भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 आणि 4 जुलै 2025 दरम्यान त्रिनिदाद व टोबागोला भेट दिली. त्रिनिदाद व टोबागोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांनी पंतप्रधान मोदी यांना या भेटीचे निमंत्रण दिले होते.

गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. 1845 पासूनच्या दोन्ही देशांमधील दीर्घकालिन मैत्रीचा पाया रचणाऱ्या सांस्कृतिक संबंध, नागरिकांचे परस्पर संबंध आणि लोकशाही मूल्यांना या भेटीमुळे पुन्हा उजाळा मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांचे अभिनंदन केले. तसेच भारत आणि त्रिनिदाद व टोबागो मधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यातील त्यांच्या योगदानासाठी प्रशंसा केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतातील आणि जागतिक पातळीवरील उत्कृष्ट नेतृत्वाच्या सन्मानार्थ त्यांना त्रिनिदाद टोबागो देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद टोबागो प्रदान करण्यात आला. 

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय, क्षित्रिय आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंधांची सखोलता आणि व्याप्ती याविषयी त्यांनी समाधान व्यक्त करुन व्यापक, सर्वसमावेशक व भविष्यवेधी भागीदारी सुरू करण्याचा निर्धार केला. आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, व्यापार, आर्थिक विकास, कृषी, न्याय, न्यायिक व्यवहार, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ही भागीदारी करण्यात येईल. 

दोन्ही देशांमधील शांतता व सुरक्षा यांना दहशतवादापासून धोका असल्याचे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. दहशतवादाला विरोध करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करुन दोन्ही नेत्यांनी दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध केला. सीमे पलिकडून होणाऱ्या दहशतवादासह कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही असे त्यांनी जाहीर केले.

दोन्ही देशांदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या करारांचे आणि सामंजस्य करारांचे त्यांनी स्वागत केले. औषधनिर्माण, सहकार विकास, शैक्षणिक, सांस्कृतिक देवाणघेवाण, राजनैतिक प्रशिक्षण आणि क्रीडा या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या दुसऱ्या CARICOM शिखर परिषदेतील ठरावांचा उल्लेख करुन दोन्ही नेत्यांनी या परिषदेत जाहीर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निश्चय बोलून दाखविला. 

डिजिटल क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार करण्याबाबतची इच्छा दोन्ही देशांनी व्यक्त केली. भारताचा प्रमुख डिजिटल देयक मंच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) स्वीकारणारा पहिला कॅरिबिअन देश ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद टोबागो देशाचे अभिनंदन केले. डिजिलॉकर, इ स्वाक्षरी आणि सरकारी इ बाजारपेठ (जीइएम) यासह भारताच्या अन्य डिजिटल उपक्रमांचा पर्याय स्वीकारण्याबाबतचे सहकार्य आणखी वाढविण्याविषयी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. जमीन नोंदणी प्रणालीच्या डिजिटायजेशनसाठी आणि ती अद्ययावत करण्यासाठी भारताने सहकार्य करावे अशी विनंती त्रिनिदाद टोबागो देशातर्फे करण्यात आली. सर्वसमावेशक विकास, नवोन्मेष आणि राष्ट्राची स्पर्धात्मकता वाढविणे यामध्ये डिजिटल प्रशासन व सार्वजनिक सेवा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असेही दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.

शिक्षणाचे डिजिटायजेशन करण्याच्या पंतप्रधान बिसेस्सर यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाची प्रशंसा करुन भारत त्रिनिदाद टोबागोच्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमाच्या मदतीसाठी 2000 लॅपटॉप भेट देईल असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. त्रिनिदाद टोबागोमधील विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्तींअंतर्गत भारतातील उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रदेखील महत्त्वाचे असल्याचे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. भारताने त्रिनिदाद टोबागोच्या राष्ट्रीय कृषी विपणन व  विकास महामंडळाला (NAMDEVCO) दहा लाख अमेरिकी डॉलर्स किमतीची कृषी यंत्रे भेट म्हणून दिली आहेत. याचाही उल्लेख यावेळी करण्यात आला. एका समारंभात यामधील पहिली काही यंत्रे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते NAMDEVCO आस्थापनेला प्रदान करण्यात आली. नैसर्गिक शेती, समुद्री वनस्पतींपासून बनविलेली खते आणि भरडधान्य लागवड या क्षेत्रांमध्येदेखील भारत त्रिनिदाद टोबागोला सहकार्य करेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

भारतीय औषधशास्त्राला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्रिनिदाद टोबागो सरकारचे आभार मानले. यामुळे दोन्ही देशांमधील औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य मजबूत होईल आणि त्रिनिदाद टोबागो देशातील नागरिकांना भारतातील रास्त दरातील जेनेरिक औषधे तसेच उपचार घेणे सुलभ होईल. येत्या काही महिन्यांमध्ये त्रिनिदाद टोबागोमध्ये 800 व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आरोग्य क्षेत्रातील यंत्रे आणि उपकरणांपलिकडील या मदतीबद्दल पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. त्रिनिदाद टोबागोमधील चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवेसाठी भारत सरकारने 20 हिमोडायलिसिस युनिट व 2 सागरी रुग्णवाहिका देऊ केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

तत्काळ परिणाम प्रकल्पांबाबतच्या सामंजस्य करारचे स्वागत करुन त्रिनिदाद टोबागो देशाने विकासातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या करारामुळे भारताच्या मदतीने त्रिनिदाद टोबागोमधील समाज विकास प्रकल्पांची वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी शक्य होईल.  

कोविड 19 साथीच्या संकटकाळात लोकांचा जीव वाचविण्यासाठी भारताने दिलेल्या अमूल्य योगदानाची पंतप्रधान बिसेस्सर यांनी प्रशंसा केली. त्रिनिदाद टोबागोच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत भारताने कोविड लसी आणि वैद्यकीय उपकरणांची मोल्यवान मदत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. विशेषतः कोविड 19 प्रकल्पातील HALT (उच्च व लघु तंत्रज्ञान) अंतर्गत भारताने दिलेली दहा लाख अमेरिकी डॉलर्सच्या तसेच आरोग्यसेवा देणारे यंत्रमानव, टेलिमेडिसीन संच आणि स्वच्छता उपकरणांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी यांनी आपत्ती प्रतिसादात्मक पायाभूत सुविधा संघात तसेच जागतिक जैवइंधन संघटनेत सहभागी होण्याच्या त्रिनिदाद टोबागोच्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयातून त्यांची हवामान बदलाचा सामना, लवचिक इमारती आणि शाश्वत विकासाप्रतीची वचनबद्धता प्रतीत होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी भारताने विकसित केलेल्या पूर्व इशारा यंत्रणेच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. त्रिनिदाद टोबागोमधील परराष्ट्र व कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयाच्या छतावर बसविण्यात येणाऱ्या सौरउर्जा यंत्रणेसाठी भारताने आर्थिक मदत देऊ केली आहे. या मदतीसाठीही त्रिनिदाद टोबागो सरकारने भारताचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या मिशन लाइफ उपक्रमाची पंतप्रधान बसेस्सर यांनी प्रशंसा केली. साधनांचा रास्त, विचारपूर्वक वापर व शाश्वत राहणीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.  जगाला पर्यावरण संवेदनशील राहणीमानाकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. 

क्षमता उभारणी हा भारत आणि त्रिनिदाद टोबागोमधील भागीदारीचा महत्त्वाचा स्तंभ असल्याचे नमूद करण्यात आले. त्रिनिदाद टोबागोमधील युवा पिढीच्या क्षमता वाढविण्यासाठी भारताने त्यांच्यासाठी दरवर्षी 85 प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. याचीही त्रिनिदाद टोबागोने दखल घेतली. त्रिनिदाद टोबागोच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील प्रशिक्षणासाठी भारतीय तज्ज्ञ आणि प्रशिक्षक पाठविण्याची इच्छा भाराततर्फे व्यक्त करण्यात आली.

न्यायवैद्यक शास्त्र आणि न्यायालयीन कामकाज क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी त्रिनिदाद टोबागोला सहकार्य करण्यास भारत उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यासाठी त्रिनिदाद टोबागोमधील अधिकारी कर्मचारी भारतात येऊ शकतात किंवा भारतातील प्रशिक्षक व तज्ज्ञांना तिकडे पाठविता येईल असे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या व्यावसायिक संघटनांमध्ये थेट संपर्काला चालना देऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असल्याचे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. 

दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील, विशेषतः क्रिकेटमधील दृढ संबंधांचाही, दोन्ही नेत्यांनी उल्लेख केला. प्रशिक्षण, खेळाडूंचे आदानप्रदान, पायाभूत सुविधा विकास व  संयुक्त क्षमता बांधणी उपक्रम याद्वारे क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबतच्या सामंजस्य कराराचे त्यांनी स्वागत केले. त्रिनिदाद टोबागोमधील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंना भारतात प्रशिक्षण देता येईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

त्रिनिदाद टोबागोमधील पंडितांच्या समुदायाला भारतात प्रशिक्षण देण्याची योजना पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली. हे पंडित भारतातील गीता महोत्सवातही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या या घोषणेची दखल घेत पंतप्रधान बिसेस्सर यांनी त्रिनिदाद टोबागोमध्ये संयुक्तपणे गीता महोत्सव साजरा करण्याबाबत तत्काळ पाठिंबा दर्शविला.  

द्विपक्षीय सांस्कृतिक संबंध दृढ करण्यामधे 1997 मध्ये स्थापन झालेल्या महात्मा गांधी सांस्कृतिक सहकार्य संस्थेच्या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमाची भूमिका महत्त्वाची असल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केला. 2025-28 या काळासाठी या कार्यक्रमाचे नूतनीकरण करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. या नवीन सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी त्रिनिदाद टोबागो सरकार तिथल्या तालवाद्य कलाकारांना (स्टील पॅन) तसेच इतर क्षेत्रांमधल्या कलाकारांना भारतात पाठवेल. त्रिनिदाद टोबागो सरकारने देशभरात योग व हिंदी भाषेला प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले. भारतातील योग प्रशिक्षकांना पाठवून त्रिनिदाद टोबागोच्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश करण्यामधे मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

त्रिनिदाद टोबागोमध्ये 1845 मध्ये पहिल्यांदा भारतीय नागरिक आले त्या घटनेला 30 मे 2025 रोजी 180 वर्षे झाल्याचा उल्लेख दोन्ही पंतप्रधानांनी केला. नेल्सन बेट सांस्कृतिक पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद करुन राष्ट्रीय पुराभिलेखातील भारतीयांच्या आगमनाबाबतची माहिती आणि अन्य नोंदींचे डिजिटायजेशन करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्रिनिदाद टोबागोमधील भारतीयांच्या मागील सहाव्या पिढीपर्यंतच्या नागरिकांना परदेशस्थ भारतीय नागरिक (OCI) कार्ड देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केला. 

वेस्ट इंडिज विद्यापीठातील हिंदी व भारतीय अभ्यास विभागाच्या प्रमुख पदाचे पुनरुज्जीवन करण्याच्या निर्णयाचे दोन्ही पंतप्रधानांनी स्वागत केले. यामुळे भारत आणि त्रिनिदाद टोबागोमधील शैक्षणिक व सांस्कृतिक बंध घट्ट होतील तसेच प्राचीन विद्या आणि आयुर्वेदाचा ठेवा यांच्या प्रसाराला प्रोत्साहन मिळेल.

भारत - त्रिनिदाद टोबागो संसदीय मंत्री गटाचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. त्रिनिदाद टोबागोच्या संसद सदस्यांना भारतात प्रशिक्षण देणे आणि दोन्ही देशांच्या संसदीय शिष्टमंडळांनी नियमितपणे एकमेकांच्या देशांना भेट देणेही गरजेचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

क्षेत्रिय आणि आंतरराष्ट्रीय विकासाबाबतचा दृष्टीकोन व्यक्त करत दोन्ही देशांनी शांतता, हवामान बदल, सर्वसमावेशक विकास आणि दक्षिण गोलार्धातील देशांचा आवाज मजबूत करणे याबाबतची वचनबद्धता पुन्हा बोलून दाखविली. बहुआयामी मंचांवरुन मिळालेल्या परस्पर पाठिंब्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत व्यापक सुधारणा होणे गरजेचे आहे तसेच सध्याच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचाही विस्तार होणे गरजेचे आहे असे दोन्ही नेते म्हणाले. जागतिक संघर्ष व सध्याचे वाढते भूराजकीय तणाव यांची दखल घेत दोन्ही नेत्यांनी यावरील तोडग्यासाठी राजनैतिक चर्चेचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार त्रिनिदाद टोबागोतर्फे करण्यात आला. वर्ष 2027-28 या काळासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील त्रिनिदाद टोबागोच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारत पाठिंबा देईल तर 2028 – 29 या काळासाठी भारताच्या सदस्यत्वाला त्रिनिदाद टोबागो पाठिंबा देईल असे निश्चित करण्यात आले.   

त्रिनिदाद टोबागो सरकार आणि तेथील नागरिकांनी उत्साहाने व आपलेपणाने आदरातिथ्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. पंतप्रधान बिसेस्सर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्रिनिदाद टोबागो भेटीचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्रिनिदाद टोबागोचा हा अधिकृत दौरा अतिशय फलदायी ठरल्याचे आणि यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांचे नवे युग सुरू झाल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. ही भागीदारी आणखी बळकट, सर्वसमावेशक आणि भविष्यानुकूल करण्याबाबतची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official

Media Coverage

Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 डिसेंबर 2025
December 07, 2025

National Resolve in Action: PM Modi's Policies Driving Economic Dynamism and Inclusivity