Operation Sindoor is not just a military mission; it is a picture of our resolve, courage and a transforming India and this picture has infused the whole country: PM Modi
The rise in the population of the Asiatic Lion shows that when the sense of ownership strengthens in the society, amazing results happen: PM Modi
Today there are many women who are working in the fields as well as touching the heights of the sky. They are flying drones as Drone Didis and ushering in a new revolution in agriculture: PM Modi
‘Sugar boards’ are being installed in some schools. The aim of this unique initiative of CBSE is to make children aware of their sugar intake: PM Modi
‘World Bee Day’ is a day which reminds us that honey is not just sweetness; it is also an example of health, self-employment and self-reliance: PM Modi
The protection of honeybees is not just a protection of the environment, but also that of our agriculture and future generations: PM Modi

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. 

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे.  आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.' 

मित्रांनो, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आपल्या सैन्यांनी जो पराक्रम केला, त्याने प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकांची मान अभिमानाने ताठ झाली आहे.   ज्या अचूकतेने आणि निपुणतेनं आपल्या सैन्यांनी सीमेपलिकडच्या  दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले, ते अद्भुत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने जगभरातल्या  दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला आहे. 

मित्रांनो, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही  केवळ एक लष्करी मोहिम नाही, ती  आपला  निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं  प्रतिबिंब आहे.  आणि त्याने  संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनेनं  भारून टाकलं आहे, तिरंग्यानं  रंगवलं आहे.  देशातील अनेक शहरांत, गावांत, लहान लहान वस्त्यांमधून तिरंगा यात्रांचं आयोजन झालेलं आपण पाहिलं आहे.  हजारो लोक हातात तिरंगा घेऊन देशाच्या सेनेला वंदन आणि अभिनंदन करण्यासाठी बाहेर पडले. अनेक शहरांत नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक होण्यासाठी मोठ्या संख्येने युवक एकत्र आले,  चंदीगडचे व्हिडीओज तर खूप व्हायरल झालेलं आम्ही पाहिलं. सोशल मीडियावर कविता लिहिण्यात येत होत्या, निर्धार गीतं  गायली जात होती. लहान मुलं मोठे संदेश देणारी चित्र काढत होती. 

मी तीन दिवसांपूर्वी बीकानेरला गेलो होतो, तिथे मुलांनी मला असंच  एक चित्र भेट दिलं.  ‘ऑपरेशन सिंदूर’ ने देशातील लोकांवर इतका प्रभाव टाकला आहे की, अनेक कुटुंबांनी त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवलं. बिहारच्या कटिहारमध्ये, उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये, आणखीनही अनेक  शहरांत त्या काळात जन्मलेल्या मुलांचं नामकरण  ‘सिंदूर’  असं करण्यात आलं.

मित्रांनो, आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं, हे त्यांचं  दुर्दम्य साहस  होतेच  आणि  त्यात भारतात बनवलेली  शस्त्र, उपकरण आणि तंत्रज्ञानाची ताकद होती.  यात ‘आत्मनिर्भर भारत’चा निर्धारही होता.  आपल्या अभियंत्यांच्या, तंत्रज्ञांच्या , प्रत्येकाच्या घामामुळेच हा विजय मिळाला आहे.  या मोहिमेनंतर संपूर्ण देशात ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला नवीन ऊर्जा मिळाली आहे.  अनेक गोष्टी मनाला भिडत आहेत, एका आई-वडिलांनी सांगितले – “आता आम्ही आपल्या मुलांसाठी फक्त भारतात बनवलेली  खेळणीच घेणार आहोत.  देशभक्तीची सुरुवात अशी  बालपणापासून होईल. ” काही कुटुंबांनी शपथ घेतली आहे – “आम्ही आमच्या  पुढील सुट्ट्या देशातीलच  एखाद्या सुंदर ठिकाणी घालवू”.  अनेक युवकांनी ‘वेड इन इंडिया’चा निर्धार केला आहे, ते देशातच लग्न करणार आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे की, “आता आम्ही केवळ,  भारतीय कारागिरांनी तयार केलेलीच भेटवस्तू देऊ.”

मित्रांनो, हीच तर भारताची खरी ताकद आहे –‘जनमानसाची  जोडणी, जनभागीदारी’. मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की, या टप्प्यावर आपण एक निर्धार करूया – 'आपण आपल्या आयुष्यात जिथे शक्य असेल  तिथे देशात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देऊया.  ही फक्त आर्थिक आत्मनिर्भरतेची गोष्ट नाही, ही राष्ट्रनिर्मितीत भागीदार बनण्याची भावना आहे.  आपलं  एक पाऊल भारताच्या प्रगतीत मोठं  योगदान ठरू शकतं. 

मित्रांनो, बसनं कुठेही ये-जा करणं  ही  आता किती सामान्य गोष्ट  आहे.

पण मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली,  अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो,  त्या दिवसाची त्या गावातले  लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. आणि जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावात पक्की सडक होती, लोकांना गरज होती, पण यापूर्वी कधीही तिथे बस चालू झाली नव्हती. का? कारण हे गाव माओवादी हिंसाचारानं  प्रभावित होता. ही जागा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि या गावाचं नाव आहे काटेझरी. काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात परिणाम जाणवत आहे. आता इथली  परिस्थिती वेगानं  सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या  सामूहिक लढाईमुळे आता अशा भागांपर्यंतही मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. बस आल्यानं त्यांच जीवन अधिक सोपं होईल, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.  

मित्रांनो, ‘मन की बात’ मध्ये आपण छत्तीसगडमधील 'बस्तर ऑलिंपिक्स' आणि माओवादी प्रभावित भागातील सायन्स लॅबबाबत चर्चा केली आहे. तीथल्या मुलांमध्ये विज्ञानाची आवड आहे. ते खेळांमध्येही कमाल करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे लक्षात येतं की, या भागांमध्ये राहणारे लोक किती धैर्यवान आहेत. त्यांनी कसे अनेक अडचणींना तोंड देऊन आपलं जीवन सुधारण्याचा मार्ग निवडला आहे. मला हे समजल्यावर खूप आनंद झाला की, दंतेवाडा जिल्ह्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल खूपच चांगले  आले आहेत. सुमारे ९५ टक्के निकालासह हा जिल्हा दहावीच्या निकालांमध्ये टॉपवर आहे. तर बारावीच्या परीक्षेत या जिल्ह्याने छत्तीसगढमध्ये सहावा क्रमांक मिळवला आहे. विचार करा! जो दंतेवाडा कधी माओवाद्यांच्या प्रभावाखाली होता, तिथे आज शिक्षणाचा झेंडा उंचावला गेला आहे. अशा बदलांमुळे आपल्या सर्वांना अभिमान वाटतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आता मी सिंहांशी संबंधित एक मोठी चांगली बातमी तुम्हाला सांगणार आहे.  गेल्या फक्त पाच वर्षांत गुजरातच्या गिर जंगलातली  सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ झाली  आहे. सहाशे चौऱ्याहत्तर ते आठशे एक्याणाव ! सिंह गणनेनंतर समोर आलेली ही वाढ अत्यंत उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी  अनेकांना प्राणी गणना कशी होते हे कदाचित जाणून घ्यायचं असेल. ही प्रक्रिया खूपच आव्हानात्मक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिंह गणना ११ जिल्ह्यांमध्ये, ३५ हजार चौ.किमी क्षेत्रफळात केली गेली आहे. गणनेसाठी टीमने चोवीस  तास सतत या भागांची पाहणी केली. या संपूर्ण मोहिमेत सत्यापन आणि पुनःसत्यापन दोन्ही केले गेले. यामुळे सिंहांची काळजीपूर्वक मोजणी  पूर्ण होऊ शकली.

मित्र हो, आशियाई सिंहांच्या संख्येतली  वाढ हेच स्पष्ट करते की, जेव्हा समाजात आपलेपणाची  भावना मजबूत होते, तेव्हा उत्कृष्ट निकाल प्राप्त होतात.  काही दशकांपूर्वी गिरमध्ये परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती. पण तिथल्या  लोकांनी एकत्र येऊन बदल घडवण्याचे काम हाती घेतले. तेथे नवीन तंत्रज्ञानाबरोबरच सर्वोत्तम  जागतिक पद्धतीही अवलंबल्या गेल्या. याच दरम्यान, गुजरात हे वनक्षेत्र अधिकारी पदांवर मोठ्या प्रमाणावर महिलांची नेमणूक करणारं पहिलं राज्य ठरलं.  आज दिसत असलेल्या निकालात  या सर्वांचं  योगदान आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला असंच नेहमी जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, दोन-तीन दिवसांपूर्वीच मी पहिल्या राइजिंग नॉर्थ ईस्ट समिटमध्ये सहभागी झालो होतो. त्याआधीच आपण देशाच्या उत्तर पूर्व भागाच्या सामर्थ्याला समर्पित ‘अष्टलक्ष्मी महोत्सव’ देखील साजरा केला होता.

आमच्या देशाच्या उत्तर-पूर्वेकडची  गोष्टच वेगळी आहे, तिथलं  सामर्थ्य, तिथली प्रतिभा, खरोखरच अद्भुत आहे. मला Crafted Fibers विषयी एक रंजक गोष्ट समजली आहे. Crafted Fibers हा फक्त एक ब्रँड नाही, तर सिक्किमच्या परंपरेचा, विणकामाच्या कलेचा आणि आजच्या फॅशनच्या विचारांचा सुंदर त्रिवेणी संगम आहे. याची सुरुवात डॉ. चेवांग नोरबू भूटियांनी केली. ते व्यवसायानं पशुवैद्य आहेत  आणि मनानं  सिक्किमच्या संस्कृतीचे खरे ब्रँड अँम्बेसडर आहेत. त्यांनी विणकामाला एक नवीन परिमाण प्राप्त करून द्यायचा विचार केला.  आणि या विचारातून Crafted Fibers ची निर्मिती झाली. त्यांनी पारंपरिक विणकामाला आधुनिक फॅशनशी जोडलं आणि तो  एक सामाजिक उपक्रम बनला. आता त्यांच्या इथे फक्त कपडेच तयार होत नाहीत, तर लोकांचे जणू जीवनही विणले जाते. ते स्थानिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण देतात, त्यांना आत्मनिर्भर बनवतात. गावातील विणकर, पशुपालक आणि स्वयं-सहायता गटांना एकत्र आणून डॉ. भूटियांनी रोजगाराचे नवनवीन मार्ग उघडले आहेत. आज, स्थानिक महिला आणि कारीगर आपापल्या  कौशल्याने चांगली कमाई करत आहेत. Crafted Fibers च्या शाली, स्टोल्स, हातमोजे, सॉक्स हे सर्व स्थानिक हातमागाच्या उत्पादनांमधून बनतात. यामध्ये वापरलेली लोकर सिक्किमच्या ससे आणि मेंढ्यांपासून मिळते. रंग पूर्णपणे नैसर्गिक असतात – कुठलाही रासायनिक पदार्थ नाही, फक्त निसर्गाच्या रंगांची छटा. डॉ. भूटियांनी सिक्किमच्या पारंपरिक विणकामाला आणि संस्कृतीला नवीन ओळख दिली आहे. जेव्हा परंपरेला आवडीशी जोडले जाते, तेव्हा ती संपूर्ण जगाला आकर्षित करू शकते, हीच शिकवण  त्यांच्या कामातून आपल्याला मिळते.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आज मी तुम्हाला अशा एक विलक्षण व्यक्तीविषयी सांगू इच्छितो, जो एक कलाकार आहे आणि एक जिवंत प्रेरणास्रोत आहे. त्यांचे नाव आहे – जीवन जोशी, वय ६५ वर्षे. आता विचार करा,  ज्यांच्या नावातच ‘जीवन’ आहे, ते किती जीवंततेने भरलेले असतील! जीवनजी उत्तराखंडमधील हल्द्वानी इथे राहतात. बालपणात पोलिओने त्यांचे पाय कमजोर केले, पण पोलिओ त्यांच्या आकांक्षांना रोखू शकला नाही. त्यांचा चालण्याचा वेग भले थोडा मंद झाला असेल, पण त्यांचे मन कल्पनेच्या आकाशात उडतच  राहिले. त्यातूनच, जीवनजींनी एका अनोख्या कलेला जन्म दिला.  – ज्याला त्यांनी ‘बगेट’ असं नाव दिलं . यात ते पाईन अर्थात चीड वृक्षांच्या सुकलेल्या सालांपासून सुंदर कलाकृती बनवतात.  सामान्यतः ही साल लोक नष्ट करतात, पण ती जीवनजींच्या हातांत आली की एक समृद्ध वारसा बनते. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत उत्तराखंडच्या मातीचा सुगंध असतो. कधी वाटतं, उत्तराखंडच्या पर्वतांचा आत्माच त्यांच्या लोक वाद्यातून गुंजत आहे.  जीवनजींचे काम फक्त एक कला नाही, तर एक साधना आहे. त्यांनी या कलेत आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. जीवन जोशी सारखे कलाकार आपल्याला हीच आठवण करून देतात की परिस्थिती कशीही असो, जर निर्धार पक्का असेल तर अशक्य असे काहीच नाही. त्यांचं नाव ‘जीवन’ आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं जीवन जगणं म्हणजे काय असतं, ते दाखवून दिलं आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आज  अशा अनेक महिला आहेत, ज्या शेतांबरोबरच आभाळाच्या उंचीवर देखील काम करत आहेत. होय! तुम्ही बरोबर ऐकलं आहे, आता गावातील महिला 'ड्रोन दीदी' बनून ड्रोन उडवत आहेत आणि शेतीत नवी क्रांती घडवत आहेत.

मित्रांनो, तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात, काही काळापूर्वीपर्यंत ज्या महिलांना इतरांवर अवलंबून रहावं लागे, आज त्याच  महिला ड्रोनच्या सहाय्याने ५० एकर जमिनीवर औषध फवारणीचं काम पूर्ण करत आहेत. सकाळी तीन तास, संध्याकाळी दोन तास आणि काम संपलं.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे. आपण अजूनही योगा पासून दूर असाल तर आता योगाशी जोडून घ्या हे समजावून सांगणारी ही संधी आहे. तुमच्या जगण्याची पद्धत योगामुळे बदलून जाईल. मित्रहो, 21 जून 2015 ला योगदिनाची सुरुवात झाल्यापासूनच याबद्दलचं आकर्षण सातत्याने वाढत आहे. यावर्षीही योगदिनाबाबत जगभरातल्या  लोकांचा जोश आणि उत्साह दिसून येत आहे. वेगवेगळ्या संस्था आपापल्या तयारीबद्दल माहिती देत आहेत. गेल्या वर्षीच्या छायाचित्रांनी मोठी प्रेरणा दिली आहे. आपण हेही पाहिलं की- वेगवेगळ्या देशांत कुठल्याशा वर्षी लोकांनी योगशृंखला केली, योग ring केली. एकावेळी चार पिढ्या एकत्रितपणे योग करत आहेत असंही खूप ठिकाणी पाहायला मिळालं. अनेक जणांनी आपल्या शहरातल्या महत्वपूर्ण जागा योगासाठी निवडल्या. आपणही यावर्षी काहीतरी रंजक पद्धतीने योगदिन साजरा करण्याचा विचार करू शकता.

मित्रहो आंध्र प्रदेश सरकारनं योगआंध्र अभियान सुरू केलं आहे. पूर्ण राज्यात योगसंस्कृती विकसित करणं हा ह्याचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत, योग करणाऱ्या दहा लाख लोकांचं एकत्रीकरण करून एक pool तयार करण्यात येणार आहे. मला यावर्षी विशाखापट्टणममध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. यावर्षीही आपले तरुण साथीदार देशाच्या वारशाशी संबंधित महत्वपूर्ण ठिकाणी योग करणार आहेत, हे समजल्यावर मला आनंद झाला. अनेक तरुणांनी नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा आणि योगशृंखलेचा भाग होण्याचा संकल्प सोडला आहे. आपल्या कॉर्पोरेट्सदेखील यात कमी नाहीत. काही आस्थापनांनी ऑफिसमध्येच योगाभ्यासासाठी वेगळी जागा ठरवली आहे. काही स्टार्टअप उद्योगांनी त्यांच्याकडे 'office योग hours' ठरवून घेतले आहेत. काही जण गावांमध्ये जाऊन योग शिकवण्याच्या तयारीतही आहेत. आरोग्य आणि सुदृढता याबद्दलची लोकांमधली जागरूकता पाहून मला फार बरं वाटतं.

मित्रहो,

योग दिना बरोबरच आयुर्वेदाच्या क्षेत्रातही असं काही घडलंय जे ऐकून तुम्हाला फार आनंद होईल. कालच म्हणजे  24 मे ला WHO चे महासंचालक आणि माझे मित्र तुलसीभाई यांच्या उपस्थितीत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. या कराराबरोबरच, international classification of health interventions अंतर्गत, एका dedicated traditional medicine module वर काम सुरू झालं आहे. या उपक्रमाद्वारे पूर्ण जगात आयुष वैज्ञानिक पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

मित्रांनो,

तुम्ही शाळांमध्ये blackboard तर बघितला असेलच, पण आता काही शाळांमध्ये sugar board ही लावला जात आहे - blackboard नव्हे तर sugar board ! मुलांना त्यांच्या साखर खाण्याबद्दल जागरूक करणं हा CBSE च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा उद्देश आहे. किती साखर खाल्ली पाहिजे आणि किती साखर खाल्ले जात आहे हे कळल्यावर मुलं स्वतःच आरोग्यपूर्ण पर्याय निवडू लागली आहेत. हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे आणि याचा परिणामही अगदी सकारात्मक होईल. लहानपणापासूनच आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या सवयी लावण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकेल. अनेक पालकांनी याचं कौतुक केलं आहे, आणि मला असं वाटतं, की हा उपाय कार्यालयं, कॅन्टीन आणि संस्थांमध्येही केला पाहिजे, कारण शेवटी तब्येत चांगली तर सर्व काही आहे. सुदृढ भारत हाच बलिष्ठ भारताचा पाया आहे.

प्रिय देशवासीयांनो,

स्वच्छ भारतचा विषय निघेल आणि मन की बात चे श्रोते मागे राहतील, असं होईल तरी का? मला पक्की खात्री आहे की आपण सर्वजण आपापल्या पातळीवर अभियानाला बळकटी देत आहात. पण आज मी असं एक उदाहरण सांगणार आहे, ज्यात स्वच्छतेच्या संकल्पानं अडचणींचा डोंगरही पार केला. कल्पना करा, एखादी व्यक्ती बर्फाळ डोंगरावर चढत आहे, जिथे श्वासही घेणं कठीण आहे, पावलोपावली जिवाला धोका आहे आणि तरीही ती व्यक्ती साफसफाई करण्यात गर्क आहे. आपल्या ITBP टीमच्या सदस्यांनी असंच काहीसं केलं आहे. ही टीम माउंट मकालू सारखं जगातलं सर्वात कठीण शिखर सर करायला गेली होती. पण मित्रहो त्यांनी फक्त गिर्यारोहण नाही केलं तर त्याबरोबर स्वच्छतेची आणखी एक मोहीम आपल्या ध्येयाशी जोडून घेतली. शिखराजवळ पडलेला कचरा गोळा करण्याचा त्यांनी विडा उचलला. विचार करा या टीमच्या सदस्यांनी दीडशे किलोपेक्षा जास्त अविघटनशील कचरा आपल्याबरोबर खाली आणला. इतक्या उंचावर साफसफाई करणं अजिबात सोपं नाही. पण यातून हेच दिसतं की तिथे संकल्प असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतात.

मित्रांनो याच्याशीच संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, कागदाचा कचरा आणि पुनश्चक्रीकरण. आपल्या घरात आणि कार्यालयात दररोज कागदाचा खूप कचरा तयार होतो. कदाचित आपल्याला त्याचं विशेष काही वाटत नाही, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की देशाचे भूभाग व्यापणाऱ्या landfill waste मध्ये जवळपास एक चतुर्थांश भाग कागदी कचऱ्याचा असतो‌. प्रत्येकाने या दिशेने विचार करण्याची आज गरज आहे. भारतातले अनेक स्टार्टअप उद्योग या क्षेत्रात छान काम करत आहेत, हे समजल्यावर मला आनंद झाला. विशाखापट्टण गुरुग्राम अशा अनेक शहरांमध्ये अनेक स्टार्ट अप, कागदाच्या पुनश्चक्रीकरणाचे अभिनव मार्ग अवलंबत आहेत. कोणी recycled paper पासून packaging board तयार करतंय, तर कोणी डिजिटल पद्धतीने newspaper recycling सोपं करतंय. जालना सारख्या शहरात काही लोक १०० टक्के recycled material पासून packaging roll आणि paper core बनवत आहेत. एक टन कागदाच्या recycling ने १७ झाडं तुटण्यापासून वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते, हे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आता विचार करा गिर्यारोहक जर इतक्या कठीण परिस्थितीत कचरा खाली आणू शकतात तर आपण आपल्या घरात आणि कार्यालयांत कागद वेगळा करून रिसायकलिंग मध्ये आपलं योगदान नक्कीच दिलं पाहिजे. देशासाठी मी आणखी काय चांगलं करू शकेन, असा विचार जेव्हा प्रत्येक नागरिक करेल, तेव्हा आपण सगळे मिळून मोठं परिवर्तन घडवून आणू शकू.

मित्रहो,

गेल्या काही दिवसात खेलो इंडिया स्पर्धेची मोठीच धामधूम होती. खेलो इंडिया दरम्यान बिहारच्या पाच शहरांनी यजमानपद भूषवलं. तिथे वेगवेगळ्या श्रेणींचे सामने झाले. भारतभरातून तिथे पोहोचलेल्या खेळाडूंची संख्या पाच हजाराहूनही अधिक होती. या खेळाडूंनी बिहारच्या खिलाडू वृत्तीची आणि बिहारी लोकांच्या आत्मीयतेची खूप प्रशंसा केली आहे.

मित्रहो, यावर्षी खेलो इंडिया स्पर्धेत एकूण २६ विक्रम प्रस्थापित झाले. भारोत्तोलन स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता धोने, ओदिशाचा हर्षवर्धन साहू आणि उत्तरप्रदेशचा तुषार चौधरी यांच्या शानदार कामगिरीने सर्वांच्या मनात घर केलं. महाराष्ट्राच्या साईराज परदेशीने तर तीन रेकॉर्ड करून दाखवले. Athletics मध्ये उत्तर प्रदेशच्या कादर खान आणि शेख जीशान यांनी आणि राजस्थानचा हंसराज यानं चमकदार कामगिरी केली. यंदा बिहारनंही ३६ पदकं पटकावली. गड्यांनो, जो खेळतो तोच फुलतो. तरुण क्रीडा प्रतिभेसाठी स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यामुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.

प्रिय देशबांधवांनो,

20 मे ला जागतिक मधमाशी दिवस साजरा झाला. मध फक्त गोडवाच नाही तर आरोग्य, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेचंही दान देऊ शकतो, याचं स्मरण करून देणारा हा दिवस. गेल्या अकरा वर्षात भारतात मधुमक्षिका पालनाबाबत एक sweet revolution घडून आली आहे.  10 -11वर्षांपूर्वी भारतात वर्षाकाठी 70 -75 मेट्रिक टन मध उत्पादन होत असे. ते वाढून आज जवळपास सव्वा लाख मॅट्रिक टनांपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे मध उत्पादनात साधारण 60 टक्के वाढ झाली आहे. मधाचं उत्पादन आणि निर्यात याबाबतीत आपण जगातल्या अग्रणी देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. हा सकारात्मक प्रभाव मिळण्यात 'राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानाची' भूमिका मोलाची आहे. या अंतर्गत मधुमक्षिका पालनाशी संबंधित हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, उपकरणं देण्यात आली आणि त्यांना थेट बाजारापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

मित्रांनो, हे परिवर्तन फक्त आकड्यातच नाही, तर थेट गावच्या भूमीवरही दिसतं. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातलं एक उदाहरण आहे - तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांनी 'सोन हनी' नावाचा शुद्ध जैविक मधाचा ब्रांड तयार केला आहे. आज तो मध GeM सह अनेक ऑनलाइन पोर्टल्सवर विकला जातो. म्हणजे, गावाचे कष्ट आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. अशाचप्रकारे उत्तर प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हजारो महिला आणि तरुण आता मध उद्योजक बनले आहेत. आणि बरं का मित्रांनो, आता मधाच्या फक्त प्रमाणावरच नाही तर शुद्धतेवरही काम सुरू आहे. काही स्टार्टअप उद्योग कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मधाच्या गुणवत्तेला प्रमाणित करत आहेत. तुम्ही पुढच्या वेळी मध खरेदी करताना या honey उद्यमींकडचा मध  जरूर चाखून पाहा. एखाद्या स्थानिक शेतकऱ्याकडून, एखाद्या उद्योजक महिलेकडूनही मध खरेदी करा. कारण त्याचा प्रत्येक थेंबात स्वादच नव्हे तर भारताचे परिश्रम आशा-आकांक्षा मिसळलेल्या असतात. मधाचा तो गोडवा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा स्वाद आहे.

गड्यांनो, आपण मधाबद्दलच्या प्रयत्नांविषयी बोलतोच आहोत तर, तुम्हाला आणखी एका उपक्रमाविषयी सांगतो. मधमाशांची सुरक्षा केवळ पर्यावरणासाठी नाही तर आपल्या शेती आणि भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाची आहे, याची जाणीव यातून होते. हे उदाहरण आहे पुणे शहरातलं- तिथे का हाऊसिंग सोसायटीतलं मधमाशांचं पोळं काढण्यात आलं- सुरक्षेसाठी, किंवा कदाचित भीतीपोटी. पण या घटनेने एका व्यक्तीला खूप विचारात पाडलं. अमित नावाच्या या तरुणानं ठरवलं की मधमाशांना हाकलण्यापेक्षा त्यांना वाचवलं पाहिजे. तो स्वतः शिकला, मधमाशांवर संशोधन केलं आणि यासाठी इतरांनाही जोडायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी एक पथक तयार केलं, त्याला नाव दिलं- बी फ्रेंड्स म्हणजे मधमाशांचे मित्र. आता हे मधमाशांचे मित्र मधमाशांची पोळी एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षितपणे घेऊन जातात जेणेकरून लोकांनाही धोका नसेल आणि मधमाशाही सुरक्षित राहतील. अमितजींच्या या प्रयत्नांना फळही चांगलं आलं आहे. मधमाशांच्या वसाहती वाचत आहेत. मधाचं उत्पादन वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनजागृतीही वाढत आहे. आपण जेव्हा निसर्गाशी ताळमेळ राखून काम करतो तेव्हा सर्वांचाच फायदा होतो हेच यावरून शिकायला मिळतं.

प्रिय देशवासीयांनो,

मन की बात च्या आजच्या भागात बस इतकंच. तुम्ही असंच देशबांधवांच्या सफलता, समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. मन की बात च्या पुढच्या भागात अनेक नवे विषय घेऊन पुन्हा भेटू या, देशावासीयांच्या नवीन यशाची चर्चा करण्यासाठी. मी तुमच्या संदेशांची वाट पाहतो. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद, नमस्कार.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar

Media Coverage

India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology