भारतात होत असलेल्या पाच महत्त्वाच्या स्थित्यंतरांचा केला उल्लेख
“लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे खुलेपणा. त्याच वेळी, आपण काही स्वार्थींना या खुलेपणाचा गैरवापर करू देऊ नये”
"भारताची डिजिटल क्रांती ही आपली लोकशाही, आपली लोकसंख्या आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार यात रुजलेली आहे"
“आम्ही लोकांच्या सक्षमीकरणासाठीचा स्रोत म्हणून (माहिती) डेटा वापरतो. वैयक्तिक हक्कांची भक्कम हमी असलेल्या लोकशाही चौकटीत हे करण्याचा भारताला चांगला अनुभव आहे.”
“भारताच्या लोकशाही परंपरा प्राचीन आहेत; त्याचे आधुनिक अधिष्ठान, स्वरुप सक्षम आहे. आणि, आम्ही नेहमीच जग एक कुटुंब असल्याचे मानतो.
लोकशाहीसाठी एकत्र काम करण्याकरता एक पथदर्शी आराखडा मांडला, त्याद्वारे राष्ट्रीय अधिकारांना मान्यता, त्याच वेळी व्यापार, गुंतवणूक आणि मोठ्या सार्वजनिक हिताला चालना दिली जात आहे.
"सर्व लोकशाही राष्ट्रांनी क्रिप्टो-चलनावर एकत्रितपणे कार्य करणे आणि ते चुकीच्या हाती जाणार नाही याची खातरजमा करणे महत्वाचे आहे, नाहीतर त्यामुळे आपल्या तरुणाईचे नुकसान होऊ शकते"

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिडनी संवादाच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषण केले.  श्री मोदींनी भारताची तंत्रज्ञान उत्क्रांती आणि क्रांतीकारक बदल या विषयावर भाष्य केले. सुरुवातीला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान श्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रास्ताविक केले. 

पंतप्रधान, श्री मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात आणि उदयोन्मुख डिजिटल विश्वात भारताच्या मध्यवर्ती भूमिकेची दखल घेतली जात असल्याकडे लक्ष वेधले.  डिजिटल युगाच्या लाभांचा उल्लेख करतानाच पंतप्रधान म्हणाले की, जगाला समुद्राच्या तळापासून, सायबर ते अंतराळापर्यंत, विविध नवीन धोके आणि संघर्षांच्या नवीन स्वरूपांचा सामना करावा लागत आहे.  “लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे खुलेपणा.  त्याच वेळी, आपण काही स्वार्थींना या खुलेपणाचा गैरवापर करू देऊ नये,” असे पंतप्रधान म्हणाले.

लोकशाही आणि डिजिटल नेतृत्व म्हणून भारत समृद्धी आणि सुरक्षितता सामायिक करण्यासाठी भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  “भारताच्या डिजिटल क्रांतीचे मूळ आपल्या लोकशाहीत आहे, आपली लोकसंख्या आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात आहे.  हे आमच्या तरुणांच्या उद्यमशीलता आणि नवोन्मेषामुळे आहे.  आम्ही भूतकाळातील आव्हानांना भविष्यात झेप घेण्याच्या संधीत बदलत आहोत”

पंतप्रधानांनी भारतात होत असलेल्या पाच महत्त्वाच्या स्थित्यंतरांचा उल्लेख केला.  

एक, जगातील सर्वात व्यापक सार्वजनिक माहिती पायाभूत सुविधा भारतात उभारल्या जात आहेत.  1.3 अब्जाहून अधिक भारतीयांची एक युनिक (अद्वितीय) डिजिटल ओळख आहे, सहा लाख गावे लवकरच ब्रॉडबँड आणि जगातील सर्वात कार्यक्षम आर्थिक व्यवहार पायाभूत सुविधा, युपीआयसह जोडली जातील.  

दोन, शासन, समावेशन, सक्षमीकरण, संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी), लाभ वितरण आणि कल्याणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. 

तीन, भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी नवउद्यमी परिसंस्था (स्टार्टअप इको-सिस्टम) आहे.  

चार, भारतातील उद्योग आणि सेवा क्षेत्रे, अगदी कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन होत आहे.  

पाच, भारताला भविष्यासाठी तयार करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहे.  “आम्ही 5G आणि 6G सारख्या दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये स्वदेशी क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र अध्ययनामधे (मशीन लर्निंगमध्ये), विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मानव-केंद्रित आणि नैतिक वापरामध्ये भारत अग्रगण्य राष्ट्रांपैकी एक आहे.  आम्ही क्लाउड प्लॅटफॉर्म आणि क्लाउड कंप्युटिंगमध्ये भक्कम क्षमता विकसित करत आहोत,” असे ते पुढे म्हणाले.

भारताच्या लवचिकता आणि डिजिटल सार्वभौमत्वाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आम्ही हार्डवेअरवर लक्ष केंद्रित करत आहोत.  सेमी-कंडक्टरचे (अर्धसंवाहकाचे) प्रमुख उत्पादक बनण्यासाठी आम्ही प्रोत्साहनांचे पॅकेज तयार करत आहोत.  इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉममधील आमच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना आधीच स्थानिक आणि जागतिक उद्योगांना भारतात कारखाना किंवा कार्यालय  स्थापन करण्यासाठी आकर्षित करत आहेत.”  डेटा संरक्षण, गोपनीयता आणि सुरक्षेसाठी भारत वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  “त्याच वेळी, आम्ही लोकांच्या सक्षमीकरणासाठीचा स्रोत म्हणून डेटा वापरतो.  वैयक्तिक हक्कांची मजबूत हमी असलेल्या लोकशाही चौकटीत असे करण्याचा भारताला चांगला अनुभव आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

Y2K समस्येचा सामना करण्यासाठी भारताचे योगदान आणि मुक्त स्रोत सॉफ्टवेअर म्हणून जगाला कोविन मंच प्रदान करणे ही भारताची मूल्ये आणि दूरदृष्टीची उदाहरणे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  “भारताच्या लोकशाही परंपरा प्राचीन आहेत;  त्याचे आधुनिक अधिष्ठान, स्वरुप सक्षम आहे.  आणि, आम्ही नेहमीच जग एक कुटुंब असल्याचे मानतो,” असे ते म्हणाले.

श्री मोदी म्हणाले की, भारताचा तंत्रज्ञान आणि धोरणे, यांचा असलेला व्यापक अनुभव  सार्वजनिक हित, सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विकसनशील जगाला खूप मदत करू शकतो.  "आपण राष्ट्रांना आणि त्यांच्या जनतेला सशक्त करण्यासाठी एकत्र काम करू शकतो आणि त्यांना या शतकातील संधींसाठी तयार करू शकतो", असे मत त्यांनी नोंदवले.

लोकशाहीसाठी एकत्र काम करण्याकरता एक पथदर्शी आराखडा मांडत, श्री मोदींनी "भविष्यात तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकासामध्ये एकत्र गुंतवणूक करण्यासाठी एका सहयोगी चौकटीचे आवाहन केले;  विश्वसनीय उत्पादन आधार आणि विश्वसनीय पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी;  सायबर सुरक्षेवर आधारित बुद्धिमत्ता आणि कार्यान्वयन (ऑपरेशनल) सहकार्य वाढवणे, महत्त्वपूर्ण माहितीच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे;  सार्वजनिक मतांमध्ये केला जाणारा फेरफार रोखणे;  आपल्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत तांत्रिक आणि प्रशासन मानके आणि मानदंड विकसित करण्यासाठी;  आणि, डेटा प्रशासनासाठी तसेच डेटाचे संरक्षण आणि ते सुरक्षित करणार्‍या सीमापार प्रवाहासाठी मानके आणि मानदंड तयार करणे.  उदयोन्मुख चौकटीने "राष्ट्रीय हक्कांचीही नोंद केली  पाहिजे आणि त्याच वेळी व्यापार, गुंतवणूक आणि मोठ्या सार्वजनिक हिताला प्रोत्साहन दिले पाहिजे".

या संदर्भात त्यांनी क्रिप्टो-चलनाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "सर्व लोकशाही राष्ट्रांनी यावर एकत्रितपणे काम करणे आणि ते चुकीच्या हाती जाणार नाही याची खातरजमा करणे महत्वाचे आहे, नाहीतर त्यामुळे आपली तरुणाई वाया जाऊ शकते".

 

 

 

 

 

 

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
From Kashmir to Kota, India’s riverfronts are getting a makeover

Media Coverage

From Kashmir to Kota, India’s riverfronts are getting a makeover
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 फेब्रुवारी 2024
February 20, 2024

Vikas Bhi, Virasat Bhi under the Leadership of PM Modi