पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. "श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
"श्री नारायण गुरूंचे आदर्श संपूर्ण मानवतेसाठी एक खूप मोठी ठेव आहे",असे उद्गार मोदी यांनी काढले. देश आणि समाजाच्या सेवेसाठी वचनबद्ध असलेल्यांसाठी श्री नारायण गुरू दीपस्तंभासारखे आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी समाजातील शोषित, पीडित आणि वंचित घटकांशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी सांगितले. पंतप्रधानांनी सांगितले की आजही जेव्हा ते या समुदायांच्या कल्याणासाठी मोठे निर्णय घेतात तेव्हा ते गुरुदेवांचे स्मरण करतात. 100 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती, शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे निर्माण झालेल्या विकृती,यामुळे त्या वेळी लोक प्रचलित सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध बोलण्यास घाबरत होते, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. मात्र श्री नारायण गुरू विरोधाची पर्वा करणारे नव्हते, ते आव्हानांमुळे घाबरून गेले नाहीत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी असे निदर्शनास आणून दिले की श्री नारायण गुरूंचा दृढ विश्वास समरसता आणि समानतेमध्ये होता. सत्य, सेवा आणि सलोखा यावर त्यांचा विश्वास होता. हीच प्रेरणा आपल्याला 'सबका साथ, सबका विकास' चा मार्ग दाखवते असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा विश्वास आपल्याला असा भारत निर्माण करण्यास बळ पुरवतो, जिथे शेवटच्या टप्प्यावर उभी असलेली व्यक्ती आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे.

शिवगिरी मठाशी संबंधित लोक आणि संतांना श्री नारायण गुरू आणि मठावरील आपल्या अढळ श्रद्धेविषयी ठाऊक आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की त्यांना नेहमीच मठातील पूजनीय संतांचा स्नेह लाभला आहे. त्यांनी 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीची आठवण सांगितली. या आपत्तीमध्ये शिवगिरी मठातील अनेक लोक अडकले होते, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, मठाने त्यांच्यावर अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी सोपवली होती. संकटाच्या वेळी, सर्वप्रथम आपल्या माणसांची, ज्यांच्यावर आपला अधिकार आहे, अशी भावना ज्यांच्याविषयी आपल्याला वाटते, त्यांची आठवण होते, असे मोदी यांनी नमूद केले. शिवगिरी मठाच्या संतांशी असलेले नाते आणि आपल्याप्रती असलेला त्यांचा विश्वास यापेक्षा मोठे आध्यात्मिक समाधान असू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. वर्काला हे अनेक वर्षे दक्षिणेची काशी ' म्हणून ओळखले जात होते, असे त्यांनी नमूद केले. काशी उत्तरेत असो वा दक्षिणेत , प्रत्येक काशी ही आपण आपलीच असल्याचे मानतो असे त्यांनी सांगितले.
भारताच्या आध्यात्मिक परंपरा आणि ऋषीमुनींचा वारसा अगदी तपशीलवारपणे समजून घेण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वतःला नशीबवान समजत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जेव्हा जेव्हा राष्ट्राला अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा तेव्हा देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून एक महान व्यक्तिमत्व पुढे येऊन समाजाला नवीन मार्ग दाखवतो, ही भारताची अनोखी ताकद आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. काही जण समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करतात, तर काही जण सामाजिक सुधारणांना गती देतात, असे त्यांनी नमूद केले. श्री नारायण गुरु हे असेच एक महान संत होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांचे निवृत्ती पंचकम आणि आत्मोपदेश शतकम यांसारखे ग्रंथ अद्वैत आणि आध्यात्मिक अभ्यास करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून कामी येणाऱ्या रचना आहेत असे त्यांनी नमूद केले.

श्री नारायण गुरु यांचे मुख्य कार्य हे योग, वेदांत, आध्यात्मिक अभ्यास आणि मुक्ती या क्षेत्रातले असल्याचे त्यांनी सांगितले. वाईट सामाजिक प्रवृत्तींमध्ये अडकलेल्या समाजाची आध्यात्मिक उन्नती ही केवळ सामाजिक प्रगतीद्वारेच साध्य होऊ शकते, यावर श्री नारायण गुरु यांनी भर दिला होता असे ते म्हणाले. श्री नारायण गुरु यांनी अध्यात्मिकतेला सामाजिक सुधारणा आणि सार्वजनिक कल्याणाचे माध्यम बनवले, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
गांधीजींनाही श्री नारायण गुरुंच्या प्रयत्नांतून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या विद्वानांनाही श्री नारायण गुरुंसोबतच्या चर्चेतून लाभ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
एकदा कोणीतरी रमण महर्षींना श्री नारायण गुरु यांचे आत्मोपदेश शतकम वाचून दाखवले होते, तेव्हा ते ऐकून रमण महर्षीं यांनी त्यांना सर्व काही माहित असल्याचे सांगितल्याचा प्रसंग पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितला. परदेशी विचारधारांनी भारताची परंपरा, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्री नारायण गुरु यांनी याबाबतचा दोष आपल्या मूळ परंपरांमध्ये नव्हता, तर आपल्याला आपली अध्यात्मिकता खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याची गरज होती ही बाब लक्षात आणून दिली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. आपण प्रत्येक मानवात नारायण, प्रत्येक सजीवात शिव पाहणारे लोक आहोत असे त्यांनी सांगितले. आपण द्वैतात अद्वैत, विविधतेत एकता आणि मतमतांतरातही एकरुपता पाहतो असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी श्री नारायण गुरु यांच्या ओरु जाती, ओरू मथ्तम, ओरु दैवम, मनुष्यनुम अर्थात एक जात, एक धर्म, एक ईश्वर मानवासाठी या मंत्राविषयी देखील सर्वांना सांगितले. हा मंत्र सर्व मानवजाती आणि सर्व सजीवांच्या एकतेचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. हे तत्त्वज्ञान भारताच्या नागरी संस्कृतीच्या नीतीमत्तेचा पाया आहे, असे त्यांनी सांगितले. आज भारत जागतिक कल्याणाच्या भावनेतून या तत्त्वज्ञानाची व्याप्ती विस्तारत आहे, असे त्यांनी नमूद केले. अलीकडेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि या वर्षीची संकल्पना 'एक पृथ्वी, एक आरोग्य' अशी होती, ही संकल्पना एक पृथ्वी आणि सार्वत्रिक कल्याणाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. यापूर्वीही भारताने मानवतेच्या कल्याणासाठी एक जग, एक आरोग्य यांसारखे जागतिक उपक्रमही राबवले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता भारत एक सूर्य, एक पृथ्वी, एक ग्रीड यांसारख्या शाश्वत विकासाला दिशा देणाऱ्या जागतिक चळवळींचे नेतृत्व करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 2023 मध्ये भारताच्या जी 20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना राबवली होती याचेही त्यांनी स्मरण करून दिले. हे प्रयत्न वसुधैव कुटुंबकम् या भावनेत रुजलेले आहेत आणि श्री नारायण गुरु यांच्यासारख्या संतांच्या आयुष्यातून प्रेरित आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले.
श्री नारायण गुरु यांनी भेदभावमुक्त समाजाचे स्वप्न पाहीले होते, आज देश पूर्ण समाधान देण्याचा दृष्टीकोन (saturation approach) अंगीकारून भेदभावाची प्रत्येक शक्यता संपुष्टात आणत आहे असे पंतप्रधान म्हणले. लोकांनी 10-11 वर्षांपूर्वीच्या परिस्थिती आठवून पाहावी असे आवाहन त्यांनी लोकांना केले. त्यावेळी स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही लाखो नागरिकांना अत्यंत कठीण परिस्थितीत जगण्यास भाग पाडले गेले. लाखो कुटुंबांकडे निवारा नव्हता, असंख्य गावांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि आरोग्यसेवेच्या अभावामुळे किरकोळ आजारांवरही उपचार करता येत नव्हते, तर गंभीर आजारांच्या बाबतीत जीव वाचवण्याचाही कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता असे पंतप्रधान म्हणाले.
लक्षावधी गरीब लोक- दलित, आदिवासी, महिला मूलभूत मानवतेच्या प्रतिष्ठेपासून वंचित होते, असे ते म्हणाले. अनेक पिढ्यानपिढ्या या हालअपेष्टा पुढे चालत राहिल्याने कित्येकांनी चांगल्या जीवनाची आशाच सोडून दिली होती, यावर मोदी यांनी भर दिला. इतकी मोठी लोकसंख्या हालअपेष्टांच्या आणि निराशेच्या वातावरणात जीवन जगत असताना एखादा देश कसा काय प्रगती करू शकणार होता, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. आपल्या सरकारने करुणाभाव आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवला आणि सेवा म्हणजे एक मोहीम बनवली, असे मोदी यांनी अधोरेखित केले. याचाच परिणाम म्हणून पीएम आवास योजने अंतर्गत लक्षावधी गरीब, दलित, उपेक्षित आणि वंचित कुटुंबांना कायमस्वरुपी घरे मिळाली आहेत, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक गरीब नागरिकाला घर देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि सांगितले की, ही घरे केवळ विटा आणि सिमेंटची बांधकामे नाहीत, तर ती घराच्या पूर्ण संकल्पनेचे प्रतिबिंब आहेत, जी सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहेत.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली घरे गॅस, वीज आणि स्वच्छता सुविधांनी सुसज्ज असतात. ज्या अंतर्गत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवले जात आहे त्या जल जीवन मिशनबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, आदिवासी भागांमध्ये जिथे सरकारी सेवा कधीही पोहोचल्या नव्हत्या, तिथेही आता विकास निश्चित झाला आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वात वंचित आदिवासी समुदायांसाठी पंतप्रधान जनमन योजना सुरू करण्यात आली आणि या उपक्रमामुळे अनेक प्रदेशांमध्ये परिवर्तन होत आहे. मोदींनी सांगितले की, याचा परिणाम म्हणून, समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरील लोकांमध्येही नवीन आशा निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “हे उपक्रम केवळ त्यांचे जीवनच बदलत नाहीत, तर त्यामुळे राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावताना ते स्वतःला पाहात आहेत.”
पंतप्रधानांनी सांगितले की, श्री नारायण गुरुंनी महिला सक्षमीकरणावर सातत्याने भर दिला, आणि सरकार 'महिला-नेतृत्वाखालील विकास' या मंत्रासह प्रगती करत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही, भारतात अशी अनेक क्षेत्रे होती जिथे महिलांना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने हे निर्बंध काढून टाकले, ज्यामुळे महिलांना नवीन क्षेत्रांमध्ये आपले अधिकार मिळवता आले, यावर त्यांनी भर दिला. आज खेळांपासून ते अंतराळापर्यंत, महिला प्रत्येक क्षेत्रात देशाला अभिमान वाटेल असे काम करत आहेत, असे मोदी यांनी अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक वर्ग आणि घटक आता विकसित भारताच्या स्वप्नात नव्या आत्मविश्वासाने योगदान देत आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन, पर्यावरण मोहीम, अमृत सरोवरांची निर्मिती आणि भरड धान्य जनजागृती अभियान यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. त्यांनी यावर भर दिला की, हे प्रयत्न 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याने सार्वजनिक सहभागाच्या भावनेतून पुढे जात आहेत.
श्री नारायण गुरुंनी "शिक्षणातून ज्ञान, संघटनेतून सामर्थ्य आणि उद्योगातून समृद्धी" अशी घोषणा केली होती. त्यांचे हे कालातीत विचार अधोरेखित करताना, मोदी म्हणाले, "श्री नारायण गुरुंनी केवळ हे विचार मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाच्या संस्थांचा पाया देखील घातला." पंतप्रधानांनी नमूद केले की, गुरुजींनी शिवगिरी येथे देवी सरस्वतीला समर्पित शारदा मठ स्थापन केला. ही संस्था या विश्वासाचे प्रतीक आहे की, शिक्षण हे उपेक्षित लोकांसाठी उत्थानाचे आणि मुक्तीचे साधन बनले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. गुरुदेवांनी सुरू केलेले प्रयत्न आजही विस्तारत आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये, गुरुदेव केंद्रे आणि श्री नारायण सांस्कृतिक मिशन मानवाच्या कल्याणासाठी सक्रियपणे काम करत आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

"शिक्षण, संघटना आणि औद्योगिक प्रगतीद्वारे सामाजिक कल्याणाची दृष्टी देशाच्या सध्याच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टपणे दिसून येते," पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की, अनेक दशकांनंतर एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. हे धोरण केवळ शिक्षणाचे आधुनिकीकरण करत नाही आणि ते अधिक सर्वसमावेशक बनवत नाही, तर मातृभाषेत शिक्षणालाही प्रोत्साहन देते. या उपक्रमाचे सर्वात मोठे लाभार्थी समाजातील वंचित आणि उपेक्षित वर्ग आहेत, यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी सांगितले की, गेल्या दशकात, देशभरात स्थापन झालेल्या नवीन IITs, IIMs, आणि AIIMS ची संख्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 60 वर्षांत तयार झालेल्या एकूण संस्थांपेक्षा जास्त आहे. परिणामी, गरीब आणि वंचित तरुणांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या 10 वर्षांत आदिवासी भागांमध्ये 400 हून अधिक एकलव्य निवासी शाळा उघडण्यात आल्या आहेत.
पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेली आदिवासी समाजातील मुले आता प्रगती करत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाचा थेट संबंध कौशल्य आणि संधींशी जोडला गेला आहे. स्किल इंडिया सारखे उपक्रम तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी सक्षम बनवत आहेत. देशाची औद्योगिक प्रगती अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, खासगी क्षेत्रातील मोठ्या सुधारणा आणि मुद्रा योजना आणि स्टँड अप इंडियासारख्या योजनांचा दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला सर्वाधिक लाभ मिळत आहे.

"श्री नारायण गुरु यांनी एका मजबूत आणि सक्षम भारताची कल्पना केली होती आणि हे स्वप्न साकारण्यासाठी भारताने आर्थिक, सामाजिक आणि लष्करी क्षेत्रात अग्रेसर राहायला हवे,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले की देश या मार्गावर स्थिरपणे वाटचाल करत आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. मोदी यांनी सांगितले की, जगाने अलिकडेच भारताची ताकद पाहिली आहे, ऑपरेशन सिंदूरने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भारताचे ठाम आणि अढळ धोरण स्पष्टपणे दाखवून दिले आहे. भारताने हे स्पष्ट केले आहे की, भारतीय नागरिकांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांसाठी कोणतेही आश्रयस्थान सुरक्षित नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
"आजचा भारत केवळ राष्ट्रहितासाठी जे योग्य आहे त्या आधारावर निर्णय घेतो", असे सांगून मोदी म्हणाले की, लष्करी गरजांसाठी देशाचे परकीय राष्ट्रांवरील अवलंबित्व सातत्याने कमी होत आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान हा बदल स्पष्टपणे दिसून आला, जिथे भारतीय सैन्याने देशांतर्गत निर्मित शस्त्रे वापरून शत्रूला 22 मिनिटांत आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडले. आगामी काळात मेड इन इंडिया शस्त्रास्त्रे जागतिक स्तरावर मान्यता आणि प्रशंसा मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी श्री नारायण गुरूंची शिकवण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, सरकार या दिशेने सक्रियपणे काम करत आहे. श्री नारायण गुरू यांच्या जीवनाशी निगडित तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी शिवगिरी सर्किटचा विकास सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्री नारायण गुरूंचे आशीर्वाद आणि शिकवण देशाच्या अमृत काळाच्या प्रवासात मार्गदर्शन करत राहतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारतातील जनता एकत्रितपणे विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा शिवगिरी मठाच्या सर्व संतांप्रति आदर भाव व्यक्त केला, आणि श्री नारायण गुरूंचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी सदैव राहो, अशी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, श्री नारायण धर्म संघम ट्रस्टचे संत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1925 रोजी शिवगिरी मठ येथे दिलेल्या भेटीदरम्यान भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यात ऐतिहासिक संवाद झाला. वायकोम सत्याग्रह, धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, मोक्षप्राप्ती, शोषितांचे उत्थान, या आणि इतर मुद्द्यांवर हा संवाद होता.
श्री नारायण धर्म संघम ट्रस्टने आयोजित केलेल्या या उत्सवात आध्यात्मिक नेते आणि इतर सदस्य एकत्र येतील आणि भारताच्या सामाजिक आणि नैतिक रचनेला आकार देणाऱ्या दूरदर्शी संवादाचे चिंतन आणि स्मरण करतील. श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी या दोघांच्या सामाजिक न्याय, एकता आणि आध्यात्मिक सलोख्याबाबतच्या सामायिक दृष्टीकोनाला वाहिलेली ही आदरांजली आहे.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
The ideals of Sree Narayana Guru are a great treasure for all of humanity. pic.twitter.com/YmgAsjwVRA
— PMO India (@PMOIndia) June 24, 2025
India has been blessed with remarkable saints, sages and social reformers who have brought about transformative changes in society. pic.twitter.com/j9ZL7D6vJw
— PMO India (@PMOIndia) June 24, 2025
Sree Narayana Guru envisioned a society free from all forms of discrimination.
— PMO India (@PMOIndia) June 24, 2025
Today, by adopting the saturation approach, the country is working to eliminate every possibility of discrimination. pic.twitter.com/L4Z5ywIe69
Missions like Skill India are empowering the youth and making them self-reliant. pic.twitter.com/d1eu9IpP5d
— PMO India (@PMOIndia) June 24, 2025
To empower India, we must lead on every front - economic, social and military. Today, the nation is moving forward on this very path. pic.twitter.com/1zQFJK9CcA
— PMO India (@PMOIndia) June 24, 2025


