‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे केले उद्घाटन
“आजचा भारत केवळ ‘व्होकल फॉर लोकल’ नाही तर त्यासाठी जागतिक मंच देखील उपलब्ध करून देत आहे”
“स्वदेशीबाबत देशात एक नवी क्रांती निर्माण झाली आहे”
“व्होकल फॉर लोकलच्या भावनेने नागरिक मनापासून स्वदेशी उत्पादनांची खरेदी करत आहेत आणि ती आता लोकचळवळ बनली आहे”
“मोफत रेशन, पक्के घर, 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार- ही मोदी यांनी दिलेली हमी आहे”
“विणकरांचे काम सोपे व्हावे, उत्पादकतेत वाढ व्हावी आणि गुणवत्तेमध्ये आणि डिझाईनमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे”
“एका छत्राखाली प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात हातमागावर तयार झालेली उत्पादने आणि कलाकुसरीच्या वस्तू यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या राजधानीच्या प्रत्येक शहरात एकता मॉल उभारले जात आहेत ”
“विणकरांना जगातील सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट धोरणाने सरकार काम करत आहे”
“जे लोक आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नांची गुंफण करत आहेत आणि मेक इन इंडिया ला बळ देत आहेत त्यांना खादी हे एक केवळ एक वस्त्र नव्हे तर अस्त्र वाटते”
“जेव्हा छतावर तिरंगा फडकवला जातो त्यावेळी तो आपल्या अंतर्मनात देखील फडकत असतो”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

भारत मंडपमच्या भव्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतातील हातमाग उद्योगाचे योगदान अधोरेखित केले आणि ते म्हणाले की जुने आणि नवे यांचा संगम ही नव्या भारताची व्याख्या आहे. “ आजचा भारत केवळ ‘व्होकल फॉर लोकल’ नाही तर त्यांना जागतिक मंच देखील उपलब्ध करून देत आहे”, ते म्हणाले. आजचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विणकरांसोबत झालेल्या आपल्या संवादाची माहिती देताना, आजच्या भव्य सोहळ्यामध्ये देशभरातून विविध हातमाग समूहांच्या उपस्थितीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि त्यांचे स्वागत केले.

 

ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या प्रत्येक बलिदानाचे स्मरण करण्याचा हा काळ आहे असे त्यांनी अधोरेखित केले. स्वदेशी चळवळीवर भर देत पंतप्रधान म्हणाले की ही चळवळ केवळ परदेशी कापडावर बहिष्कार घालण्यापुरती मर्यादित नव्हती, तर भारताची अर्थव्यवस्था स्वतंत्र करण्यासाठी एक प्रेरणा स्रोत होती. भारतातील विणकरांना सर्वसामान्य लोकांसोबत जोडणारी ही चळवळ होती आणि आज राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यामागे सरकारसाठी हीच प्रेरणा होती, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. गेल्या काही वर्षात हातमाग उद्योगाच्या विस्तारासाठी आणि विणकरांसाठी अभूतपूर्व काम करण्यात आले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वदेशी बाबत देशात एक नवी क्रांती निर्माण झाली आहे असे मोदी यांनी नमूद केले. विणकरांनी केलेल्या कामगिरीच्या माध्यमातून भारताला मिळणाऱ्या यशाबाबत त्यांनी अभिमान व्यक्त केला.

 

एखादी व्यक्ती परिधान करत असलेल्या पोशाखावरून तिची ओळख लक्षात येते आणि या प्रसंगी दिसत असलेल्या पोशाखांच्या विविधतेकडे त्यांनी लक्ष वेधले.  भारताच्या विविध भागातील पोशाखांच्या माध्यमातूनही भारताची विविधता साजरा करण्याचा देखील आजचा दिवस आहे, असे ते म्हणाले. भारतामध्ये विविध प्रकारच्या पोशाखांचे एक अतिशय सुंदर इंद्रधनुष्य आहे, असे पंतप्रधानांनी भारताच्या दुर्गम भागातील आदिवासी समुदायांपासून हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये राहणारे लोक आणि किनारपट्टीच्या प्रदेशातील लोकांपासून ते वाळवंटी भागात राहणाऱ्या लोकांच्या पोशाखांबरोबरच भारतातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या पोशाखांच्या विविधतेला अधोरेखित करताना सांगितले. भारतामधील पोशाख विषयक विविधता सूचीबद्ध करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली होती याची आठवण करून दिली आणि ही सूचना आज ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’ च्या उद्घाटनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

 

गेल्या शतकांमध्ये भारतातील वस्त्रोद्योगाचा चांगला पाया घातला गेला, हे नमूद करून स्वातंत्र्यानंतर त्याला बळकट करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नसल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. खादी परिधान करणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहिले जात होते हे सांगताना ते म्हणाले कि  “खादी देखील लोप पावत चालली होती.” 2014 नंतर, ही परिस्थिती आणि त्यामागील विचार बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खादी उत्पादने खरेदी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केल्याची आठवण सांगितली ज्याद्वारे गेल्या 9 वर्षांत खादीच्या उत्पादनात 3 पटीहून अधिक वाढ झाली. खादीच्या कपड्यांची विक्री 5 पटीने वाढली असून परदेशातही त्याची मागणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पॅरिसच्या भेटी दरम्यान एका मोठ्या फॅशन ब्रँडच्या सीईओला भेटल्याची आठवणही मोदींनी सांगितली; ज्यांनी त्यांना खादी आणि भारतीय हातमाग यांच्या वाढत्या आकर्षणाबद्दल माहिती दिली होती.

 

नऊ वर्षांपूर्वी खादी आणि ग्रामोद्योगांची वार्षिक उलाढाल केवळ 25-30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होती, पण आज ती एक लाख तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी नमूद केले की अतिरिक्त 1 लाख कोटी रुपये हातमाग क्षेत्राशी संबंधित असलेल्या खेड्यांमध्ये आणि आदिवासींपर्यंत पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी नीति आयोगाच्या अहवालाचा हवाला दिला ज्यामध्ये असे म्हटले आहे की गेल्या 5 वर्षांत 13.5 कोटी लोकांनी गरीबीवर मात केली आणि त्यासाठी या क्षेत्रातील वाढत्या उलाढालीतील योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. "वोकल फॉर लोकल या भावनेने, नागरिक मनापासून स्वदेशी उत्पादने खरेदी करत आहेत आणि ती एक लोकचळवळ बनली आहे",असे  मोदी म्हणाले. रक्षाबंधन, गणेश उत्सव, दसरा आणि दीपावली या आगामी उत्सवांमध्ये विणकर आणि कारागिरांना पाठबळ देण्यासाठी स्वदेशी संकल्पाची पुनरावृत्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी राबविण्यात आलेल्या योजना सामाजिक न्यायाचे प्रमुख माध्यम बनत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले कारण देशभरातील खेडे आणि शहरांमध्ये लाखो लोक हातमाग कामात गुंतलेले आहेत. यातील बहुतांश लोक दलित, मागास, पसमांडा आणि आदिवासी समाजातून आलेले आहेत हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारही वाढला आहे. वीज, पाणी, गॅस कनेक्शन, स्वच्छ भारत या योजनांची उदाहरणे देत त्यांनी अशा मोहिमांचा सर्वाधिक लाभ झाल्याचे सांगितले. “मोफत रेशन, पक्के घर, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, ही मोदींची हमी आहे”, असे पंतप्रधानांनी हे अधोरेखित करत सांगितले की, विद्यमान सरकारने विणकर समाजाची मूलभूत सुविधांसाठी असलेली अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली आहे. 

 

वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत परंपरा चिरंतर ठेवण्यासाठीच सरकार प्रयत्न करत नाही तर एका नव्या रूपात जगाला आकर्षित करेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. म्हणूनच, सरकार या कामाशी निगडित असलेल्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि उत्पन्नावर भर देत आहे आणि विणकर आणि कारागिरांच्या मुलांच्या आकांक्षांना पंख देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विणकरांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी वस्त्रोद्योग संस्थांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या शिष्यवृत्तीचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या 9 वर्षात 600 हून अधिक हातमाग क्लस्टर विकसित करण्यात आले असून हजारो विणकरांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली. “विणकरांचे काम सोपे व्हावे, त्यांची उत्पादकता वाढावी आणि गुणवत्ता आणि संरचना सुधारण्यासाठी सरकारचा निरंतर प्रयत्न असतो. संगणकावर चालणारी पंचिंग मशिनही त्यांना पुरविण्यात येत असून त्यामुळे नवीन डिझाइन्सची निर्मिती जलद गतीने करता येते, असेही त्यांनी नमूद केले. “मोटरवर चालणाऱ्या यंत्रांच्या सहाय्याने ताणा बनवणे देखील सोपे होत आहे. अशी अनेक उपकरणे, अशी अनेक यंत्रे विणकरांना उपलब्ध करून दिली जात आहेत,” ते म्हणाले. हातमाग विणकरांना सुतासारखा कच्चा माल सरकार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत असून कच्च्या मालाच्या वाहतुकीचा खर्चही उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजनेचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की आता विणकरांना तारणमुक्त कर्ज मिळणे शक्य झाले आहे.

 

पंतप्रधानांनी गुजरातच्या विणकरांसोबतच्या त्यांच्या सहवासाचे स्मरण केले आणि त्यांचा मतदारसंघ असलेल्या संपूर्ण काशी प्रदेशातील हातमाग उद्योगाच्या योगदानावर प्रकाश टाकला. विणकरांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करताना पुरवठा साखळी आणि विपणनात येणारी आव्हाने पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिली. सरकार भारत मंडपमप्रमाणेच देशभर प्रदर्शने आयोजित करून हस्तनिर्मित उत्पादनांच्या विपणनावर भर देत आहे, असे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर मोफत स्टॉलसोबत त्यांना दैनंदिन भत्ताही दिला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. कुटीर उद्योग आणि हातमागांनी बनवलेल्या उत्पादनांसाठी तंत्र आणि नमुने तसेच विपणन पद्धतींमध्ये नावीन्य आणणाऱ्या स्टार्टअप्सचे आणि भारतातील तरुणांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले आणि आपण कोणीही त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा साक्षीदार होऊ शकतो, असे सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील विशेष उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे असे पंतप्रधानांनी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेबद्दल बोलताना सांगितले. "अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी देशातील रेल्वे स्थानकांवर विशेष स्टॉल देखील उभारले जात आहेत", असे ते म्हणाले. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यातील हातमागांवर  बनवलेले प्रकार  आणि  हस्तकला उत्पादनांना एकाच छताखाली प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून राज्यांच्या प्रत्येक राजधानीत विकसित करण्यात येत असलेल्या आगामी एकता मॉलचाही त्यांनी उल्लेख केला. हातमाग क्षेत्राशी निगडित लोकांना या एकता मॉलचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील एकता मॉलचाही उल्लेख केला. या मॉलमुळे पर्यटकांना भारताची एकता अनुभवण्याची आणि एकाच छताखाली कोणत्याही राज्यातील उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.

 

पंतप्रधान आपल्या परदेश दौऱ्यांदरम्यान मान्यवरांना भेटवस्तू देतात त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की या भेटवस्तूंचे मान्यवरांकडून केवळ कौतुक होत नाही तर या वस्तू तयार करणाऱ्यांबद्दल माहिती समजल्यावर त्यांचे मन खोलवर प्रभावित होते.

जीईएम पोर्टल किंवा सरकारी ई-मार्केटप्लेस बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की अगदी लहान मोठे कारागीर किंवा विणकर देखील त्यांचा माल थेट सरकारला विकू शकतात. हातमाग आणि हस्तकलेशी संबंधित सुमारे 1.75 लाख संस्था आज जेईएम पोर्टलबरोबर जोडल्या गेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. “हातमाग क्षेत्रातील आपल्या बंधू-भगिनींना डिजिटल इंडियाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी सांगितले. 

 

“सरकार आपल्या विणकरांना जगातील सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट धोरण घेऊन काम करत आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, विणकर, कारागीर आणि शेतकरी यांची उत्पादने जगभरातील बाजारपेठेत नेण्यासाठी जगातील मोठ्या कंपन्या पुढे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात जगभरातील मोठी दुकाने, किरकोळ पुरवठा साखळी, ऑनलाइन उपस्थिती आणि दुकाने असलेल्या अशा अनेक कंपन्यांच्या प्रमुखांशी  झालेल्या थेट चर्चेबद्दल  त्यांनी माहिती दिली . अशा कंपन्यांनी आता भारतातील स्थानिक उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा संकल्प केला आहे, असे त्यांनी नमूद केले. “भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ असोत किंवा हातमागाची उत्पादने असोत, या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांना जगभरातील बाजारपेठांमध्ये घेऊन जातील”, असेही ते म्हणाले. उत्पादने भारतातच बनवली जातील आणि पुरवठा साखळी मात्र या बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यान्वित करतील यावर त्यांनी भर दिला.

वस्त्रोद्योग आणि फॅशन जगताशी निगडित असलेल्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगातील सर्वात मोठ्या   तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यासाठी उचललेल्या पावलांच्या व्यतिरिक्त आपल्या विचारांची आणि कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. भारताच्या हातमाग, खादी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर यशस्वी बनवण्यासाठी ‘सबका प्रयत्न’ (प्रत्येकाचे प्रयत्न) आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “कामगार असो, विणकर असो, डिझायनर असो किंवा उद्योग असो, प्रत्येकाने समर्पित प्रयत्न करावे लागतील”, असे ते म्हणाले. मानके आणि तंत्रज्ञानाशी विणकरांचे कौशल्य जोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

 

भारतात नव-मध्यमवर्गाच्या उदयावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की प्रत्येक उत्पादनासाठी प्रचंड प्रमाणात तरुण ग्राहकवर्ग तयार होतो आहे आणि त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. म्हणून, स्थानिक पुरवठा साखळी बळकट करणे आणि त्यामध्ये गुंतवणूक करणे ही देखील या कंपन्यांची जबाबदारी आहे असे पंतप्रधान म्हणाले. स्थानिक पुरवठा साखळीमध्ये गुंतवणूक करणे आणि या साखळीला भविष्यासाठी सज्ज करणे यावर भर देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की या क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी आता ही सबब सांगू नये की, इतक्या कमी अवधीत हे कसे घडून येईल. “जर आपल्याला भविष्यात फायदा मिळवायचा असेल तर आज  आपल्याला स्थानिक पुरवठा साखळीमध्ये गुंतवणूक करावीच लागेल. विकसित भारताच्या उभारणीचा आणि 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न साकार करण्याचा हाच मार्ग आहे,”त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की या मार्गाचे अनुसरण करुनच, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वदेशीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येईल. “ज्यांनी आत्मनिर्भर भारताची स्वप्ने बघितली आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ दिले त्यांच्यासाठी खादी हे केवळ कापड नव्हते तर ते त्यांचे अस्त्र होते,” पंतप्रधान मोदी उद्गारले.

 

9 ऑगस्ट या दिवसाच्या समयोचिततेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की ही तारीख देशातील सर्वात मोठ्या चळवळीची साक्षीदार आहे. ती म्हणजे पूज्य महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत छोडो’ चळवळ. या चळवळीच्या माध्यमातून गांधीजींनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यानंतर काही काळातच ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागले. आपला देश आज इच्छाशक्तीसह पुढे वाटचाल करत असताना ही आजच्या काळाची गरज आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. एकेकाळी ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी जो मंत्र वापरला गेला तोच वापरून आता विकसित भारत उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या घटकांना दूर केले पाहिजे असे ते म्हणाले. “संपूर्ण भारत आज एकमुखाने म्हणतो आहे की भ्रष्टाचार, वंशवाद आणि तुष्टीकरण यांनी भारत सोडून गेलेच पाहिजे.” मोदी उद्गारले. भारतातील या अनिष्ट बाबी  म्हणजे देशापुढील एक मोठे आव्हान आहे ही बाब अधोरेखित करत आपला देश यावर नक्कीच  विजय मिळवेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. “आपला देश विजयी होईल, भारतातील जनता जिंकेल,” ते पुढे म्हणाले.

 

भाषण संपवताना पंतप्रधानांनी गेली अनेक वर्षे तिरंगा झेंडा विणण्यासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या महिलांशी केलेल्या संवादावर प्रकाश टाकला. नागरिकांनी तिरंगा फडकवावा आणि पुन्हा एकदा ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे करावे असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा घरांच्या छतावर तिरंगा फडकवला जातो तेव्हा तो आपल्या मनात देखील फडकतो,” पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शन जरदोश, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण तातू राणे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशातील कला आणि कारागिरीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलाकार आणि कारागिरांना प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठिंब्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच पुरस्कर्ते राहिले आहेत  याच दृष्टिकोनाला आणखी पुढे नेण्याच्या हेतूने केंद्र सरकारने राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करायला सुरुवात केली असून देशात पहिला राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट, 2015 रोजी साजरा झाला. देशात 7 ऑगस्ट, 1905 रोजी  स्वदेशी चळवळीचा आरंभ झाला म्हणून त्या तारखेचे औचित्य ठेवून 7 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती. या माध्यमातून  देशांतर्गत उद्योग आणि विशेषतः हातमाग विणकरांना  प्रोत्साहन मिळाले.

यावर्षी नववा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते   “भारतीय वस्त्र एवं  शिल्प कोष” (कापड आणि हस्तकलांचे भांडार) या ई-पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. हे पोर्टल राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (एनआयएफटी) ने विकसित केले आहे.

या कार्यक्रमाला 3000 हून अधिक हातमाग आणि खादी विणकर, कारागीर तसेच वस्त्रोद्योग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातील हातमाग समूह, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थांची संकुले, विणकर सेवा केंद्रे, भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था परिसर, राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ, हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद, खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आणि विविध राज्यांमधले हातमाग विभाग एका छताखाली येतील.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Business confidence hits five-quarter high despite global headwinds: CII

Media Coverage

Business confidence hits five-quarter high despite global headwinds: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister salutes the brave personnel of the National Disaster Response Force on its Raising Day
January 19, 2026

Lauding the the courage, dedication and selfless service of the brave personnel of the National Disaster Response Force the Prime Minister Shri Narendra Modi today greeted them on the occasion of its Raising Day.

In a post on X, he wrote:

“On the Raising Day of the National Disaster Response Force (NDRF), we extend our deepest appreciation to the men and women whose professionalism and resolve stand tall in moments of crisis. Always at the forefront when a calamity strikes, NDRF personnel work tirelessly to protect lives, provide relief and restore hope under the most challenging circumstances. Their skills and sense of duty exemplify the highest standards of service. Over the years, the NDRF has emerged as a benchmark in disaster preparedness and response, earning much respect internationally.

@NDRFHQ”