पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमाराला ते भावनगर येथे 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात सहभागी होणार असून, 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या वेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
त्यानंतर, पंतप्रधान धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील. दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला ते एका आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाला भेट देतील.
सागरी क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान सागरी क्षेत्राशी संबंधित 7,870 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन करतील. ते श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, कोलकाता येथे नवीन कंटेनर टर्मिनल आणि संबंधित सुविधांची पायाभरणी करतील; पारादीप बंदर येथे नवीन कंटेनर बर्थ, माल हाताळणी सुविधा आणि संबंधित विकास कामे; टुना टेकरा मल्टी-कार्गो टर्मिनल; कामराजर बंदर, एन्नोर येथे अग्निशमन सुविधा आणि आधुनिक रस्ता कनेक्टिव्हिटी; चेन्नई बंदर येथे सागरी भिंती आणि रिव्हेटमेंट्ससह किनारी संरक्षण कामे; कार निकोबार बेटावर सागरी भिंत बांधकाम; दीनदयाळ बंदर, कांडला येथे बहुउद्देशीय मालवाहू बर्थ आणि ग्रीन बायो-मेथेनॉल प्लांट; आणि पाटणा आणि वाराणसी येथे जहाज दुरुस्ती सुविधांची पायाभरणी करतील.
आपल्या सर्वंकष आणि शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेच्या पुर्ततेच्या अनुषंगाने पंतप्रधान गुजरातमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या 26,354 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध क्षेत्रांमधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते छारा बंदरातील हिंदुस्तान पेट्रोलियम द्रवरूप वायू इंधन पुनर्वायुकरण टर्मिनल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या गुजरातमधील तेलशुद्धीकरण प्रकल्पातील ॲक्रेलिक्स आणि ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, 600 मेगावॅट ग्रीन शू उपक्रम, शेतकऱ्यांसाठी 475 मेगावॅटचा प्रधानमंत्री कुसुम सी कंपोनंटयुक्त सौर फीडर, 45 मेगावॅटचा बडेली सौर फोटोव्होल्टेइक प्रकल्प आणि धोर्डो गावाचे पूर्ण सौरऊर्जीकरण अशा अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यासोबतच द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनविषयक पायाभूत सुविधा, अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, सागरी किनारपट्टीशी संबंधित संरक्षणविषयक कामे, महामार्ग, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूकीशी संबंधित प्रकल्पांचीही पायाभरणी करतील. यात भावनगरमधील सर टी. सामान्य रुग्णालय आणि जामनगरमधील गुरु गोविंद सिंह शासकीय रुग्णालयाच्या विस्ताराच्या कामांसह, 70 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राची हवाई पाहणीही करतील. इथे शाश्वत औद्योगिकीकरण, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि जागतिक गुंतवणुकीच्या आधारे एक हरीत औद्योगिक शहर विकसित केले जात आहे. याच बरोबरीने पंतप्रधान लोथल इथे सुमारे 4,500 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जात असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाला भेट देतील आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतील. भारताच्या प्राचीन सागरी परंपरा जपण्यासाठी तसेच पर्यटनाचे, संशोधनाचे, शिक्षणाचे आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून हे संकुल उभारले जात आहे.


