माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.
हे याचे देखील द्योतक आहे की अधिकाधिक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात योगसाधना करत आहेत. यावेळी आपण 'योग दिनाची' कितीतरी आकर्षक छायाचित्रे पाहिली आहेत. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी तीन लाख लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. विशाखापट्टणम इथूनच आणखी एक अद्भुत दृश्य समोर आलं आहे. दोन हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांमध्ये 108 सूर्यनमस्कार घातले. विचार करा, किती शिस्तीचं पालन आणि समर्पण असेल. आपल्या नौदलाच्या जहाजांवर देखील योगाभ्यासाची भव्य झलक पहायला मिळाली. तेलंगणामध्ये तीन हजार दिव्यांग मित्र एकत्रितपणे योग शिबिरात सहभागी झाले. त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे योग सशक्तीकरणाचे देखील माध्यम आहे. दिल्लीच्या लोकांनी योगला स्वच्छ यमुनेच्या संकल्पाशी जोडलं आणि यमुना किनारी जाऊन योगसाधना केली. जम्मू-काश्मीरमधला चिनाब पूल, जो जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे, तिथे देखील लोकांनी योगाभ्यास केला. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ‘आयटीबीपी’चे जवान, तिथे देखील त्यांनी योगाभ्यास केला, साहस आणि साधना एकत्र पाहायला मिळाले. गुजरातच्या लोकांनी देखील एक नवीन इतिहास रचला. वडनगर मध्ये 2121 (दोन हजार एकशे एकवीस) लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केलं आणि नवीन विक्रम बनवला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधील योगदिनाची छायाचित्र समोर आली आहेत आणि प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट खास राहिली आहे, शांतता, स्थैर्य आणि संतुलन. या वर्षाची संकल्पना अतिशय खास होती, Yoga for One Earth, One Health, म्हणजे “एक पृथ्वी एक आरोग्य”. ही केवळ एक घोषणा नाही तर एक दिशा आहे जी आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकएम्’ची जाणीव करून देते. मला विश्वास आहे, यावर्षीची योग दिनाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग साधनेचा अवलंब करण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
जेव्हा कुणी तीर्थयात्रेसाठी निघतं, तेव्हा एकच भावना सर्वप्रथम मनात येते, 'चलो बुलावा आया है'. हीच भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे. या यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व, ईश्वराशी जोडले जाण्याचं माध्यम आहे. त्याशिवाय या तीर्थयात्रांची आणखी एक बाजू असते. या धार्मिक यात्रा सेवेच्या संधींचे एक महाअनुष्ठान देखील असतात. जेव्हा कुठलीही यात्रा असते, तेव्हा जितके लोक यात्रेसाठी जातात त्याहून अधिक लोक यात्रेकरूंच्या सेवेच्या कामात सहभागी होतात. ठिकठिकाणी भंडारे आणि लंगर लावले जातात. लोक रस्त्याच्या कडेला ‘प्याऊ’ बसवतात. सेवा भावनेनेच वैद्यकीय शिबीरे आणि सुविधांची व्यवस्था केली जाते. कितीतरी लोक स्वखर्चाने यात्रेकरूंसाठी धर्मशाळांची आणि राहण्याची व्यवस्था करतात.
मित्रांनो,
प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजेच भगवान शिव यांचं धाम. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलास हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, तीन जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि पवित्र श्रावण महिना देखील काही दिवसांवर आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण भगवान जगन्नाथ जी यांची रथयात्रा देखील पाहिली. ओदिशा असेल, गुजरात असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपरा असेल, लाखो श्रद्धाळू या यात्रांमध्ये सहभागी होतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेचे प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धा भावनेनं, पूर्ण समर्पणानं आणि शिस्तबद्धतेनं आपल्या धार्मिक यात्रा पार पाडतो तेव्हा त्याचं फळ देखील मिळतं. यात्रेला जाणाऱ्या सर्व सौभाग्यशाली श्रद्धाळूंना मी माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवाभावनेनं या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी झटत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला देशातल्या दोन अशा यशस्वी कामगिरीबाबत सांगू इच्छितो ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. या कामगिरीची चर्चा जागतिक संस्था करत आहेत. डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएलओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांनी देशाच्या या उपलब्धींची भरपूर प्रशंसा केली आहे. पहिली कामगिरी आहे ती आपल्या आरोग्याशी निगडित आहे . तुमच्यापैकी अनेक लोकांनी डोळ्यांच्या एका आजाराबाबत ऐकलं असेल, ट्रॅकोमा. हा आजार जिवाणूमुळे पसरतो. एक काळ होता जेव्हा हा आजार देशातल्या अनेक भागांमध्ये सहजपणे आढळत होता. जर लक्ष दिलं नाही तर या आजारामुळे हळूहळू आपली दृष्टी देखील जाऊ शकते. आम्ही संकल्प केला की ट्रॅकोमाचं समूळ उच्चाटन करायचं आणि मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ने भारताला ट्रॅकोमा- फ्री घोषित केलं आहे, आता भारत ट्रॅकोमा-मुक्त देश बनला आहे.
हे त्या लाखो लोकांच्या मेहनतीचं फळ आहे, ज्यांनी न थकता, न थांबता या आजाराविरुद्ध लढा दिला. हे यश आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे देखील याच्या निर्मूलनात मोठी मदत मिळाली. जलजीवन अभियानाचे देखील या यशात मोठे योगदान राहिलं आहे. आज जेव्हा घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ ने देखील या गोष्टीची प्रशंसा करताना म्हटलं आहे कि भारताने आजाराविरोधात लढा देण्याबरोबरच त्याला कारणीभूत मुळांवर देखील घाव घातला आहे.
मित्रांनो, आज भारतात बहुतांश लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा लाभांचा फायदा घेत आहे आणि आता नुकताच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा -आयएलओ चा एक महत्त्वपूर्ण अहवाल आला आहे. या अहवालात म्हटलं आहे की भारतातील 64 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला आता कुठला ना कुठला सामाजिक सुरक्षा लाभ नक्की मिळत आहे. सामाजिक सुरक्षा ही जगातील सर्वात मोठी व्याप्ती असलेल्यापैकी एक आहे. आज देशात सुमारे 95 कोटी लोक कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. त्या उलट 2015 पर्यंत 25 कोटींपेक्षा कमी लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचू शकत होत्या.
मित्रांनो, भारतात आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेने पुढे जात आहे. हे सामाजिक न्यायाचे देखील एक उत्तम चित्र आहे. या यशामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे की आगामी काळ अधिक चांगला असेल, प्रत्येक पावलावर भारत आणखी सशक्त होईल.
माझ्या प्रिय देश बांधवांनो, लोक -सहभागाच्या शक्तीने मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो. मी तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवतो, या ध्वनिफितीत तुम्हाला त्या संकटाच्या भीषणतेची कल्पना येईल. ते संकट किती मोठं होतं, आधी ते ऐका, समजून घ्या.
ऑडिओ - मोरारजीभाई देसाई
मित्रांनो, हा आवाज देशाचे माजी पंतप्रधान श्रीमान मोरारजीभाई देसाई यांचा आहे. त्यांनी संक्षिप्त स्वरूपात मात्र अतिशय स्पष्ट पद्धतीने आणीबाणी बाबत माहिती दिली. तुम्ही कल्पना करू शकता, तो काळ कसा होता. आणीबाणी लादणाऱ्यानी न केवळ आपल्या संविधानाची हत्या केली, तर त्यांचा हेतू न्यायपालिकेला देखील आपला गुलाम बनवून ठेवणं हा होता. या काळात लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला होता. याची अनेक अशी उदाहरणे आहेत जी कधीही विसरता येणार नाहीत. जॉर्ज फर्नांडिस साहेबांना बेड्यांमध्ये जखडून ठेवण्यात आलं होतं. अनेक लोकांना कठोर यातना सोसाव्या लागल्या. मिसा (MISA) अंतर्गत कोणालाही विनाकारण अटक केली जात होती. विद्यार्थ्यांना देखील त्रास दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली. मित्रांनो, त्या काळात ज्या हजारो लोकांना अटक करण्यात आली त्यांच्यावर विनाकारण मानवी अत्याचार झाले. मात्र हे भारताच्या जनतेचे सामर्थ्य आहे, ते झुकले नाहीत, वाकले नाहीत आणि लोकशाहीशी कोणतीही तडजोड त्यांनी मान्य केली नाही. शेवटी जनता जनार्दनाचा विजय झाला, आणीबाणी हटवण्यात आली आणि आणीबाणी लादणारेपराभूत झाले. बाबू जगजीवन रामजी यांनी याबाबत अतिशय सशक्त पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं होतं
ऑडिओ-
अटलजी यांनी देखील त्यावेळी आपल्या खास शैलीत जे काही सांगितलं होतं ते देखील आपण नक्की ऐकायला हवं
#Audio
मित्रांनो, देशावर आणीबाणी लादण्यात आली त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्ष पूर्ण झाली. आपण देशवासियांनी संविधान हत्या दिवस पाळला. आपण नेहमी त्या सर्व लोकांचे स्मरण करायला हवं ज्यांनी नेटाने आणीबाणीचा सामना केला होता. यामुळे आपल्याला आपल्या संविधानाला सशक्त राखण्यासाठी निरंतर सजग राहण्याची प्रेरणा मिळते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही एका चित्राची कल्पना करा. सकाळचं ऊन पर्वतांवर पडत आहे, हळूहळू सूर्यप्रकाश मैदानाच्या दिशेने पसरत आहे आणि त्या प्रकाशात फुटबॉलप्रेमींची झुंबड त्या दिशेने जात आहे. शिट्टी वाजते आणि काही क्षणातच मैदान टाळ्या आणि घोषणांनी दुमदुमून जातं. प्रत्येक पास, प्रत्येक गोल बरोबरच लोकांचा उत्साह वाढत आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कोणते सुंदर जग आहे? मित्रांनो, हे चित्र आसामचे एक प्रमुख क्षेत्र बोडोलँड येथील वास्तव आहे. बोडोलँड आज आपल्या एका नव्या रूपासह देशासमोर उभा आहे. इथल्या युवकांमध्ये जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो फुटबॉलच्या मैदानात सर्वात जास्त पाहायला मिळतो. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रात बोडोलँड सीईएम चषकाचे आयोजन होत आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही तर एकता आणि आशेचा उत्सव बनला आहे. 3 हजार 700 हून अधिक संघ, सुमारे 70 हजार खेळाडू आणि त्यातही मोठ्या संख्येने आपल्या मुलींचा त्यात सहभाग आहे. हे आकडे बोडोलँडमधील मोठ्या बदलाची गाथा सांगत आहेत. बोडोलँड आता देशाच्या खेळाच्या नकाशावर आपली चमक आणखी वाढवत आहे.
मित्रांनो, एक काळ असा होता की संघर्ष हीच या भागाची ओळख होती. तेव्हा येथील तरुणांसाठी उपलब्ध मार्ग मर्यादित होते. मात्र आज त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्ने आहेत आणि मनात स्वावलंबनाचे धैर्य
आहे. येथे तयार झालेले फुटबॉल खेळाडू आता उच्च स्तरावर स्वतःची ओळख प्रस्थापित करत आहेत. हालीचरण नारजारी, दुर्गा बोरो, अपूर्व नारजारी, मनबीर बसुमतारी, ही केवळ फुटबॉलपटूंची नावे नव्हेत – तर हे त्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी बोडोलँडला मैदानापासून राष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचवले. यापैकी अनेक जणांनी अत्यंत मर्यादित साधनांसह सराव केला, अनेकांनी अत्यंत कठीण
परिस्थितीतून मार्ग शोधला आणि आज यांचे नाव घेऊन कितीतरी लहान मुले स्वतःच्या स्वप्नांचा पाया रचत आहेत.
मित्रांनो, जर आपल्याला आपले सामर्थ्य वाढवायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपली तंदुरुस्ती, आपले स्वास्थ्य यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. तसे तर मित्रांनो, तुम्हाला तंदुरुस्तीसाठी, लठ्ठपणा कमी
करण्यासाठी मी केलेली सूचना लक्षात आहे ना? जेवणात 10 टक्के तेल कमी वापरा आणि लठ्ठपणा कमी करा. जेव्हा तुम्ही फिट व्हाल तेव्हा आयुष्यात आणखी सुपरहिट व्हाल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला भारत जसा प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यासाठी प्रसिध्द आहे त्याच प्रकारे, कला, शिल्पकला आणि कौशल्यातील विविधता देखील आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्या भागात जाल, तिथली एखादी तरी विशेष बाब आणि स्थानिक गोष्टीविषयी तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही बहुतेकदा ‘मन की बात’ मध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विषयी चर्चा करतो. असेच एक उत्पादन म्हणजे मेघालयातील एरी सिल्क नावाचे रेशीम. याला काही दिवसांपूर्वीच जीआय टॅग मिळालेला आहे. एरी सिल्क हे मेघालयासाठी एखाद्या वारशाप्रमाणे आहे. इथल्या आदिवासी जमातींनी विशेषतः खासी समाजाच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या याचा सांभाळ केला आहे आणि स्वतःच्या कौशल्याने त्याला आणखी समृद्ध देखील केलं आहे. या रेशमामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे इतर कापडापासून वेगळेपणाने उठून दिसते. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे रेशीम तयार करण्याची पद्धत, जे या प्रकारचे रेशीम तयार करणाऱ्या रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळवताना हे किडे मारले जात नाहीत. त्यामुळे या रेशमाला अहिंसा सिल्क देखील म्हणतात. आजकाल जगभरात जी उत्पादने बनवताना हिंसा केलेली नसेल आणि निसर्गावर त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसेल अशा प्रकारच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. आणि म्हणूनच मेघालयातील एरी सिल्क जागतिक बाजारपेठेसाठी एक सुयोग्य उत्पादन आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे रेशीम थंडीत उब देते आणि उन्हाळ्यात थंडावा देते. या रेशमाचे हे वैशिष्ट्य याला बहुतांश भागांमध्ये वापरासाठी अनुकूल बनवते. मेघालयातील महिला आता स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा मोठ्या प्रमाणात पुढे नेत आहेत. एरी सिल्कला जीआय टॅग मिळाल्याबद्दल मी मेघालयातील जनतेचे अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांना देखील आग्रह करतो की तुम्ही एरी सिल्कपासून तयार केलेले कपडे नक्की वापरून पहा. आणि हो, खादी, हातमाग, व्होकल फॉर लोकल यांची देखील नेहमीच आठवण असू द्या. ग्राहकांनी भारतातच निर्मित उत्पादने खरेदी केली आणि व्यापाऱ्यांनी भारतात तयार झालेली उत्पादनेच विकली तर ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी उर्जा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मंत्र भारताचे नवे भविष्य उभारण्यासाठी सज्ज आहे. आपल्या माता, भगिनी, कन्या आज केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी नवी दिशा शोधून काढत आहेत. तुम्ही तेलंगणा मधील भद्राचलमच्या महिलांच्या यशस्वी कामगिरीची माहिती जाणून घ्याल तर तुम्हाला अधिकच आनंद होईल. या भागातील महिला एकेकाळी शेतात मजुरी करत असत. उपजीविकेसाठी दिवसभर कष्ट उपसत असत. आज त्याच महिला श्रीअन्नापासून म्हणजेच भरड धान्यांपासुन बिस्किटे तयार करत आहेत. ’भद्रादि मिलेट मॅजिक’ या नावाने ही बिस्किटे लंडनपर्यंत पुरवली जाताहेत. भद्राचलमच्या या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून याचे प्रशिक्षण घेतले.
मित्रांनो, या महिलांनी आणखी एक कौतुकास्पद काम केले आहे. त्यांनी ‘गिरी सॅनिटरी पॅड्स’ चे उत्पादन सुरु केले. केवळ तीन महिन्यांमध्ये त्यांनी तब्बल 40,000 पॅड्स तयार केले आणि शाळा तसेच
आजूबाजूच्या कार्यालयांमध्ये त्याची विक्री केली, ती देखील अत्यंत कमी किंमतीत. मित्रांनो, कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिलांनी मिळवलेले यश देखील उल्लेखनीय आहे. या महिलांनी ज्वारीच्या भाकरीला एक ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी जी सहकारी संस्था स्थापन केली आहे त्यामध्ये दररोज सुमारे तीन हजारपेक्षा जास्त भाकऱ्या तयार करण्यात येतात. या भाकऱ्यांचा सुगंध आता केवळ गावापर्यंत मर्यादित राहिलेला नसून, बेंगळूरूमध्ये देखील यांच्या विक्रीचे काउंटर सुरु झाले आहे. अन्नपदार्थांच्या ऑनलाईन मंचावर या भाकऱ्यांसाठी ऑर्डर्स येत आहेत. कलबुर्गीची भाकरी आता मोठमोठ्या शहरांतील स्वयंपाकघरांमध्ये पोहोचली आहे. आणि याचा त्या महिलांच्या जीवनावर फार चांगला परिणाम झाला आहे, त्यांचे उत्पन्न वाढत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या यशोगाथांमधील चेहरे वेगवेगळे असतील मात्र त्या चेहऱ्यांवरचे तेज मात्र एकसारखे आहे. हे तेज आहे आत्मविश्वासाचे, आत्मनिर्भरतेचे. असाच एक चेहरा आहे, मध्यप्रदेशातील सुमा ऊईके यांचा. सुमाजींचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील कटंगी ब्लॉकमध्ये बचत गटामध्ये सहभागी होऊन, अळंबीची शेती तसेच पशुपालन यांचे प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला. सुमा ऊईके यांचे उत्पन्न वाढल्यावर त्यांनी त्यांच्या कार्याचा विस्तार देखील केला. लहानशा प्रयत्नापासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘दीदी कॅन्टीन’ आणि ‘औष्णिक उपचार केंद्रा’ पर्यंत पोहोचला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य महिला स्वतःचे आणि देशाचे भाग्य उजळवत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांत मला व्हिएतनामच्या लोकांनी विविध माध्यमांतून काही संदेश पाठवले. या संदेशांच्या प्रत्येक ओळीत श्रद्धा होती, आत्मीयता होती. त्यांच्या भावना मनाला
स्पर्श करणाऱ्या होत्या.ते सर्वजण, भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे ‘रेलीक्स’ चे दर्शन घडवल्याबद्दल भारताचे आभार मानत होते.त्यांच्या शब्दांमध्ये जे भाव भरलेले होते ते कोणत्याही औपचारिक आभारप्रदर्शनाहून अधिक हृदयस्पर्शी होते.
मित्रांनो, मुळात, भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचा शोध आंध्रप्रदेशात पालनाडू जिल्ह्यातील नागार्जुनकोंडा येथे लागला.या स्थानाचे बौद्ध धर्माशी जवळचे नाते आहे. असे म्हटले जाते की एकेकाळी या स्थानाला भेट देण्यासाठी श्रीलंका आणि चीनसह अनेक लांबलांबच्या देशांतून लोक येथे येत. मित्रांनो, गेल्या महिन्यात भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले. तिथल्या वेगवेगळ्या 9 ठिकाणी जनतेच्या दर्शनासाठी हे अवशेष ठेवण्यात आले. भारताचा हा उपक्रम एका अर्थी
व्हिएतनाम साठी एक राष्ट्रीय सोहोळा बनला. तुम्ही कल्पना करू शकता, 10 कोटी लोकसंख्येच्या व्हिएतनाम मध्ये सुमारे दीड कोटीहून अधिक लोकांनी भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले.
समाज माध्यमांवर मी जी छायाचित्रे आणि व्हिडीओ पाहिले त्यातून असे जाणवते की श्रद्धेला कोणतीही सीमा नसते. पाऊस असो, कडक ऊन असो, लोक कोणत्याही परिस्थितीत तासंतास रांगेत उभे होते. लहान मुले, वयोवृद्ध, दिव्यांगजन, असे सगळेच भावुक झाले होते. व्हिएतनामचे राष्ट्रपती, उपपंतप्रधान, ज्येष्ठ मंत्री, कोणीही असो, प्रत्येक जण नतमस्तक झाला होता. या प्रवासाप्रती तिथल्या लोकांमध्ये इतका आदरभाव होता की व्हिएतनाम सरकारने हा उपक्रम आणखी 12 दिवसांसाठी सुरु ठेवण्याचा आग्रह धरला आणि भारताने याला सहर्ष संमती दिली.
मित्रांनो, भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी, देशांना, संस्कृतींना आणि लोकांना एका धाग्यात बांधते. यापूर्वी भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष थायलंड आणि मंगोलिया येथे नेण्यात आले होते, त्या देशांमध्ये देखील असाच श्रद्धाभाव बघायला मिळाला. माझा तुम्हा सर्वांना असा आग्रह आहे की तुम्ही तुमच्या राज्यात असलेल्या बौद्ध स्थळांना अवश्य भेट द्या. हा एक अध्यात्मिक अनुभव असेल आणि आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी देखील असेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात आपण सर्वांनी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला. मला तुमचे हजारो संदेश मिळाले. अनेकांनी त्यांच्या परिसरातील अशा मित्रांची माहिती दिली जे पर्यावरण रक्षणासाठी एकटेच प्रयत्न करत होते आणि नंतर संपूर्ण समाज त्यांच्यासोबत सहभागी झाला. सर्वांचे हेच योगदान, आपल्या वसुंधरेसाठी एक मोठे सामर्थ्य बनत आहे. पुण्याच्या रमेश खरमाळे यांच्या कार्याबद्दल समजल्यावर तुम्हाला मोठी प्रेरणा मिळेल. आठवड्याच्या शेवटी जेव्हा बाकीचे लोक आराम करतात तेव्हा रमेशजी आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन बाहेर पडतात. ते कुठे जातात माहितीये? जुन्नरच्या डोंगरांच्या दिशेने. ऊन असो की उंचावरची चढाई, ते थांबत नाहीत. ते माजलेली झाडी कापतात, पाणी
थांबवण्यासाठी चर खणतात आणि बिया लावतात. फक्त 2 महिन्यांमध्ये त्यांनी 70 चर खणले रमेशजींनी अनेक लहान लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. ते एक प्राणवायू पार्क देखील
उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की या भागात पक्षी परतू लागले आहेत, वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले आहे.
मित्रांनो, पर्यावरणासाठी आणखी एक सुंदर उपक्रम बघायला मिळतो तो म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद या शहरात. तिथल्या नगरपालिकेने ‘लाखो वृक्षांसाठी अभियान’ सुरु केले असून त्याचे उद्दिष्ट आहे लाखो झाडे लावणे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सिंदूर वन’. हे वन ऑपरेशन सिंदूरमधील वीरांना समर्पित केलेले आहे. ज्या शूर वीरांनी देशासाठी सर्व समर्पण केले त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही सिंदूरची रोपे लावण्यात येत आहेत. इथे आणखी एका अभियानाला वेग देण्यात येत येत आहे आणि ते म्हणजे ‘एक पेड, माँ के नाम’. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात किंवा शहरात सुरु असलेल्या अशा अभियानात नक्की सहभागी व्हा. झाडे लावा, पाणी
वाचवा, धरतीची सेवा करा, कारण जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो तेव्हा खरेतर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करत असतो.
मित्रांनो, महाराष्ट्रातील एका गावाने फार उत्तम उदाहरण घालून दिले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एक ग्रामपंचायत आहे- ‘पाटोदा’ ही कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत आहे. या गावात कोणीही स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था केलेली आहे. इथे सांडपाण्यावर प्रक्रिया देखील करण्यात येते. प्रक्रिया करून स्वच्छ केल्याशिवाय कोणतेही पाणी नदीत सोडले जात नाही. या गावात शेण्या वापरून अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि त्याची राख वापरून दिवंगत व्यक्तीच्या नावे झाड लावले जाते. या गावातली स्वच्छता देखील बघण्यासारखी आहे. लहान लहान सवयी जेव्हा सामुहिक निर्धाराचे रूप घेतात तेव्हा फार मोठे परिवर्तन घडणे निश्चित असते.
माझ्या प्रिय मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे लागलेल्या आहेत. भारताने नवा इतिहास रचला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाशी काल माझे बोलणे सुद्धा झाले.
तुम्ही देखील माझे शुभांशूसोबत झालेले संभाषण ऐकले असेल. शुभांशूला अजून काही दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहावे लागेल. आपण या मोहिमेबद्दल आणखी चर्चा करू, मात्र ‘मन की बात’ च्या
पुढच्या भागात.
आता या भागात तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. मात्र मित्रांनो, जाताजाता मी तुम्हाला एका विशेष दिवसाची आठवण करून देऊ इच्छितो. परवा, 1 जुलैला आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यवसायांचा सन्मान करतो, डॉक्टर्स आणि सीए. हे दोन्ही आपल्या समाजाचे असे स्तंभ आहेत जे आपल्या जीवनाला अधिक चांगले रूप देतात. डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षक आहेत आणि सीए आपल्या आर्थिक जीवनाचे मार्गदर्शक आहेत. सगळ्या डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाऊन्टंटना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
मित्रांनो, तुमच्या सूचनांची मी वाट पाहत असतो. ‘मन की बात’ चा पुढचा भाग तुमच्या याच सूचनांमुळे आणखी समृध्द होईल. पुन्हा भेटूया, नव्या मुद्द्यांसह, नव्या प्रेरणांसह, देशवासीयांच्या नवनव्या यशांसह. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
More and more people are adopting yoga in their daily lives. #MannKiBaat pic.twitter.com/rMO4ZSGjY2
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
I extend my best wishes to all the fortunate devotees going on the various Yatras. I also commend those who are engaged in making these Yatras successful and safe with a spirit of service: PM @narendramodi in #MannKiBaat pic.twitter.com/iVhENprVHu
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
A remarkable milestone!
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
India has been declared Trachoma-free by the World Health Organisation. #MannKiBaat pic.twitter.com/9ZfbrLbPcL
According to a recent ILO report, more than 64% of Indians are now covered under some kind of social protection. #MannKiBaat pic.twitter.com/lHTHDQrbxw
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
PM @narendramodi recalls the dark days of the Emergency and salutes the defenders of the Constitution. #MannKiBaat pic.twitter.com/gq5NLN1GcI
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
Bodoland is fast emerging as a shining beacon on India's sports map. #MannKiBaat pic.twitter.com/A42Ted4kDx
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
Meghalaya's Eri Silk, now a GI-tagged product, blends tradition, sustainability and innovation. #MannKiBaat pic.twitter.com/r9KpJ9fvc7
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
Today, our Nari Shakti is driving change, not just for themselves, but for the entire nation. #MannKiBaat pic.twitter.com/XvsypN5CtL
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
People from Vietnam have expressed profound gratitude to India for facilitating the darshan of the relics of Bhagwan Buddha, a moving reminder of our timeless cultural bond. #MannKiBaat pic.twitter.com/B6F9d25PBe
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025
Across India, individuals and communities are becoming catalysts of change. Their unwavering commitment to conservation is not only protecting nature but also safeguarding the future for generations to come. #MannKiBaat pic.twitter.com/FI0ocBFMv3
— PMO India (@PMOIndia) June 29, 2025


