोठी गोष्ट मानतात.

सहकाऱ्यांनो,

दिल्लीतील लोकांसाठी भारत सरकार पूर्ण संवेदनशीलता बाळगून काम करत आहे. दिल्लीतील अनेक वसाहतींना नियमित करून घेत भाजपाच्या सरकारने लाखो लोकांची चिंता दूर केली, परंतु इथल्या आप - दा सरकारने, इथल्या राज्य सरकारने त्यांना आप - दा चे बळी बनवले आहे. केंद्रातील भाजपाचे सरकार लोकांची मदत करण्यासाठी खास एक खिडकी शिबिरे चालवत आहे, परंतु आप - दा सरकार, या वसाहतींमध्ये पाणीची, सांडपाण्याच्या गटारांची सुविधा देखील योग्यरित्या देत नाही आहे. या सगळ्यामुळेच त्यामुळे लाखो दिल्लीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतर देखील जर सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा नसेल, नाले तुटले असतील, गल्ल्यांमधून घाण पाणी वाहत असेल, तर दिल्लीतील जनता व्यथित होणे हे खूपच स्वाभाविक आहे. जे लोक दिल्लीतील जनतेचा विश्वासघात करून, खोट्या शपथा घेऊन, स्वत:साठी मात्र काचेचा महाल बांधून घेत आहेत, त्यांच्यातून जेव्हा ही आप - दा जाईल आणि भाजपा येईल, त्या वेळी या सर्वच समस्यांचे निराकारण देखील केले जाईल.

 

सहकाऱ्यांनो,

तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जिथे जिथे आप - दा ने हस्तक्षेप केलेला नाही,  तुमचा हस्तक्षेप नसतो, तिथे प्रत्येक काम चांगल्या तऱ्हेने होते आहे. तुमच्यासमोर DDA -दिल्ली विकास प्राधिकरणाचे उदाहरण आहे. DDAमध्ये आप - दाचा तितका हस्तक्षेप नाही आहे. याच कारणामुळे DDA गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी नवी घरे बांधू शकत आहे. दिल्लीतील प्रत्येक घरापर्यंत वाहिन्यांच्या माध्यमातून स्वस्त दरातील गॅस पोहोचवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम देखील यामुळेच होऊ शकते आहे, कारण या कामात देखील आप - चा हस्तक्षेप नाही आहे. दिल्लीमध्ये इतके सारे महामार्ग बांधले जात आहेत, द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत, हे काम देखील यामुळेच पूर्ण होत आहे,  कारण या कामांत देखील आप - दाचा हस्तक्षेप नाही आहेत.

सहकाऱ्यांनो,

आप - दाचे लोक दिल्लीला केवळ समस्या देऊ शकतात, तर त्याचवेळी भाजपा मात्र दिल्लीतील लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामांत गुंतली आहे. दोन दिवसांपूर्वीच आमच्या दिल्लीतील सर्व सात खासदारांनी इथल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारला महत्त्वाच्या सूचना सादर केल्या होत्या. दिल्ली विमानतळाच्या जवळच्या शिवमूर्ती ते नेल्सन मंडेला मार्गापर्यंत बोगदा बांधण्याचे काम असो, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाला K.M.P द्रुतगती मार्गा सोबत जोडण्याचे काम असो, दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्गाला शहर विस्तार रस्ता दोन सोबत जोडण्याचे काम असो, किंवा दिल्लीचा ईस्टर्न बायपासचे काम असो, या आमच्या खासदारांनी सादर केलेल्या सूचना आहेत, या सूचनांचा भारत सरकारने स्विकार केला आहे, त्यांना तत्वतः मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे येता काळात दिल्लीतील वाहतुक कोंडीची समस्या सुटू शकणार आहे.

सहकाऱ्यांनो,

2025 हे वर्ष दिल्लीत सुशासनाचे नवे युग प्रस्थापित करेल. हे वर्ष देश प्रथम, देशवासी प्रथम, माझ्यासाठी दिल्लीतील रहिवासी प्रथम या भावनेला दृढ करेल. हे वर्ष दिल्लीतून राष्ट्र उभारणी आणि लोक कल्याणाच्या नव्या राजकारणाचा शुभारंभ करेल. आणि म्हणूनच आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे, आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे, आप - दा ला हटवायचे आहे, भाजपाला आणायचे आहे. याच विश्वासाने पुढे जात, तुम्हा सगळ्यांचे नवीन घरांसाठी, नवीन शैक्षणिक संस्थांसाठी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. चला माझ्या सोबत बोला  -

 

भारत माता की जय.

दोन्ही हाथ वर करून पूर्ण जोषाने बोला, आप - दा पासून मुक्तता मिळवण्याचे नारे हवे आहेत-

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

खूप - खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions