पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्याबद्दल भारतभर शोक व्यक्त होत आहे. बिहारमधील मधुबनी येथे आयोजित राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवसीयांच्या वतीने या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. संपूर्ण देशाच्या वतीने पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती म्हणून दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बिहारमधील मधुबनी येथे केलेल्या रोखठोक भाषणात पंतप्रधान मोदींनी दहशतवादाला तोंड देताना न्यायाची, एकतेची, कणखरपणा बाळगण्याची तसेच भारतीयत्वाची अमर भावना जोपासण्याची स्पष्ट हाक दिली. पहलगाम, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला आणि आत्म्याला धोका निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आखण्यात आलेली रूपरेषा मांडली.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दु:खद हल्ल्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त करत, "निरपराध नागरिकांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देशाला वेदना होत असून देश दु:खात आहे. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या सर्वांना सारखेच दुःख आणि हळहळ वाटत आहे." त्यांनी पीडित कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करत जे जखमी आणि उपचार घेत आहेत त्यांच्या मदतीसाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले . दहशतवादाच्या विरोधात 140 कोटी भारतीय दृढनिर्धारासह एकजुटीने उभे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. "हा हल्ला केवळ निशस्त्र पर्यटकांवरचाच नव्हे, तर भारताच्या आत्म्यावर केला गेलेला हल्ला होता," असे त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान मोदींनी गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा ठामपणे निर्धार व्यक्त केला: "ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी त्याचा कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयंकर शिक्षा भोगावी लागेल. दहशतवादाची पाळंमुळं पुसून टाकण्याची वेळ आली आहे. भारताची इच्छाशक्ती दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडून टाकेल." भारताच्या जागतिक भूमिकेला आणखी बळकटी देत, बिहारच्या भूमीतून बोलताना ते म्हणाले, "भारत प्रत्येक दहशतवाद्याला, त्यांच्या हस्तकाला आणि पाठीराख्यांना वेचून काढेल, त्यांचा शोध घेऊन त्यांना शासन घडविले जाईल त्यासाठी ते पृथ्वीवर कुठेही कानाकोपऱ्यात दडून बसले असले तरीही त्यांचा माग काढला जाईल. दहशतवादाला शिक्षा केल्यावाचून राहणार नाही आणि सार देश या निश्चयावर ठाम आहे."
दु:खाच्या या प्रसंगात भारताच्या पाठीशी उभ्या असलेले विविध देश, त्यांचे नेते आणि त्या देशातील जनतेबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करत, "मानवतेवर विश्वास असलेला प्रत्येकजण आमच्या पाठीशी आहे," असे स्पष्ट केले.”


