400 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताची क्षमता दर्शविणारीः पंतप्रधान मोदी
गेल्या वर्षभरात जीईएम पोर्टल च्या माध्यमातून सरकारडून एक लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंची खरेदीः पंतप्रधान
126 वर्षीय बाबा शिवानंद यांचा फिटनेस सर्वांसाठीच प्रेरणादायीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
भारताचा योग आणि आयुर्वेद सध्या जगभर चर्चेमध्येः पंतप्रधान मोदी
पाणी वाचविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
मुलांनी स्वच्छता ही चळवळ बनविली, ते ‘वॉटर वॉरियर’ बनून पाणी वाचवण्यास मदत करू शकतात: पंतप्रधान
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या मुलींना शिक्षण देण्याचे मी त्यांच्या मातापित्यांना आणि पालकांना आवाहन करतो: पंतप्रधान

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

नमस्कार!

गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.

 

मित्रांनो,

देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी नवी उत्पादने परदेशात जात आहेत, आसामच्या हैलाकांडीची चामड्याची उत्पादने असोत की उस्मानाबादची हातमाग उत्पादने,बीजापूरची फळे – भाज्या असोत की चंदौलीचा काळा तांदूळ, सर्वांची निर्यात वाढत आहे. आता आपल्याला लदाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईत देखील मिळतील आणि सौदी अरबमध्ये तामिळनाडू मधून पाठवली गेलेली केळी मिळतील. आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, नवी नवी उत्पादने नव्या नव्या देशांत पाठवली जात आहेत. उदाहरणार्थ हिमाचल, उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत. त्रिपुरातून ताजे फणस, हवाई मार्गाने लंडनला निर्यात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भालीया गव्हाची पहिली खेप गुजरातमधून केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली. म्हणजे, आता तुम्ही दुसऱ्या देशांत जाल, तर मेड इन इंडिया उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील.

 

मित्रांनो,

ही यादी खूप मोठी आहे आणि जितकी मोठी ही यादी आहे, तितकीच मोठी ‘मेक इन इंडियाची’ शक्ती आहे, तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्याचा आधार आहे – आपले शेतकरी, आपले कारागीर, आपले विणकर, आपले अभियंते, आपले लघु उद्योजक, आपलं एमएसएमई क्षेत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक, हे सगळे याची खरी ताकद आहेत. यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकलो आहोत आणि मला आनंद आहे की भारताच्या लोकांचे हे सामर्थ्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात, नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे. जेव्हा एक – एक भारतीय, लोकल करता व्होकल होतो, म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो, तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही. चला, लोकलला ग्लोबल बनवूया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया.

  

मित्रांनो,

‘मन की बात’ च्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघुउद्योजकांचे यश आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेआहे. आज आपले लघुउद्योजक सरकारी खरेदीत Government e-Marketplace म्हणजेच GeMच्या माध्यमातून मोठी भागीदारी पार पाडत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ जवळ सव्वालाख लघुउत्पादकांनी, छोट्या दुकानदारांनी आपले सामान थेट सरकारला विकले आहे. एक काळ होता जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला सामान विकू शकत असत. मात्र, आता देश बदलतो आहे, जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत. आता छोट्यातला छोटा दुकानदार देखील GeMपोर्टलवर सरकारला आपले समान विकू शकतो – हाच तर नवा भारत आहे. हा केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही, तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो, जिथे पूर्वी कोणीच पोचलं नव्हतं. याच साहसाच्या जोरावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देखील नक्की पूर्ण करू.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

नुकत्याच पार पडलेल्या पद्म सन्मान सोहळ्यात आपण बाबा शिवानंद जी यांना नक्की बघितले असेल. 126 वर्षाच्या वृद्धाची चपळता बघून माझ्या प्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल आणि मी बघितलं, डोळ्याची पापणी लावते न लावते तोच, ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले. मी देखील बाबा शिवानंद जी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला. 126 व्या वर्षी बाबा शिवानंद यांचे वय आणि सुदृढ प्रकृती दोन्ही, आज देशात चर्चेचा विषय आहे. मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली, की बाबा शिवानंद, आपल्या वयाच्या चार पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही सुदृढ आहेत. खरोखरच, बाबा शिवानंद याचं जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो. त्यांच्यात योगाविषयी एक जिद्द आहे त्यांची जीवनशैली अतिशय सुदृढ आहे.

 

जीवेत शरदः शतम्.

आपल्या संस्कृतीत सर्वांना शंभर वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपण 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करणार आहोत. आज संपूर्ण जगात आरोग्याविषयी भारतीय चिंतन, मग ते योग असो की आयुर्वेद, याकडे ओढा वाढतो आहे. आत्ता आपण बघितले असेल की गेल्या आठवड्यात कतरमध्ये एक योग कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम बनवला. याचप्रमाणे आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्याने वाढते आहेत. 6 वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ जवळपास 22 हजार कोटी रुपये इतकी होती. आज आयुष उत्पादन उद्योग, एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोचला आहे, म्हणजे या क्षेत्रात संधी सातत्याने वाढत आहेत. स्टार्टअप जगातही आयुष, आकर्षणाचा विषय बनत आहे.

 

मित्रांनो,

आरोग्य क्षेत्राच्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी आधीही अनेक वेळा बोललो आहे, मात्र या वेळी आयुष स्टार्टअप्स वर खास करून बोलणार आहे. एक स्टार्टअप आहे कपिवा (Kapiva!). याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे. यात Ka चा अर्थ आहे – कफ, Pi चा अर्थ आहे – पित्त आणि Vaचा अर्थ आहे वात. ही स्टार्टअप कंपनी, आपल्या परंपरेनुसार उत्तम पोषक आहाराच्या सवयीवर आधारित आहे. आणखी एक स्टार्ट अप निरोग-स्ट्रीट देखील आहे, आयुर्वेद आरोग्यसेवा व्यवस्थेत एक नाविन्यपूर्णकल्पना आहे. याचे तंत्रज्ञान-आधारितव्यासपीठ, जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना थेट लोकांशी जोडून देतो. 50 हजार पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य याच्याशी जोडले गेले आहेत. याचप्रमाणे, ‘आत्रेय इनोव्हेशन्स,’एक आरोग्यसेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे, जे सर्वंकष निरामयता या क्षेत्रात काम करत आहे. Ixoreal (इक्सोरियल) ने केवळ अश्वगंधाच्या उपयोगाविषयीच जागरूकता पसरविली नाही, तर उच्च दर्जा उत्पादन प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. क्युरवेदा (Cureveda) ने वनौषधींच्या आधुनिक शोध आणि पारंपारिक ज्ञानाच्या संयोगातून सर्वंकष जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे.

मित्रांनो,

आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत, ही यादी खूप मोठी आहे. हे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या संधींची काही प्रतीकात्मक उदाहरणे आहेत. मी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील केली  आहे. आपण कुठलेही ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता, जी काही माहिती तयार करता, ती संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये देखील बनवण्याचा प्रयत्न करा. जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही आणि समजतही नाही. अशा देशांचा विचार करुन, आपल्या माहितीचा प्रचार – प्रसार करा. मला खात्री आहे, लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जगावर आपली छाप पाडतील.

 

मित्रांनो,

आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

चला आता आपण बोलूया, केरळच्या के मुपट्टम श्री नारायणन यांच्याविषयी, त्यांनी एक अभियान सुरु केलं आहे, ज्याचं नाव आहे, ‘‘Pots for water of life’- (म्हणजे जीवन देणाऱ्या जलासाठीची भांडी). तुम्हाला जेव्हा या प्रकल्पाबद्दल कळेल, तेव्हा तुम्ही पण विचार कराल, की काय जोरदार काम आहे !

 

मित्रांनो,

मुपट्टम श्री नारायणन जी, उन्हाळ्यात, पशु-पक्ष्यांना तहान लागू नये, पाणी मिळावे यासाठी मातीची भांडी वाटण्याची मोहीम चालवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत. मग यावर उपाय म्हणून त्यांनी विचार केला की आपणच लोकांना मातीची भांडी पुरवली तर मग, लोकांना फक्त त्यात पाणी भरुन पशू-पक्ष्यांसाठी ठेवता येईल. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, की नारायणन जी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या आता एक लाखांपेक्षा अधिक होणार आहे. आपल्या या अभियानातलं  एक लाखावं भांडं ते महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत. आता जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, अशावेळी नारायणन जी यांचे हे काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल आणि आपणही या उन्हाळयात, आपल्या पशु-पक्षी मित्रांसाठी, पाण्याची व्यवस्था कराल.

 

मित्रहो,

‘मन की बात’च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी जलबचतीच्या संकल्पाचा पुनरूच्चार करावा. पाण्याचा अगदी  थेंब न थेंब वाचविण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो, ते ते  जरूर केले पाहिजे. याशिवाय पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण तितकाच जोर देत राहिले पाहिजे. घरामध्ये काही कामांसाठी वापरण्यात येणारे पाणी,  घरातल्या कुंड्यांना घालता येऊ शकत असेल, बगिचाला देता येऊ शकत असेल तर ते जरूर पुन्हा वापरले पाहिजे. अगदी थोडक्या प्रयत्नांमधून तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता. रहीमदास जी, युगांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनं असं  म्हणून गेले आहेत की, ‘‘रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून’’ आणि पाणी वाचविण्याच्या या कामामध्ये मला मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवले, त्याचप्रमाणे ही मुले आता ‘जल योद्धा’ बनून, पाणी वाचविण्यासाठी मदत करू शकतात.

 

मित्रांनो,

आपल्या देशामध्ये जल संरक्षण, जल स्त्रोतांचे रक्षण, अनेक युगांपासून समाजाच्या स्वभावाचा एक भाग आहे. मला आनंद होतो की, देशामध्ये अनेक लोकांनी जल संवर्धनाचे कार्य आपल्या जीवनाचे ‘मिशन’च बनविले आहे. जसे की, चेन्नईचे एक सहाकारी आहेत- अरूण कृष्णमूर्ती जी! अरूण जी यांनी आपल्या भागातल्या तलाव -तळ्यांची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव -तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली. याच प्रमाणे महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे एक कार्यकर्ते आहेत. रोहन व्यवसायाने ‘ एच.आर.’ विभागात आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या पाय-यांच्या शेकडो विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक विहिरी तर शेकडो वर्षे जुन्या, प्राचीन आहेत. अशा विहिरी जणू आपल्या वारशाच्या भाग आहेत. सिकंदराबादमध्ये बन्सीलालपेट इथे  विहीर अशी एक पाय-यांची विहीर आहे, तिच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचं  लक्ष नव्हतं, या उपेक्षेमुळे ही पाय-यांची विहीर माती आणि कच-यानं  झाकून गेली होती. मात्र आता इथं  या पाय-यांच्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम लोकांच्या सहभागातून सुरू केली आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

ज्या भागात पाण्याची सदोदित टंचाई असते, अशा राज्यातून मी आलो आहे. गुजरातमध्ये अशा पाय-यांच्या विहिरींना ‘वाव’ असे म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी ‘जल मंदिर योजने’नं  खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना, आडांना पुनर्जीवित करण्यात आले. यामुळे त्या  त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली. असेच  अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता. ‘चेक डॅम’ बनविण्याचं काम असो, रेन हारवेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनी मुरवून पावसाच्या पाण्याची ‘शेती’ करायचं काम असो, यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणेही गरजे आहे.  त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येवू शकतील. काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जावू शकते. तसेच काही नवीन सरोवर बनविता येवू शकतील. या दिशेने आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल, असा मला विश्वास आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

‘मन की बात’ची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडून मला अनेक भाषांमधून, अनेक बोलीं भाषांमधून संदेश येत असतात. काही लोक मायगव्हवर  ‘ऑडिओ मेसेज’ ही पाठवत असतात. भारताची संस्कृती, आपल्या अनेक भाषा, आपल्या बोलीभाषा, आपले राहणे, वेशभूषा, खाण्याच्या -जेवणाच्या पद्धती यांचा विस्तार, अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे. पूर्वेपासून ते  पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणे पर्यंत भारताची हीच विविधता, सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’बनवत आहे. यामध्येही आपली ऐतिहासिक स्थाने आणि पौराणिक कथा, अशा दोन्हींचे खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वजण विचार करीत असणार की, या सर्व गोष्टी, मी आपल्यासमोर का मांडतोय? याचे कारण आहे, ‘माधवपूर जत्रा’ माधवपूरची जत्रा कुठे भरते,  का भरते? वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माधवपूर जत्रा भारताच्या विविधतेशी कशी जोडली गेली आहे, या जत्रेच्या आयोजनामागचे  कारण जाणून घेणे ‘मन की बात’ च्या श्रोत्यांच्यादृष्टीने अतिशय रंजक ठरणार आहे.

 

मित्रांनो,

‘‘माधवपुर मेला’’ गुजरातमध्ये पोरबंदर इथं  समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर गावात भरतो. मात्र याचं  नातं हिदुंस्तानच्या पूर्व किना-याशी जोडलं  जातं . आता आपण विचार करीत असणार हे कसं शक्य आहे? तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं. असं  म्हणतात की, हजारों वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचा विवाह, ईशान्येकडील राजकुमारी रूक्मिणीबरोबर झाला होता. हा विवाह पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता. आणि त्या विवाहाचे प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर तिथं जत्रा भरविण्यात येते. पूर्व आणि पश्चिम यांचं  घट्ट बनलेलं  नातं म्हणजे, आपला संस्कृती वारसा आहे. काळाच्या बरोबर आता लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी जोडल्या जात आहेत. आपल्याकडे वधुपक्षाला ‘घराती’ असे म्हणतात,  आणि या जत्रेमध्ये आता ईशान्येकडून अनेक ‘घराती’ही येत आहेत. एक आठवडाभर चालणा-या या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांतून कलाकार येत आहेत. हस्तशिल्पी, हस्तकलाकार येत आहेत आणि ही मंडळी या मेळाव्यात अधिक बहार आणतात. एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींचा होणारा हा मेळ, म्हणजे माधवपूर जत्रा आहे आणि तो ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’चे सुंदर उदाहरण बनत आहे. तुम्हीही या मेळाव्याची, जत्रेची माहिती वाचून,  जाणून घ्यावी, असा माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आता लोक सहभागाचे एक नवीन आदर्श उदाहरण बनले आहे. काही दिवसांपूर्वी 23 मार्चला हुतात्मा दिनी देशाच्या कानाकोप-यामध्ये अनेक कार्यक्रम झाले. देशानं  आपल्या स्वातंत्र्यामधल्या नायक-नायिकांचं  स्मरण केलं, श्रद्धापूर्वक स्मरण केलं. याच दिवशी मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लाबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे एक अतिशय अव्दितीय, अद्भूत दालन आहे. जर संधी मिळाली तर, तुम्ही हे दालन पाहण्यासाठी जरूर जावे.

 

मित्रांनो,

एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. या महान विभूती आहेत - महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर! महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला. जल संकटातून मुक्ती मिळावी, यासाठीही त्यांनी मोठं  अभियान चालविलं.

 

मित्रांनो,

महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं, तितकंच जरूरीचं  आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्‍ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं  त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की, कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून, सर्व माता-पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं  असेल, राहिलं  असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे.

 

मित्रांनो,

बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं  कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांचे जन्मस्थान -महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महा-परिनिर्वाणाचे स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की, त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

‘मन की बात’मध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये अनेक सण-उत्सव येत आहेत.  काही दिवसांनीच नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण व्रत-उपवास, शक्तीची साधना करतो. शक्तीची पूजा करतो,  याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचे उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात. संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक पर्व आहे. म्हणूनच नवरात्राचे  आपल्या सर्वांसाठी एक विशेष महत्व असते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सणही आहे. एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही या दिवशी सुरू होत आहे. आपण सर्वांना बरोबर घेवून हे सर्व सण साजरे करावेत, भारताच्या विविधतेला सशक्त बनवावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. यावेळी ‘मन की बात’ मध्ये इतकंच! पुढच्या महिन्यात तुमची पुन्हा एकदा भेट घेवून नवीन विषयांवर तुमच्याबरोबर संवाद साधला जाईल, खूप-खूप धन्यवाद!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
During Diplomatic Dinners to Hectic Political Events — Narendra Modi’s Austere Navratri Fasting

Media Coverage

During Diplomatic Dinners to Hectic Political Events — Narendra Modi’s Austere Navratri Fasting
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 6 ऑक्टोबर 2024
October 06, 2024

PM Modi’s Inclusive Vision for Growth and Prosperity Powering India’s Success Story