मी आज, सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान, महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर जात आहे.
सौदी अरेबियाबरोबर असलेल्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक संबंधांना भारत अतिशय महत्त्व देत असून अलीकडच्या वर्षात या संबंधांना धोरणात्मक खोली आणि गती प्राप्त झाली आहे. आम्ही परस्पर लाभदायक आणि भरीव भागीदारी विकसित केली आहे ज्यात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि नागरिकांमधील आपसांतील संबंध या पैलूंचा समावेश आहे. आम्ही प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षा आणि स्थैर्य यांना चालना देण्यात सारखेच स्वारस्य आणि वचनबद्धता दर्शवली आहे.
गेल्या दशकभरातील सौदी अरेबियाचा माझा हा तिसरा दौरा असून मी पहिल्यांदाच जेद्दाह या ऐतिहासिक शहराला भेट देत आहे. धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे आणि माझ्या भावासमान असलेल्या महामहिम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भारतातील अत्यंत यशस्वी राजकीय भेट जशी झाली, तशीच ही भेटही यशस्वी व्हावी यासाठी मी उत्सुक आहे.
याशिवाय सांस्कृतिक आणि मानवी संबंध मजबूत करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि दोन राष्ट्रांमध्ये एक जिवंत सेतू म्हणून कार्य करणाऱ्या सौदी अरेबियामधील उर्जावान भारतीय समुदायाला भेटण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.


