महामहिम,
विशिष्ट प्रतिनिधीवर्ग,
प्रिय मित्रहो, नमस्कार.
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा 2025 या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. युरोपमध्ये ही परिषद प्रथमच आयोजित केली जात आहे. माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आणि फ्रान्स सरकारने केलेल्या सहयोगाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आगामी संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसाठीही मी शुभेच्छा देतो.
मित्रहो,
‘किनारी भागांच्या उज्वल भविष्याला आकार देणे’ हा या परिषदेचा विषय आहे. नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल यामुळे किनारी क्षेत्र आणि बेटे यांना मोठा धोका आहे. मागील काही दिवसात आपण भारत आणि बांगलादेशमध्ये रेमल चक्रीवादळ,कॅरेबियन मध्ये बेरील चक्रीवादळ, आग्नेय आशियामध्ये यागी वादळ, अमेरिकेत हेलेन वादळ, फिलिपिन्स मध्ये उसागी वादळ आणि आफ्रिकेच्या काही भागात चिडो चक्रीवादळ आलेले पाहिले. अशा आपत्तीमध्ये जीवित-वित्त हानी झाली आहे.

मित्रहो,
भारतानेही 1999 मध्ये सुपर सायक्लोन आणि 2004 मध्ये त्सुनामीदरम्यान हा आघात झेलला आहे.आम्ही लवचिकता लक्षात घेत अनुकूलन आणि पुनर्निर्मिती केली. संवेदनशील भागांमध्ये चक्रीवादळ काळासाठी आसरास्थाने उभारली. आम्ही 29 देशांसाठी त्सुनामी इशारा प्रणाली तयार करण्यासाठीही मदत केली.
मित्रहो,
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा यासाठीची आघाडी 25 छोट्या द्वीपकल्पीय विकसनशील देशांसमवेत काम करत आहे. मजबूत घरे, शाळा, उर्जा, जल सुरक्षा आणि पूर्व सूचना प्रणाली उभारण्यात येत आहे.या परिषदेची संकल्पना पाहता प्रशांत हिंद महासागर आणि कॅरेबियन मित्रांना इथे पाहून मला आनंद होत आहे. आफ्रिकी संघही सीडीआरआय मध्ये सहभागी झाला आहे हे पाहून मला आनंद झाला आहे.
मित्रहो,
काही महत्वाच्या जागतिक प्राधान्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.
पहिला : आपत्ती निवारणासाठीचा अभ्यासक्रम,मॉड्यूल आणि कौशल्य विकास कार्यक्रम हा उच्च शिक्षणाचा भाग झाला पाहिजे. यातून भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कुशल मनुष्यबळ सज्ज होईल.

दुसरा : अनेक देश आपत्तींना तोंड देतात आणि कणखरतेने पुनर्निर्मिती करतात. त्यांनी घेतलेला धडा आणि सर्वोत्तम पद्धती यांचा एक जागतिक डिजिटल कोष तयार केल्यास त्याचा फायदा होईल.
तिसरा :आपत्ती निवारणासाठी अभिनव वित्तपुरवठ्याची आवश्यकता आहे. आपल्याला कृतीयोग्य कार्यक्रम तयार करायला हवा आणि विकसनशील देश या वित्तपुरवठ्यापर्यंत पोहोचतील याची सुनिश्चिती करायला हवी.
चौथा : छोट्या द्वीपकल्पीय विकसनशील देशांकडे आम्ही मोठे महासागरी देश म्हणून पाहतो. ते अतिसंवेदनशील असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
पाचवा : भक्कम पूर्व सूचना प्रणाली आणि समन्वय अतिशय महत्वाचा आहे. यामुळे वेळेवर निर्णय घेण्यासाठी आणि तळापर्यंत प्रभावी संपर्क साधण्यासाठी मदत होते. या परिषदेत होणाऱ्या चर्चेमध्ये या पैलूंवर विचार विनिमय होईल याचा मला विश्वास आहे.
मित्रहो,
चला, आपण अशा पायाभूत सुविधा उभारूया ज्या प्रत्येक आपत्तीतही भक्कमपणे उभ्या राहतील.चला, आपण जगासाठी भक्कम आणि लवचिक भविष्य घडवूया.
धन्यवाद.


