आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.

द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम् मधील “सौराष्ट्रे सोमनाथम् च श्रीशैल मल्लिकार्जुनम्” हा मंत्रोच्चार करत मोदी यांनी बारा ज्योतिर्लिंगांमध्ये प्रभू सोमनाथ आणि भगवान मल्लिकार्जुन यांची नावे सुरुवातीला येत असल्याचे अधोरेखित केले. “गुजरातमध्ये सोमनाथांच्या पवित्र भूमीवर जन्म होणे, काशीमध्ये बाबा विश्वनाथांच्या भूमीची सेवा करायला मिळणे आणि आता श्रीशैलम यांचे आशीर्वाद मिळणे हे माझे भाग्य आहे,” असे मोदी म्हणाले. श्रीशैलम् येथे भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट दिली आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.त्यांनी अल्लमा प्रभू आणि अक्कमहादेवी या आदरणीय शैव संतांना वंदन केले. त्यांनी श्री उय्यलावाडा नरसिंह रेड्डी गारू आणि श्री हरी सर्वोत्तम राव यांच्यासह महान स्वातंत्र्य सैनिकांना देखील आदरांजली वाहिली.
“आंध्र प्रदेश ही स्वाभिमान आणि महान संस्कृतीची भूमी आहे त्याचबरोबर ते विज्ञान आणि नवोन्मेष यांचे देखील केंद्र आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. या राज्याच्या अमर्याद क्षमतेवर आणि युवा वर्गाच्या असीमित सामर्थ्यावर त्यांनी भर दिला. आंध्र प्रदेशला योग्य दृष्टीकोन आणि नेतृत्वाची गरज होती,अशी टिप्पणी त्यांनी केली. आज चंद्राबाबू नायडू गारु आणि पवन कल्याण गारू यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून आंध्र प्रदेशला द्रष्ट्या नेतृत्वासोबत केंद्र सरकारचे संपूर्ण पाठबळ मिळाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
गेल्या सोळा महिन्यांत आंध्र प्रदेशचा वेगाने विकास झाला असून केंद्र आणि राज्यातील त्यांच्या सरकारच्या काळात अभूतपूर्व प्रगती झाली आहे, असे अधोरेखित करून, दिल्ली आणि अमरावती गतिमान विकासाच्या दिशेने एकत्र काम करत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. 2047 पर्यंत भारत निश्चितच एक विकसित राष्ट्र असेल, आणि 21 वे शतक भारत आणि त्याच्या 140 कोटी नागरिकांचे आहे, याचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. रस्ते, वीज, रेल्वे, महामार्ग आणि व्यापार याच्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. या उपक्रमांमुळे राज्यातली दळणवळण व्यवस्था मजबूत होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांचे राहणीमान सुलभ होईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पांमुळे कुर्नूल आणि आसपासच्या प्रदेशांना मोठा लाभ मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि राज्यातील जनतेचे त्यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही देशाच्या अथवा राज्याच्या विकासासाठी ऊर्जा सुरक्षा आवश्यक असते, यावर भर देत, पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रात अंदाजे 3,000 कोटी रुपये खर्चाचा पारेषण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, यामुळे देशाची ऊर्जा क्षमता आणखी वाढेल. वेगवान विकासादरम्यान भूतकाळातील परिस्थिती विसरू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ते म्हणाले की, 11 वर्षांपूर्वी विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात दरडोई विजेचा वापर 1,000 युनिटपेक्षाही कमी होता, आणि देशाला वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत होता. हजारो गावांमध्ये विजेचे खांबही नव्हते. आज स्वच्छ ऊर्जेपासून, ते एकूण ऊर्जा उत्पादनापर्यंत, भारत सर्वच क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे, दरडोई वापर 1,400 युनिटपर्यंत वाढला आहे, आणि उद्योग आणि घरगुती ग्राहकांना पुरेसा वीज पुरवठा होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
आंध्र प्रदेश हे भारताच्या ऊर्जा क्रांतीचे प्रमुख केंद्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी श्रीकाकुलम ते अंगुल दरम्यान नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे सुमारे पंधरा लाख घरांना गॅस पुरवठा होईल. त्यांनी चित्तूर येथे एलपीजी बॉटलिंग प्लांटचे उद्घाटनही केले. या प्लांटमध्ये दररोज वीस हजार सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. या सुविधेमुळे स्थानिक वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल आणि तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
"देशभरात मल्टी-मोडल पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे आणि आम्ही खेड्यांपासून शहरांपर्यंत आणि शहरांपासून बंदरांपर्यंत कनेक्टिविटीवर भर देत आहोत", असे त्यांनी सांगितले. सब्बावरम आणि शीलानगर दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल असे ते म्हणाले. रेल्वे क्षेत्राबाबत बोलताना, त्यांनी असे नमूद केले की, नवीन रेल्वे मार्गांचे उद्घाटन आणि रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली असून, यामुळे प्रवाशांची सुलभता वाढेल आणि या क्षेत्रातील उद्योगांना नवीन गती मिळेल.
2047 साला पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध आहे, आणि या संकल्पाला ‘स्वर्ण आंध्र’च्या दृष्टिकोनामुळे नवी ऊर्जा मिळत आहे, यावर भर देऊन, आंध्र प्रदेश आणि इथला तरुण, नेहमीच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर राहिले आहेत आणि केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारच्या काळात या क्षमतेचा आणखी वापर आणि विस्तार होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

“आज जग भारतात आणि आंध्र प्रदेशात होणाऱ्या प्रगतीचा वेग आणि आवाका पाहत आहे,” असे मोदी म्हणाले. केवळ दोन दिवसांपूर्वी, गूगलने आंध्र प्रदेशात मोठी गुंतवणूक जाहीर केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गूगल या राज्यात भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे नवीन एआय केंद्र शक्तिशाली एआय पायाभूत सुविधा, डेटा केंद्र क्षमता, मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्रोत आणि विस्तारित फायबर-ऑप्टिक नेटवर्कची सुविधा देईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
गूगलची एआय केंद्र गुंतवणूक ही एका नवीन आंतरराष्ट्रीय जालान्तर्गत गेटवे (International Subsea Gateway) च्या विकासाचा भाग असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. या गेटवेमध्ये विशाखापट्टणम इथे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय जालान्तर्गत केबल्सचा समावेश असेल. हा प्रकल्प विशाखापट्टणमला केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एआय आणि जागतिक जोडणीचे प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करेल, असे त्यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचे विशेष अभिनंदन केले.
भारताच्या प्रगतीसाठी आंध्रचा विकास आवश्यक आहे आणि आंध्रच्या प्रगतीसाठी रयलसीमा प्रदेशाची प्रगती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन करून मोदी म्हणाले की, आज करनूलच्या भूमीवर सुरू झालेले प्रकल्प रायलसीमाच्या प्रत्येक जिल्ह्यात रोजगार आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडतील आणि या प्रदेशात औद्योगिक विकासाला गती देतील.
आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्यासाठी नवीन औद्योगिक कॉरिडॉर आणि केंद्र स्थापन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. सरकार ओरवाकल आणि कोप्पार्थी यांना राज्याची नवीन औद्योगिक ओळख म्हणून विकसित करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदेशांमध्ये वाढणारी गुंतवणूक सातत्याने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे असेही ते म्हणाले.

“आज, जग भारताकडे 21 व्या शतकाचे नवीन उत्पादन केंद्र म्हणून पाहत आहे आणि आत्मनिर्भर भारताची दृष्टी या यशाचा आधार आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. आंध्र प्रदेश आत्मनिर्भर भारताच्या यशात एक महत्त्वाचा योगदानकर्ता म्हणून उदयाला येत आहे, यावर त्यांनी भर दिला. पूर्वीच्या सरकारांनी आंध्र प्रदेशच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले, त्याचा फटका संपूर्ण देशाला बसला. राष्ट्रीय प्रगतीला चालना देणारे हे राज्य स्वतःच्या विकासासाठी संघर्ष करत राहिले, असे मोदी यावेळी म्हणाले. आपल्या सरकारच्या काळात आंध्र प्रदेशची दिशा बदलत असून, उत्पादनात वेगाने वाढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी निम्मलुरु येथे एका प्रगत नाईट व्हिजन कारखान्याच्या उद्घाटनाची घोषणा केली. हे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ही सुविधा भारताची नाईट व्हिजन उपकरणे, क्षेपणास्त्र सेन्सर्स आणि ड्रोन गार्ड सिस्टीम तयार करण्याची क्षमता वाढवेल आणि देशाच्या संरक्षण निर्यातीला नव्या उंचीवर नेईल, असे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालीचे यश संपूर्ण जगाने पाहिले होते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
आंध्र प्रदेश सरकारने करनूलला भारताचे ड्रोन केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, ड्रोन उद्योगामुळे करनूलमध्ये आणि संपूर्ण आंध्रमध्ये भविष्यवेधी तंत्रज्ञानाशी जोडलेली अनेक नवीन क्षेत्रे उदयाला येतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोनच्या यशाचा उल्लेख करुन, येत्या काही वर्षांत करनूल ड्रोन क्षेत्रात राष्ट्रीय शक्ती बनेल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी नागरिक-केंद्रित विकासाच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि नागरिकांचे जीवन सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकला. 12 लाख रुपयां पर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त आहे आणि परवडणारी औषधे, कमी खर्चाची आरोग्य सेवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड यांसारख्या उपक्रमांनी जीवन सुलभतेच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे, हे पंतप्रधानांनी नमूद केले.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून वस्तू आणि सेवा करात महत्त्वाची कपात लागू केली असल्याचे त्यांनी सांगितले. नारा लोकेश गारू यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी बचत उत्सव साजरा होत असल्याचे पाहून आनंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सुपर जीएसटी – सुपर बचत या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांनी नारा लंकेश गारू यांचे कौतुक केले. नेक्स्ट जेन जीएसटी सुधारणांमुळे आंध्र प्रदेशातील जनतेची ₹8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बदल होण्याची अपेक्षा असून, यामुळे या उत्सवाच्या उत्साहात भर पडेल असे ते म्हणाले. व्होकल फॉर लोकल प्रतिज्ञेसह जीएसटी बचत उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विकसित आंध्र प्रदेशाच्या माध्यमातूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नवीन प्रकल्पांसाठी राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले.
या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे राज्यपाल सय्यद अब्दुल नझीर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री राममोहन नायडू किंजरापू, डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे 13,430 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांअंतर्गत उद्योग क्षेत्र, वीज पारेषण , रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन, तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. हे प्रकल्प म्हणजे प्रादेशिक स्तरावर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी, औद्योगिकीकरणाला गती देण्यासाठी आणि राज्यात सर्वसमावेशक सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीच्या सरकारच्या वचनबद्धतेची साक्ष देणारे प्रकल्प आहेत.
आपल्या या भेटीत पंतप्रधानांनी 2,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या कर्नूल-III वीज एकत्रिकरण स्थानकातील पारेषण व्यवस्था सक्षमीकरण प्रकल्पाचीही पायाभरणीही केली. या प्रकल्पाअंतर्गत 765 किलोव्होल्टचे डबल-सर्किट कर्नूल-III वीज एकत्रिकरण स्थानक – चिलकलुरीपेटा पारेषण वाहिनीच्या बांधकामाचा अंतर्भाव आहे. यामुळे वीज विरणाची क्षमता 6,000 मेगाव्होल्ट ॲम्पीअरने वाढणार आहे, तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात नवीकरणीय ऊर्जा पारेषण शक्य होणार असल्याने या कामामुळे देशाच्या प्रगतील मोठे पाठबळ लाभणार आहे.

यावेळी पंतप्रधानांनी कर्नूल मधील ओर्वाकल औद्योगिक क्षेत्र आणि कडपा इथल्याल कोप्पार्थी औद्योगिक क्षेत्राची पायाभरणीही केली. या प्रकल्पांसाठी एकूण 4,920 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. हे आधुनिक, बहु-क्षेत्रीय औद्योगिक केंद्रांमध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्ट (NICDIT) तसेच आंध्र प्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केले असून. हे औद्योगिक केंद्र वापरासाठी सुसज्ज (plug-and-play) पायाभूत सुविधा आणि कामाच्या ठिकाणी पायी चालत पोहचा (walk-to-work) या संकल्पनेसह विकसित केले गेले आहे. अशा प्रकारच्या सोयी सुविधांमुळे या केंद्राअंतर्गत 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल आणि अंदाजे 1 लाख रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशात औद्योगिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेलाही चालना मिळू शकणार आहे.
रस्ते विषयक पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या उद्देशाने पंतप्रधानांनी 960 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सब्बावरम ते शीलनगरपर्यंतच्या सहा - पदरी हरित क्षेत्र महामार्गाच्या कामाचीही पायाभरणी केली. विशाखापट्टणममधील वाहतूक कोंडी कमी करणे तसेच व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासोबतच एकूण सुमारे 1,140 कोटी रुपये खर्चाचे सहा रस्ते प्रकल्पही सुरु केले जाणार आहेत. याअंतर्गत पिलेरू - कालूर विभागातील चौपदरीकरण, कडपा / नेल्लोरे सीमेपासून ते सीएस पुरमपर्यंतचे रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्ग 165 वरील गुडीवाडा आणि नुजेल्ला रेल्वे स्थानकांदरम्यानचा चार पदरी रेल्वे उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग 716 वरील पाप्पग्नी नदीवरील प्रमुख पूल, राष्ट्रीय महामार्ग 565 वरील कनिगिरी बायपास, आणि राष्ट्रीय महामार्ग 544 DD वरील एन. गुंडलापल्ली शहरातील बायपास केलेल्या विभागाअंतर्गतची सुविधा अशा व्यापक कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमुळे सुरक्षिततेत सुधारणा घडून येईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच संपूर्ण आंध्र प्रदेशातील स्थानिक दळणवळणीय जोडणी अधिक बळकट होऊ शकणार आहे.

पंतप्रधानांनी 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि ते राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये कोट्टावलसा-विजियानगरम येथील चौथ्या रेल्वे मार्गाची पायाभरणी आणि पेंडुर्ती आणि सिंहचलम उत्तर दरम्यान रेल्वे उड्डाणपूल आणि कोट्टावलसा-बोद्दावरा विभाग आणि शिमिलीगुडा-गोरापूर विभागाच्या द्विदरीकरणाच्या कामाचे राष्ट्राला समर्पण यांचा समावेश आहे. हे प्रकल्प गर्दी कमी करत जलद आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतील. त्यांमुळे प्रवाशांची आणि मालवाहतुकीची सुरळीत वाहतूक सुलभ होऊन स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि संपूर्ण प्रदेशातील औद्योगिक, उद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल.
ऊर्जा क्षेत्रात, पंतप्रधानांनी गेल इंडिया लिमिटेडच्या श्रीकाकुलम-अंगुल नैसर्गिक वायू पाइपलाइनचे राष्ट्रार्पण केले. ही पाइपलाइन आंध्र प्रदेशात सुमारे 124 किमी आणि ओडिशामध्ये 298 किमी लांबीची असून, सुमारे 1730 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. त्यांनी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे इंडियन ऑइलच्या 60 टीएमटीपीए (वार्षिक हजार मेट्रिक टन) एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील चार जिल्हे, तामिळनाडूतील दोन जिल्हे आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात 80 वितरकांद्वारे 7.2 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देईल. या प्रदेशातील घरे आणि व्यवसायांसाठी विश्वासार्ह एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यात ही पाइपलाइन महत्त्वाची भूमिका बजावेल.
संरक्षण उत्पादन मजबूत करण्यासाठी,पंतप्रधानांनी कृष्णा जिल्ह्यातील निम्मलुरु येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सुमारे 360 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्थापन केलेल्या प्रगत नाईट व्हिजन उत्पादन कारखान्याचे लोकार्पण केले. या कारखान्यातून भारतीय संरक्षण दलांसाठी प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली तयार केल्या जातील, ज्यामुळे संरक्षण उत्पादनात स्वावलंबन वाढेल आणि या प्रदेशात कुशल रोजगाराला चालना मिळेल.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
I feel blessed to be born in Gujarat, the land of Somnath, to serve in Kashi, the land of Baba Vishwanath and to receive the blessings of Srisailam today: PM @narendramodi pic.twitter.com/cM6j5B1Y0X
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
I had the opportunity to pay tribute at the Sree Shivaji Spoorthi Kendra. I bow to Chhatrapati Shivaji Maharaj: PM @narendramodi pic.twitter.com/Ka3JFgGITM
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Andhra Pradesh is the land of 'Swabhimaan' and 'Sanskriti'. It is also a hub of science and innovation. pic.twitter.com/n2T3Uaxrn8
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Today, from clean energy to total energy production, India is setting new records in every field. pic.twitter.com/KJoLC0Hx4P
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Today, multi-modal infrastructure is developing rapidly across the country. We are focusing strongly on connectivity, from villages to cities and from cities to ports. pic.twitter.com/Uj3LE7k6wE
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Today, the world is witnessing the speed and scale of both India and Andhra Pradesh. Google is set to establish India's first Artificial Intelligence Hub in Andhra Pradesh. pic.twitter.com/SfBNzsWMiE
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Today, the world sees India as the new manufacturing centre of the 21st century. pic.twitter.com/cpuD4x9yYj
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025
Our government's vision is citizen-centric development. Through continuous reforms, we are making people's lives easier. pic.twitter.com/OQe2MDHQLA
— PMO India (@PMOIndia) October 16, 2025


