या अभियानाअंतर्गत आपले वैज्ञानिकांचे पथक प्रयोगशाळेमधून बाहेर पडून शेतापर्यंत जाईल आणि शेतकऱ्यांना संपूर्ण डेटासह आधुनिक शेतीची माहिती देईल आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत करेल : पंतप्रधान
भारतीय शेतीला विकसित भारताचा मुख्य आधार बनवणे हा या अभियानाचा संकल्प आहे : पंतप्रधान
भारताने केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते सीमित राहू नये तर जागतिक अन्न पुरवठादार म्हणूनही उदयास यावे : पंतप्रधान
विकसित कृषी संकल्प अभियान शेतीमध्ये आधुनिकीकरणाला चालना देत शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित कृषी संकल्प अभियानाला संबोधित केले. याप्रसंगी ते म्हणाले की, विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे तसेच  कृषी विकासाला पाठबळ  देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मान्सूनच्या प्रारंभासोबत आणि खरीप हंगामाची तयारी सुरू होण्यासोबत, पुढील 12 ते 15 दिवसांमध्ये वैज्ञानिक, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांची 2000 पथके 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील आणि गावोगावी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याप्रति त्यांच्या समर्पणाची दखल घेत , त्यांनी सर्व शेतकरी आणि या पथकांमधील सहभागींना शुभेच्छा दिल्या.

शेती हा पारंपारिकपणे राज्याचा विषय आहे, प्रत्येक राज्य धोरणे आखते आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेते हे अधोरेखित करून, वेगाने बदलणाऱ्या काळासोबत, भारताच्या कृषी क्षेत्रातही लक्षणीय परिवर्तनाची आवश्यकता आहे यावर मोदी यांनी भर दिला.त्यांनी नमूद केले की भारतीय शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे, धान्याची कोठारे भरली आहेत, परंतु बाजारपेठेतील गणिते  आणि ग्राहकांची प्राधान्ये देखील बदलत आहेत. राज्ये आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने कृषी व्यवस्थांमध्ये आधुनिक सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी नमूद केले की या अभियानांतर्गत ,वैज्ञानिक पथके प्रयोगशाळेमधून शेतावर जातील , शेतकऱ्यांपर्यंत व्यापक माहिती पोहोचवतील आणि त्यांना प्रगत कृषी ज्ञानाने सुसज्ज करतील. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही पथके तयार राहतील यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या कृषी वैज्ञानिकांनी  गेल्या काही दशकांमध्ये केलेली महत्त्वपूर्ण संशोधन प्रगती, शेतीच्या परिणामांवर त्यांचा सकारात्मक परिणाम अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी नवीन तंत्रांचा यशस्वी प्रयोग करून उल्लेखनीय उत्पादन मिळवणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचे कौतुक केले. वैज्ञानिक संशोधन आणि यशस्वी शेती पद्धती व्यापक शेतकरी समुदायापर्यंत पोहचणे अत्यावश्यक आहे याचे महत्त्व अधोरेखित कताना, पंतप्रधानांनी नमूद केले की प्रयत्न सुरु आहेत मात्र आता नवीन उर्जेने या उपक्रमांना गती देण्याची गरज आहे.

"विकसित कृषी संकल्प अभियान, ज्ञानाची पोकळी भरून काढण्यासाठी एक मौल्यवान संधी प्रदान करते. या अभियानामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाचा लाभ घेता येईल",असे पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारतासाठी,भारताचे कृषी क्षेत्र देखील विकसित झाले पाहिजे,यावर पंतप्रधानांनी भर दिला. केंद्र सरकार कृषी क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशाने अनेक प्रमुख क्षेत्रांवर प्रकाश टाकत आहे,हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा,कृषी अर्थव्यवस्था मजबूत बनवावी आणि राष्ट्रीय गरजांनुसार पीक उत्पादनाचे संरेखन करावे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला."भारताने केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते मर्यादित राहू नये  तर जागतिक अन्न पुरवठादार म्हणूनही उदयास आले पाहिजे", असे ते म्हणाले. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे, कमीत कमी पाण्याच्या वापरातून धान्य उत्पादन वाढवणे, हानिकारक रसायनांपासून मातीचे आरोग्य संरक्षित करणे, शेती तंत्रांचे आधुनिकीकरण करणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतापर्यंत नेणे आवश्यक आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या 10-11 वर्षांत सरकारने या क्षेत्रांमध्ये व्यापक प्रयत्न केले आहेत यावर त्यांनी भर दिला. मोहिमेतील सर्व सहभागींनी शेतकरी जागरूकता वाढवावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी प्रगतीची चांगली माहिती मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, शेतकऱ्यांच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या प्रमुख उपक्रमांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. शेताच्या बांधावर सौर पॅनेल बसवल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते असे त्यांनी सांगितले.  मधुमक्षिका पालन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे, त्यामुळे अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधू क्रांतीच्या परिणामाबाबत बोलताना सांगितले. शेतातल्या कचऱ्याचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याची, कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करण्याची गरज देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केली. 'श्री अन्न' लागवडीसाठी योग्य क्षेत्रे निश्चित करण्याचे आणि कृषी उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन वाढवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. दूध न देणारी भाकड गुरे देखील आता गोबरधन योजनेद्वारे अर्थव्यवस्थेत योगदान देत असून त्यातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग आणि त्यांना मिळणारे फायदे सुनिश्चित करण्यासाठी या नवोन्मेषाबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

"भारताचे कृषी क्षेत्र, विकसित भारताची कोनशिला बनली पाहिजे", अशा शब्दात मोदी यांनी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी भेट देणाऱ्या शास्त्रज्ञांना भेट देण्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनी या शास्त्रज्ञांना प्रश्न विचारण्यासाठी आणि मौल्यवान ज्ञान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी आपल्या ध्येयाचे महत्त्व ओळखावे असे आवाहन त्यांनी केले. आपली वचनबद्धता नियमित सरकारी कामाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सेवेच्या भावनेतून प्रतिबिंबित झाली पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना व्यापकपणे सोडवण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या मौल्यवान सूचनांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. "विकसित कृषी संकल्प अभियान भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करील तसेच शेतीमध्ये आधुनिकीकरण आणेल", असे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले आणि सर्व हितसंबंधांना शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi