नमस्कार,

आज आपल्यासोबत संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्व जपानच्या विविधतेचे आणि ऊर्जेचे जिवंत प्रतिबिंब आहात.

या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.

महामहिम,

भारत आणि जपान यांचे संबंध हजारो वर्षांपासून दृढ आणि सखोल आहेत. हे नाते भगवान बुद्धांच्या करुणेच्या सूत्राने जोडले गेले आहे. बंगालचे न्यायमूर्ती राधाबिनोद पाल यांनी टोक्यो ट्रायल्समध्ये ‘न्यायाला ‘धोरणापेक्षा प्राधान्य दिले. आपण त्यांच्या अदम्य धैर्याशी जुळलेलो आहोत. माझी जन्मभूमी गुजरातमधील हिऱ्यांचे व्यापारी मागील शतकाच्या प्रारंभी कोबे येथे पोहोचले होते. हमा-मात्सू येथील कंपनीने भारताच्या मोटारवाहन क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. या दोन्ही देशांच्या उद्योगशीलतेच्या आत्म्याने आपल्याला परस्परांशी अधिक घट्ट बांधले आहे. अशा अनेक कथा, अनुभव आणि नाती आहेत जी भारत आणि जपानला आपुलकीच्या नात्याने घट्ट बांधतात. आज या संबंधांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, सुरक्षा, कौशल्यविकास आणि संस्कृती या क्षेत्रांत नवे अध्याय लिहिले जात आहे. हे संबंध केवळ टोक्यो किंवा नवी दिल्लीपुरते मर्यादित नसून, भारत आणि जपानच्या जनतेच्या भावविश्वातही ते दृढपणे रूजलेले आहेत.

महामहिम,

पंतप्रधान होण्यापूर्वी जवळपास दिड दशक मी गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. त्या काळात मला जपान भेटीचेही सौभाग्य लाभले. मला जाणवले की राज्ये आणि प्रांत यांच्या अंगी अपार क्षमता आणि व्यापक संधी दडलेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून कार्य करताना माझा भर धोरणकेंद्रित प्रशासनावर होता. उद्योगांना प्रोत्साहन देणे, भक्कम पायाभूत सुविधा उभारणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे. आज त्यालाच लोक “गुजरात मॉडेल” म्हणून ओळखतात. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मी तोच दृष्टिकोन राष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य भाग बनवला. आम्ही राज्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण केली, त्यांना राष्ट्रीय प्रगतीचे व्यासपीठ बनवले. जपानच्या प्रांतांप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची ओळख, वैशिष्ट्ये आणि भौगोलिक ओळख आहे. कुणाकडे समुद्रकिनारा आहे, तर कुणी पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले आहे. या विविधतेला आम्ही विकासाचे साधन बनवले. प्रत्येक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आणि ओळखीला बळ देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन हे (वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक् ) अभियान राबवले. जे जिल्हे आणि तालुके राष्ट्रीय विकासात मागे राहिले होते त्यांच्यासाठी अकांक्षित जिल्हा आणि अकांक्षित तालुका कार्यक्रम कार्यान्वित केले. सीमावर्ती भागातील खेड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रम राबवण्यात आला. आज तीच गावे आणि जिल्हे राष्ट्रीय प्रगतीची नवी केंद्रे ठरत आहेत.

मान्यवरहो,

आपले प्रिफेक्चर्स तंत्रज्ञान(जपानमधील विविध प्रांतांमधले तंत्रज्ञान), उत्पादन आणि नवोन्मेष यांचे खरे शक्तिस्थान आहे. काही प्रिफेक्चर्सची (जपानमधील राज्य किंवाषप्रांत) अर्थव्यवस्था तर अनेक देशांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांची जबाबदारीही मोठी आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्याचे भविष्य तुमच्या हातांनी लिहिले जात आहे. भारताच्या अनेक राज्यांची आणि प्रिफेक्चर्सची आधीपासून भागीदारी आहे. उदा. –

गुजरात – शिझुओका

उत्तर प्रदेश – यमानाशी

महाराष्ट्र – वकायामा

आंध्र प्रदेश – तोयामा

परंतु माझी अशी धारणा आहे की ही भागीदारी फक्त कागदावरच न राहता, कागदावरुन लोकांपर्यंत आणि लोकांपासून समृद्धीपर्यंत पोहोचली पाहिजे.

आमची इच्छा आहे की भारतातील प्रत्येक राज्यही आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केंद्र बनावे. ह्याच दृष्टिकोनातून काल मी आणि पंतप्रधान इशिबा यांनी मिळून स्टेट–प्रीफेक्चर पार्टनरशिप इनिशिएटिव्ह हा भारतीय राज्य आणि जपानचे प्रांत यांच्यातील भागीदारीचा उपक्रम सुरू केला आहे. आमचा उद्देश स्पष्ट आहे – दरवर्षी किमान तीन भारतीय राज्ये आणि तीन जपानी प्रीफेक्चर्स यांची प्रतिनिधीमंडळे एकमेकांना भेट देतील.

मी आपणा सर्वांना मनापासून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो आणि भारतभेटीचे निमंत्रण देतो!

भारताची राज्ये आणि जपानची प्रीफेक्चर्स मिळून आपल्या सामायिक प्रगतीचे सह-चालक बनू देत.

आपले प्रांत (प्रीफेक्चर्स) ही केवळ मोठ्या कंपन्यांचीच नव्हे, तर लघु-मध्यम उद्योग (SMEs) आणि नवंउद्योगांची (स्टार्ट-अप्स) सुपीक भूमी आहे. भारतातही, छोट्या शहरांमधून उगम पावलेले स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (MSME), देशाच्या विकासकथेला गती देत आहेत.

जपान आणि भारतातील या चैतन्यशील परिसंस्था जर एकत्र आल्या, तर –

कल्पनांचे वारे वाहू लागतील,

नवोन्मेष बहरेल,

आणि संधींची नवी कवाडे उघडतील!

मला आनंद आहे की ह्याच विचाराने कान्साईमध्ये बिझनेस एक्स्चेंज फोरम हा व्यवसाय विनिमय मंच सुरू करण्यात येत आहे. या मंचाद्वारे, कंपन्यांमध्ये थेट संवाद साधला जाईल, नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल, स्टार्ट-अप्समधील भागीदारी अधिक दृढ होईल आणि कुशल व्यावसायिकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

महोदयहो,

जेव्हा तरुण मने जोडली जातात, तेव्हा महान राष्ट्रे एकत्र उंच भरारी घेतात.

जपानची विद्यापीठे जगप्रसिद्ध आहेत. अधिकाधिक भारतीय विद्यार्थी येथे यावेत, शिकावेत आणि त्यांनी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने काल पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत आम्ही एक कृती योजना (ॲक्शन प्लॅन) सुरू केली आहे. या अंतर्गत पुढील 5 वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये, 5 लाख लोकांना एकमेकांच्या देशांमध्ये (भारत-जपान) येण्या जाण्याला (देवाणघेवाणीला) प्रोत्साहन दिले जाईल. तसेच 50,000 भारतीय कुशल व्यावसायिकांना जपानमध्ये पाठवले जाईल. या उपक्रमात प्रीफेक्चर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. मला विश्वास आहे की यात आपणा सर्वांचे सक्रिय सहकार्य लाभेल.

महोदयहो,

माझी अशी इच्छा आहे की जसे आपले देश एकत्र पुढे जात आहेत, तद्वतच जपान आणि भारतातील प्रत्येक राज्य यांच्याकडून नवीन उद्योगधंद्यांची उभारणी होवो, नवी कौशल्ये विकसित होवोत आणि आपल्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण होवोत.

टोकियो आणि दिल्ली नेतृत्व करू शकतातच.

पण —

कानागावा आणि कर्नाटक एकत्र भूमिका मांडू देत.

आइची आणि आसाम एकत्र स्वप्ने पाहू देत.

ओकायामा आणि ओदिशा एकत्र भविष्य घडवू देत.

खूप खूप आभार!.

अरिगातो गोझाईमासु ( जपानी भाषेत विनम्र आभार)!!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions