पंतप्रधान कार्नी….सर्व मान्यवर हो…नमस्कार!

जी-7 शिखर परिषदेकरता आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आणि उत्तम स्वागतासाठी मी पंतप्रधान कार्नी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जी-7 समुहाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

येणाऱ्या पिढ्यांसाठी ऊर्जा सुरक्षितता पक्की करणे हे आपल्यापुढील  मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. हे केवळ आमचे प्राधान्य नसून आपल्या नागरिकांप्रती जबाबदारी देखील आहे, असे आम्ही मानतो. उपलब्धता, सुलभ प्राप्ती, परवडणारी किंमत आणि स्वीकारार्हता या मूलभूत तत्त्वांवर पुढे जात भारताने सर्वसमावेशक विकासाचा मार्ग निवडला आहे.

आज भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात वीज जोडणी आहे. भारतामध्ये प्रती युनिट वीजदर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असूनही, भारताने आपल्या पॅरिस करारातील प्रतिबद्धता वेळेपूर्वीच पूर्ण केल्या आहेत.आम्ही 2070 पर्यंत निव्वळ शून्य (नेट झिरो) या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. भारताने आजपर्यंत जितकी वीजनिर्मितीची क्षमता  उभारली आहे, त्यामध्ये सुमारे अर्धी म्हणजे 50% क्षमता ही नवीकरणीय स्रोतांमधून येते. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा साध्य करण्याच्या लक्ष्याकडे आम्ही ठामपणे वाटचाल करत आहोत. हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, आणि इथेनॉल मिश्रण यांवर आमचा भर आहे, जेणेकरून स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्माण होईल. भारत इतर सर्व देशांना एक हरित आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देत आहे.

या दिशेने आम्ही-आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी, मिशन लाइफ, जागतिक जैवइंधन आघाडी आणि एक सूर्य, एक जग, एक आंतरराष्ट्रीय वीज जाळे— असे काही जागतिक उपक्रम सुरू केले आहेत.

मित्रांनो,

ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने सर्व देशांनी एकत्रितपणे पुढे जाणे अत्यावश्यक आहे. "मी नाही…तर आपण सर्व" या भावनेने आपल्याला पुढे जावे लागेल. दुर्दैवाने, ग्लोबल साउथ (विकसनशील देश) देशांनाच सध्याची अनिश्चितता आणि संघर्षांचा सर्वाधिक फटका बसतो आहे. जगाच्या कोणत्याही भागात तणाव निर्माण झाला, तरी अन्न, इंधन, खत आणि आर्थिक संकटांचा पहिला फटका या देशांनाच बसतो.

लोकसंख्या, कच्चा माल, उत्पादन आणि वाहतूक व्यवस्था, यांच्यावरही याचा परिणाम होतो. ग्लोबल साउथचे प्राधान्यक्रम आणि समस्यांना  जागतिक व्यासपीठ मिळावे, ही भारत आपली स्वतःची जबाबदारी समजतो.आम्हाला असे खात्रीपूर्वक वाटते की, जोपर्यंत पक्षपात (दुजाभाव)  कोणत्या न कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तोपर्यंत मानवतेचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य होणे शक्य नाही.

मित्रांनो,

मी आपले लक्ष आणखी एका गंभीर मुद्द्याकडे वेधू इच्छितो — तो म्हणजे दहशतवाद. दहशतवादासंदर्भात दुजाभावाला कुठल्याच प्रकारचा थारा नसावा. अलीकडेच भारताने एक क्रूर आणि भ्याड दहशतवादी हल्ला सोसला. 

22 एप्रिल रोजी झालेला हल्ला केवळ पहलगामवरचा नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाचा आत्मा, ओळख आणि प्रतिष्ठा यांच्यावर थेट हल्ला होता. हा संपूर्ण मानवतेवरच हल्ला होता.या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करणाऱ्या आणि मनापासून शोक व्यक्त करणाऱ्या सर्व मित्रांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

मित्रांनो,

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे.लोकशाही मूल्ये मानणाऱ्या प्रत्येक  राष्ट्राच्या विरोधात हा शत्रू उभा ठाकला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजूट असणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने,आमचा  शेजारच दहशतवादाचा अड्डा बनला आहे. जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी आपली विचारांची दिशा आणि धोरणे अगदी स्पष्ट असली पाहिजेत —कोणताही देश जर दहशतवादाला पाठिंबा देत असेल, तर त्याला जबाबदार धरले गेले पाहिजे आणि त्याची किंमत त्याला चुकवावी लागलीच पाहिजे.

दुर्दैवाने, वास्तव मात्र याच्या अगदी उलट आहे. एकीकडे आपण स्वतःच्या हितसंबंधांनुसार आणि पसंतीनुसार झटपट निर्बंध लावतो…तर दुसरीकडे, दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या देशांचे सतत लाड केले जातात. इथे उपस्थित सर्वांसाठी मला काही गंभीर प्रश्न विचारायचे आहेत:

·  आपण खरंच दहशतवादाच्या विरोधात गांभीर्याने प्रयत्नशील आहोत का?

·  दहशतवादाचे चटके स्वतःला बसल्यानंतरच आपल्याला त्याची खरी धग जाणवेल का?

·  दहशतवाद पसरवणाऱ्यांना आणि त्याचा बळी ठरणाऱ्यांना एकाच मापात मोजणे योग्य आहे का?

·  आपल्या जागतिक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येत नाहीये का?

जर आपण आज मानवतेच्या विरोधात उभ्या असलेल्या या दहशतवादाच्या विरोधात निर्णायक पावले उचलली नाहीत, तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही. निहित स्वार्थांसाठी दहशतवादाकडे डोळेझाक करणे किंवा दहशतवाद किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देणे हे संपूर्ण मानवतेचा विश्वासघात करण्यासारखे आहे.

मित्रांनो,

भारत नेहमीच स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन मानवतेच्या हितासाठी काम करत आला आहे. भविष्यातही जी-7 देशांबरोबर संवाद आणि सहकार्य सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. 

खूप खूप धन्यवाद.

मित्रांनो,

तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा या विषयांवर मी काही मुद्दे सामायिक करू इच्छितो. निःसंशयपणे, कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून उदयास येत आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतःच एक अत्यंत ऊर्जा-केंद्रित तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर्समुळे वाढणारी ऊर्जा मागणी आणि आजच्या तंत्रज्ञान आधारित समाजांच्या वाढत्या ऊर्जा मागण्या केवळ नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारेच शाश्वतपणे पूर्ण केल्या जाऊ शकतात.

परवडणारी, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा सुनिश्चित करणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. हे साध्य करण्यासाठी, आम्ही सौर ऊर्जा आणि छोट्या मॉड्यूलर रिॲक्टर्सवर लक्ष केंद्रित करत आहोत. नवीकरणीय ऊर्जा उत्पादन केंद्रांना मागणी केंद्रांशी जोडण्यासाठी आम्ही स्मार्ट ग्रिडस् , ऊर्जा साठवण प्रणाली आणि हरित ऊर्जा कॉरिडॉर देखील विकसित करत आहोत.

मित्रांनो,

भारतातील आमचे सर्व प्रयत्न मानव-केंद्रित दृष्टिकोनावर आधारित आहेत. आम्हाला विश्वास आहे की कोणत्याही तंत्रज्ञानाचे खरे मूल्य त्याच्या शेवटच्या टप्प्यावरील व्यक्तीला फायदा पोहचवण्याच्या क्षमतेत आहे. ग्लोबल साऊथ मधील कोणतीही व्यक्ती मागे राहू नये. उदाहरणार्थ, जर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हवामान अंदाज ॲप विकसित केले तर ते तेव्हाच खरे यशस्वी ठरेल जेव्हा ते माझ्या देशातील एका लहान खेड्यात राहणाऱ्या शेतकरी किंवा मच्छीमारांना फायदा देईल.

भारतात, आम्ही 'भाषिणी' नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषा ॲप विकसित केले आहे जेणेकरून दुर्गम भागातील व्यक्ती देखील जगातील भाषांशी जोडला जाऊ शकेल आणि जागतिक संवादाचा भाग बनू शकेल. आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाला सक्षम केले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, आपण मानव-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. प्रत्येकजण कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता आणि उपयुक्तता ओळखतो. पण, खरी आव्हाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यात नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणे माणसाच्या सन्मानात आणि सक्षमीकरणात कशी मदत करतील, यात आहे. 

मित्रांनो,

समृद्ध डेटा हा समावेशक, सक्षम आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेचा मूलभूत घटक आहे. भारताची विविधता, त्याच्या चैतन्यशील जीवनशैली, विविध भाषा आणि विशाल भौगोलिक विविधता यातून प्रतिबिंबित होते, यामुळेच भारत समृद्ध डेटाच्या सर्वात मौल्यवान आणि शक्तिशाली स्रोतांपैकी एक बनतो. म्हणूनच भारताच्या विविधतेच्या निकषांनुसार विकसित आणि चाचणी केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल संपूर्ण जगासाठी प्रचंड प्रासंगिक आणि उपयुक्त ठरतील.

भारतात, आम्ही डेटा सक्षमीकरण आणि संरक्षण यावर आधारलेली मजबूत रचना तयार करण्यावर भर दिला आहे. यासोबतच, भारताकडे एक प्रचंड मोठी कुशल आणि लोकशाही मूल्यांची बांधली असणारी प्रतिभा शक्ती आहे जी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

मित्रांनो,

मी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर काही सूचना मांडू इच्छितो. प्रथम, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रशासनासाठी काम केले पाहिजे जे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित चिंतांना संबोधित करते आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देते. अशाच पद्धतीने आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला जागतिक हितासाठी एका शक्तीमध्ये रूपांतरित करू शकतो. दुसरे म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, महत्त्वपूर्ण खनिजे आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. आपण त्यांच्या पुरवठा साखळींच्या लवचिकतेचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणताही देश कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ स्वतःच्या हितासाठी किंवा शस्त्र म्हणून करू नये याची आपण खात्री केली पाहिजे. तिसरे म्हणजे, डीप फेक्स हे समाजात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण करणारे एक गंभीर संकट बनले आहे. म्हणून, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित आशय स्पष्टपणे वॉटरमार्क केलेला असावा किंवा तसा स्पष्ट खुलासा असावा.

मित्रांनो,

गेल्या शतकात, आपण ऊर्जेवर आधारित स्पर्धा पाहिली. या शतकात, आपल्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य स्वीकारावे लागेल. आपण 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और सबका प्रयास', म्हणजेच लोक, पर्यावरण आणि प्रगती यासाठी भारताचे आवाहन - या मार्गदर्शक तत्त्वासह पुढे गेले पाहिजे. या भावनेने, मी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक आमंत्रण देतो.

खूप खूप धन्यवाद. 

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Indian IPOs set to raise up to $18 billion in second-half surge

Media Coverage

Indian IPOs set to raise up to $18 billion in second-half surge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2025
July 11, 2025

Appreciation by Citizens in Building a Self-Reliant India PM Modi's Initiatives in Action