पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, गृहनिर्माण, कोळसा आणि ऊर्जा यांसह प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीला पंतप्रधान कार्यालय आणि निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणात, नमूद करण्यात आले की, अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गंत उद्दिष्टाच्या 81 टक्के म्हणजेच सुमारे 1.45 लाख गावे आतापर्यंत जोडण्यात आली आहेत. उर्वरित गावे निर्धारित वेळेत जोडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या संसाधनांचा वर्षभरात काळजीपूर्वक वापर करावे असे पंतप्रधानांनी नमूद केले. केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख अलिकडेच आणल्यामुळे कामगिरी सुधारायला मदत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मेरी सडक ॲपवर येणाऱ्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा केला जात असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. तक्रारींचे सविस्तर विश्लेषण करण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरुन गरज भासेल तेव्हा वेळेवर उपाययोजना करता येतील.

2019 पर्यंत ग्रामीण भागात एक कोटी घरे बांधण्याच्या कृती आराखडयाच्या प्रगतीचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, लाभार्थ्यांच्या जीवनावर घरांच्या सकारात्मक प्रभावाचे योग्य विश्लेषण केले जावे आणि त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यावर भर दयायला हवा.
कोळसा क्षेत्राचा आढावा घेताना पंतप्रधानांनी, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भुयारी खाणकाम आणि कोल गॅसिफिकेशनच्या दिशेने नव्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ग्रामीण विद्युतीकरण आणि घरगुती विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रगतीबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.


