भारत माता की जय !

भारत माता की जय !

नमस्कार ! केम छो ! वणक्कम ! सत श्री अकाल ! जिन दोबरे !

हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण  पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र  प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.

मित्रहो,

गेल्या एक आठवड्यापासून भारतातील माध्यमांमध्ये तुमच्याबद्दल , पोलंडच्या लोकांबद्द्दल खूप चर्चा होत आहे आणि पोलंडबद्दलही खूप काही बोलले जात आहे. आणि एक ठळक बातमी देखील सांगितली जात आहे की 45 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी पोलंडला भेट दिली आहे.  अनेक चांगली कामे  करण्याचे  भाग्य मला लाभले आहे. काही महिन्यांपूर्वीच मी ऑस्ट्रियाला गेलो होतो. तिथेही चार दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिली भेट होती. असे अनेक देश आहेत जिथे  अनेक दशकांपासून भारताच्या एकाही पंतप्रधानांनी भेट दिलेली नाही.  मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अनेक दशकांपासून भारताचे धोरण सर्व देशांपासून समान अंतर राखण्याचे होते. मात्र आजच्या भारताचे धोरण सर्व देशांशी समान जवळीक ठेवण्याचे आहे. आजच्या भारताला सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत.  सगळ्यांचा विकास व्हावा अशी भारताची इच्छा आहे , आजचा भारत सगळ्यांसोबत आहे, सगळ्यांच्या हिताचा विचार करतो. आज जग भारताला  विश्वबंधू म्हणून मान देत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हालाही इथे तसाच अनुभव येत आहे, मी  बरोबर बोलत आहे ना ?

मित्रहो,

आमच्यासाठी हा भौगोलिक राजकारणाचा नव्हे तर संस्कारांचा , मूल्यांचा विषय आहे. ज्यांना कुठेही जागा मिळाली नाही, त्यांना भारताने आपल्या हृदयात आणि भूमीवर स्थान दिले आहे. हा आपला वारसा आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पोलंड तर भारताच्या या चिरंतन भावनेचा साक्षीदार राहिला आहे. आजही आमच्या जाम साहेबांना पोलंडमधला प्रत्येक जण दोबरे म्हणजेच गुड महाराजा या नावाने ओळखतो.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा पोलंड संकटात सापडला होता, पोलंडच्या हजारो महिला आणि मुले आश्रयासाठी ठिकठिकाणी वणवण फिरत होते  तेव्हा जामसाहेब दिग्विजय सिंह रणजितसिंह जाडेजा जी पुढे आले. त्यांनी पोलिश महिला आणि मुलांसाठी एक विशेष छावणी उभारली. जाम साहेबांनी छावणीतील  पोलिश मुलांना सांगितले होते की, ज्याप्रमाणे नवानगरचे लोक मला बापू म्हणतात, त्याचप्रमाणे मी तुमचाही बापू आहे. 

 

मित्रहो,

जाम साहेबांच्या कुटुंबीयांना मी अनेकदा भेटलो आहे , मला त्यांचा  अपार स्नेह लाभला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील मी सध्याच्या जाम साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या खोलीत पोलंडशी संबंधित एक छायाचित्र अजूनही आहे. आणि जाम साहेबांनी दाखवलेल्या मार्गाचे पोलंड आजही अनुसरण करत आहे हे पाहून आनंद वाटतो. दोन दशकांपूर्वी, जेव्हा गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता, तेव्हा जामनगरलाही त्याची झळ पोहचली होती.  तेव्हा पोलंड हा सर्वप्रथम  मदतीसाठी धावलेल्या देशांपैकी एक होता. इथे पोलंडमध्येही लोकांनी जाम साहेब आणि त्यांच्या कुटुंबाला भरपूर मान -सन्मान  दिला आहे. हे प्रेम वॉर्सा येथील गुड महाराजा स्क्वेअरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. काही वेळापूर्वी मलाही दोबरे महाराज स्मारक आणि कोल्हापूर स्मारकाला भेट देण्याचे भाग्य लाभले. या अविस्मरणीय प्रसंगी , मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. भारत जामसाहेब स्मृती युवा आदानप्रदान कार्यक्रम  प्रोग्राम सुरू करणार आहे. या अंतर्गत भारत दरवर्षी 20 पोलिश युवकांना  भारत भेटीसाठी आमंत्रित करेल. यामुळे पोलंडच्या युवकांना भारताविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.

मित्रहो,

इथले कोल्हापूर स्मारक देखील कोल्हापूरच्या महान राजघराण्याप्रति पोलंडच्या जनतेची श्रध्दाभावना आहे, मानवंदना आहे.  महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रति पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे. छत्रपति शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरच्या महान राजघराण्याने  वळवडे मध्ये पोलंडच्या महिला आणि मुलांना आश्रय दिला होता.  तिथेही एक खूप मोठी छावणी उभारण्यात आली होती . पोलंडमधील महिला आणि बालकांना कोणताही त्रास होऊ  नये यासाठी महाराष्ट्रातील जनतेने दिवसरात्र एक केला होता. मित्रहो,

आजच मला मॉन्टे कॅसिनो स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करण्याची  संधी मिळाली. हे स्मारक हजारो भारतीय जवानांच्या बलिदानाची देखील आठवण करून देते. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांनी कशा प्रकारे आपले कर्तव्य बजावले आहे, याचाही हा दाखला आहे.

मित्रहो,

21व्या शतकातील आजचा भारत आपल्या जुन्या मूल्यांचा आणि वारशाचा अभिमान बाळगत विकासाच्या मार्गावर पुढे वाटचाल करत आहे. आज जग भारताला त्या गुणवैशिष्ट्यांमुळे ओळखते जी भारतीयांनी जगासमोर सिद्ध करून दाखवली आहेत.  आम्हा भारतीयांना प्रयत्न, उत्कृष्टता आणि सहानुभूती यासाठी ओळखले जाते.  आपण भारतीय लोक जगात कुठेही गेलो तरी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसतो.  मग ती उद्योजकता असो, मदत पुरवणे  असो किंवा आपले  सेवा क्षेत्र असो. भारतीय आपल्या  प्रयत्नांनी स्वतःचे आणि देशाचे नाव गौरवान्वित करत  आहेत. हे मी तुमच्याबद्दल  सांगत आहे. तुम्हाला वाटेल की मी कुठल्यातरी तिसऱ्या देशाबद्दल बोलत आहे. जगभरात भारतीय उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असो किंवा भारतातील डॉक्टर्स असो , सगळे त्यांच्या उत्कृष्टतेने  प्रभावित करतात. आणि कितीतरी  मोठा समूह तर माझ्या समोर उपस्थित आहे.

मित्रहो,

सहानुभूती हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. जगातील कोणत्याही देशावर संकट आले की मदतीचा हात पुढे करणारा भारत हा पहिला देश असतो. जेव्हा कोविड सारखे  100 वर्षातील सर्वात मोठे संकट आले तेव्हा भारताची भूमिका होती - मानवता प्रथम. आपण जगातील 150 हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लशींच्या मात्रा  पाठवल्या आहेत. जगात कुठेही भूकंप आला किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी भारताचा एकच मंत्र असतो  - मानवता प्रथम. कुठेही  युद्ध झाले तर भारत म्हणतो- मानवता प्रथम आणि याच  भावनेने भारत जगभरातील नागरिकांची मदत करतो. भारत नेहमीच प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून पुढे येतो. 

 

मित्रहो,

भारत ही बुद्धाचा वारसा असलेली भूमी आहे. आणि जेव्हा बुद्धाचा विषय येतो तेव्हा तो  युद्धावर नव्हे तर शांततेवर विश्वास ठेवतो. त्यामुळे या प्रदेशातही भारत हा चिरस्थायी शांततेचा मोठा पुरस्कर्ता आहे. भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे - हे युद्धाचे युग नाही. मानवतेला सर्वात मोठा धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची ही वेळ आहे. त्यामुळे भारत मुत्सद्देगिरी आणि संवादावर अधिक भर देत आहे.

मित्रहो,

ज्या प्रकारे आपण युक्रेन मध्ये अडकलेल्या आमच्या मुलांना मदत केलीत ते आम्ही सर्वांनी बघितले आहे. आपण त्यांना खूप मदत केलीत. घराचे दरवाजे, आपली रेस्टॉरंट्स मुलांसाठी उघडलीत. पोलंडच्या सरकारने तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसासारखी बंधनेही दूर केली. म्हणजे पोलंडने मनापासून आमच्या मुलांसाठी दरवाजे उघडून दिले होते. आजसुद्धा मी जेव्हा युक्रेनहून परतलेल्या मुलांना भेटतो तेव्हा ती मुले पोलंडच्या नागरिकांची आणि आपली भरपूर प्रशंसा करतात. म्हणून आज इथे 140 कोटी  भारतीयांच्या वतीने आपले,  पोलंडच्या  सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो आणि आपल्याला सलाम करतो. 

मित्रहो, 

भारत आणि पोलंड या दोन्ही समाजात अनेक साम्यस्थळे आहेत‌.  एक ठळक साम्य म्हणजे आपली लोकशाही. भारत लोकशाहीचे माता आहेच, पण एक सर्वसमावेशक आणि जोशपूर्ण लोकशाहीसुद्धा आहे. भारतातील लोकांचा लोकशाहीवर अजोड विश्वास आहे. हा विश्वास आम्ही आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहिला आहे. ही निवडणुक इतिहासातील सर्वात मोठी निवडणुक होती. आता अलीकडेघ युरोपियन युनियनच्या निवडणुकासुद्धा झाल्या.  यामध्ये जवळपास 180 दसलक्ष मतदात्यांनी मतदान केले. भारतातून यापेक्षा तिप्पटीहून अधिक  म्हणजे जवळपास 640 दसलक्ष मतदारांनी मतदान केले. भारतात या निवडणुकांमध्ये हजारो राजकीय पक्षांनी भाग घेतला. जवळपास आठ हजार उमेदवार मैदानात होते. पाच दसलक्षपेक्षा जास्त मतदान यंत्रे, एक दसलक्षहून जास्त मतदान केंद्रे, 15 दसलक्षहून अधिक कर्मचारी या स्तरावर व्यवस्थापन , एवढी कार्यक्षमता आणि निवडणुकांवर या पातळीपर्यंत विश्वास ही भारताची खूप मोठी ताकद आहे. जगातील इतर माणसे जेव्हा हे आकडे ऐकतात तेव्हा त्यांना घेरी यायचीच बाकी असते. 

मित्रहो,

आम्ही भारतीय विविधता कशी  जगायची हे जाणतात, ती साजरी कशी करायची हे जाणतात. म्हणूनच प्रत्येक समाजात आम्ही अगदी सहजपणे मिसळून जातो. पोलंडमध्ये तर भारताबद्दल माहिती घेणे,  भारत समजून घेणे आणि भारतासंबंधी वाचन करणे याची जुनी परंपराच आहे. विद्यापीठांमध्येसुद्धा आपल्याला हे बघायला मिळते. आपल्यापैकी बरेच लोकांनी वार्सा विद्यापीठाच्या वाचनालयाला भेट दिली असेलच. तिथे भगवद्गीता , उपनिषदे यामधील आदर्श वाक्यांनी आपल्या सर्वांचे स्वागत होते. तामिळ असो किंवा संस्कृत, विविध भारतीय भाषा शिकणारे अनेकजण इथे आहेत. येथील उत्तमोत्तम विद्यापीठांमध्ये भारतीय अभ्यासाशी संलग्न पदे आहेत. पोलंड आणि भारतीय यांच्यामधील अजून एक धागा म्हणजे कबड्डी आहे. आपण तर जाणताच की भारतात गावागावातून कबड्डी खेळली जाते. हा खेळ भारतातून पोलंडमध्ये पोहोचला आहे. आणि पोलंडच्या लोकांनी कबड्डीला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. पोलंड सलग दोन वर्षे युरोपियन कबड्डी चॅम्पियन आहे. 24 ऑगस्टपासून पुन्हा एकदा कबड्डीचे  सामने सुरु होणार आहेत आणि पोलंड पहिल्यांदाच यजमानपदी आहे असे मला कळले आहे. इथे मी या माध्यमातून पोलंडच्या कबड्डी संघाला माझ्या शुभेच्छासुद्धा देतो. 

मित्रहो, 

आपण काही दिवसांपूर्वी इथे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी  समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते. आज प्रत्येक भारतीय तेच स्वप्न साकार करण्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहे. भारताने उद्दिष्ट ठेवले आहे की 2047 पर्यंत स्वतःला भारत, विकसित भारत करेल. हा संकल्प घेऊन आमचा देश पुढे जात आहे. म्हणून आजचा भारत अभूतपूर्व मापन, वेग आणि उत्तरांवर कामे करत आहे भारतात कोणत्या स्तरावर आणि किती वेगाने परिवर्तन करत आहे हे ऐकून आपल्यालाही अभिमान वाटेल. तर ऐकवू का,?

 

भारतात गेल्या दहा वर्षात 250 दसलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि 250 दसलक्ष म्हणजे ही संख्या फ्रान्स, जर्मनी आणि युकेच्या एकूण लोकसंख्येहून सुद्धा जास्त आहे. दहा वर्षात गरिबांसाठी 40 दसलक्ष पक्की घरे उभारली आहेत आणि अजून 30 दसलक्ष घरे आम्ही उभारणार आहोत. आणि समजा पोलंडमध्ये आज 14 दसलक्ष घरे असतील तर समजून जा की भारतात एका दशकात आम्ही जवळपास तीन नवीन पोलंड वसवले आहेत. आर्थिक समावेशन आम्ही नवीन स्तरावर नेले आहे. दहा वर्षात भारतात 500 दसलक्ष जनधन बँक खाती उघडली गेली आहेत. ही संख्या संपूर्ण युरोपियन युनियनच्या लोकसंख्येहूनसुद्धा जास्त आहे.  भारतात दररोज यूपीआयमधून डिजिटल ट्रांजेक्शन होतात तरीदेखील युरोपियन युनियन यांच्या लोकसंख्येएवढ्या संख्येने. युरोपियन यूनियनच्या  एकूण लोकसंख्येहून जास्त भारतीयांना सरकार पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा देत आहे. गेल्या दशकामध्ये भारतातील ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्यासुद्धा वाढली आणि 940 दसलक्ष हून जास्त झाली आहे . म्हणजेच युरोप आणि अमेरिका मिळून जेवढी लोकसंख्या होईल  जवळपास तेवढे लोक आज भारतात ब्रॉडबॅंडचा वापर करतात. गेल्या दशकात भारतात जवळपास सात लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे  अंथरले गेले . पृथ्वीला 70 वेळा प्रदक्षिणा घालण्यासारखेच हे आहे. भारतात दोन वर्षाच्या आतच देशातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत 5G नेटवर्क पोचवलं आहे. आता आम्ही मेड इन इंडिया 6G  नेटवर्कवर काम करत आहोत. 

मित्रहो, 

भारत जे काही करतो ते एक नवीन विक्रम म्हणून स्थापित होते, इतिहास रचला जातो. आपण पाहिले आहे की भारताने एकाच वेळी शंभरहून जास्त उपग्रह अंतराळात सोडले.  हा सुद्धा एक विक्रमच आहे. आता दोन दिवसांनी 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे.  आपल्याला माहिती आहे ना? लक्षात आहे ना ? काय लक्षात आहे?  याच दिवशी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान उतरवले. जिथे कोणताही देश पोचला नव्हता तिथे भारत पोचला आणि त्या जागेचे नाव आहे शिवशक्ती. भारत जगातील तिसरा मोठे स्टार्टअप इकोसिस्टीम आहे.

जागतिक लोकसंख्येत  भारताचा वाटा १६ टक्के आहे आज जगातील प्रत्येक संस्था भारताच्या शानदार भावी काळाचे भविष्य वर्तवत आहे आणि हे काही ज्योतिषीय भाकित नाही तर अंकांच्या आधारावर हा अंदाज बांधला जातो. त्या वास्तवाच्या आधारावर हिशोब करतात.

भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्यापासून फार दूर नाही. मी देशातील जनतेला वचन दिले आहे की, माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार.येत्या काही वर्षांत जगाला भारताची प्रचंड आर्थिक उन्नती पाहायला मिळणार आहे. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे या दशकाच्या अखेरीस भारत 8 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल असा नॅसकॉमचा अंदाज आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा अंदाज आहे की येत्या 3-4 वर्षांत भारतातील एआय बाजारपेठ सुमारे 30-35 टक्के वेगाने वाढेल. म्हणजेच  भारताबद्दल एक अभूतपूर्व सकारात्मकता सर्वत्र दिसत आहे. आज भारत सेमी-कंडक्टर मिशन, डीप ओशन मिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, नॅशनल क्वांटम मिशन आणि एआय मिशनवर काम करत आहे  जेणेकरून येत्या अनेक दशकांत भारत खूप पुढे राहील. येत्या काही वर्षांत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या तयारीत आहे. आणि तो दिवस दूर नाही जेव्हा आपण भारतीय अंतराळवीरांना मेड इन इंडिया गगनयानमध्ये अंतराळात जाताना पहाल.

मित्रांनो, 

आज भारताचे संपूर्ण लक्ष दर्जेदार उत्पादन आणि दर्जेदार मनुष्यबळावर आहे. जागतिक पुरवठा साखळीसाठी या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. अलीकडच्या अर्थसंकल्पात आम्ही आमच्या तरुणांच्या कौशल्य आणि रोजगार निर्मितीवर खूप भर दिला आहे. आमचे तरुण मोठ्या संख्येने येथे अभ्यासासाठी आले आहेत. आम्ही भारताला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम याचे एक मोठे केंद्र बनविण्यात गुंतलो आहोत.

 

मित्रांनो,

तंत्रज्ञान असो, वैद्यकीय सेवा असो, शिक्षण असो, प्रत्येक क्षेत्रात जगासाठी एक कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी भारताने घेतली आहे. मी तुम्हाला आरोग्य क्षेत्राचे एक  उदाहरण देईन. गेल्या 10 वर्षांत, आम्ही भारतात 300 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केली आहेत. भारतातील वैद्यकीय जागा आता गेल्या 10 वर्षांत दुप्पट, 10 वर्षांत दुप्पट झाल्या आहेत. या 10 वर्षांत आम्ही आमच्या वैद्यकीय यंत्रणेत 75 हजार नवीन जागा जोडल्या आहेत. आता येत्या 5 वर्षात 75 हजार नवीन वैद्यकीय जागा वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा प्रदाता म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल. आणि आमचा जगाला एकच संदेश आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा आपण भारतात बरे व्हा असे म्हणू. त्यासाठीच सध्या आम्ही तयारी करत आहोत.

मित्रांनो, 

नवोन्मेष आणि युवक हे भारत आणि पोलंड या दोन्ही देशांच्या विकासाचे ऊर्जास्रोत आहेत. आज मी तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. भारत आणि पोलंड या दोन्ही देशांनी सामाजिक सुरक्षा करारावर सहमती दर्शवली आहे.  ज्याचा फायदा तुम्हा सर्वांना होणार आहे. 

मित्रांनो, 

भारताचे ज्ञान वैश्विक आहे, भारताचा दृष्टिकोन वैश्विक आहे, भारताची संस्कृती वैश्विक आहे, काळजी आणि करुणा जागतिक आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला "वसुधैव कुटुंबकम" हा मंत्र दिला आहे. आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले आहे. आणि हे आजच्या भारताच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये दिसून येते. जी-20 दरम्यान, भारताने असे आवाहन केले की- एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य.  याच भावनेत 21व्या शतकाच्या जगाच्या उत्तम भविष्यासाठी हमी आहे. एक सूर्य, एक जग, एक ग्रीड या संकल्पनेने भारताला जग जोडायचे आहे. केवळ भारतच आहे - जो एक पृथ्वी, एक आरोग्य ही निरोगी जगाची हमी मानतो. 'एक आरोग्य ' म्हणजे सर्वंकष कल्याण, ज्यामध्ये  आपले प्राणी, झाडे आणि वनस्पतींसह, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज आपण ज्या प्रकारची परिस्थिती पाहत आहोत, त्यात एक आरोग्य हे तत्त्व अधिक आवश्यक झाले आहे. भारताने संपूर्ण जगाला मिशन LiFE म्हणजेच पर्यावरणासाठी जीवनशैलीचे मॉडेल दिले आहे. भारतात सुरू असलेल्या एका मोठ्या मोहिमेबद्दल तुम्हीही ऐकले असेल. ही मोहीम आहे-  'एक झाड आईच्या नावाने' कोट्यवधी भारतीय आज आपल्या जन्मदात्या आईच्या नावाने झाड लावत आहेत आणि त्यामुळे धरती मातेचीही रक्षा होत आहे. 

मित्रांनो,

अर्थव्यवस्था आणि पर्यावरणातील समतोल राखणे ही आज भारताची प्राथमिकता आहे. केवळ भारतच एक विकसित राष्ट्र आणि "नेट झिरो" राष्ट्र होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारत हरित भविष्यासाठी 360 अंश दृष्टिकोनावर काम करत आहे. ग्रीन मोबिलिटी हे याचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. भारत आज वेगाने इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विस्तार करत आहे. आज भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दरवर्षी वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी ईव्हीच्या विक्रीत 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत ईव्ही उत्पादन आणि नवनिर्मितीचे जागतिक केंद्र बनेल. येत्या काळात तुम्ही भारताला ग्रीन हायड्रोजनचे मोठे जागतिक केंद्र म्हणून पाहणार आहात.

मित्रांनो, 

नवीन तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात भारत आणि पोलंडमधील भागीदारी देखील सतत वाढत आहे याचा मला आनंद आहे. अनेक भारतीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक करून नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अनेक पोलिश कंपन्यांनी भारतात संधी निर्माण केल्या आहेत. उद्या माझी भेट राष्ट्रपती डूडा आणि पंतप्रधान टस्क यांच्याशी होणार आहे.  उद्या माझी भेट राष्ट्रपती डूडा आणि पंतप्रधान टस्क यांच्याशी होणार आहे. या भेटीमुळे भारत-पोलंडची शानदार भागीदारी अधिक मजबूत होणार आहे. पंतप्रधान टस्क भारताचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा ते युरोपियन काउंसिलचे अध्यक्ष होते, तेव्हाही माझ्या त्यांच्याशी अनेक वेळा भेट झाली आहे. 

 

मित्रांनो,

आजचा भारत एका आवाजाने आणि एका भावनेने विकसित भविष्य लिहिण्यात व्यस्त आहे. आज भारत हा संधींचा देश आहे. तुम्हाला भारताच्या विकासाच्या कथेशी शक्य तितके जोडले पाहिजे. तुम्हाला आता भारताच्या पर्यटनाचे प्रतिमादूत बनायचे आहे. म्हणजे आपण काय करणार? सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट करणार  आणि ताजमहालासमोर बसणार. प्रतिमादूत म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी किमान पाच पोलिश कुटुंबांना भारतात भेट देण्यासाठी पाठवावे लागेल.करणार न? मला इतका तरी गृहपाठ तुम्ही करून द्यायला हवा. तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमच्या भारताला विकसित भारत बनवण्यात मदत करेल.

मित्रांनो, 

पुन्हा एकदा, इथे आल्याबद्दल, या शानदार स्वागताबद्दल, मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत म्हणा- भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! 

खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
RBI raises UPI Lite wallet limit to Rs 5,000; per transaction to Rs 1,000

Media Coverage

RBI raises UPI Lite wallet limit to Rs 5,000; per transaction to Rs 1,000
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister receives Foreign Minister of Kuwait H.E. Abdullah Ali Al-Yahya
December 04, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today received Foreign Minister of Kuwait H.E. Abdullah Ali Al-Yahya.

In a post on X, Shri Modi Said:

“Glad to receive Foreign Minister of Kuwait H.E. Abdullah Ali Al-Yahya. I thank the Kuwaiti leadership for the welfare of the Indian nationals. India is committed to advance our deep-rooted and historical ties for the benefit of our people and the region.”