पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधला.

या प्रतिनिधीमंडळात दाऊदी बोहरा समुदायातील उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. आपला संघर्ष विषद करताना, त्यांनी आपल्या समुदायातील सदस्यांच्या मालकीच्या मालमत्तांवर वक्फने चुकीच्या पद्धतीने कसा दावा केला, ते सांगितले. वक्फ सुधारणा कायदा आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि ही मागणी दीर्घ काळापासून प्रलंबित होती, असे सांगितले.

दाऊदी बोहरा समाजाबरोबर पंतप्रधानांचे असलेले जुने घनिष्ट संबंध आणि त्यांनी केलेल्या सकारात्मक कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. या कायद्याचा त्यांच्या समाजाला कसा लाभ मिळेल, याविषयी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांनी हा कायदा केवळ अल्पसंख्याकांसाठीच नव्हे, तर अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्य समुदायासाठी आणला आहे. भारताने नेहमीच आपल्या समुदायाला स्वतःची ओळख मिळवायला प्रोत्साहन दिल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना समावेशकतेची भावना जाणवते.
वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाविषयी चर्चा करताना या प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी भारताला विकसित करण्याच्या वाटचालीत कटिबद्धता आणि सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पंतप्रधानांच्या ‘खरा विकास लोक-केंद्री असला पाहिजे’ या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेतृत्वाची देखील त्यांनी प्रशंसा केली. आत्मनिर्भर भारत, एमएसएमई उद्योगांना पाठबळ इत्यादींसारख्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा करत ते म्हणाले की हे उपक्रम विशेषतः लहान व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. महिला शक्तीला सक्षम करण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि अशाच इतर उपक्रमांसारख्या सरकारने उचललेल्या पावलांचे देखील त्यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना वक्फ सुधारणा कायदा आणण्यासाठी गेली अनेक वर्षे केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. वक्फ मुळे लोकांपुढे उभ्या राहिलेल्या समस्यांविषयी त्यांनी सांगितले आणि ते म्हणाले की विद्यमान यंत्रणेमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागणाऱ्या महिला, विशेषतः विधवा हा कायदा करण्यातील सर्वात महत्त्वाची प्रेरणा ठरल्या.

पंतप्रधानांनी यावेळी दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी असलेल्या घट्ट नात्याची आठवण केली. या समुदायातर्फे केले जाणारे समाज कल्याण कार्य आपण गेली अनेक वर्षे बघत आलो आहोत असे सांगून त्यांनी हे कार्य करण्याच्या समुदायाच्या परंपरेची प्रशंसा केली. वक्फ सुधारणा कायदा आणण्यात या समुदायाच्या विशेष योगदानाचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की जेव्हा हा कायदा करण्यासाठीचे कार्य हाती घेण्यात आले तेव्हा ज्या मोजक्या लोकांशी त्यांनी याबद्दल पहिल्यांदा चर्चा केली त्यात सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचा समावेश होता आणि त्यांनी या कायद्याच्या विविध बारकाव्यांवर केलेली तपशीलवार टिप्पणी अत्यंत महत्त्वाची होती.

Had a wonderful meeting with members of the Dawoodi Bohra community! We talked about a wide range of issues during the interaction.@Dawoodi_Bohras pic.twitter.com/OC09EgcJPG
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2025


