जय हिंद !
जय हिंद !
जय हिंद !
व्यासपीठावर उपस्थित पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी,मंत्रीमंडळातले माझे सहकारी प्रल्हाद पटेल, बाबुल सुप्रियो, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे निकटवर्तीय, भारताचा गौरव वृद्धिंगत करणाऱ्या आझाद हिंद सेनेचे शूर सदस्य, त्यांचे कुटुंबीय, उपस्थित कला आणि साहित्य जगत क्षेत्रातले उपस्थित दिग्गज आणि बंगालच्या या महान धरतीवरच्या माझ्या बंधू- भगिनीनो,
कोलकात्याची माझी आजची भेट अतिशय भावूक करणारा क्षण आहे. बालपणापासूनच नेताजी सुभाष चंद्र बोस हे नाव ऐकल्यावर कोणत्याही स्थितीमध्ये , कोणत्याही परिस्थितीमध्ये, हे नाव कानी पडताच नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. इतके विराट व्यक्तिमत्व की व्याख्येसाठी शब्द अपुरे पडतील. इतकी दूर दृष्टी की तिथपर्यंत पाहण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. कठिणातल्या कठीण परिस्थितीतही इतके धैर्य, इतके साहस की जगातले मोठ्यात मोठे आव्हानही टिकू शकणार नाही. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या चरणी मी नतमस्तक होतो,त्यांना नमन करतो आणि नमन करतो त्या मातेला, प्रभादेवी यांना, ज्यांनी नेताजींना जन्म दिला. आज या पवित्र दिवसाला 125 वर्षे होत आहेत. 125 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत मातेच्या कुशीत या वीर पुत्राने जन्म घेतला ज्यांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला नवी दिशा दिली.आजच्याच दिवशी गुलामीच्या अंधकारात ही चेतना प्रकटली , ज्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या सत्ते समोर उभे रहात सांगितले होते की मी तुमच्याकडे स्वातंत्र्य मागणार नाही तर ते स्वातंत्र्य हिसकावून घेईन.
आजच्या दिवशी केवळ नेताजी सुभाष चंद्र यांचा जन्म झाला असे नव्हे तर भारताच्या नव्या आत्मगौरवाचा जन्म झाला होता, भारताच्या नव्या सैन्य कौशल्याचा जन्म झाला होता. नेताजींच्या 125 व्या जन्म-जयंतीला कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने या महापुरुषाला कोटी-कोटी प्रणाम करतो,त्यांना सलाम करतो.

मित्रहो,
बालक सुभाष यांना नेताजी म्हणून घडवणाऱ्या,त्यांचे जीवन, तप, त्याग यांनी घडवणाऱ्या बंगालच्या या पुण्य-भूमीला मी आदरपूर्वक नमन करतो. गुरुदेव श्री रवींद्रनाथ टागोर, बंकिम चंद्र चट्टोपाध्याय, शरद चंद्र या सारख्या थोर पुरुषांनी ही पुण्यभूमी , राष्ट्र भक्तीच्या भावनेने ओतप्रोत केली आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभु, श्री ऑरोबिन्दो, मा शारदा, मा आनंदमयी, स्वामी विवेकानंद, श्री श्री ठाकुर अनुकूल चंद्र यासारख्या संतानी ही पुण्य भूमी वैराग्य, सेवा आणि आध्यात्म यांनी अलौकिक केली आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय, गुरुचंद ठाकुर, हरीचंद ठाकुर यांच्यासारखे अनेक समाज सुधारक, सामाजिक सुधारणेचे अग्रणी यांनी या पुण्यभूमीवरून देशाच्या नव सुधारणांची पायाभरणी केली आहे. जगदीशचंद्र बोस, पी सी रॉय, एस. एन. बोस आणि मेघनाद साहा यासारख्या अगणित वैज्ञानिकांनी या पुण्य-भूमीला ज्ञान विज्ञानाचे सिंचन केले आहे. या पुण्यभूमीने देशाला राष्ट्रगीतही दिले आहे. या भूमीने आपल्याला देशबंधु चितरंजन दास, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि आपणा सर्वांचे प्रिय भारत रत्न प्रणब मुखर्जी यांची भेट घडवली आहे. या भूमीच्या अशा लाखो महान व्य्क्तीत्वांच्या चरणी मी आज या पवित्र दिनी नमन करतो.
मित्रहो,
इथे येण्यापूर्वी मी राष्ट्रीय वाचनालयात गेलो होतो,तिथे नेताजींच्या कार्याबाबत एक आंतरराष्ट्रीय परिषद आणि कलाकार शिबिराचे आयोजन केले आहे. नेताजींचे नाव ऐकताच प्रत्येकात नवी ऊर्जा सळसळते हे मी अनुभवले. नेताजींच्या जीवनाची ही ऊर्जा जणू त्यांच्या अंतर्मनाशी जोडली गेली आहे ! त्यांची ही उर्जा,त्यांची तपस्या, त्यांचा त्याग देशाच्या प्रत्येक युवकासाठी मोठी प्रेरणा आहे. आज भारत नेताजींची प्रेरणा घेऊन वाटचाल करत आहे तेव्हा त्यांच्या योगदानाचे वारंवार स्मरण करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक पिढीने त्याचे स्मरण ठेवावे यासाठी नेताजींचे 125 वे जयंती वर्ष ऐतिहासिक आणि अभूतपूर्व भव्य कार्यक्रमासह साजरे करण्याचा देशाने प्रण केला आहे.आज सकाळपासूनच देशाच्या प्रत्येक भागात यासंदर्भात कार्यक्रम होत आहेत. याचाच भाग म्हणून नेताजींच्या स्मृती प्रीत्यर्थ आज एक नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.नेताजींच्या पत्रांबाबतच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे.
कोलकाता आणि बंगाल, जी त्यांची कर्मभूमी राहिली आहे इथे नेताजींच्या जीवनावर एक प्रदर्शन आणि प्रॉजेक्शन मॅपिंग शो आजपासून सुरु होत आहे. हावड़ा इथून सुटणाऱ्या ‘हावड़ा-कालका मेल’ या रेल्वे गाडीचे नाव बदलून आता ‘नेताजी एक्सप्रेस’ करण्यात आले आहे. नेताजींची जयंती दर वर्षी म्हणजे 23 जानेवारी हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निश्चयही देशाने केला आहे. आपले नेताजी भारताच्या पराक्रमाचे प्रतिनिधीही आहेत आणि प्रेरणाही. या वर्षात देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रवेश करणार आहे, देश आत्मनिर्भर भारत हा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा नेताजींचे जीवन, त्यांचे कार्य, त्यांचा प्रत्येक निर्णय,आपणा सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांच्यासारख्या पोलादी व्यक्तिमत्वासाठी काहीच असंभव नव्हते. परदेशात जाऊन त्यांनी भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या चेतनेला जागृत केले, स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना करून मजबूत केली. देशाच्या प्रत्येक जाती,पंथ आणि प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना देशाचा सैनिक केला. त्या काळात जेव्हा जग महिलांच्या अधिकाराबाबत चर्चा करत होती तेव्हा नेताजींनी ‘राणी झाशी रेजीमेंट’ करून महिलानाही सहभागी केले. सैनिकांना युद्धाचे आधुनिक प्रशिक्षण दिले, देशासाठी जगण्याची आणि प्राणार्पण करण्याची प्रेरणा दिली. नेताजींनी म्हटले होते-
“भारोत डाकछे। रोकतो डाक दिए छे रोक्तो के। ओठो, दाड़ांओ आमादेर नोष्टो करार मतो सोमोय नोय।
म्हणजे भारत साद घालत आहे, रक्त, रक्ताला बोलावत आहे,उठा, आता आपल्याला वेळ दवडायचा नाही.

मित्रहो,
असा हुंकार केवळ नेताजीच देऊ शकत होते. त्यांनी हेही दाखवून दिले की ज्या सत्तेवरचा सूर्य कधी मावळत नव्हता त्यांना भारताचे शूर वीर रणांगणातही पराभूत करू शकतात.भारताच्या भूमीवर, स्वतंत्र्य भारताच्या, स्वतंत्र सरकारची पायाभरणी करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. नेताजींनी आपला प्रण पूर्ण करूनही दाखवला. अंदमान मध्ये त्यांनी आपल्या सैनिकांसह तिरंगा फडकवला. ज्या जागी इंग्रज देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना यातना देत होते, काळ्या पाण्याची शिक्षा देत होते, त्या जागी जाऊन त्यांनी या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली दिली. ते सरकार अखंड भारताचे पहिले स्वतंत्र सरकार होते. अखंड भारताच्या आझाद हिंद सरकारचे नेताजी हे पहिले प्रमुख होते. मी हे माझे भाग्य मानतो की, स्वातंत्र्याची ती पहिली झलक सुरक्षित राखण्यासाठी 2018 मध्ये अंदमानच्या त्या द्विपाचे नाव नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप ठेवण्यात आले. देशाच्या भावना लक्षात घेऊन नेताजी यांच्याविषयीचे दस्तावेज आमच्या सरकारने सार्वजनिक केले. आमच्या सरकारचे हे भाग्य की 26 जानेवारीच्या संचलना दरम्यान INA Veterans संचलनात सहभागी झाले. आज या कार्यक्रमात आझाद हिंद सेनेत राहिलेले देशाचे वीर पुत्र आणि कन्या उपस्थित आहेत. मी आपल्याला पुन्हा प्रणाम करतो आणि सांगतो की देश आपला सदैव कृतज्ञ राहील, कृतज्ञ आहे आणि सदैव कृतज्ञ राहील.
मित्रहो, 2018 मध्ये देशाने आझाद हिंद सरकारचे 75 वे वर्ष धूम धडाक्यात साजरे केले. त्याच वर्षी देशाने सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारही सुरु केले. ‘दिल्ली दूर नहीं’ ही घोषणा देत लाल किल्यावर झेंडा फडकवण्याचे नेताजींनी पाहिलेले स्वप्न देशाच्या लाल किल्यावर झेंडा फडकवून पूर्ण केले.
बंधू-भगिनीनो,
आझाद हिंद सेनेच्या कॅपमध्ये लाल किल्यावर मी झेंडा फडकवला होता तेव्हा माझ्या मनात अनेक विचार दाटून आले होते. अनेक प्रश्न होते, अनेक गोष्टी होत्या, एक वेगळीच अनुभूती होती. मी नेताजींच्या विषयी विचार करत होतो, देशवासियांबाबत विचार करत होतो. आयुष्यभर त्यांनी धोका कशासाठी झेलला...त्याचा उत्तर आहे आपल्यासाठी, आपणा सर्वांसाठी धोका पत्करला. अनेक दिवस ते आमरण उपोषण कशासाठी करत राहिले.. आपल्यासाठी, आपणा सर्वांसाठी.महिनोन महिने तुरुंगाच्या कोठडीत शिक्षा भोगत राहिले .. आपणा सर्वांसाठी. असे कोण आहे की इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले आहे आणि आपले प्राण पणाला लावून ते फरार झाले आहेत. आठवडा- आठवड्यापर्यंत ते काबुलच्या रस्तांवर आपले प्राण धोक्यात घालत एका दुतावासातून दुसऱ्या दुतावासात फेऱ्या मारत राहिले- कोणासाठी ?, आपणा सर्वांसाठी. जागतिक महायुद्धाच्या त्या काळात देशांमधल्या संबंधांचे चित्र क्षणाक्षणाला पालटत होते अशा परिस्थितीत प्रत्येक देशाकडे ते भारतासाठी पाठींबा का मागत होते ? कारण भारत स्वतंत्र व्हावा, आपण स्वतंत्र भारतात जगावे. हिंदुस्तानची प्रत्येक व्यक्ती नेताजी सुभाष बाबू यांची ऋणी आहे. 130 कोटीहून अधिक भारतीयांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब नेताजींचा ऋणी आहे. हे ऋण आपण कसे फेडणार ?हे ऋण आपण कधी फेडू शकू का?

मित्रहो,
जेव्हा नेताजी, एल्गिन रोड मधल्या घरात कैदेत होते तेव्हा भारता बाहेर पडण्याचा त्यांनी विचार केला होता, तेव्हा आपला पुतण्या शिशिर यांना बोलवून म्हटले होते, - अमार एकटा काज कोरते पारबे? अमार एकटा काज कोरते पारबे? माझे एक काम करू शकतोस का ? त्या नंतर शिशिर यांनी जे केले ते भारताच्या स्वातंत्र्याच्या सर्वात मोठ्या कारणापैकी एक होते. नेताजी हे जाणत होते की जागतिक महायुद्धाच्या या काळात इंग्रज सत्तेला बाहेरून धक्का दिला तर त्यांना मोठा हादरा बसेल. ते विचार करत होते की भविष्यात जस- जसे जागतिक महायुद्ध पुढे सरकेल तस- तशी इंग्रजांची ताकद क्षीण होत जाईल, भारतावरची त्यांची पकड ढिली होत जाईल.ही त्यांची दूर दृष्टी होती,ते इतक्या दूरवरचा विचार करू शकत होते. मी वाचले आहे, की त्यांनी आपली पुतणी इला यांना दक्षिणेश्वर मंदिरात मातेचा आशीर्वाद मागण्यासाठी पाठवले होते.त्यांना त्वरित देशाबाहेर पडायचे होते. देशाबाहेर भारत समर्थक शक्ती होत्या त्यांना ते एकजूट करू इच्छित होते. म्हणून त्यांनी शिशिर यांना सांगितले होते- अमार एकटा काज कोरते पारबे? क्या मेरा एक काम कर सकते हो?
मित्रहो,
आज प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयावर हात ठेवून नेताजींचे स्मरण केले तर पुन्हा हाच प्रश्न ऐकू येईल-
- अमार एकटा काज कोरते पारबे? क्या मेरा एक काम कर सकते हो?
हे काम, हे लक्ष्य आज भारताला आत्मनिर्भर करण्याचे आहे. देशातली प्रत्येक व्यक्ती, देशाचा प्रत्येक भाग याच्शी जोडला गेला आहे.नेताजींनी म्हटले होते - पुरुष, ओर्थो एवं उपोकरण निजेराई बिजोय बा साधिनता आंते पारे ना. आमादेर अबोशोई सेई उद्देश्यो शोकति थाकते होबे जा आमादेर साहोसिक काज एवंम बीरतपुरनो शोसने उदबुधो कोरबे.
म्हणजे आपल्याकडे तो उद्देश आणि शक्ती असली पाहिजे जी आपल्याला साहस आणि वीरतेने कारभार करण्यासातही प्रेरित करेल. आज आपल्याकडे उद्देशही आहे आणि शक्तीही. आत्मनिर्भर भारत हे आपले लक्ष्य आपली आत्मशक्ती , आपल्या आत्मसंकल्पाने पूर्ण होईल. नेताजींनी म्हटले होते - “आज आमादेर केबोल एकटी इच्छा थाका उचित – भारोते ईच्छुक जाते, भारोते बांचते पारे। म्हणजे आज आपली एकच इच्छा असली पाहिजे की आपला भारत वाचला पाहिजे,आगेकूच करत राहिला पाहिजे. आपलेही एकच लक्ष्य आहे. कठोर परिश्रम करत देशासाठी जगावे,आपल्या परिश्रमांनी, नवोन्मेशाने देशाला आत्मनिर्भर करावे. नेताजींनी म्हटले होते- “निजेर प्रोती शात होले सारे बिस्सेर प्रोती केउ असोत होते पारबे ना’ अर्थात, आपण स्वतः प्रामाणिक असू तर आपण जगासाठी चुकीचे ठरत नाही. आपल्याला जगासाठी उत्तम दर्जाची उत्पादने निर्माण करायची आहेत, कोणतीही कमतरता नाही. झिरो डीफेक्ट – झिरो इफेक्ट अशी उत्पादने. नेताजींनी आपल्याला सांगितले होते - “स्वाधीन भारोतेर स्वोप्ने कोनो दिन आस्था हारियो ना। बिस्से एमुन कोनो शोक्ति नेई जे भारोत के पराधीनांतार शृंखलाय बेधे राखते समोर्थों होबे” म्हणजे स्वतंत्र भारताच्या स्वप्नावरचा विश्वास कधी हरवू देऊ नका.जगात अशी कोणतीही ताकद नाही जी भारताला जखडून ठेवेल. खरोखरच जगात अशी कोणतीही ताकद नाही जी 130 कोटी देशवासियांना आपला भारत आत्मनिर्भर भारत करण्यापासून रोखू शकेल.
मित्रहो,
नेताजी सुभाष चंद्र बोस, गरीबी, निरक्षरता, रोगराई,यांना देशाच्या सर्वात मोठ्या समस्या मानत असत, ते म्हणत असत - ‘आमादेर शाब्छे बोरो जातियो समस्या होलो, दारिद्रो अशिकखा, रोग, बैज्ञानिक उत्पादोन। जे समस्यार समाधान होबे, केबल मात्रो सामाजिक भाबना-चिन्ता दारा” अर्थात, आपली सर्वात मोठी समस्या गरीबी, निरक्षरता, रोगराई आणि वैज्ञानिक उत्पादनांचा अभाव आहे. या समस्यांचा निपटारा करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. मला संतोष आहे की, आज देशातले पीड़ित, शोषित वंचित, आपला शेतकरी, देशाच्या महिलांना सशक्त करण्यासाठी कठोर परीश्रम करत आहेत.आज प्रत्येक गरिबाला मोफत उपचारासाठी आरोग्य सुविधा मिळत आहेत. देशाच्या शेतकऱ्याला बियाण्या पासून बाजारापर्यंत आधुनिक सुविधा देण्यात येत आहेत. शेतीवर शेतकऱ्याला करावा लागणारा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक युवकाला आधुनिक आणि गुणवत्ता-पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी देशाचा शैक्षणिक ढाचा आधुनिक करण्यात येत आहे. देशभरात मोठ्या संख्येने एम्स,आयआयटी आणि आयआयएम यासारख्या संस्था उघडण्यात आल्या आहेत. आज देश 21 व्या शतकाला अनुरूप नवे शैक्षणिक धोरणही लागू करत आहे.
मित्रहो,
मी अनेकदा विचार करतो, की आज देशात जे परिवर्तन घडत आहे,जो नव भारत साकारत आहे तो पाहून नेताजी किती संतुष्ट झाले असते.जगातल्या सर्वात आधुनिक तंत्रज्ञानात आपला देश आत्म निर्भर झाल्याचे पाहून त्यांच्या भावना काय असत्या ? जगभरातल्या मोठ-मोठ्या कंपन्यात, शिक्षण क्षेत्रात,वैद्यकीय क्षेत्रात भारतीयांचे नाव दुमदुमत आहे हे पाहून त्यांना किती आनंद झाला असता. राफेल सारखे अत्याधुनिक विमान भारताच्या सैन्यदलात आहे,तेजस सारख्या अत्याधुनिक विमानाची भारत स्वतः निर्मिती करत आहे. त्यांनी जेव्हा पाहिले असते की आपल्या देशाचे सैन्य इतके सामर्थ्यशाली आहे, त्यांना तशीच शस्त्रास्त्रे मिळत आहेत, तेव्हा नेताजींच्या भावना काय असत्या ?नेताजींनी हे पाहिले असते की भारत इतक्या मोठ्या महामारीशी सामर्थ्याने लढा देत आहे, आज त्यांचा भारत लसीसारखे आधुनिक वैज्ञानिक उपचार स्वतः तयार करत आहे तेव्हा त्यांच्या मनात कोणते विचार आले असते ? भारत ही लस दुसऱ्या देशांना देऊन त्यांना मदत करत आहे हे पाहून त्यांना किती अभिमान वाटला असता. नेताजी ज्या रूपाने आपल्याला पाहत आहेत, आपल्याला आशीर्वादच देत आहेत, आपला स्नेह देत आहेत.ज्या बलवान भारताची त्यांनी कल्पना केली होती आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ते नियंत्रण रेषेपर्यंत भारताचे हे रूप जग पाहत आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा कोठूनही प्रयत्न झाला तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.
मित्रहो,
नेताजी यांच्या कर्तुत्वाबाबत बोलण्यासारखे इतके आहे की वेळ अपुरा पडावा. नेताजी यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या जीवनातून आपणा सर्वाना विशेषकरून युवकांना खूप शिकवण मिळते. एक आणखी गोष्ट मला प्रभावित करते ती म्हणजे आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्न. जागतिक महायुद्धाच्या काळात सहकारी देश पराभवाचा सामना करत होते, शरणागती स्वीकारत होते तेव्हा नेताजींनी आपल्या सहकाऱ्यांना जे सांगितले होते त्याचा भावार्थ हाच होता की दुसऱ्या देशांनी शरणागती स्वीकारली असेल आपण नाही. आपला संकल्प पूर्तते पर्यंत नेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय होती. ते आपल्या जवळ भगवत गीता ठेवत असत त्यातून प्रेरणा घेत असत.एखाद्या गोष्टीची त्यांना खात्री असेल तर ती पूर्ण करण्यासाठी ते कठोर प्रयत्न करत असत. त्यांनी आपल्याला शिकवण दिली की कोणतेही कार्य सोपे नसेल, त्यात अडचणी असतील तरीही नवे करण्यासाठी आपण कचरता कामा नये.आपल्याला एखाद्या गोष्टीचा विश्वास असेल तर आपण त्याचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. एखादे वेळी आपल्याला वाटेलही की आपण प्रवाहाविरोधात जात आहोत, मात्र आपले लक्ष्य पवित्र असेल तर आपण जराही विचलित होता कामा नये. आपल्या दूरदृष्टीच्या लक्ष्यासाठी आपण समर्पित असाल तर आपल्याला यश नक्कीच मिळणार हे त्यांनी सिध्द करून दाखवले.
मित्रहो,
आत्मनिर्भर भारत या स्वप्ना बरोबरच सोनार बांग्लासाठीही नेताजी मोठी प्रेरणा आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी जी भूमिका बजावली होती ती भूमिका पश्चिम बंगालला ,आत्मनिर्भर भारत अभियानात बजावायची आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाचे नेतृत्व आत्मनिर्भर बंगाल आणि सोनार बांग्ला यानाही करायचे आहे. बंगालने आगेकूच करावी, आपल्या गौरवात भर घालावी आणि देशाचा गौरवही वृद्धिंगत करावा.नेताजी यांच्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या संकल्प प्राप्तीपर्यंत थांबायचे नाही. आपण सर्वजण आपल्या प्रयत्नात, संकल्पात यशस्वी व्हावे हा शुभेच्छेसह ,या पवित्र दिनी, या पवित्र धरतीवर येऊन, आपणा सर्वांचा आशीर्वाद घेऊन, नेताजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन मार्गक्रमण करूया याच भावनेने आपणा सर्वाना अनेक अनेक धन्यवाद देतो. जय हिंद !जय हिंद !जय हिंद !
खूप-खूप धन्यवाद!


