पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहिबााबाद आणि न्यू अशोक नगर दरम्यानच्या नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन, दिल्लीला मिळाली पहिली नमो भारत कनेक्टिव्हीटी
भारतातील मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याचा विस्तार आता 1,000 किलोमीटरवर पोहोचला, ही देशाची अत्यंत उल्लेखनीय कामगिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मेक इन इंडिया सोबतच जग 'हील इन इंडिया' या मंत्राचाही स्वीकार करेल : पंतप्रधान
जगाची आरोग्य आणि निरामयता राजधानी बनण्यासाठी भारतात प्रचंड क्षमता आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता  सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीने प्रवास देखील केला.

या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.  राजधानी दिल्ली क्षेत्राला आज भारत सरकारकडून एक महत्त्वाची भेट मिळाली आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे भारताच्या शहरी भागांतील  दळणवळण सेवा सुविधांचा आणखी विस्तार झाला असल्याची बाबही त्यांनी यावेळी नमूद केली. या कार्यक्रमाला येण्याआधी नमो भारत रेल्वे गाडीतून साहिबाबाद ते न्यू अशोक नगर या स्थानकांदरम्यान आपण केलेल्या प्रवासाच्या अनुभवाविषयी त्यांनी उपस्थितांना सांगितले . हा प्रवास विकसित भारताच्या शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीचे भवितव्य दर्शवणारा होता असे पंतप्रधान म्हणाले. या प्रवासाच्या वेळी आपण काही युवा प्रतिनिधींसोबत संवाद साधला, ते उत्साह आणि आशेने भरलेले होते असे त्यांनी सांगितले. नमो भारत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली - मेरठ मार्गावरच्या  वाहतुक कोंडीच्या समस्येत लक्षणीय बदल होतील ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली क्षेत्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन देखील केले.

आजच्या दिवसाने भारताच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड पार करत ऐतिहासिक यशाची नोंद केली असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात नमूद केली. भारतातील मेट्रो रेल्वे सेवेचे  जाळे आता एक हजार किलोमीटरपर्यंत विस्तारले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. ही अत्यंत उल्लेखनीय कामागिरी असल्याचे म्हणत त्यांनी भारताच्या या यशाची प्रशंसाही केली.  2014 मध्ये जेव्हा देशाने आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यावेळी मेट्रो रेल्वे सेवा जोडणीच्या बाबतीत जागतिक पातळीवर भारताचे स्थान पहिल्या दहा क्रमांकामध्येही नव्हते, मात्र त्यानंतर  गेल्या दहा वर्षांत भारत मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याच्या विस्ताराच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला असल्याची बाबही पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखित केली. आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

2014 च्या आधी, भारताचे मेट्रो जाळे एकूण फक्त 248 किलोमीटर लांबीचे होते आणि केवळ पाच शहरांपुरते मर्यादित होते, असे पंतप्रधान म्हणाले.  गेल्या दहा वर्षांत भारतात एकूण 752 किलोमीटरहून जास्त लांबीच्या नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे, असे त्यांनी ठळकपणे निदर्शनास आणून दिले. आज देशभरातील 21 शहरांमध्ये मेट्रो सेवा कार्यरत आहेत,तर 1,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे मेट्रो मार्ग सध्या वेगाने विकसित होत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दोन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन आणि पायाभरणी यासह, दिल्ली मेट्रो मार्गाचा विस्तार यांची नोंद घेत मोदींनी, गुरुग्राम नंतर आता हरयाणाचा आणखी एक भाग मेट्रो जाळ्याशी जोडला जात आहे यावर भर दिला.  ते पुढे म्हणाले की, रिठाला-नरेला-कुंडली मार्गटप्पा, हा दिल्ली मेट्रो जाळ्याच्या सर्वात मोठ्या विभागांपैकी एक असेल. हा टप्पा, दिल्ली आणि हरयाणामधील प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडणारी दळणवळण व्यवस्था  मजबूत करेल आणि लोकांचा प्रवास सुकर करेल, असेही ते म्हणाले.  भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे दिल्लीतील मेट्रो मार्गांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत, ते म्हणाले  की 2014 मध्ये दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एनसीआरमधील एकूण मेट्रो जाळे, 200 किलोमीटरपेक्षा कमी होते आणि आज ते  दुपटीने वाढले आहे.

"गेल्या दशकभरात, सरकारचे प्राथमिक प्राधान्य पायाभूत सुविधांच्या विकासावर आहे", असे मोदी म्हणाले.  त्यांनी नमूद केले की, दहा वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांसाठीची नियोजित आर्थिक तरतूद  सुमारे 2 लाख कोटी रुपये होती, ती आता 11 लाख कोटीं रुपयांहून अधिक झाली आहे.  ते पुढे म्हणाले की आधुनिक दळणवळण व्यवस्थेवर  भर देण्यात आला आहे, विशेषत: यात शहरांतर्गत दळणवळण आणि एक शहर दुसऱ्या शहराला जोडणे, यांचा समावेश आहे.  पंतप्रधानांनी नमूद केले की, आता दिल्लीतून निघून विविध शहरांमध्ये पोहोचणारे द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तयार होत आहेत आणि दिल्ली औद्योगिक पट्ट्याशी जोडली जात आहे.  त्यांनी नमूद केले  की एनसीआरमध्ये, एक मोठे बहुपेडी मालवाहतूक केंद्र (मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब) विकसित केले जात आहे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये दोन रेल्वे मालवाहतुक  मार्ग (फ्रेट कॉरिडॉर) एकत्र येऊन मिळत  आहेत.  हे प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासात आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात हातभार लावत असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.  "आधुनिक पायाभूत सुविधा गरीब आणि मध्यमवर्गासह प्रत्येकासाठी सन्माननीय आणि दर्जेदार जीवनाची हमी मिळवून देण्यात मदत करत आहेत", असे ते पुढे म्हणाले.

गरिबातील गरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे यावर भर देत पंतप्रधानांनी अधोरेखित की सरकार आयुष आणि आयुर्वेद यांसारख्या पारंपारिक भारतीय औषध पद्धतींनाही प्रोत्साहन देत आहे. गेल्या दशकभरात आयुष प्रणाली 100 हून अधिक देशांमध्ये विस्तारली आहे. भारतामध्ये पारंपारिक औषधांशी संबंधित पहिली जागतिक आरोग्य संघटना (WHO) संस्था स्थापन होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले असल्याचे  सांगितले. आज केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी झाली आहे, असे पंतप्रधानांनी  सांगितले. या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी दिल्लीतील जनतेचे विशेष अभिनंदन केले.

“जगाची आरोग्य आणि निरामयता  राजधानी बनण्याची अफाट क्षमता भारतात आहे”, यावर पंतप्रधानांनी भर दिला.  तो दिवस दूर नाही जेव्हा जग “मेक इन इंडिया” सोबतच “हील इन इंडिया” या मंत्राचा स्वीकार करेल, असे त्यांनी सांगितले. परदेशी नागरिकांना भारतात आयुष उपचारांचा लाभ घेता यावा यासाठी विशेष आयुष व्हिसा सुविधा सुरू करण्यात आली असून अल्पावधीत शेकडो परदेशी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. भारत सरकारचे हे प्रयत्न दिल्लीला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह या कार्यक्रमाला इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

प्रादेशिक संपर्क सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून, साहिबााबाद आणि न्यू अशोक नगर दरम्यान सुमारे 4,600 कोटी रुपयांच्या दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किमीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करतील.  या प्रकल्पामुळे दिल्ली पहिल्या नमो भारत संपर्क सुविधेशी जोडली जाणार आहे.  यामुळे दिल्ली आणि मेरठ दरम्यानचा प्रवास लक्षणीयरीत्या सुलभ होईल तसेच अतुलनीय सुरक्षा आणि विश्वासार्हतेसह जलद गती आणि आरामदायी प्रवासामुळे लाखो लोकांना याचा फायदा होईल.

पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रो टप्पा-IV मधील जनकपुरी आणि कृष्णा पार्क दरम्यानच्या 2.8किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. या टप्प्यावर सुमारे 1200 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा दिल्ली मेट्रो टप्पा-IV चा उद्घाटन करण्यात आलेला पहिला मार्ग आहे. कृष्णा पार्क, विकासपुरीच्या काही भागांसह पश्चिम दिल्लीच्या क्षेत्रांना या मेट्रो मार्गाचा लाभ होणार आहे.

पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रो टप्पा-IV च्या 26.5 किमी मार्गाच्या कामाची पायाभरणी केली. रिठाला ते कुंडली विभागांतर्गत हा मार्ग असून यावर सुमारे 6230 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मेट्रो मार्ग दिल्लीतील रिठाला आणि हरियाणातील नथुपूर (कुंडली) यांना जोडेल. यामुळे दिल्ली आणि हरियाणाच्या उत्तर-पश्चिम भागांमधील कनेक्टिव्हीटी  वाढेल. रोहिणी, बवाना, नरेला आणि कुंडली यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना या मार्गाचा लाभ होईल. निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रवेश यामुळे सुकर होणार आहे. एकदा कार्यान्वित झाल्यावर या विस्तारित  `रेड लाईन`द्वारे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात प्रवास सुलभ होईल.

पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील रोहिणी इथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेसाठी (सीएआरआय) नवीन अत्याधुनिक इमारतीची पायाभरणी केली. या इमारतीचा खर्च सुमारे 185 कोटी रुपये असेल. या ठिकाणी अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि औषधांच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता असेल. नवीन वास्तूमध्ये प्रशासकीय विभाग, ओपीडी विभाग, आयपीडी विभाग आणि एक समर्पित उपचार विभाग असेल. यामुळे रुग्ण आणि संशोधकांसाठी एकात्मिक आणि सुरळीत आरोग्य सेवा अनुभव सुनिश्चित केला जाईल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Year Ender 2025: Major Income Tax And GST Reforms Redefine India's Tax Landscape

Media Coverage

Year Ender 2025: Major Income Tax And GST Reforms Redefine India's Tax Landscape
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2025
December 29, 2025

From Culture to Commerce: Appreciation for PM Modi’s Vision for a Globally Competitive India