भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो, भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत: पंतप्रधान
आपल्याकडे लडाखमध्ये जगातील सर्वात उंच खगोलशास्त्रीय वेधशाळांपैकी एक असून ती समुद्रसपाटीपासून 4,500 मीटर उंचीवर म्हणजेच जणू ताऱ्यांशी हस्तांदोलन करण्याइतपत जवळ आहे: पंतप्रधान
वैज्ञानिक जिज्ञासा जोपासण्यासाठी आणि तरुण मनांना सक्षम करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे: पंतप्रधान
विश्वाचा धांडोळा घेत असताना आपण हे देखील विचारले पाहिजे की अवकाशविज्ञान पृथ्वीवरील लोकांचे जीवन कसे सुधारू शकते: पंतप्रधान
भारत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि हे ऑलिंपियाड तीच भावना प्रतिबिंबित करते: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला संबोधित केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी 64 देशांमधील 300हून अधिक सहभागींशी संपर्क साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी त्यांचे भारतात स्वागत केले. 

"भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत", असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे  विधान प्रथम केले. "शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!" असे पंतप्रधानांनी नमूद केले.

"भारताकडे समुद्रसपाटीपासून 4,500मीटर उंचीवर असलेल्या  लडाखमध्ये जगातील सर्वात उंच खगोलशास्त्रीय वेधशाळांपैकी एक वेधशाळा आहे.  ताऱ्यांशी हस्तांदोलन करण्याइतकी ती जवळ आहे!", असे  मोदी यांनी नमूद  केले. पुण्यातील महाकाय  मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचाही त्यांनी उल्लेख केला आणि ती जगातील सर्वात संवेदनशील रेडिओ दुर्बिणींपैकी एक असल्याचे सांगितले जी पल्सर , क्वासार आणि आकाशगंगांचे रहस्य उलगडण्यात मदत करते.  भारत स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे आणि लिगो-इंडिया सारख्या जागतिक महा-विज्ञान  प्रकल्पांमध्ये अभिमानाने योगदान देत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी चंद्रयान--3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरणारी पहिली मोहीम बनून इतिहास रचला होता याची आठवण त्यांनी करून दिली.  मोदी पुढे म्हणाले की, आदित्य-एल 1 सौर वेधशाळेद्वारे भारताने सूर्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे जी सौर ज्वाला, वादळे आणि सूर्याच्या मूड स्विंग्जचे निरीक्षण करते. गेल्या महिन्यात ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांची ऐतिहासिक मोहीम  पूर्ण केली , जो सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आणि युवा  संशोधकांसाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक जिज्ञासा जोपासण्यासाठी आणि युवा मनांना सक्षम करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे हे स्पष्ट करून पंतप्रधानांनी अटल टिंकरिंग लॅबमध्ये प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे 1 कोटींहून अधिक विद्यार्थी STEM संकल्पना समजून घेत आहेत आणि त्यातून शिक्षण आणि नवोन्मेषाची संस्कृती निर्माण करत आहेत यावर भर दिला. सर्वांना ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी, 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजना सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मोदी यांनी दिली. यामुळे  लाखो विद्यार्थी आणि संशोधकांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्स मोफत उपलब्ध होणार आहे.  STEM क्षेत्रात महिलांच्या सहभागात भारत हा आघाडीचा देश आहे असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, विविध उपक्रमांतर्गत संशोधन परिसंस्थेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे. तसेच त्यांनी जगभरातील तरुण बुद्धिमानांना भारतात येऊन शिक्षण, संशोधन आणि सहकार्य करण्याचे आमंत्रण दिले. “कदाचित पुढील मोठा वैज्ञानिक शोध अशा भागीदारीतूनच साकार होईल!” असे ते म्हणाले.

मानवजातीच्या हितासाठी आपल्या प्रयत्नांना दिशा देण्याचे आवाहन करताना, पंतप्रधान मोदी यांनी तरुण संशोधकांना अवकाश विज्ञानाद्वारे पृथ्वीवरील जीवन अधिक चांगले कसे करता येईल याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्यांनी, शेतकऱ्यांना अधिक सक्षम हवामान अंदाज कसे देता येतील? नैसर्गिक आपत्तींचा पूर्वानुमान करता येईल का? वनात लागणाऱ्या आगी आणि वितळणारे हिमनग यांचे निरीक्षण करता येईल का? दुर्गम भागांसाठी अधिक चांगली संवाद व्यवस्था निर्माण करता येईल का? असे महत्वपूर्ण प्रश्न मांडले. 

त्याचबरोवर पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, विज्ञानाचे भविष्य हे तरुणांच्या हातात आहे आणि ते कल्पकता व संवेदनशीलतेने प्रत्यक्ष समस्यांचे समाधान करण्यात आहे. सोबतच त्यांनी आवाहन केले की, विश्वाचा धांडोळा घेताना, “व्हॉट इज आऊट देअर ?” या प्रश्नासोबत “अवकाश विज्ञानाचा उपयोग पृथ्वीवरील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी कसा होऊ शकतो?” याचाही विचार करा.

“भारत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि हा ऑलिंपियाड त्याच भावनेचे प्रतीक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. यंदाचे ऑलिंपियाड हे  आतापर्यंतचा सर्वात मोठे असून, त्यासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले.

पंतप्रधान मोदी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवण्यास  आणि मोठी स्वप्ने पाहण्यास  प्रोत्साहन दिले. “आणि लक्षात ठेवा, भारतात आम्ही मानतो की आकाश ही मर्यादा नाही, ती फक्त सुरुवात आहे!”

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India attracts $70 billion investment in AI infra, AI Mission 2.0 in 5-6 months: Ashwini Vaishnaw

Media Coverage

India attracts $70 billion investment in AI infra, AI Mission 2.0 in 5-6 months: Ashwini Vaishnaw
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 जानेवारी 2026
January 31, 2026

From AI Surge to Infra Boom: Modi's Vision Powers India's Economic Fortress