शेअर करा
 
Comments
हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे 11,000 कोटी रुपयांच्या जल विद्युत प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन आणि भूमिपूजन
आज उद्घाटन झालेले जल विद्युत प्रकल्प म्हणजे पर्यावरण स्नेही विकासाप्रती भारताच्या कटीबद्धतेचे द्योतक
2030 पर्यंत स्थापित विद्युत क्षमतेच्या 40 टक्के उर्जा बिगर जीवाश्म उर्जा स्त्रोतातून करण्याचे भारताने 2016 मध्ये ठेवलेले उद्दिष्ट, 2030च्या पूर्वी , यावर्षी नोव्हेंबरमधेच केले साध्य.
प्लास्टिक सर्वत्र झाले असून नद्यांमध्येही प्लास्टिक जमा होत असून हिमाचलमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करायला हवेत
भारताला आज जर जगाचे औषधालय म्हणून ओळखले जात असेल तर त्यामध्ये हिमाचल प्रदेशचे मोठे योगदान
कोरोना जागतिक महामारीच्या काळात हिमाचल प्रदेशने देशातल्या इतर राज्यांबरोबरच अन्य देशानांही केली मदत
बाबी प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेमुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेला अनेक दशके प्रतीक्षा करावी लागली, इथले अनेक प्रकल्प अनेक वर्षे रखडले
15-18 वयोगटातल्या मुलांना लस देण्याच्या तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्याना आणि सह व्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रीकॉशन डोस देण्याबाबत दिली माहिती
मुलींचे लग्नासाठीचे वय वाढवून 21 केल्याने त्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येईल आणि त्यांना करिअर करणे शक्य होईल
देशाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी आपल्या सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कार्याचा, सैनिक, माजी सैनिक यांच्या साठी घेतलेल्या निर्णयांचा हिमाचल प्रदेशलाही मोठा लाभ

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी  मुख्यमंत्री धुमल, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी अनुराग ठाकूर, संसदेतले माझे सहकारी सुरेश कश्यप, किशन कपूर, इंदु गोस्वामी आणि हिमाचल प्रदेशातल्या काना-कोपऱ्यातून इथे उपस्थित माझ्या बंधू-भगिनीनो,  
'इस मिहिन्ने काशी विश्वनाथा रे दर्शन करने बाद... आज इस छोटी काशी मंझ, बाबा भूतनाथरा, पंच-वक्त्रारा, महामृत्युन्जयरा आशीर्वाद लैणे रा मौका मिल्या। देवभूमि रे, सभी देवी-देवतयां जो मेरा नमन।'
मित्रहो, 
हिमाचल प्रदेशाशी माझे भावनात्मक नाते राहिले आहे. हिमाचलच्या या भूमीने, हिमालयाच्या उत्तुंग शिखरांनी माझ्या जीवनाला दिशा देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आज मी इथे आलो आहे, मी जेव्हा मंडी इथे येतो तेव्हा ‘मंडी री सेपू बड़ी, कचौरी और बदाणे रे मिट्ठा’ यांची आठवण येते.
मित्रहो, 
आज दुहेरी इंजिन सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. सेवा आणि सिद्धी यांच्या या चार वर्षांसाठी हिमाचलच्या जनता जनार्दनाचे खूप-खूप अभिनंदन. इतक्या कडाक्याच्या थंडीत  आम्हा सर्वाना आशीर्वाद देण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात. याचा अर्थ या चार वर्षात हिमाचलला वेगाने प्रगती करताना आपण पाहिले आहे. 
जयराम जी आणि त्यांच्या मेहनती चमूने हिमाचलवासीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. या चार वर्षातल्या दोन वर्षात आपण कोरोना विरोधात सामर्थ्याने लढाही दिला आहे आणि विकास कार्यात खंडही पडू दिला नाही. गेल्या चार वर्षात हिमाचलला पहिले एम्स मिळाले. हमीरपुर, मंडी, चंबा आणि  सिरमौर इथे 4 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली.  हिमाचलशी  कनेक्टिविटी बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न जारी आहेत. 

बंधू-भगिनीनो, 
आज या मंचावर येण्याआधी मी हिमाचल प्रदेशच्या औद्योगिक विकासाशी संबंधित कार्यक्रमात,गुंतवणूकदार परिषदेत सहभागी झालो. इथे जे प्रदर्शन लागले आहे. ते पाहून मन प्रभावित झाले. यामध्ये हिमाचल मध्ये हजारो –कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा, युवकांसाठी नव्या रोजगाराचा मार्ग निर्माण झाला आहे. काही वेळापूर्वी 11 हजार कोटी रुपये खर्चाच्या 4 मोठ्या जल- विद्युत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात आले आहे. यातून हिमाचलचे उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील. सावड़ा कुड्डु प्रकल्प असू दे, लूहरी प्रकल्प असू दे किंवा धौलासिद्ध प्रकल्प किंवा रेणुका जी प्रकल्प हे सर्व प्रकल्प हिमाचलच्या  आकांक्षा आणि देशाच्या  आवश्यकता यांची पूर्तता यातून होणार आहे. सावड़ा कुड्डु धरण तर पियानोच्या आकारातले आशियातले असे पहिले धरण आहे. इथे निर्माण होणाऱ्या विजेमुळे हिमाचलला दर वर्षी सुमारे सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल. 
मित्रहो, 
श्री रेणुकाजी आपले महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भगवान परशुराम आणि त्यांची माता रेणुका जी यांच्या स्नेहाचे प्रतिक असलेल्या या भूमीवरून आज देशाच्या विकासासाठीही  एक ओघ सुरु झाला आहे. गिरी नदीवर बांधण्यात येणारा हा  श्री रेणुकाजी धरण प्रकल्प जेव्हा  पूर्ण होईल तेव्हा मोठ्या क्षेत्राला त्याचा थेट लाभ होईल. या प्रकल्पातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग इथल्या विकासासाठी उपयोगात आणला जाईल.
मित्रहो, 
इझ ऑफ  लिव्हिंग अर्थात जनतेचे जीवन सुखकर करणे याला आमच्या सरकारचे  सर्वोच्च प्राधान्य असून यामध्ये विजेची मोठी भूमिका आहे.वाचनासाठी, घरांमधल्या कामांसाठी, उद्योग आणि इतकेच नव्हे तर मोबाइल चार्ज करण्यासाठीही आपल्याला विजेची आवश्यकता असते, त्याशिवाय कोणी राहू शकत नाही. जीवन सुखकर करण्याचे आमच्या सरकारचे  मॉडेल, पर्यावरणाप्रती जागरूक आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी मदतही करत आहे हे आपण जाणताच. आज इथे जल विद्युत प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले ते म्हणजे पर्यावरण स्नेही नव भारताच्या दिशेने एक दृढ पाऊल आहे. पर्यावरणाचे रक्षण करत भारत विकासाला कशी गती देत आहे यासाठी संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे.  सौर उर्जा ते जल विद्युत,पवन उर्जा ते हरित हायड्रोजन, नविकरणीय उर्जेच्या प्रत्येक स्त्रोताचा  पुरेपूर वापर करण्यासाठी आपला देश सातत्याने काम करत आहे.देशाच्या नागरिकांच्या उर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्याबरोबरच  पर्यावरणाचेही रक्षण व्हावे हा यामागचा उद्देश आहे. भारत आपले उद्दिष्ट कसे साध्य करत आहे याचे एक उदाहरण म्हणजे देशाची वाढती स्थापित विद्युत क्षमता. 

मित्रहो, 
भारताने 2016 मध्ये,  2030 पर्यंत स्थापित विद्युत क्षमतेच्या 40 टक्के उर्जेची पूर्तता , बिगर जीवाश्म उर्जा स्त्रोतातून करण्याचे उद्दिष्ट ठेवले.   या वर्षाच्या नोव्हेंबरमधेच भारताने हे उद्दिष्ट साध्य केले याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान राहील.म्हणजे जे उद्दिष्ट 2030 पर्यंतचे होते, भारताने  ते 2021 मधेच साध्य केले. हा आहे आज भारताच्या कामाचा वेग, आपल्या कामाचा वेग.


मित्रहो, 
डोंगरांचे प्लास्टिकमुळे जे नुकसान होत आहे, त्याबाबत आमचे सरकार सतर्क आहे. एकल वापराच्या प्लास्टिक विरोधात देशव्यापी अभियाना बरोबरच आमचे सरकार, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरही काम करत आहे. प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करत त्याचा उपयोग रस्ते निर्मितीसाठी करण्यात येत आहे. हिमाचलमध्ये देशाच्या काना कोपऱ्यातून लोक येतात.हिमाचलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मी विनंती करू इच्छितो. हिमाचल स्वच्छ राखण्यात, प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून  मुक्त राखण्यासाठी पर्यटकांचेही मोठे  दायित्व आहे. सर्वत्र दिसणारे प्लास्टिक, नद्यांमध्ये जमा होणारे प्लास्टिक, हिमाचलचे जे नुकसान होत आहे, ते थांबवण्यासाठी आपणा सर्वाना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. 

मित्रहो,  
देवभूमी हिमाचलला निसर्गाचे जे वरदान मिळाले आहे, त्याचे संरक्षण आपल्याला करावेच लागेल. इथे पर्यटनाबरोबरच इथे औद्योगिक विकासाच्या अपार संधी आहेत. आमचे सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे. अन्न उद्योग, कृषी आणि औषध निर्माण क्षेत्रावर आमचा विशेष भर आहे. इथे पुंजी तर आहेच.  पर्यटनाची पुंजी  हिमाचलपेक्षा आणखी कुठे मिळेल.अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराची हिमाचलमध्ये  अपार क्षमता आहे. म्हणूनच आमचे सरकार मेगा फूड पार्क पासून शीत गोदामा पर्यंत पायाभूत सुविधा बळकट करत आहे. शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीला, प्रोत्साहन देण्यासाठीही दुहेरी इंजिन सरकार सातत्याने काम करत आहे.आज नैसर्गिक शेतीतून पिकलेल्या धान्याला जगभरातून मागणी वाढत आहे. रसायन मुक्त कृषी उत्पादनांकडे ओढा वाढला आहे. यामध्येही  हिमाचल उत्तम काम करत आहे, राज्यात अनेक जैव – गावे निर्माण करत आहे याचा मला आनंद आहे. हिमाचलच्या शेतकऱ्यांनी,नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकरी इतक्या छोट्याश्या राज्यात अतिशय कमी काळात रासायनिक मुक्त शेतीच्या मार्गाकडे वळले  आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे.   आज इथल्या प्रदर्शनात नैसर्गिक शेतीची उत्पादने पहात होतो. त्यांचे रंग-रूप मोहक होते.हिमाचल, हिमाचलच्या शेतकऱ्यांचे यासाठी मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि  देशभरातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की हिमाचलने  जो मार्ग निवडला आहे  तो उत्तम मार्ग आहे.  आज पॅकबंद अन्नाकडे कल वाढत आहे, अशामध्ये हिमाचल मोठी भूमिका बजावू शकते. 
हिमाचल प्रदेश देशातल्या सर्वात महत्वपूर्ण औषध निर्मिती केंद्रांपैकी एक आहे. भारताला आज जगाचे  औषधालय म्हटले जाते त्यामागे हिमाचलचे  मोठे  सामर्थ्य आहे. कोरोना जागतिक महामारीच्या काळात हिमाचल प्रदेशने देशातल्या इतर राज्यांबरोबरच इतर देशानांही मदत केली.औषध उद्योग क्षेत्राबरोबरच आमच्या सरकारने आयुष उद्योग-नैसर्गिक औषधांशी संबंधित उद्योजकांनाही प्रोत्साहन देत आहे.  
 

 

मित्रांनो,,

आज देशात शासन चालवण्याची दोन भिन्न प्रारुपे अस्तित्वात आहेत.  एक प्रारुप आहे - सबका साथ - सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास.  त्याच वेळी, दुसरे प्रारुप आहे - स्वतःचा स्वार्थ, कुटुंबाचा स्वार्थ आणि विकास देखील स्वतःच्या कुटुंबाचाच.जर आपण केवळ   हिमाचलमध्येच पाहिले तर आज पहिले मॉडेल(प्रारुप) जे मॉडेल आम्ही तुमच्यासमोर आणले, ते मॉडेल राज्याच्या विकासात सक्रियपणे सहभागी आहे.  याचा परिणाम म्हणून, हिमाचलने आपल्या राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात, इतरांपुढे जाऊन सर्वप्रथम बाजी मारली.  येथील सरकारमध्ये जे लोक प्रतिनिधी आहेत ते राजकीय स्वार्थात मग्न नसून हिमाचलमधील प्रत्येक नागरिकाला लस कशी मिळेल याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिले आहे.आणि या कामात गुंतलेल्या लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे भाग्य मला एकदा लाभले.  अत्यंत प्रेरक, एकेकाचे बोलणे इतके प्रेरणादायी ….

 

बंधू आणि भगिनिंनो

हिमाचलमधील लोकांच्या आरोग्याची चिंता होती, त्यामुळे दुर्गम भागात त्रास सहन करूनही सर्वांना लस देण्यात आली आहे.  ही आमची सेवाभावना आहे, लोकांप्रती असलेल्या दायित्वाची भावना आहे.  इथल्या सरकारने लोकांच्या विकासासाठी अनेक नवीन योजना राबवल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या योजनांचा विस्तारही ते चांगल्या पद्धतीने करत आहे.  हिमाचल सरकारला जनतेची आणि गरिबांची किती काळजी आहे, हे यावरून दिसून येते.

मित्रांनो,

आज आमचे सरकार मुलींना मुलाप्रमाणे समान हक्क देण्यासाठी झटत आहे.  मुलगा आणि मुलगी एक समानच आणि एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत.  त्यांचेच आशीर्वाद आम्हाला या कार्यासाठी बळ देतात.  मुलगा आणि मुलगी एक सारखेच.  आम्ही निश्चित केले आहे की, मुलींच्या लग्नाचे वयही तेवढेच असायला  हवे, ज्या वयात मुलांना लग्न करायची परवानगी असते.  बघा आमच्या भगिनीच सगळ्यात जास्त टाळ्या वाजवत आहेत.  मुलींच्या लग्नाचे वय  21 वर्षे झाल्यामुळे त्यांना अभ्यासासाठीही पूर्ण वेळ मिळेल आणि त्या आपले करिअरही घडवू शकतील.  आमचे हे सर्व प्रयत्न सुरू असताना तुम्ही आणखी एक मॉडेल पाहत आहात जो फक्त त्याचा स्वार्थ, त्याची व्होट बँक पाहतो.  ज्या राज्यांमध्ये ते सरकार चालवत आहेत, त्या राज्यांमध्ये गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य नाही तर स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणाला प्राधान्य दिले जाते.  मी देशातील तज्ञांना विनंती करू इच्छितो की,जरा त्या राज्यांच्या लसीकरणाच्या नोंदी पण  पहा.  त्यांच्या लसीकरणाच्या नोंदी हीच त्यांना आपल्या राज्यातील जनतेची काळजी नसल्याची साक्ष आहे.

 

मित्रांनो,

तुमची प्रत्येक गरज लक्षात घेऊन आमचे सरकार अत्यंत संवेदनशीलतेने, सतर्कतेने निरंतर काम करत आहे.  आता सरकारने ठरवले आहे की 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना मुले-मुली  सर्वांना सोमवार, 3 जानेवारीपासून लस मिळण्यास सुरुवात होईल.  सोमवार, ३ जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार आहे.  मला खात्री आहे की हिमाचल प्रदेश यातही शानदार काम करून दाखवेल.  देशाला दिशा दाखविण्याचे काम हिमाचल करणार आहे.  आपले आरोग्य क्षेत्रातील लोक, आघाडीचे कर्मचारी ते गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील एक मोठी शक्ती बनले आहेत.  त्यांनाही  सावधगिरी म्हणून लसीची मात्रा  देण्याचे कामही 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना, ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत, त्यांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सावधगिरीची मात्रा म्हणून लस देण्यास सुरुवात होणार आहे.  या सर्व प्रयत्नांमुळे हिमाचलच्या लोकांना सुरक्षा कवच तर मिळेलच, पण इथल्या पर्यटन क्षेत्राचे रक्षण  करण्यासाठी आणि आगेकूच करण्यासाठी खूप मदत होईल.

 

 मित्रांनो,

प्रत्येक देशाच्या विचारधारा वेगवेगळ्या असतात, पण आज आपल्या देशातील जनतेला दोन विचारधारा स्पष्टपणे दिसत आहेत.  एक विचारधारा विलंबाची आणि दुसरी विकासाची.  दिरंगाई करणार्‍यांनी पर्वतीय भागात राहणाऱ्या लोकांची कधीच पर्वा केली नाही.  पायाभूत सुविधांचे काम असो, लोकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम असो, विलंबाच्या विचारसरणीने हिमाचलच्या लोकांना अनेक दशके वाट पाहात रहावी लागली.  त्यामुळे अटल बोगद्याच्या कामाला अनेक वर्षे विलंब झाला होता.  रेणुकाजी प्रकल्पालाही तीन दशके उशीर झाला.  त्या लोकांच्या विलंबाच्या विचारसरणीच्या विरुध्द, आमची बांधिलकी केवळ आणि केवळ विकासासाठीच आहे.  आम्ही  अटल बोगद्याचे काम पूर्ण केले.  चंदीगड ते मनाली आणि सिमला जोडणाऱ्या रस्त्याचे आम्ही रुंदीकरण केले.  आम्ही केवळ महामार्ग आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करत नाही, तर अनेक ठिकाणी रोपवेही बसवत आहोत.  आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने दूरदूरची गावे देखील जोडत आहोत.

 

मित्रांनो

गेल्या 6-7 वर्षांत सरकारने ज्या कार्यक्षम (डबल इंजिन) पद्धतीने काम केले आहे त्यामुळे विशेषतः आमच्या बहिणींच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे.  पूर्वी आमच्या बहिणींचा स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करण्यात बराच वेळ जात असे.  आज गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचला आहे.  शौचालयाची सुविधा मिळाल्यानेही  भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.  इथे पाण्यासाठी बहिणी-मुलींना किती कष्ट करावे लागले, हे तुमच्यापेक्षा चांगले कोणाला माहीत आहे.  एक वेळ अशी होती की, केवळ पाण्याचे कनेक्शन घेण्यासाठी अनेक दिवस सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागत होते.  आज सरकारच पाण्याचे  कनेक्शन देण्यासाठी तुमचे दार ठोठावत आहे.  स्वातंत्र्याच्या 7 दशकांत हिमाचलमध्ये 7 लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळाले.  7 दशकात 7 लाख कुटुंबे. आमच्यामुळे अवघ्या 2 वर्षात आणि तेही कोरोनाच्या काळात 7 लाखांहून अधिक नवीन कुटुंबांना पाईपद्वारे पाणी मिळाले आहे.  7 दशकात 7 लाख.किती? जरा त्याबाजूनेही आवाज येऊ द्या, किती?

 

 7 दशकात 7 लाख.  आणि आम्ही दोन वर्षात आणखी सात लाख नवीन दिले.  किती दिले?  सात लाख घरांना पाणी देण्याचे काम केले.  आता जवळपास ९० टक्के लोकसंख्येला नळाचे पाणी उपलब्ध आहे.  कार्यक्षम (डबल इंजिन) सरकारचा हा लाभ आहे.  केंद्र सरकारचे इंजिन एक योजना सुरू करते, राज्य सरकारचे दुसरे इंजिन ती योजना वेगाने पुढे नेते.  आता आयुष्मान भारत योजनेचे उदाहरण समोर आहे.  ही योजना पुढे नेत, राज्य सरकारने हिमकेअर योजना सुरू केली आणि अधिकाधिक लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराच्या कक्षेत आणले.  या योजनांतर्गत हिमाचलमधील सुमारे सव्वा लाख रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत.  तसेच, येथील सरकारने उज्ज्वला योजनेचा विस्तार करत लाभार्थी गृहीणी  सुविधा योजना सुरू केली, ज्यामुळे लाखो भगिनींना नवे  सहाय्य मिळाले.  या कठीण काळात प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकार देत असलेल्या मोफत रेशन योजनेला गती देण्याचे कामही राज्य सरकार करत आहे.

 

 मित्रांनो,

हिमाचल ही वीरांची भूमी आहे, हिमाचल ही शिस्तपालनाची धरती आहे, देशाचा मान, शान आणि सन्मान वाढवणारी भूमी आहे. येथे घरोघरी देशाचे रक्षण करणारे शूर पुत्र आणि कन्या आहेत.  आमच्या सरकारने गेल्या सात वर्षांत देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी जे काम केले आहे, सैनिक, माजी सैनिक, यांच्यासाठी घेतलेले निर्णय यांचाही हिमाचलच्या जनतेला मोठा फायदा झाला आहे.  वन रँक वन पेन्शनचा अनेक दशके अडकलेला निर्णय ,विलंबित धोरण, रखडलेला निर्णय असो किंवा लष्कराला आधुनिक शस्त्रे आणि बुलेट प्रूफ जॅकेट देण्याचे काम‌ असो वा थंडीत त्रास कमी करण्यासाठी आवश्यक संसाधने अथवा ये-जा करण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी या सरकारच्या प्रयत्नांचे लाभ हिमाचलमधील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत.

 

 मित्रांनो,

भारतात पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत.  तीर्थक्षेत्रात हिमाचलचे जे  सामर्थ्य आहे त्याच्याशी कुणी मुकाबला करुच शकणार नाही.  हे शिव आणि शक्तीचे स्थान आहे.  पंच कैलास पैकी 3 कैलास हिमाचल प्रदेशात आहेत.  त्याचप्रमाणे हिमाचलमध्ये अनेक शक्तीपीठे आहेत.  बौद्ध धर्माचे आणि संस्कृतीचे महत्त्वाचे स्थानही येथे आहे.  दुहेरी इंजिनचे(कार्यक्षमतेचे) सरकार हिमाचलची ही शक्ती अनेक पटींनी वाढवणार आहे.

 

 मंडीतील शिवधामचे बांधकाम हेही याच बांधिलकीचे फलित आहे.

 

 बंधू आणि भगिनिंनो,

 

आज भारत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना, हिमाचल राज्य पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरचे सुवर्णमहोत्सवी वर्षही साजरे करत आहे.  म्हणजेच हिमाचलसाठी नवीन योजनांवर काम करण्याची ही वेळ आहे.हिमाचलने प्रत्येक राष्ट्रीय संकल्प साध्य करण्यात आघाडीची भूमिका बजावली आहे.  हा उत्साह पुढील काळातही कायम राहील.  पुन्हा एकदा, विकास आणि विश्वासाच्या 5 व्या वर्षाच्या आणि नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.  इतका प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल, खूप आशीर्वाद दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.  या देवभूमीला मी पुन्हा एकदा प्रणाम करतो.

 

माझ्यासोबत म्हणा,

 

 भारत माता की जय !

 

भारत माता की जय!

 

भारत माता की जय !

 

 खूप खूप धन्यवाद.

मोदी मास्टरक्लास: पंतप्रधान मोदींसोबत ‘परीक्षा पे चर्चा’
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
Explore More
पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद

लोकप्रिय भाषण

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद
You all have made it: PM Narendra Modi speaks to India's Thomas Cup 2022 winners, invites them to residence

Media Coverage

You all have made it: PM Narendra Modi speaks to India's Thomas Cup 2022 winners, invites them to residence
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2022
May 15, 2022
शेअर करा
 
Comments

Ayushman Bharat Digital Health Mission is transforming the healthcare sector & bringing revolutionary change to the lives of all citizens

With the continuous growth and development, citizens appreciate all the efforts by the PM Modi led government.