महोदय,

नमस्कार!

सुरुवातीला, मी या शिखर परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल थायलंडच्या पंतप्रधान महामहिम शिनावात्रा आणि थायलंड सरकारचे मनापासून आभार मानतो.

महोदय,

सर्वप्रथम, भारतीय जनतेच्या वतीने, म्यानमार आणि थायलंडमध्ये अलिकडेच झालेल्या भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल मी अतीव दुःख व्यक्त करतो. याची झळ पोहोचलेल्यांसोबत आम्ही सर्व खंबीरपणे उभे असून जखमींच्या तब्येतीत त्वरित आराम पडावा अशी कामना करतो.

महोदय,

गेल्या तीन वर्षात बिमस्टेकचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांच्या टीमने केलेल्या सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.

बिमस्टेक, दक्षिण आणि आग्नेय आशिया दरम्यान एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असून प्रादेशिक संपर्क, सहकार्य आणि सामायिक समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी एक प्रभावी मंच म्हणून उदयास येत आहे.

गेल्या वर्षी बिमस्टेक सनद अमलात आली ही खूप समाधानाची बाब आहे. मला विश्वास आहे की आज आपण स्वीकारत असलेला बँकॉक दृष्टिकोन 2030, हा बंगालच्या उपसागर क्षेत्रात समृद्ध, सुरक्षित आणि समावेशकतेच्या आपल्या सामूहिक बांधिलकीला आणखी बळकटी देईल.

महोदय,

बिमस्टेकला अधिक बळकट करण्यासाठी, आपण त्याची व्याप्ती आणि त्याची संस्थात्मक क्षमता वाढवत राहिले पाहिजे.

गृहमंत्र्यांची यंत्रणा संस्थात्मक केली जात आहे ही बाब उत्साहवर्धक आहे. सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा धोके, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करीविरुद्धच्या लढाईत हा मंच मोठी भूमिका बजावू शकतो. या संदर्भात, या वर्ष अखेरीस भारतात  या यंत्रणेची पहिली बैठक आयोजित करण्याचा मी  प्रस्ताव ठेवतो.

 

महोदय,

प्रादेशिक विकासासाठी,भौतिक कनेक्टिव्हिटीसह   डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटीदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

बेंगळुरू येथील बिमस्टेक ऊर्जा केंद्राने आपले कामकाज सुरू केल्याचे नमूद करताना मला आनंद होत आहे. आपल्या टीम्सनी  संपूर्ण प्रदेशात इलेक्ट्रिक ग्रिड इंटरकनेक्शन साध्य करण्यासाठी प्रयत्नांना गती द्यावी असे मी सुचवतो.

भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी (डीपीआय) सार्वजनिक सेवांच्या वितरणात क्रांती घडवून आणली आहे. यामुळे सुशासनाला चालना मिळाली असून पारदर्शकता वाढली आहे आणि आर्थिक समावेशनाला गती मिळाली आहे. बिमस्टेक सदस्य राष्ट्रांसोबत आमचा डीपीआय अनुभव सामायिक करण्यास आम्हाला आवडेल. याच्या पुढील वाटचालीसाठी, या क्षेत्रातील बिमस्टेक देशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्ये चांगल्या प्रकारे समजून घेऊन प्रायोगिक अध्ययन करता येईल.

भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि बिमस्टेक सदस्य देशांची पेमेंट प्रणाली यांच्यात कनेक्टिव्हिटी स्थापित करण्याचा प्रस्ताव देखील मी देऊ इच्छितो. अशा एकात्मतेमुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांमध्ये लक्षणीय फायदे होतील आणि सर्व स्तरांवर आर्थिक क्रियाकलाप वाढतील.

महोदय,

आपल्या सामूहिक प्रगतीसाठी व्यापार आणि व्यावसायिक संपर्क तितकेच महत्त्वाचे आहेत.

आपल्या व्यावसायिक समुदायांमध्ये सहकार्य आणि समन्वय मजबूत करण्यासाठी मी बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवतो. याव्यतिरिक्त, आर्थिक सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी वार्षिक बिमस्टेक व्यवसाय शिखर परिषद आयोजित केली जाईल.

बिमस्टेक प्रदेशात स्थानिक चलनांमध्ये व्यापाराच्या क्षमतेची चाचपणी करण्याच्या दृष्टीने व्यवहार्यता अभ्यास करण्याचे मी सुचवेन.

 

महोदय,

एक मुक्त, खुले, सुरक्षित आणि नि:शंक  हिंद महासागर ही आमची सामायिक प्राथमिकता आहे. आज झालेल्या सागरी वाहतूक करारामुळे व्यापारी नौवहन आणि मालवाहतूक यांच्यातील सहकार्य बळकट होऊन संपूर्ण प्रदेशात व्यापाराला लक्षणीय चालना मिळेल.

भारताने शाश्वत सागरी वाहतूक केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हे केंद्र क्षमता निर्माण, संशोधन, नवोन्मेष आणि सागरी धोरणात अधिक समन्वय वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल.  संपूर्ण प्रदेशात सागरी सुरक्षेसाठी आपले सहकार्य वाढवणारा उत्प्रेरक म्हणून देखील काम करेल.

महोदय,

बिमस्टेक प्रदेश नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने  किती नाजूक  आहे याची स्पष्ट जाणीव अलीकडील भूकंपाने करून दिली आहे.

संकटाच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून भारत नेहमीच आपल्या मित्रांच्या पाठीशी उभा राहिला आहे. म्यानमारच्या लोकांना वेळेवर मदत पोहोचवण्यात आम्हाला यश आले, हे आम्ही आमचे भाग्य मानतो. नैसर्गिक आपत्ती रोखता येऊ शकत नाहीत, परंतु जलद प्रतिसाद देण्याची आपली सज्जता आणि क्षमता कायम बळकट असल्या पाहिजेत.

या संदर्भात मी भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी बिमस्टेक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडतो. हे केंद्र आपत्ती सज्जता, मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमधील सहकार्य सुलभ करेल. याव्यतिरिक्त बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा चौथा संयुक्त सराव या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित केला जाईल.

महोदय,

सार्वजनिक आरोग्य हा आपल्या सामूहिक सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत बिमस्टेक देशांमध्ये कर्करोग उपचारांमधील प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी यासाठी सहयोग देईल. आरोग्याबाबतच्या आपल्या समग्र दृष्टिकोनाच्या अनुषंगाने पारंपरिक औषधांचे संशोधन आणि प्रसार यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र देखील स्थापन केले जाईल.

त्याचप्रमाणे, आपल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आम्ही भारतात ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान, संशोधन सहकार्य आणि कृषी क्षेत्रातील क्षमता बांधणी यावर लक्ष केंद्रित करणारे आणखी एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवतो.

महोदय,

भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश क्षेत्रात केलेली प्रगती ग्लोबल साऊथच्या सर्व युवकांना प्रेरणा देते आहे. सर्व बिमस्टेक देशांबरोबर आम्ही आमचे अनुभव व कौशल्य सामायिक करण्यास तयार आहोत. मी प्रस्ताव ठेवतो की  याविषयात बिमस्टेक देशांच्या मनुष्यबळ प्रशिक्षणासाठी, नॅनो उपग्रहांच्या विकसन आणि प्रक्षेपणासाठी व रिमोट सेन्सिंग डेटाचा बिमस्टेक देशांसाठी उपयोग करून देण्यासाठी आम्ही एक केंद्र स्थापित करू इच्छितो. 

 

महोदय,

या क्षेत्रातील युवाकौशल्य प्रशिक्षणासाठी आम्ही 'बोधी' हा उपक्रम सुरु करत आहोत. BODHI अर्थात ‘मनुष्यबळ संरचनेच्या नियोजनपूर्ण विकासासाठी बिमस्टेक’ हा उपक्रम. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी बिमस्टेक सदस्य देशांमधील 300 युवकांना भारतात प्रशिक्षण दिले जाईल. भारताच्या वन संशोधन संस्थेतर्फे बिमस्टेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातील, तसेच नालंदा विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेचा  विस्तार केला जाईल. बिमस्टेक देशांमधील युवा राजकीय नेत्यांसाठी  वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल.

महोदय,

आपला  सामायिक सांस्कृतिक वारसा आपल्या संबंधांचा मजबूत पाय आहे. 

ओडिशातील बाली जात्रा , बौद्ध व हिंदू परंपरांमधील खोलवर मुळे असलेले ऐतिहासिक दुवे , व आपल्यातील भाषिक जवळीक - या सर्वांमधून आपल्या सांस्कृतिक अनुबंधांची  प्रभावी प्रतीके दिसून येतात. या अनुबंधांचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतात  या वर्षी पहिला 'बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव' आयोजित केला जाईल.

महोदय,

आपल्या युवकांमध्ये अधिक आदानप्रदान  घडवून आणण्यासाठी यावर्षाअखेरीस 'बिमस्टेक युवा नेते  शिखर परिषद' आयोजित केली जाईल.  नवोन्मेष व सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही 'बिमस्टेक हॅकॅथॉन' व 'युवा व्यावसायिक भेट' कार्यक्रम देखील आयोजित करू.

क्रीडाक्षेत्रात भारतात यंदा  'बिमस्टेक अॅथलेटिक्स मेळावा' आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. वर्ष  2027 मध्ये  बिमस्टेकच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त भारत बिमस्टेक खेळांचे  आयोजन करेल. 

महोदय,

आमच्यासाठी बिमस्टेक ही केवळ प्रादेशिक संस्था नाही.  हे सर्वसमावेशक विकास व सुरक्षेचे प्रारूप आहे. आपल्या सामायिक वचनबद्धतेचे व सामूहिक  शक्तीचे हे एक प्रतीक आहे.

'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' या घोषणेचे हे मूर्तरूप आहे.

आपण आपली एकजूट, सहकार्य व परस्पर विश्वासाला अधिक बळकट करत बिमस्टेकला अधिक बळकट करू आणि मोठ्या उंचीवर नेऊ असा मला विश्वास आहे. अखेरीस, बिमस्टेकचे  आगामी  अध्यक्ष  म्हणून मी बांगलादेशचे स्वागत करतो आणि त्यांच्या यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा  देतो. 

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pens heartfelt letter to BJP's new Thiruvananthapuram mayor; says

Media Coverage

PM Modi pens heartfelt letter to BJP's new Thiruvananthapuram mayor; says "UDF-LDF fixed match will end soon"
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2026
January 02, 2026

PM Modi’s Leadership Anchors India’s Development Journey