गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी , दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी , ज्ञान ज्योती महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार आर्य जी , डीएव्ही कॉलेज मॅनेजिंग कमिटीच्या अध्यक्ष पूनम सुरी जी , ज्येष्ठ आर्य संन्यासी, स्वामी देवव्रत सरस्वती जी, विविध आर्य प्रतिनिधी सभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, देशभरातून आणि जगभरातून आलेले आर्य समाजाचे सर्व उपासक, बंधू आणि भगिनींनो !
सर्वप्रथम, मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्याचा विशेष कार्यक्रम होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी इथे आलो, त्यावेळी जे मंत्र ऐकले होते, त्यांची ऊर्जा आपल्याला आताही जाणवत आहे. जेव्हा जेव्हा मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळते, आणि जेव्हा जेव्हा मी येतो, तेव्हा तो एक दिव्य अनुभव असतो, एक अद्भुत अनुभव असतो. आणि हा स्वामी दयानंदजींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आदर्शांबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, तुम्हा सर्व विचारवंतांशी माझी अनेक दशकांची जवळीक आहे, त्यामुळे मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि मला नुकतेच सांगण्यात आले की अशी आणखी नऊ सभागृहे बांधण्यात आली आहेत. तेथे आपले सर्व आर्य समाज सदस्य हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत. मी त्यांना पाहू शकत नाही, पण मी इथूनच त्यांना प्रमाण करतो.

मित्रहो,
गेल्या वर्षी गुजरातमधील दयानंद सरस्वती यांच्या जन्मस्थळी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यात सहभागी झालो होतो. त्याआधी, मला दिल्ली येथे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती समारंभाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले होते. वेद मंत्रांच्या उच्चारणाची ती ऊर्जा, तो हवन विधी, असे वाटते की हे सर्व कालच घडले आहे.
मित्रहो,
तेव्हा आपण सर्वांनी ठरवले होते की 200 व्या जयंतीचा हा सोहळा विचार यज्ञाच्या रूपात दोन वर्षे असाच साजरा केला जाईल. मला आनंद आहे की, हा ‘अखंड विचार यज्ञ’ गेली दोन वर्षे अखंड सुरु आहे. वेळोवेळी मला तुमच्या प्रयत्नांविषयी, तुमच्या कार्यक्रमांबद्दल देखील माहिती मिळत आहे. आणि आज, आर्य समाजाच्या 150 व्या स्थापना वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मला पुन्हा एकदा माझ्या भावनांची आहुती देण्याची संधी मिळाली आहे. मी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना आदरपूर्वक नमन करतो. या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. या निमित्त एक विशेष नाणे प्रकाशित करण्याचे सौभाग्यही मला लाभले आहे.
मित्रहो,
आर्य समाजाच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत, हा प्रसंग केवळ समाजाच्या एका वर्गाचा किंवा पंथाचा नाही तर तो संपूर्ण भारताच्या वैदिक अस्मितेचा आहे. हा प्रसंग भारताच्या त्या विचाराशी निगडित आहे, ज्यामध्ये गंगेच्या प्रवाहाप्रमाणे स्वतःला परिष्कृत करण्याची, आत्म-शुद्धीकरणाची क्षमता आहे. हा प्रसंग त्या महान परंपरेशी जोडलेला आहे, ज्याने सामाजिक सुधारणांची महान परंपरा सतत पुढे नेली आहे! स्वातंत्र्यलढ्यातील अनेक योद्ध्यांना याने वैचारिक ऊर्जा दिली आहे. लाला लजपत राय, शहीद रामप्रसाद बिस्मिल आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी आर्य समाजापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण केले. दुर्दैवाने, राजकीय कारणांमुळे स्वातंत्र्यलढ्यातील आर्य समाजाच्या या भूमिकेला जो सन्मान मिळायला हवा होता, तो मिळू शकला नाही.

मित्रहो,
स्थापनेपासून ते आजपर्यंत, आर्य समाज ही प्रखर देशभक्तांची संस्था राहिली आहे. त्यांनी निर्भयपणे भारतीयतेचा पुरस्कार केला आहे. भारतविरोधी विचारसरणी असो, विदेशी विचारसरणी लादणारे लोक असोत, विभाजनवादी मानसिकता असो, सांस्कृतिक प्रदूषणाचे वाईट प्रयत्न असोत, आर्य समाजाने त्यांना नेहमीच आव्हान दिले आहे. आज, जेव्हा आर्य समाज आणि त्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत, तेव्हा समाज आणि देश दयानंद सरस्वती यांच्या महान विचारांना या भव्य स्वरूपात आदरांजली वाहत आहे, याचा मला आनंद आहे.
मित्रहो,
धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून इतिहासाच्या प्रवाहाला एक नवीन दिशा देणारे स्वामी श्रद्धानंद यांच्यासारखे आर्य समाजातील अनेक महापुरुष, त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद देखील या ऐतिहासिक क्षणाशी जोडले गेले आहेत. या व्यासपीठावरून, मी अशा कोट्यवधी पुण्यात्म्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या स्मृतींना वंदन करतो.
मित्रहो,
आपला भारत अनेक बाबतीत खास आहे. ही भूमी, तिची संस्कृती, तिची वैदिक परंपरा, युगानुयुगे अमर आहे. कारण, कोणत्याही कालखंडात, जेव्हा नवीन आव्हाने समोर येतात, काळ नवीन प्रश्न विचारतो, तेव्हा कोणते तरी महान व्यक्तिमत्व त्यांच्या उत्तरांसह समोर येते. कोणी ना कोणी ऋषी, महर्षी, किंवा ज्ञानी माणूस आपल्या समाजाला एक नवी दिशा दाखवतो. दयानंद सरस्वती हे देखील या महान परंपरेचे एक महान ऋषी होते. त्यांचा जन्म गुलामगिरीच्या काळात झाला होता. शतकानुशतकांच्या गुलामगिरीने संपूर्ण देश, संपूर्ण समाज उद्ध्वस्त केला होता. विचारांची आणि चिंतनाची जागा दांभिकतेने आणि दुष्टपणाने घेतली होती. ब्रिटिशांनी आपल्या परंपरांना आणि आपल्या श्रद्धांना तुच्छ लेखले. त्यांनी आपल्याला कमी लेखून भारताच्या गुलामगिरीचे समर्थन केले. अशा परिस्थितीत, समाज मौलिक विचार मांडण्याचे धैर्यही गमावत होता. आणि अशा कठीण काळात एक तरुण संन्यासी येतो. हिमालयातील निर्जन व दुर्गम ठिकाणी तो साधना करतो, तपश्चर्येच्या कसोटीवर स्वत:ची परीक्षा घेतो. आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा न्यूनगंडाच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय समाजाला खडबडून जागे करतो. जेव्हा संपूर्ण ब्रिटिश राजवट भारतीय अस्मितेला हीन लेखण्यात गुंतलेली होती तेव्हा समाजाच्या ढळणाऱ्या आदर्शांना आणि नैतिकतेच्या पाश्चिमात्यकरणाला आधुनिकीकरण म्हणून नावाजले जात होते, तेव्हा आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेल्या त्या ऋषींनी आपल्या समाजाला वेदांकडे परतण्याचे आवाहन केले : वेदांकडे चला ! असे विलक्षण व्यक्तिमत्व होते स्वामी दयानंद जी ! त्यांनी गुलामीच्या त्या कालखंडामध्ये दबलेल्या, पिचलेल्या राष्ट्राच्या चैतन्याला पुन्हा जागृत केले होते.

मित्रांनो,
स्वामी दयानंद सरस्वती जी हे जाणून होते की जर भारताला प्रगती करायची असेल तर भारताला केवळ राजकीय गुलामीच्या शृंखला तोडून चालणार नाही तर ज्या शृंखलांनी आपल्या समाजाला जखडून ठेवले आहे त्या शृंखला देखील तोडणे आवश्यक आहे. म्हणूनच स्वामी दयानंद सरस्वती जी यांनी उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य, आणि भेदभावाचा धिक्कार केला. त्यांनी समाजामधील अस्पृश्यतेचे समुळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले. त्यांनी निरक्षरतेविरुद्ध अभियान सुरू केले. त्यांनी आपले वेद आणि शास्त्रांची चुकीची व्याख्या करणाऱ्यांना तसेच त्यात आपल्या विचारांची भेसळ करणाऱ्यांना आव्हान दिले. त्यांनी परदेशी कथनांना देखील ललकारले होते. आणि शास्त्रार्थाच्या जुन्या परंपरेच्या आधाराने सत्य सिद्ध केले.
मित्रांनो,
स्वामी दयानंद जी युगदृष्टे महापुरुष होते. व्यक्तीनिर्माण असो की समाजनिर्माण, या कामाच्या नेतृत्वात नारीशक्तीची भूमिका खूप मोठी असते हे स्वामीजी जाणून होते. म्हणूनच स्त्रीयांना घराच्या उंबरठ्याच्या आत बंदिस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला त्यांनी आव्हान दिले. आर्य समाजाच्या विद्यालयांमधून मुलींना शिक्षण देण्याचे अभियान त्यांनी सुरू केले. त्या काळात जालंधरमध्ये जे कन्या विद्यालय सुरू झाले ते अल्पावधीतच कन्या महाविद्यालय बनले. आर्य समाजाच्या अशाच महाविद्यालयांमधून शिक्षण घेतलेल्या लाखो लाख मुली आज राष्ट्राचा पाया मजबूत करण्यात योगदान देत आहेत.
मित्रांनो,
आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी या क्षणी मंचावर उपस्थित आहेत. नुकतेच दोन दिवसांपूर्वीच आपल्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी राफेल फायटर विमानातून भरारी घेतली. आणि यावेळी त्यांची साथीदार होती स्क्वाड्रन लीडर शिवांगी सिंह. आज आपल्या मुली फायटर जेट उडवत आहेत, आणि ड्रोन दीदी बनून आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देत आहेत. भारत आज जगातील सर्वात जास्त महिला STEM स्नातक (अशी व्यक्ती ज्याने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी अथवा गणित या विषयात पदवी प्राप्त केली आहे) असणारा देश आहे असे आपण अभिमानाने सांगू शकतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये देखील भारतातील महिला नेतृत्वाची भूमिका निभावत आहेत. आज देशातील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक संस्थांमध्ये महिला शास्त्रज्ञ मंगलयान, चांद्रयान आणि गगनयान यासारख्या अंतराळ मोहीमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. देश आज योग्य मार्गावर वाटचाल करत आहे, हे या बदलांमधून स्पष्ट होते. देश स्वामी दयानंद जी यांचे स्वप्न पूर्ण करत आहे.
मित्रांनो,
स्वामी दयानंद जी यांच्या एका विचाराचे मी नेहमीच चिंतन करत असतो. मी तो विचार अनेक वेळा लोकांना देखील सांगतो. स्वामीजी म्हणत असत, “ जी व्यक्ती सर्वात कमी ग्रहण करते आणि सर्वात अधिक योगदान देते तीच परिपक्व असते”. स्वामीजींनी अत्यंत कमी शब्दात हा अमूल्य विचार मांडला आहे की कदाचित याची व्याख्या करण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली जाऊ शकतील. मात्र कोणत्याही विचाराची खरी ताकद त्याच्या भावार्थापेक्षा तो विचार किती काळ जिवंत राहिला, त्या विचाराने किती जणांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले, यावरून ठरवली जाते. आणि जेव्हा आपण या कसोटीवर महर्षी दयानंद जी यांच्या विचारांना पारखतो, जेव्हा आपण आर्य समाजातील समर्पण भाव जपणाऱ्या लोकांना पाहतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की स्वामीजींचे विचार काळाबरोबर अधिकाधिक तेजस्वी होत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी दयानंद सरस्वती ची यांनी आपल्या जीवनात ‘परोपकारिणी सभे’ची स्थापना केली होती. स्वामीजींनी रुजवलेली बीजं आज विशाल वृक्षाच्या अनेक शाखांमध्ये विस्तार पावली आहेत. गुरुकुल कांगडी, गुरुकुल कुरुक्षेत्र, डी ए व्ही संस्था (दयानंद अँग्लो वेदिक अभियान) तसेच इतर अन्य शैक्षणिक संस्था, या सर्व संस्था आपापल्या क्षेत्रात निरंतर काम करत आहेत. जेव्हा जेव्हा देशावर संकट कोसळले आहे तेव्हा आर्य समाजातील लोकांनी देशवासीयांसाठी आपले सर्वस्व समर्पित केले आहे. देशाची फाळणी झाली त्या काळात आपले सर्व काही गमावलेले शरणार्थी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची सहाय्यता, पुनर्वसन आणि त्यांचे शिक्षण या कार्यातही आर्य समाजाने खूप मोठी भूमिका निभावली आहे, याची इतिहासात नोंद आहे. आज देखील नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीडितांची सेवा करण्यात आर्य समाज नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आर्य समाजाने केलेल्या ज्या कार्यांचे ऋण देशावर आहे त्यातील एक महत्त्वाचे कार्य म्हणजे, आपल्या देशाची गुरुकुल परंपरा जीवित राखणे. एकेकाळी गुरुकुलांच्या आधारावरच भारत ज्ञान आणि विज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर होता. गुलामगिरीच्या काळात गुरुकुल व्यवस्थेवर हेतूपुरस्सर प्रहार करण्यात आले. यामुळे आपले ज्ञान लयाला गेले, आपले संस्कार नष्ट झाले, नवी पिढी कमकुवत झाली, अशावेळी आर्य समाजाने पुढे सरसावून ध्वस्त होत चाललेली गुरुकुल परंपरा जतन केली. केवळ इतकेच नाही, तर आर्य समाजाने गुरुकुल व्यवस्थेत काळानुरूप बदल देखील घडवले. गुरुकुलांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धती देखील समाविष्ट केली. आज जेव्हा देश राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणाला मूल्य आणि चारित्र्य निर्मितीशी जोडत आहे तेव्हा मी भारताच्या या पवित्र ज्ञान परंपरेचे रक्षण करणाऱ्य आर्य समाजाप्रती मन:पूर्वक आभार व्यक्त करत आहे.

मित्रांनो,
आपल्या वेदांमध्ये एक वचन लिहिलेले आहे, “कृण्वन्तो विश्वमार्यम्”, – म्हणजे आपण संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवूया, संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ विचारांच्या मार्गावर नेऊया. स्वामी दयानंद जी यांनी या वेदातील वचनाला आर्य समाजाचे ध्येयवाक्य बनवले. आज हेच वेदवाक्य भारताच्या विकास यात्रेचा देखील मूलमंत्र आहे. भारताच्या विकासातून विश्वाचे कल्याण, भारताच्या समृद्धीतून मानवतेची सेवा, याच दृष्टिकोनातून देश भविष्याकडे वाटचाल करत आहे. आज भारत शाश्वत विकासाच्या दिशेने एक प्रमुख जागतिक उत्प्रेरक बनला आहे. ज्याप्रमाणे स्वामीजींनी वेदांकडे परतण्याचे आवाहन केले होते त्याचप्रमाणे आज भारत वैदिक जीवन पद्धती आणि आदर्शांकडे परतण्याचा विचार जागतिक व्यासपीठावर मांडत आहे. याच विचारातून आम्ही ‘मिशन लाईफ’ चा प्रारंभ केला आहे. संपूर्ण जग या अभियानाला पाठिंबा देत आहे. ‘एक सूर्य, एक जग, एक ग्रीड’ या दृष्टिकोनातून आम्ही स्वच्छ ऊर्जेला देखील एका जागतिक अभियानात रूपांतरित करत आहोत. आपला ‘योग’ देखील आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगातील 190 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. जीवनात योग स्वीकारण्यासाठी, योगमय जीवन जगण्यासाठी हा पुढाकार, पर्यावरणाशी निगडित एलआयएफई- LiFE सारखे अभियान, हे जागतिक प्रयत्न, आज संपूर्ण जग ज्यात रस दाखवत आहे, ते आर्य समाजाच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनाचा आणि शिस्तीचा एक भाग आहेत. साधं जीवन आणि सेवाभाव, भारतीय वेशभूषेला प्राधान्य, पर्यावरणाची काळजी, भारतीयतेचा प्रसार, या सर्वांत आर्य समाजाचे लोक आयुष्यभर गुंतलेले असतात.
म्हणूनच, बंधूंनो आणि भगिनींनो,
आज भारत `सर्वे भवन्तु सुखिनः` या उद्देशाने विश्वकल्याणाच्या या अभियानांना पुढे नेत आहे, आज भारत जेव्हा ‘विश्वबंधु’ म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे, तेव्हा आर्य समाजाचा प्रत्येक सदस्य हे आपलं ध्येय मानून त्यासाठी कार्यरत आहे. मी आपणा सर्वांचे यासाठी कौतुक करतो, प्रशंसा करतो.
मित्रहो,
स्वामी दयानंद सरस्वतीजींनी पेटवलेली मशाल, ती गेल्या दीडशे वर्षांपासून आर्य समाजाच्या रूपाने समाजाला दिशा दाखवत आहे. माझ्या मते, स्वामीजींनी आपल्यामध्ये उत्तरदायित्वाची भावना जागवून दिली आहे. हे उत्तरदायित्व आहे, नव्या विचारांना पुढे नेण्याचे ! हे उत्तरदायित्व आहे, स्थिरावलेल्या रूढींना तोडून नवीन सुधारणा करण्याचे! आपला माझ्यावर इतका स्नेह आहे, म्हणूनच मी आज आपल्याकडे काही मागण्यासाठी, काही विनंती करण्यासाठी आलो आहे. मागू शकतो ना? मागू शकतो ना? मला पूर्ण विश्वास आहे, आपण नक्कीच देणार. राष्ट्रनिर्मितीच्या या महायज्ञात आपण आधीच बरेच कार्य करत आहात, तरी मी देशाच्या काही सध्याच्या प्राधान्यक्रमांबद्दल आपल्याशी पुन्हा बोलू इच्छितो. जसे की स्वदेशी आंदोलन, आर्य समाजाचा याच्याशी ऐतिहासिक संबंध राहिला आहे. आज देशाने पुन्हा एकदा स्वदेशीची जबाबदारी स्वीकारली आहे, देश स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही झाला आहे, त्यामुळे यात तुमची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे.
मित्रहो,
आपल्याला लक्षात असेल, काही काळापूर्वी देशाने `ज्ञान भारतम् मिशन` देखील सुरू केले आहे. याचा उद्देश आहे, भारताच्या प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचे डिजीटायझेशन आणि संरक्षण करणे. अथांग ज्ञानाची ही आपली परंपरा तेव्हाच जपली जाईल, जेव्हा नवी पिढी त्यांच्याशी जोडली जाईल, त्यांचे महत्त्व समजेल ! म्हणूनच मी आर्य समाजाला आवाहन करतो की, आपण गेल्या दीडशे वर्षांपासून भारताचे पवित्र प्राचीन ग्रंथ शोधून त्यांचे जतन करण्याचे कार्य करत आहात, ते आता राष्ट्रीय पातळीवर `ज्ञान भारतम् मिशन `च्या माध्यमातून पुढे नेले जाणार आहे. आपण हे आपलेच अभियान मानून यात सहकार्य करा, आणि आपल्या गुरुकुलांद्वारे, आपल्या संस्थांद्वारे, तरुण पिढीला हस्तलिखित ग्रंथांच्या अध्ययन आणि संशोधनाशी जोडा.

मित्रहो,
महर्षी दयानंदजींच्या 200व्या जयंतीच्या प्रसंगी मी यज्ञात वापरल्या जाणाऱ्या धान्यांचा उल्लेख केला होता. आपण सर्वजण जाणतो की यज्ञात श्रीअन्नाचे किती महत्त्व आहे. यज्ञात वापरले जाणारे धान्य विशेषतः पवित्र मानले जाते. या धान्यांसह भरड धान्य, म्हणजेच श्रीअन्न या भारतीय परंपरेलाही आपण पुढे नेले पाहिजे. यज्ञासाठी वापरले जाणारे धान्य हे नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न झाले पाहिजे, ही देखील त्याची खासियत आहे. नैसर्गिक शेती याबद्दल आचार्यजींनी आत्ताच सविस्तर सांगितले. ही नैसर्गिक शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होती. आज पुन्हा एकदा जग तिचे महत्त्व ओळखू लागले आहे. माझी विनंती आहे , आर्य समाजाने नैसर्गिक शेतीच्या आर्थिक आणि आध्यात्मिक पैलूंविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
मित्रहो,
एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे जलसंवर्धन. आज देशातील प्रत्येक गावात शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन अभियान सुरू आहे. हे अभियान जगातील सर्वांत अनोखे अभियान आहे. पण आपण लक्षात ठेवायला हवे की पाणी पोहोचवण्याची साधने तेव्हाच उपयुक्त ठरतील, जेव्हा पुढच्या पिढ्यांसाठी पुरेसे पाणी शिल्लक राहील. यासाठी आपण ठिबक सिंचनाद्वारे शेतीला प्रोत्साहन देत आहोत. देशात 60 हजारांहून अधिक अमृत सरोवर तयार करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. सरकारच्या या प्रयत्नांसोबत समाजाने स्वतःही पुढाकार घ्यावा. आपल्या गावागावांत तळे, सरोवर, विहीर आणि वापी असायच्या, पण काळानुसार त्यांच्या उपेक्षेमुळे त्या आटल्या. आता आपल्याला लोकांना पुन्हा आपल्या नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सतत जागरूक करावे लागेल. पावसाचे पाणी आडवणे आणि जिरवण्याचे आणि विहीर फेरभरणासारखे सरकारी अभियान याचा पावसाच्या पाण्याचा पुनर्भरणासाठी उपयोग, ही आजची गरज आहे.
मित्रहो,
गेल्या काही काळात देशात एक झाड आईच्या नावाने हे अभियानही अत्यंत यशस्वी झाले आहे. हे काही दिवसांचे नाही, तर सतत चालणारे अभियान आहे. वृक्षारोपण हा अखंड प्रवास आहे, आणि आर्य समाजाचे लोक या अभियानाशी आणखी अधिक लोकांना जोडू शकतात.
मित्रहो,
आपले वेद आपल्याला शिकवतात, `संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्`, म्हणजे, आपण एकत्र चालू, एकत्र बोलू, आणि एकमेकांच्या मनाचा विचार जाणू. म्हणजेच, परस्परांच्या विचारांचा आदर करू. वेदांचा हा संदेश आपण राष्ट्राच्या आह्वानाच्या रूपातही पाहायला हवा. देशाच्या संकल्पांना आपले संकल्प मानून, जनभागीदारीच्या भावनेतून सामूहिक प्रयत्नांना गती द्यावी लागेल. गेल्या दीडशे वर्षांत आर्य समाजाने हीच भावना जपली आहे. हीच भावना आपल्याला सातत्याने बळकट करायची आहे. मला विश्वास आहे, महर्षी दयानंद सरस्वती जींचे विचार अशाच प्रकारे मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रकाशित करत राहतील. या भावनेसोबत, पुन्हा एकदा आर्य समाजाच्या 150 वर्षांनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार. नमस्कार.


