रशियन महासंघाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव श्री निकोलाई पॅट्रूशेव यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दिवसभरात राष्ट्रीय सुरक्षा संस्था आणि परराष्ट्र मंत्रालयासोबत झालेल्या फलदायी विचारविनिमयासंदर्भातील माहिती सचिव पॅट्रूशेव यांनी पंतप्रधानांना दिली आणि भारतासोबत ‘विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी’ आणखी बळकट करण्यासाठी रशियाची दृढ वचनबद्धता व्यक्त केली.

मोठे क्षेत्रीय बदल होत असताना सचिव पॅट्रूशेव यांच्या नेतृत्वाखालील रशियन शिष्टमंडळाच्या भेटीबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
भारत-रशिया भागीदारीकडे सतत लक्ष दिल्याबद्दल अध्यक्ष पुतिन यांचे आभार मानत हे आभार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास सचिव पॅट्रूशेव यांना त्यांनी सांगितले. नजीकच्या काळात द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात अध्यक्ष पुतीन यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.


