जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. "आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे," असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही शिखर परिषद आणि संवाद केवळ हवाई वाहतुकीसाठीच नव्हे, तर जागतिक सहकार्य, हवामान वचनबद्धता आणि न्याय्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही महत्त्वाचे आहे, यावर भर देत मोदी यांनी या शिखर संमेलनातील चर्चा जागतिक हवाई वाहतुकीला नवी दिशा देईल, तिच्या अमर्याद शक्यतांना खुले करेल आणि तिच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचे मार्ग शोधेल असा विश्वास व्यक्त केला. केवळ काही तासात अतिशय लांबचे अंतर कापण्याच्या आणि आंतरखंडीय प्रवास करण्याच्या मानवाच्या क्षमतेकडे लक्ष वेधत त्यांनी 21 व्या शतकातील आकांक्षा पारंपरिक प्रवासाच्या पलीकडे विकसित होत राहतील यावर भर दिला. नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा अफाट वेग विचारात घेत, पंतप्रधानांनी वाढत्या वेगानुसार दूर अंतरावरील गंतव्य स्थाने ही आपले भवितव्य बनत आहेत असे नमूद केले. आता प्रवास हा पृथ्वीवरील शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर वाढत्या महत्त्वाकांक्षांनुसार अंतराळ उड्डाणे आणि आंतरग्रहीय प्रवासाला व्यावसायिक करण्याच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या आहेत आणि त्यांचे नागरी हवाई वाहतुकीमध्ये एकात्मिकरण करण्याचा विचार होत असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. अशा प्रकारच्या घडामोडी घडायला काही काळ जाईल हे मान्य करत या घडामोडी हवाई वाहतुकीचे भविष्य म्हणजे परिवर्तन आणि नवोन्मेष यांचे केंद्र असल्याचे अधोरेखित करत आहेत, ज्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या तीन स्तंभांची रुपरेषा सादर केली. यातील पहिला स्तंभ म्हणजे प्रचंड मोठी बाजारपेठ-जी केवळ ग्राहकांचा समूह नाही तर भारताच्या आकांक्षी समाजाचे प्रतिबिंब आहे.
दुसरे, एक मजबूत वैशिष्ट्यपूर्ण लोकसंख्या आणि प्रतिभावंतांची खाण - जिथे युवा नवोन्मेषक कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये यश संपादन करत आहेत. तिसरे, एक खुली आणि सहाय्यक धोरणात्मक परिसंस्था - जी औद्योगिक विकासाला चालना देते. या सामर्थ्यासह आपल्या विमान वाहतूक क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यास भारत सज्ज आहे यावर मोदी यांनी भर दिला.
गेल्या काही वर्षांमध्ये नागरी विमान वाहतुकीत भारताने घडवून आणलेले उल्लेखनीय परिवर्तन पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे”. उडान योजनेच्या यशावर भर देत, भारतीय नागरी विमान वाहतूक इतिहासातील हा एक सुवर्ण अध्याय असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमांतर्गत, 15 दशलक्षहून अधिक प्रवाशांना किफायतशीर हवाई प्रवासाचा फायदा झाला आहे, ज्यामुळे अनेक नागरिक पहिल्यांदाच विमान प्रवास करू शकले आहेत असे मोदी म्हणाले.भारतातील विमान कंपन्या दोन अंकी वाढ साध्य करत आहेत, दरवर्षी 240 दशलक्ष लोक विमान प्रवास करतात - जगभरातील बहुतांश देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 2030 पर्यंत ही संख्या 500 दशलक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मोदी यांनी नमूद केले की, भारतात दरवर्षी 3.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हवाई मार्गाने केली जाते आणि या दशकाच्या अखेरीस हे प्रमाण 10 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढणार आहे.
ही संख्या केवळ आकडेवारी नाही तर भारताच्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब आहे यावर भर देत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ही क्षमता वाढवण्यासाठी भारत भविष्यवेधी मार्गदर्शक आराखड्यावर सक्रियपणे काम करत आहे. जागतिक दर्जाच्या विमानतळ पायाभूत सुविधांमधील भारताच्या गुंतवणुकीवर भर देताना त्यांनी नमूद केले की 2014 मध्ये देशात 74 विमानतळ कार्यरत होते, आज ही संख्या 162 वर गेली आहे.मोदी म्हणाले की भारतीय विमान कंपन्यांनी 2,000 हून अधिक नवीन विमानांसाठी ऑर्डर्स दिल्या असून या क्षेत्रातील जलद वाढीचे हे संकेत आहेत. ही केवळ सुरुवात आहे, भारताचा विमान वाहतूक उद्योग एका महत्त्वाच्या वळणावर असून अभूतपूर्व उंची गाठण्यासाठी सज्ज आहे यावर भर देऊन त्यांनी अधोरेखित केले की हे परिवर्तन केवळ भौगोलिक सीमा ओलांडणार नाही तर जागतिक स्तरावर शाश्वतता, हरित गतिशीलता आणि समान प्रवेश यांनाही चालना देईल.

"आता 500 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची भारतातील विमानतळांची वार्षिक क्षमता आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या अनुभवात नवीन मापदंड स्थापित करणाऱ्या काही मोजक्या राष्ट्रांपैकी भारत एक आहे", असे सांगत सुरक्षितता, कार्यक्षमता आणि शाश्वततेला समान प्राधान्य दिले जात आहे असे ते म्हणाले. शाश्वत विमान इंधन, हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने भारताचे संक्रमण त्यांनी अधोरेखित केले. विकासाप्रति संतुलित दृष्टिकोन बळकट करत प्रगती आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना डिजी यात्रा ॲपची ओळख करून घेण्याचे आवाहन करून ते डिजिटल हवाई वाहतुकीचे एक अग्रगण्य उदाहरण असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी यावर भर दिला की चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून डिजी यात्राने एक संपूर्ण, विना अडथळा प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे प्रवाशांना बोर्डिंग गेटवर कागदपत्रे किंवा ओळखपत्र प्रदर्शित न करता विमानतळावर प्रवेश करता येतो. मोदी म्हणाले की, मोठ्या लोकसंख्येला सेवा देण्याच्या भारताच्या नवोपक्रमांचा आणि अनुभवाचा अनेक देशांना फायदा होऊ शकतो. ते पुढे म्हणाले, "डिजी यात्रा एक सुरक्षित आणि स्मार्ट उपाय म्हणून उभे आहे, जे ग्लोबल साऊथसाठी प्रेरणास्वरूप ठरले आहे".
भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्रासाठी सातत्यपूर्ण सुधारणा हा एक महत्त्वाचा घटक आहे हे अधोरेखित करून जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर पंतप्रधानांनी भर दिला, ज्यासाठी धोरणात्मक उपक्रमांमुळे या दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल. औद्योगिक प्रगतीवर भारताचा भर असून त्यादृष्टीने या वर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली होती, याचा उल्लेख करून मोदी यांनी या वर्षी संसदेत मंजूर झालेल्या विमान वस्तू विधेयकातील हित रक्षण या मुद्द्यावर प्रकाश टाकला, ज्यामुळे केपटाऊन कराराला भारतात कायद्याचे बळ प्राप्त झाले. पंतप्रधानांनी सांगितले की या कायद्यामुळे जागतिक विमान भाडेपट्टे कंपन्यांसाठी भारतात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी गिफ्ट सिटीमध्ये देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनांकडेही लक्ष वेधले आणि सांगितले की या उपाययोजनांमुळे भारत विमान भाडेपट्टेसाठी एक आकर्षक ठिकाण बनला आहे.
"नवीन भारतीय विमान कायदा हा हवाई वाहतूक कायद्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत करतो, एक सुव्यवस्थित नियामक चौकट, अनुपालन सुलभता आणि सरलीकृत कररचना सुनिश्चित करतो, ज्यामुळे प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधी उपलब्ध होते", असे मोदी म्हणाले. हवाई वाहतूक क्षेत्राच्या वाढीमुळे नवीन उड्डाणे, नवीन नोकऱ्या आणि नवीन शक्यता निर्माण होतात, हा उद्योग वैमानिक, कर्मचारीवर्ग, अभियंते आणि ग्राउंड स्टाफसाठी विस्तारित संधी निर्माण करत आहे, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण परीक्षण (एमआरओ) या उदयोन्मुख क्षेत्राकडे लक्ष वेधले आणि अधोरेखित केले की भारत विमान देखभालीचे जागतिक केंद्र बनण्याच्या प्रयत्नांना गती देत आहे. त्यांनी नमूद केले की 2014 मध्ये भारतात 96 एमआरओ सुविधा होत्या, ज्या आता 154 पर्यंत वाढल्या आहेत तर स्वयंचलित मार्गाने 100 % थेट परकीय गुंतवणूक , जीएसटी कपात आणि कर सुसूत्रीकरण या उपायांमुळे भारताच्या एमआरओ क्षेत्राला नवीन गती मिळाली आहे. मोदी यांनी देशाच्या हवाई वाहतूक विकास धोरणाला बळकटी देण्यासाठी 2030 पर्यंत 4 अब्ज डॉलर्सचे एमआरओ हब स्थापन करण्याचे भारताचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
भारताकडे केवळ हवाई वाहतूक बाजारपेठ म्हणून न पाहता मूल्य साखळीतील आघाडीचा देश म्हणून पाहिले पाहिजे यावर भर देऊन पंतप्रधान म्हणाले की, डिझाइनपासून ते वितरणापर्यंत भारत हा जागतिक हवाई वाहतूक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनत आहे. त्यांनी भारताची दिशा आणि गती योग्य मार्गावर असल्याचे प्रतिपादन केले आणि देशाच्या निरंतर जलद प्रगतीवर विश्वास व्यक्त केला. मोदी यांनी विमान कंपन्यांना केवळ 'मेक इन इंडिया'च नव्हे तर 'डिझाइन इन इंडिया' याचा देखील स्वीकार करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे जागतिक हवाई वाहतूक नवोन्मेषात भारताचा नेतृत्वदायी दृष्टिकोन बळकट होऊ शकेल.
पंतप्रधानांनी नमूद केले की भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र त्याच्या सर्वसमावेशक मॉडेलमुळे अधिक बळकट झाले आहे. भारतात 15% पेक्षा अधिक वैमानिक महिला आहेत, ही संख्या जागतिक सरासरीच्या तिप्पट आहे. त्यांनी यावर भर दिला की जागतिक स्तरावर कॅबिन क्रूमधील सरासरी सुमारे 70% महिला आहेत; तर भारतात ही संख्या 86% आहे. मोदी यांनी अशीही टिप्पणी केली की भारतातील एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण सुधारणा क्षेत्रात महिला अभियंत्यांची सरासरी जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे, ही या उद्योगात महिलांचे वाढते योगदान दर्शवते.
ड्रोन तंत्रज्ञान हे हवाई वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा घटक आहे आणि भारत त्याचा वापर तांत्रिक प्रगतीसह आर्थिक आणि सामाजिक समावेशनासाठी करत आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना सक्षम करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून त्यामुळे कृषी, सेवा प्रदान आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे.

“सुरक्षित हवाई वाहतूक भारताच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर राहिली आहे. भारताने आयसीएओ - (आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटने) च्या जागतिक मानकांनुरूप आपले नियम केले आहेत,” असे मोदी यांनी स्पष्ट केले. आयसीएओच्या अलीकडील सुरक्षा लेखापरीक्षणात भारताच्या विमानतळ सुरक्षा बळकटीकरणाच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली आहे. तसेच आशिया-प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत ‘दिल्ली घोषणापत्र’चा स्वीकार हा जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्टतेबाबत भारताच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे.
भारताने नेहमीच खुले आकाश धोरण आणि जागतिक कनेक्टीव्हिटीला पाठिंबा दर्शविला आहे, असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी ‘शिकागो करारा’च्या तत्त्वांचे समर्थन केले आणि अधिक जोडलेले व सर्वांसाठी सुलभ विमान वाहतुकीचे जाळे उभारण्याचे आवाहन केले. मोदी यांनी सर्व भागधारकांना एकत्र येऊन विमानप्रवास सर्वांसाठी सुलभ, परवडणारा आणि सुरक्षित होईल अशी व्यवस्था करण्याचे आवाहन केले. हवाई वाहतूक क्षेत्र नव्या उपाययोजना विकसित करून अधिक उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करत सर्व भागधारकांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, मुरलीधर मोहोळ, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष पीटर एल्बर्स, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे महासंचालक विली वॉल्श, इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी:
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जागतिक हवाई वाहतूक परिषद (वॅट्स) 1 ते 3 जून दरम्यान होत आहे. यांची वार्षिक सर्वसाधारण सभा भारतात याआधी 42 वर्षांपूर्वी 1983 मध्ये झाली होती. वार्षिक सभेच्या निमित्ताने जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रमुख नेते, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधी अशा 1600 हून अधिक व्यक्ती एकत्र येत आहेत.

विमान वाहतूक अर्थव्यवस्था, हवाई मार्ग, ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विमान इंधन निर्मिती, डी-कार्बनायझेशनसाठी वित्तपुरवठा, नावीन्यपूर्णता इत्यादी जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही सभा लक्ष केंद्रित करेल. तसेच भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील उल्लेखनीय परिवर्तन आणि देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासात त्याचे योगदानविषयक सादरीकरण सभेत केले जाईल.
Click here to read full text speech
Today, India is emerging as a leading force in the Global Space-Aviation convergence. pic.twitter.com/XBsSJIu7QY
— PMO India (@PMOIndia) June 2, 2025
Today, India is the world's third-largest domestic aviation market.
— PMO India (@PMOIndia) June 2, 2025
The success of the UDAN scheme is a golden chapter in Indian civil aviation. pic.twitter.com/z3gHkUqOJA
For the world's leading aviation companies, India presents an excellent opportunity for investment. pic.twitter.com/ZQe3J495Rd
— PMO India (@PMOIndia) June 2, 2025


