भारत आणि यूके यांना मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या अंतिम करण्यात यश आले आहेः पंतप्रधान
भारत व्यापार आणि वाणिज्य यांचे एक क्रियाशील केंद्र बनत आहेः पंतप्रधान
देश सर्वप्रथम- गेल्या एका दशकात भारताने सातत्याने या धोरणाचे पालन केले आहेः पंतप्रधान
आज, जेव्हा कोणी भारताकडे पाहतो, तेव्हा लोकशाही परिणामकारक ठरू शकते याची खात्री त्यांना पटू शकतेः पंतप्रधान
भारत जीडीपी-केंद्रित दृष्टीकोनाकडून जनतेचे सकल सक्षमीकरण- केंद्रित प्रक्रियेकडे वळत आहेः पंतप्रधान
परंपरा आणि तंत्रज्ञान कशा प्रकारे एकत्रितपणे विकसित होऊ शकतात ते भारत जगाला दाखवत आहेः पंतप्रधान
स्वावलंबन हा नेहमीच आमच्या आर्थिक डीएनए चा एक भाग राहिला आहेः पंतप्रधान

नमस्कार,

भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.

मित्रांनो,

हे त्या बदलत्या भारताचे प्रतिबिंब आहे, जे प्रत्येक क्षेत्रात आपला बुलंद आवाज उमटवत आहे. या बदलत्या भारताचे सर्वात मोठे स्वप्न आहे - 2047 पर्यंत विकसित भारत. देशाकडे क्षमता आहे, देशाकडे संसाधने आहेत आणि देशाकडे इच्छाशक्ती देखील आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे - उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही. आज मी देशातील प्रत्येक नागरिकामध्ये त्याच भावनेचे प्रतिबिंब पाहत आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात असे विचारमंथन, अशा चर्चा आणि त्यातही तरुणांचा सहभाग खूप मोठी भूमिका बजावत आहे. आपण इतकी सुरेख शिखर परिषद आयोजित केली आहे आणि त्यासाठी मी माझे मित्र अतिदेब सरकार जी, माझे जुने सहकारी रजनीश आणि एबीपी समूहाच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो, 

आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. काही वेळापूर्वी, मी इथे येण्याआधी, ब्रिटिश पंतप्रधानांशी संवाद साधला होता आणि तुम्हाला कळवण्यास मला आनंद होत आहे की भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या आणि खुल्या बाजारातील अर्थव्यवस्थांमधील परस्पर व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरील हा करार दोन्ही देशांच्या विकासात एक नवीन अध्याय स्थापित करेल. आपल्या युवकांसाठी ही एक अतिशय चांगली बातमी आहे. यामुळे भारतातील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल आणि भारतीय व्यवसाय तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्याला माहिती आहे, काही काळापूर्वी आम्ही संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, मॉरिशससोबत व्यापार करार केले आहेत. याचा अर्थ असा की आज भारत केवळ सुधारणा प्रक्रिया राबवत नाही तर जगाशी सक्रियपणे संवाद साधून स्वतःला एक गतिमान व्यापार आणि वाणिज्य केंद्र बनवत आहे.

मित्रांनो,

मोठे निर्णय घेण्यासाठी, आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि राष्ट्राच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या देशात दशकांपासून विपरीत प्रवृत्ती सुरु राहिली. आणि यामुळे देशाला खूप नुकसान सहन करावे लागले. एक काळ असा होता की कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी आपण जग काय विचार करेल याचा विचार करायचो. आपल्याला मते मिळतील की नाही, खुर्ची वाचेल की नाही, वोट बँक विखुरली तर जाणार नाही. अनेक प्रकारच्या स्वार्थी प्रवृत्तींमुळे मोठे निर्णय आणि मोठ्या सुधारणा पुढे ढकलल्या जात होत्या.

मित्रांनो,

कोणताही देश अशा प्रकारे आघाडीवर राहू शकत नाही. जेव्हा निर्णय घेण्याचा एकमेव निकष नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम असतो तेव्हाच देश प्रगतीपथावर वाटचाल करतो. गेल्या दशक भरापासून भारताने हे धोरण अंगिकारले आहे. आणि आज आपण त्याची परिणती देखील अनुभवत आहोत.

मित्रांनो,

गेल्या 10-11 वर्षांत, आमच्या सरकारने एकामागून एक असे निर्णय घेतले आहेत, जे दशकांपासून प्रलंबित, रखडलेले आणि भरकटलेले राहिले होते आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोशात बंद होते. आता, जसे एक उदाहरण आपल्या बँकिंग क्षेत्राचे आहे - बँकिंग क्षेत्र जे अर्थव्यवस्थेचा कणा असते. याआधी, बँकांच्या तोट्याबाबत चर्चा न करता पूर्ण होणारी अशी कोणतीही शिखर परिषद झाली नव्हती. आणि खरं तर, 2014 पूर्वी, आपल्या देशातील बँका पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होत्या. आता आजची परिस्थिती काय आहे? भारताचे बँकिंग क्षेत्र आज जगातील सर्वात मजबूत प्रणालींपैकी एक आहे. आपल्या बँका विक्रमी नफा कमवत आहेत आणि ठेवीदारांना त्याचे लाभ मिळत आहे. आमच्या सरकारने बँकिंग क्षेत्रात सातत्याने सुधारणा केल्या, देशाच्या हितासाठी लहान बँकांचे विलीनीकरण केले आणि त्यांची क्षमता वाढवली म्हणून हे साध्य झाले. तुम्हाला एअर इंडियाची जुनी स्थिती देखील आठवत असेल. एअर इंडिया बुडत होती, देशाचे दरवर्षी हजारो कोटी रुपये बुडत होते, पण तरीही मागील सरकार निर्णय घेण्यास घाबरत राहिले. आम्ही निर्णय घेतला आणि देशाला सतत होणाऱ्या नुकसानापासून वाचवले, का? कारण आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च स्थानी आहे.

 

मित्रांनो,

आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानांनी कबूल केले होते की जर सरकारने एका गरीबाला एक रुपया पाठवला तर त्यातील 85 पैसे ठकवले जातात. सरकारे बदलत राहिली, वर्षे उलटत गेली पण गरिबांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळतील अशा पद्धतीचे कोणतेही ठोस काम झाले नाही. गरिबांचे सर्व पैसे गरिबांना मिळाले पाहिजेत; जर दिल्लीतून एक रुपया आला तर प्रत्येक शंभर पैकी शंभर पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी आम्ही थेट लाभ हस्तांतरणाची व्यवस्था केली. आणि यामुळे सरकारी योजनांमधली गळती थांबली, लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले, सरकारी दस्तावेजात असे 10 कोटी बनावट लाभार्थी होते, हे जरा समजून घ्या, असे 10 कोटी बनावट लाभार्थी होते, जे कधीही जन्माला आले नव्हते. आणि त्यांना सर्व सुविधा संपूर्ण थाटामाटात मिळत होत्या. आधीच्या लोकांनी हीच 10 कोटी रुपयांची व्यवस्था तयार केली होती. आमच्या सरकारने ही 10 कोटी बनावट नावे प्रणालीतून काढून टाकली आणि संपूर्ण पैसे थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून गरिबांच्या बँक खात्यात  थेट पाठवले. यामुळे 3.5 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम, 3.5 लाख कोटी रुपयांहून अधिक चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यात आली आहे. म्हणजे तुमचे पैसे वाचवले आहेत. पैसे तुमचे वाचले आणि शिव्या मोदींनी खाल्ल्या.

मित्रांनो,

वन रँक वन पेन्शनचेचं प्रकरण पहा, हे अनेक दशकांपासून प्रलंबित होते. सरकारी तिजोरीवर भार पडेल असा युक्तिवाद करत याआधी ते फेटाळण्यात आले होते. देशाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या हिताला आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. आज, लाखो सैनिक कुटुंबांना OROP चे लाभ मिळत आहेत. आमच्या सरकारने आतापर्यंत OROP अंतर्गत 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम माजी सैनिकांना दिली आहे.

मित्रहो,

देशातील गरीब कुटुंबांनाही आरक्षण मिळावे, याबाबतही अनेक दशकांपासून केवळ चर्चाच केली गेली. याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या बाबतीत काय काय घडत होते, हे ही देशाने पूर्णतः पाहिले आहे. यामागेही काही लोकांचा स्वार्थ होता. पण राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते आवश्यक होते. म्हणूनच आमच्या सरकारने लोकसभा आणि विधानसभेत महिलांच्या आरक्षणासाठी कायदा करून, नारीशक्तीला अधिक सक्षम केले.

मित्रहो,

भुतकाळतले कितीतरी असे विषय होते, ज्यांवर चर्चा करण्यासाठी कोणीही तयार नव्हते. भीती वाटत होती की, कदाचित विशिष्ट मतदारांचा समूह नाराज झाला तर. आता जसे त्रिवार तलाकचे प्रकरण आहे. यामुळे असंख्य मुस्लिम बहिणींचे जीवन उद्ध्वस्त झाले. पण सत्तेत बसलेल्या लोकांना यामुळे कसलाच फरक पडत नव्हता. महिलांच्या हितासाठी, मुस्लिम कुटुंबांच्या हितासाठी, आमच्या सरकारने त्रिवार तलाकविरोधात कायदा बनवला. वक्फ कायद्यात आवश्यक सुधारणांची गरजही अनेक दशकांपासून जाणवत होती. पण विशिष्ट मतदार समूहाला खूश करण्यासाठी या चांगल्या कामालाही बदनाम करून ठेवले होते. आता कुठे, वक्फ कायद्यात ते बदल करण्यात आले आहेत, जे खऱ्या अर्थाने मुस्लिम माता-भगिनी, गरीब मुसलमान-पसमांदा मुसलमानांच्या कामी येणारे आहेत.

 

मित्रहो,

एक आणखी खूप मोठे काम झाले आहे, ज्याची तेवढी चर्चा होत नाही. हे काम नद्या जोडण्याशी संबंधित आहे. आत्ताच पाण्याच्या संदर्भात अतिदेबजींनी विचारले, काय करणार? दशकानुदशके आपल्या नद्यांच्या पाण्याला तणावाचा, भांडणाचा विषय बनवून ठेवले गेले. पण आमच्या सरकारने, राज्य सरकारांसोबत मिळून, नद्या जोडण्याचे महाअभियान सुरू केले आहे. केन-बेतवा लिंक प्रकल्प, पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक प्रकल्प, यांमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. तसे सध्या तर माध्यमांमध्ये पाण्यावर बरीच चर्चा सुरू आहे. तुम्हाला खूपच पटकन समजतं. आधी भारताच्या हक्काचे पाणीही बाहेर जात होते, आता भारताचे पाणी, भारताच्या बाजुनेच वाहणार, भारताच्या बाजुनेच थांबणार आणि भारतातच उपयोगाला येणार.

मित्रहो,

अनेकदा लोक पुन्हा पुन्हा एका गोष्टीची चर्चा करतात की, इतक्या दशकांनंतर, संसदेची नवीन इमारत बांधली गेली, पण एका गोष्टीवर चर्चा होत नाही, की दशकांच्या प्रतीक्षेनंतर, आमच्या सरकारनेच इथे दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकही उभारले. अटलबिहाराजींचे जेव्हा सरकार होते, तेव्हा यावर चर्चा सुरू झाली होती, पण याच्या उभारणीचे काम देखील एक दशकभर रखडलेले होते. आमच्या सरकारने हे तर पूर्ण केलेच, देश आणि जगभरात बाबासाहेबांशी संबंधित प्रमुख ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले आहे.

मित्रहो,

2014 मध्ये आमचे सरकार अशा परिस्थितीत बनले होते, जेव्हा सरकारांवरील देशवासियांचा विश्वास जवळजवळ उडाला होता. काही लोक तर असा प्रश्न विचारू लागले होते, की आपल्या देशात लोकशाही आणि विकास एकत्र नांदू शकतात का? पण आज, जेव्हा कोणी भारताकडे पाहतो, तेव्हा अभिमानाने म्हणू शकतो - Democracy Can Deliver म्हणजे लोकशाही परिणामकारक ठरू शकते. गेल्या दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, यातून अवघ्या जगाला हा संदेश पोहचला आहे, Democracy Can Deliver. ज्या कोट्यवधी छोट्या उद्योजकांना मुद्रा योजनेतून कर्ज मिळाले, त्यांना आज जाणवते आहे की, Democracy Can Deliver. आपल्या देशात डझनभर जिल्ह्यांवर मागासलेपणाचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडले गेले होते. आज जेव्हा तेच जिल्हे आकांक्षित जिल्हे बनून विकासाच्या मानकांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, तेव्हा स्पष्ट होते - Democracy Can Deliver. इथे खूप कमी लोकांना माहीत असेल, आपल्या देशात आदिवासींमध्येही अशा अतिमागासलेल्या आदिवासी जाती होत्या, ज्यांच्यापर्यंत विकासाचा लाभ पोहोचू शकला नव्हता. आज जेव्हा प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून या जातींपर्यंत सरकारी सुविधा पोहोचल्या आहेत, तेव्हा त्यांनाही विश्वास वाटू लागला आहे, Democracy Can Deliver! देशाचा विकास, देशाचे संसाधने, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोणताही भेदभाव न करता पोहोचावी, लोकशाहीचा खरा अर्थ, खरा उद्देश हाच आहे आणि आमचे सरकार तेच करत आहे.

मित्रहो,

आज एका अशा भारताची जडणघडण होत आहे, ज्याच्या विकासाच्या गतीला वेग असेल आणि तो भारत विचारांनी, संकल्पाने आणि संवेदनशीलतेनेही समृद्ध एसेल. आम्ही मानव केंद्रित जागतिकीकरणाचा असा मार्ग निवडला आहे, जिथे प्रगती केवळ बाजारपेठातून निश्चित होणार नाही. लोकांना सन्मानाचे जीवन मिळावे, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, आमच्यासाठी हा विकासाचा मोठा मापदंड आहे. आम्ही GDP Centric Approach ऐवजी GEP Centric Progress च्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि जेव्हा मी GEP म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ आहे - Gross Empowerment of People. म्हणजे सर्वांचे सक्षमीकरण. जेव्हा गरिबाला पक्के घर मिळते, तेव्हा तो सक्षम होतो, त्याचा स्वाभिमान वाढतो. जेव्हा गरिबाच्या घरात शौचालय बनते, तेव्हा त्याला उघड्यावर शौचाला जाण्याच्या अपमान आणि वेदनांपासून मुक्ती मिळते. जेव्हा आयुष्मान भारत योजनेतून गरिबाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात, तेव्हा त्याच्या जगण्यातले खूप मोठे दडपण कमी होते. अशी अनेक उदाहरणे आहेत, जी संवेदनशील विकासाचा मार्ग मजबूत करत आहेत, देशातील जनतेला सक्षम करत आहेत.

मित्रहो,

अलिकडेच काही दिवसांपूर्वी, नागरी सेवा दिनाच्या दरम्यान मी नागरिक देवो भव: या मंत्राबद्दल बोललो होतो. हा आमच्या सरकारचा मूळ विचार आहे. आम्ही जनतेत जनार्दन पाहणारे लोक आहोत. आधी, सरकारमध्ये माय-बाप संस्कृतीचा प्रभाव होता, आता जनतेच्या सेवेच्या भावनेनेच, त्या भावनेनेच काम होते. सरकार स्वतःच नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेते. इथे असंख्य युवा मित्र आहेत. आजकाल तर तुम्ही प्रत्येक अर्ज ऑनलाईन भरता. एक काळ होता, जेव्हा स्वतःचेच दस्तऐवज सत्यापित करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेर्‍या माराव्या लागत होत्या. आता तुम्ही अशी सर्व कामे स्वयं सत्यापित करूनही करू शकता.

 

मित्रहो,

अशीच जुनी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी होती. वृद्ध लोकांना दरवर्षी, आपण जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी आपल्या जुन्या कार्यालयात जावे लागत होते आणि जाऊन सांगावे लागत होते, मी जिवंत आहे किंवा बँकेत जाऊन सांगावे लागत होते की, मी जिवंत आहे, मला पैसे मिळाले पाहिजेत. आम्ही यावर तोडगा काढला. आता ज्येष्ठ नागरिक कुठूनही, डिजिटल पद्धतीने आपले जीवन प्रमाणपत्र देऊ शकतात. वीज जोडणी घ्यायची असेल, पाण्याची नळजोडणी लावायची असेल, बिल भरायचे असेल, गॅसची नोंदणी करायची असेल आणि इतकेच काय गॅसचा सिलेंडर मागवायचा असेल, त्यासाठी सुद्धा वारंवार सांगावे लागत होते.

अनेकांना सुट्टी घेऊन ही सगळी कामे निपटावी लागत,या कामांसाठी नोकरीमधून एक  दिवस सुट्टी घ्यावी लागे. आता देशात व्यवस्था बदलली आहे,अशी अनेक कामे आता ऑनलाईन होतात.पारपत्र, कर परतावा यासारख्या कामांमध्ये जिथे लोकांना सरकारी यंत्रणेशी संवाद साधावा लागतो असे प्रत्येक काम सुलभ, जलद आणि प्रभावीपणे व्हावे  यासाठी आमचे निरंतर प्रयत्न जारी आहेत. नागरिक देवो भवः या मंत्राचा हाच तर उद्देश आहे. हीच भावना बाळगत आम्ही 2047 च्या विकसित भारताचा पाया भक्कम करत आहोत.

मित्रहो,

भारत आज आपली परंपरा  जपतानाच प्रगतीही  साध्य करत आहे. ‘विकासही आणि वारसाही’  हा आमचा मंत्र आहे. परंपरा जतन करतानाच तंत्रज्ञानाचा विकास होताना भारत आज पाहत आहे. डिजिटल व्यवहारात जगातल्या सर्वोच्च देशांमध्ये भारत आहे.त्याच बरोबर योग आणि आयुर्वेद परंपरा संपूर्ण जगामध्ये आम्ही पोहोचवत आहोत. आज भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जग उत्सुक आहे, गेल्या एका दशकात विक्रमी परकीय थेट गुंतवणूक भारतात आली आहे. तसेच भारतातून तस्करी मार्गाने देशाबाहेर गेलेल्या कलाकृती आणि इतर वस्तू मोठ्या संख्येने भारतात परत आणल्या जात आहेत. आज भारत जगातला दुसरा मोठा मोबाईल निर्माता आहे. त्याचबरोबर भरड धान्यासारख्या सुपरफूडच्या उत्पादनातही अग्रेसर आहे. सूर्य मंदिर असलेल्या भारताने सौर उर्जा उत्पादनातही 100 गीगावॅट  क्षमता प्राप्त केली आहे.

मित्रहो,

प्रगती साध्य करण्यासाठी आपली संस्कृती किंवा आपल्या मुळांपासून दुरावण्याची आवश्यकता नाही. जितक्या खोलवर जाऊन आपण आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले राहू  तितकेच आधुनिकतेशीही आपण भक्कमपणे  जोडलेले राहू. हजारो वर्षांचा आपला वारसा आम्ही  येत्या हजारो वर्षांसाठी भारताचे सामर्थ्य बनवत आहोत.

मित्रहो,

2047 पर्यंत विकसित भारताच्या या प्रवासात प्रत्येक पावलाचे आगळे महत्व आहे.सरकार आज जो निर्णय घेत आहे त्याचा परिणाम किती व्यापक आणि अनेक पटीने होईल  याचा अंदाज अनेकवेळा काही लोकांना  येत नाही. मी आपल्याला एकाच क्षेत्रातल्या माध्यम आणि आशय निर्मितेचे उदाहरण देतो.10 वर्षांपूर्वी मी डिजिटल इंडिया बाबत बोलत होतो तेव्हा अनेकांनी याबाबत अनेक शंका उपस्थित  केल्या होत्या हे आपल्याला स्मरत असेल.मात्र आज डिजिटल इंडिया आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. स्वस्त डाटा आणि मेड इन इंडिया स्वस्त स्मार्टफोन्स मुळे एक नवी क्रांती उदयाला आली आहे. डिजिटल इंडियामुळे जीवन सुलभता कशी वाढली आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. मात्र डिजिटल इंडियाने आशय आणि सर्जनशीलता यांचे नवे जग कसे निर्माण केले आहे याची चर्चा फारच कमी होते.

आज उत्तम स्वयंपाक करणारी गावातली एखादी  महिला लाखो  सबस्क्रायबर क्लबमध्ये आहे. एखाद्या आदिवासी भागातला युवक आपल्या लोककलेच्या माध्यमातून जगातले लाखो दर्शक जोडत आहे.शाळेत शिकणारा एखादा विद्यार्थी तंत्रज्ञान  उत्तम पद्धतीने सांगत आहे, समजावत आहे.नुकतीच मुंबईमध्ये पहिली वेव्हज शिखर परिषद झाली. यामध्ये जगभरातले माध्यम, मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोक सहभागी झाले. या परिषदेत सहभागी होण्याची मलाही संधी मिळाली. गेल्या तीन वर्षात फक्त यु ट्युबने भारतात कंटेट क्रिएटर्सना 21,000 कोटी रुपये दिल्याची माहिती मला देण्यात आली आहे. म्हणजेच आज आपला फोन केवळ संवादाचे माध्यम नव्हे तर  सर्जनशीलतेचे,कमाईचेही मोठे माध्यम बनला आहे.  

 

मित्रहो,

2047 पर्यंत विकसित भारत  या लक्ष्यासह आणखी एक अभियान जोडलेले आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भरता आमच्या  आर्थिक डीएनएचा  भाग आहे. भारत केवळ एक बाजारपेठ आहे, उत्पादक नाही असे म्हटले जात होते. मात्र भारतासाठी लावण्यात आलेला हा शिक्का आता पुसला जात आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा संरक्षण सामग्री उत्पादक आणि निर्यातदार बनत आहे. भारताची संरक्षण सामग्री,100 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जात आहे. आपल्या संरक्षण सामग्रीची आकडेवारीही सातत्याने वाढत आहे.देशाकडे आज आयएनएस विक्रांत, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी यासारख्या अनेक स्वदेशी युद्ध नौका आहेत. भारताने आपल्या बळावर त्या घडवल्या आहेत. आज भारत अशा अनेक क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहे जे पूर्वी आपले सामर्थ्य क्षेत्र नव्हते. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र.गेल्या काही वर्षात एक मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार  म्हणून भारत पुढे येत आहे. आज आपली स्थानिक उत्पादने जागतिक होत आहेत. निर्यातीशी संबंधित आकडेवारी नुकतीच  आली आहे. गेल्या वर्षी भारताची निर्यात सुमारे 825 अब्ज डॉलर्स या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. 825 अब्ज डॉलर्स म्हणजे केवळ एका दशकात भारताने आपली निर्यात जवळ-जवळ दुप्पट केली आहे.याला अधिक वेग देण्यासाठी,नव्या शिखरावर नेण्यासाठी या वर्षीच्या अर्थ संकल्पात आम्ही उत्पादन अभियानाची घोषणा केली आहे. उत्पादन क्षेत्रातले हे सामर्थ्य भारताच्या लोकांची ओळख ठरत आहे, आशय सर्जक,नवोन्मेषक या रूपाने जग त्यांना पसंती देत आहे.

 

मित्रहो,

हे दशक, येत्या शतकासाठी  भारताची दिशा ठरवणारे आहे. देशाचे नवे भाग्य लिहिण्याचा हा कालखंड आहे.ही भावना मी देशाच्या प्रत्येक नागरिकात पाहतो आहे, देशाच्या प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक क्षेत्रात पाहतो आहे.  या शिखर परिषदेदरम्यान झालेल्या या चर्चेतही मला याची प्रचीती आली. या शिखर परिषदेसाठी एबीपी नेटवर्कला पुन्हा एकदा खूप- खूप शुभेच्छा देतो. उशिरा रात्री आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे सुद्धा  उज्वल भविष्याचे द्योतक आहे.मी विशेषकरून सांगू इच्छितो की आपण हा जो प्रयोग केला आहे, आपली पाहुण्यांची सूची मी पाहत होतो,सर्वजण प्रयत्नशील युवावर्ग आहे.यांच्याकडे नवे विचार आहेत,नवे साहस आहे. देशात ज्यांनी ऐकले असेल त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला असेल. आपल्या देशात हे सामर्थ्य आहे.आपण फार मोठे काम केले आहे, चांगले काम केले आहे आणि त्यासाठी आपले अभिनंदन, खूप-खूप धन्यवाद.

नमस्कार !

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s electronic hardware exports rise 30% to $38.5 billion in FY 2024-25

Media Coverage

India’s electronic hardware exports rise 30% to $38.5 billion in FY 2024-25
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets everyone on occasion of Navratri
March 19, 2026
PM shares a Sanskrit Subhashitam and a Hymn on this occasion

Prime Minister Shri Narendra Modi has extended his warmest greetings to everyone on the auspicious occasion of Navratri, praying for prosperity, health, and the fulfillment of the resolve for a Viksit Bharat.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam on this occasion, highlighting the divine and benevolent grace of Goddess Shailaputri as the holy festival of Navratri commences. PM Modi also shared a devotional hymn dedicated to the Goddess on this occasion, noting that through the boundless mercy of the Goddess, the welfare of all citizens would be ensured, providing a powerful impetus to the collective goal of a developed India.

In a series of posts, the Prime Minister wrote on X:

"देशभर के मेरे परिवारजनों को नवरात्रि की हार्दिक मंगलकामनाएं। शक्ति की आराधना का यह दिव्य अवसर आप सभी के लिए सुख, सौभाग्य, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए। शक्तिस्वरूपा मां दुर्गा की असीम कृपा से सबका कल्याण हो, जिससे विकसित भारत के हमारे संकल्प को भी नई ऊर्जा मिले। जय अंबे जगदंबे मां!"

"नवरात्रि के पहले दिन मां दुर्गा के प्रथम स्वरूप देवी शैलपुत्री की पूजा का विधान है। उनके आशीर्वाद से हर किसी के जीवन में संयम, शांति और सकारात्मक ऊर्जा का संचार हो, यही कामना है।

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥"

I bow to Goddess Shailaputri, who fulfills all the wishes of her devotees, who is adorned with a crescent moon on her forehead, who rides a bull and who holds a trident in her hand. She is a glorious and revered goddess.

"जगतजननी मां दुर्गा के चरणों में कोटि-कोटि देशवासियों की ओर से मेरा नमन और वंदन! नवरात्रि के पावन पर्व पर देवी मां से विनती है कि वे हर किसी को अपने स्नेह और अनुकंपा का आशीर्वाद प्रदान करें। जय माता दी!"