पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार
समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार लोकार्पण
समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल
नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार
पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार
नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील
नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार
राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, नागपूरची पायाभरणी पंतप्रधान करणार
पंतप्रधान ‘केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र , चंद्रपूर’ देशाला समर्पित करतील
सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान उद्‌घाटन करणार
विमानतळामुळे पर्यटनाला आणि प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल
पंतप्रधान 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आणि तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्‌घाटनही करणार

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत.

पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता  नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत  मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे  ते 'नागपूर मेट्रो टप्पा I' राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण  करणार आहेत आणि  महामार्गाचा दौरा करतील. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते  एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे.

नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात, सकाळी 11:30 वाजता,  1500 कोटींहून अधिक खर्चाच्या  राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण  पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. .ते  राष्ट्रीय  वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि  नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची  पायाभरणीही करतील.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ,केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान  (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र , चंद्रपूर’ चे  लोकार्पण करणार आहेत.

गोव्यात, दुपारी 3.15 वाजता, पंतप्रधान 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप  समारंभाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटनही करतील. संध्याकाळी 5:15 वाजता पंतप्रधान, गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करणार आहेत.

नागपूर येथे पंतप्रधान

समृद्धी महामार्ग

नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत.

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प, हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील पंतप्रधानांचा दृष्टीकोन  साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55,000 कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला  701 किमीचा हा द्रुतगती मार्ग - हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो.या द्रुतगती मार्गामुळे  लगतच्या इतर 14 जिल्ह्यांची  संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होईल. हे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी साहाय्यकारी आहे.

पीएम गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या  दृष्टिकोनाचा पुरस्कार करत, समृद्धी महामार्ग हा  दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण  आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना जोडेल.समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेमचेंजर ठरेल.

नागपूर मेट्रो

नागरी वाहतुकीमध्ये  क्रांती घडवून आणणारे  आणखी एक पाऊल असलेला ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान  खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला  हिरवा झेंडा दाखवतील.नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा -2 ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

एम्स नागपूर

एम्स नागपूरच्या राष्ट्रार्पणाच्या माध्यमातून   देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट  करण्यासाठीची  पंतप्रधानांची वचनबद्धता  मजबूत केली जाईल. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनीच  या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, या  रुग्णालयाची स्थापना  प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या केंद्रीय क्षेत्रातील योजने अंतर्गत करण्यात आली आहे.

एम्स नागपूर हे 1575 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केले जाणारे, बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग , निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग आणि वैद्यकशास्त्रातील  सर्व प्रमुख विशेष आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभागांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे.हे रुग्णालय महाराष्ट्रातील  विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देईल आणि गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाटच्या आसपासच्या आदिवासी भागांसाठी वरदान ठरणार आहे.

रेल्वे प्रकल्प

नागपूर रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत

नागपूर येथील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नागपूर तसेच अजनी या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करतील. या दोन स्थानकांच्या कामासाठी अनुक्रमे 590 कोटी आणि 360 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या वेळी, अजनी (नागपूर)येथील सरकारी देखभाल डेपो तसेच नागपूर-इटारसी मार्गाच्या तिसऱ्या लाईनवरील कोहली-नारखेड टप्प्याच्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण देखील करण्यात येईल. या प्रकल्पांसाठी अनुक्रमे 110 कोटी आणि 450 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

वन हेल्थ राष्ट्रीय संस्थानागपूर

नागपूरमधील एनआयओ अर्थात वन हेल्थ राष्ट्रीय संस्था उभारणीचा पंतप्रधानांच्या हस्ते होणारा पायाभरणी समारंभ म्हणजे ‘वन हेल्थ’ धोरणाअंतर्गत देशात क्षमता तसेच पायाभूत सुविधा निर्मिती उभारण्याच्या दिशेने पुढचे पाऊल मानले जात आहे.

‘वन हेल्थ’ दृष्टीकोनानुसार, असे मानले जाते की, मानवाचे आरोग्य त्याच्या आजूबाजूचे प्राणी तसेच वातावरण यांच्या आरोग्याशी निगडित आहे. माणसाला होणारे बहुतांश संसर्गजन्य आजार प्राणीजन्य प्रकारचे म्हणजे प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होणारे असतात या प्रमेयाला या दृष्टीकोनात मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात 110 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विषयाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये सहकारी संबंध आणि समन्वय प्रस्थापित केला जाईल. तसेच देशभरात ‘वन हेल्थ’ संकल्पनेद्वारे संशोधन तसेच क्षमता निर्माणाचे कार्य सुधारण्यासाठी उत्प्रेरक म्हणून देखील हा उपक्रम उपयुक्त ठरेल.

इतर प्रकल्प

या नागपूर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नाग नदीतील प्रदूषण कमी करण्यासंदर्भातील प्रकल्पाची पायाभरणी करतील. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत 1925 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

विदर्भात, विशेषतः जेथे आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा भागात सिकल सेल आजाराचे प्राबल्य जाणवते. थॅलेसेमिया आणि एचबीई इत्यादी हिमोग्लोबिनशी संबंधित प्रवृत्तींसह सिकल सेल सारख्या आजारांमुळे देशावर मोठा ताण पडतो. ही समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये ‘हिमोग्लोबिनशी संबंधित आजारांवर संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठीचे केंद्र’उभारण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हे काम पूर्ण झाले असून आता पंतप्रधान हे केंद्र देशाला अर्पण करतील. देशात संबंधित क्षेत्रातील अभिनव संशोधन, तंत्रज्ञान विकास, मनुष्यबळ विकास यासाठी हे केंद्र उत्कृष्टता केंद्राच्या रुपात नावारूपाला येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सीआयपीईटी अर्थात केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पॉलिमर आणि संबंधित उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणे हा या संस्थेच्या उभारणीमागील उद्देश आहे.

पंतप्रधानांची गोवा भेट

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळगोवा

देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सोयी यांची उभारणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने प्रयत्नशील असतात. याच दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला असून त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. या विमानतळाच्या उभारणी कामात, त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा इत्यादींसह अनेक सोयींचा समावेश आहे.

सुरुवातीला, पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी 4.4 दशलक्ष प्रवाशांची सोय होईल आणि यात टप्प्याटप्प्याने वाढ होत शेवटी दर वर्षी 33 दशलक्ष प्रवाशांची सोय करण्याची क्षमता या विमानतळाला प्राप्त होईल. या विमानतळामुळे गोवा राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि येथील पर्यटन उद्योगाच्या गरजांची पूर्तता होईल. अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट जोडले गेल्यामुळे हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून सक्षमतेने काम करू शकेल. या विमानतळावर बहुविध संपर्कसुविधांची सोय करून देण्याचे देखील नियोजन सुरु आहे.

जागतिक दर्जाचे विमानतळ असून देखील हे विमानतळ प्रवाशांना गोव्याचा विशिष्ट फील आणि अनुभव देखील देईल.या विमानतळाच्या बांधणीत गोव्याचे स्थानिक वैशिष्ट्य असणाऱ्या अझुलेजोस टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. येथील फूड कोर्टमध्ये गोव्याच्या चवीची जादू पुनश्च अनुभवता येईल. या विमानतळावर क्युरेटेड फ्ली मार्केटसाठी जागा राखून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिक कारागीर आणि हस्तकलाकार त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करू शकतील आणि त्यांची विक्री करू शकतील.

9 वे जागतिक आयुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय आयुष संस्था

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन देखील होणार आहे. तसेच ते 9 व्या जागतिक आयुर्वेद संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद येथील राष्ट्रीय युनानी औषध संस्था आणि दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था या तीन संस्था संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहयोग अधिक बळकट करतील आणि जनतेसाठी किफायतशीर दरात आयुष सेवांची सोय उपलब्ध करून देतील. एकूण 970 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या तीन संस्था सुमारे 500 खाटांच्या सुविधेसह सुमारे 400 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश देऊ शकतील.

9 वे जागतिक आयुर्वेद संमेलन आणि आरोग्य एक्स्पो मध्ये जगातील 50 देशांचे 400 हून अधिक प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि आयुर्वेद विषयाशी संबंधित इतर भागधारक सहभागी झाले आहेत. “वन हेल्थ साठी आयुर्वेद” ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM's Vision Turns Into Reality As Unused Urban Space Becomes Sports Hubs In Ahmedabad

Media Coverage

PM's Vision Turns Into Reality As Unused Urban Space Becomes Sports Hubs In Ahmedabad
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जानेवारी 2025
January 25, 2025

Appreciation for India's Transformative Journey with the Modi Government