जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय अनौपचारिक बैठकीसाठी नवी दिल्ली येथे आलेल्या विविध देशांच्या मंत्र्यांनी आणि वरिष्ठ प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी बहुराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाली. भारताने ही बैठक आयोजित केल्याबद्दल अनेक मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले.

या सर्व मान्यवरांचे स्वागत करत या बैठकीतली चर्चा बहुराष्ट्रीय व्यापाराला विधायक दिशा आणि आकार देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. नियमांवर आधारित बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्था विकसित करण्यास भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. मात्र ही व्यवस्था सर्वसमावेशक आणि सर्वसहमतीवर आधारित असावी असे ते म्हणाले. वाद विवाद सोडवण्यासाठी एक उत्तम यंत्रणा असणे हा जागतिक व्यापार संघटनेचा सकारात्मक पैलू आहे असे ते म्हणाले.
बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेसमोर असलेल्या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. दोहा गोलमेज परिषद आणि बाली येथे झालेली मंत्रीस्तरीय परिषद या दोन्हींमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही हे त्यांनी नमूद केले. मागासलेल्या देशांबाबत सरहृदयतेचा दृष्टीकोन बाळगावा यावर त्यांनी भर दिला.

या अनौपचारिक बैठकीला सर्व सदस्य देशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बहुराष्ट्रवाद आणि जागतिक व्यापार संघटनेची तत्वे यावर सर्व राष्ट्रांनी दाखवलेला विश्वास यातून सिद्ध होतो, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते.


