पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक प्रवेश म्हणजेच सर्वांसाठी ही हस्तलिखिते खुली करण्यासाठी समर्पित डिजिटल ज्ञान भारतम पोर्टलचेही उद्घाटन पंतप्रधान करतील. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करतील.
ही परिषद 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान "हस्तलिखितांच्या अमूल्य भांडारातून भारताचा ज्ञान वारसा पुन्हा मिळवणे" या संकल्पने अंतर्गत आयोजित केली जात आहे. या परिषदेत भारताच्या अमूल्य हस्तलिखीत संपत्तीचे पुनरुज्जीवन करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी आणि ही संपत्ती जागतिक ज्ञान संवादाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आघाडीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरण तज्ज्ञ एकत्र येत आहेत. यामध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रदर्शन आणि हस्तलिखीत संवर्धन, डिजिटायझेशन तंत्रज्ञान, मेटाडेटा मानके, कायदेशीर चौकट, सांस्कृतिक राजनैतिकता आणि प्राचीन लिपींचा माहिती, त्यांचे अर्थ निर्धारण, यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण सादरीकरणे केली जाणार आहेत.


