मध्य प्रदेशात सिंचन, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, कोळसा आणि उद्योग या क्षेत्रांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी बसवली कोनशिला आणि केले लोकार्पण
मध्य प्रदेशात सायबर तहसील प्रकल्पाचा केला शुभारंभ
“मध्य प्रदेशातील डबल इंजिन सरकार जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे”
“भारत तेव्हाच विकसित होईल जेव्हा त्याची राज्ये विकसित होतील”
“उज्जैनमधील विक्रमादित्य वेदिक घड्याळ कालचक्राचे साक्षीदार बनेल ज्यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे”
“डबल इंजिन सरकार दुप्पट वेगाने विकास कार्य करत आहे”
“गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर सरकार सर्वाधिक भर देत आहे”
“मध्य प्रदेशच्या सिंचन क्षेत्रात आपण एका क्रांतीचा अनुभव घेत आहोत”
“गेल्या 10 वर्षात संपूर्ण जगात भारताच्या लौकिकात वाढ झाली आहे”
“युवा वर्गाची स्वप्ने ही मोदी यांचे संकल्प आहेत”

नमस्कार !

'विकसित राज्य से विकसित भारत अभियान' या अभियानात आज आपण मध्य प्रदेशच्या आपल्या बंधू-भगिनींसोबत जोडले जात आहोत. मात्र, यावर बोलण्यापूर्वी मी डिंडोरी रस्ता अपघाताबाबत दुःख व्यक्त करतो. या अपघातात ज्या लोकांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावले आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जे लोक जखमी आहेत, त्यांच्या उपचारांची सर्व व्यवस्था सरकार करत आहे. दुःखाच्या या प्रसंगी, मी मध्य प्रदेशच्या जनतेसोबत आहे.

मित्रहो,

यावेळी एमपीच्या प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघात, विकसित मध्य प्रदेशच्या संकल्पासह लाखो सहकारी जोडले गेले आहेत. गेल्या काही दिवसात देशातील वेगवेगळ्या राज्यांनी अशाच प्रकारे विकसित होण्याचा संकल्प केला आहे. कारण भारत तेव्हाच विकसित होईल, जेव्हा राज्ये विकसित होतील. आज या संकल्प यात्रेसोबत मध्य प्रदेश जोडला जात आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

उद्यापासूनच एमपीमध्ये 9 दिवसांचा विक्रमोत्सव सुरू होणार आहे. आपला गौरवास्पद वारसा आणि वर्तमान विकासाचा हा उत्सव आहे. आमचे सरकार वारसा आणि विकासाला कशा प्रकारे एकत्र घेऊन वाटचाल करत आहे, याचा दाखला म्हणजे उज्जैनमध्ये बसवण्यात आलेले वैदिक घड्याळ देखील आहे. बाबा महाकाल यांची ही नगरी कधी काळी संपूर्ण जगासाठी कालगणनेचे केंद्र होती. मात्र, त्या महत्त्वाचे विस्मरण करण्यात आले होते. आता आम्ही जगातील पहिले “ विक्रमादित्य वैदिक घड्याळ” पुन्हा स्थापित केले आहे. ही केवळ आपल्या समृद्ध भूतकाळाचे स्मरण करण्याची एक संधी आहे, असे नाही आहे. हे त्या कालचक्राचे देखील साक्षीदार बनणार आहे, जो भारताला विकसित बनवेल.  

मित्रहो,

आज, एमपीच्या सर्व लोकसभा मतदारसंघांना एकाच वेळी जवळपास 17 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मिळाले आहेत. यामध्ये वीज, रस्ते, क्रीडा संकुले, सामुदायिक सभागृहे आणि इतर उद्योगांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच एमपीच्या 30हून जास्त रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे कामही सुरू झाले आहे. भाजपाचे डबल इंजिन सरकार अशाच प्रकारे डबल वेगाने विकास करत आहे. हे प्रकल्प एमपीच्या लोकांचे जीवन सुलभ बनवेल, येथे गुंतवणूक आणि रोजगारांच्या नव्या संधी निर्माण करेल. यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

 

मित्रहो,

आज चहु बाजूला एकच गोष्ट ऐकू येत आहे- अबकी बार, 400 पार, अबकी बार, 400 पार! पहिल्यांदाच असे झाले आहे जेव्हा जनतेने स्वतःच आपल्या आवडत्या सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अशा प्रकारे नारा बुलंद केला आहे. हा नारा बीजेपीने नाही तर देशातल्या सर्वसामान्य जनतेने दिला आहे. ‘मोदी की गॅरंटी’ वर देशाचा इतका विश्वास भावना उंचबळून टाकणारा आहे.

मात्र, मित्रांनो,

आमच्यासाठी केवळ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणे एवढेच लक्ष्य आहे, असे नाही आहे. आम्ही तिसऱ्यांदा देशाला तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. आमच्यासाठी केवळ सरकार स्थापन करणे हेच अंतिम लक्ष्य नाही आहे, आमच्यासाठी सरकार स्थापन करणे हे देश घडवण्याचे माध्यम आहे. हेच आम्ही मध्य प्रदेशात देखील पाहात आहोत. गेली दोन दशके तुम्ही सातत्याने आम्हाला संधी देत आहात. आज देखील विकासाकरिता किती आकांक्षा, किती उत्साह आहे, हे तुम्ही नव्या सरकारच्या गेल्या काही महिन्यांच्या कार्यकाळात पाहिले आहे. आणि आता मी, समोर स्कीनवर पाहात आहेत, सर्वत्र लोकच लोक दिसत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रम आहे आणि 15 लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी असणे, 200 पेक्षा जास्त ठिकाणांहून सहभागी असणे. ही गोष्ट सामान्य नाही आहे आणि माझ्या डोळ्यांनी मी या ठिकाणी समोर टीव्हीवर पाहात आहे, किती उत्साह आहे, किती आकांक्षा आहेत, किती जोश दिसत आहे. मी पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या बांधवांच्या या प्रेमाला नमन करतो, तुमच्या या आशीर्वादाला प्रणाम करतो.

मित्रहो,

विकसित मध्य प्रदेशच्या निर्मितीसाठी डबल इंजिन सरकार शेती, उद्योग आणि पर्यटन या तिघांवर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. आज माता नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेल्या तीन नदी प्रकल्पांचे भूमीपूजन झाले आहे. या प्रकल्पांमुळे आदिवासी भागात सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. सिंचनाच्या क्षेत्रात मध्य प्रदेशात आपण एक नवी क्रांती होताना पाहात आहोत. केन-बेतवा लिंक प्रकल्पामुळे बुंदेलखंडच्या लाखो कुटुंबांचे जीवन बदलणार आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचते, तेव्हा त्याची यापेक्षा मोठी सेवा दुसरी काय असू शकते. भाजपा सरकार आणि कांग्रेसचे सरकार यांच्यामध्ये कोणता फरक आहे याचे उदाहरण सिंचन योजना देखील आहेत. 2014 च्या आधीच्या 10 वर्षात देशात सुमारे 40 लाख हेक्टर जमिनीला सूक्ष्म सिंचनाच्या कक्षेत आणण्यात आले होते. मात्र, गेल्या 10 वर्षांच्या आमच्या सेवाकाळात याचा दुप्पट म्हणजे जवळपास 90 लाख हेक्टर शेतीला सूक्ष्म सिंचनाने जोडले गेले आहे. यातून हे दिसत आहे की भाजपा सरकारचे प्राधान्य कशाला आहे. हे दाखवते की भाजपा सरकार म्हणजे गती देखील आणि प्रगती देखील .

 

मित्रहो,

गोदामांची कमतरता ही लहान शेतकऱ्यांची आणखी एक मोठी समस्या आहे. यामुळे लहान शेतकऱ्यांना नाईलाजाने आपल्या उत्पादनाची मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. आता आम्ही साठवणुकीच्या विश्वाशी संबंधित सर्वात मोठ्या योजनेवर काम करत आहोत. आगामी वर्षांमध्ये देशात हजारोंच्या संख्येने मोठी गोदामे बांधण्यात येणार आहेत. यामुळे  700 लाख मेट्रिक टन धान्याच्या साठवणुकीची व्यवस्था देशात तयार होईल. यावर सरकार सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

मित्रांनो,

आमचे सरकार गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर खूप भर देत आहे. यासाठी सहकाराचा विस्तार केला जात आहे. आतापर्यंत आपण दूध आणि ऊसाच्या क्षेत्रात सहकाराचे लाभ पाहिले आहेत. भाजपा सरकार अन्नधान्य, फळे-भाजीपाला, मासे अशा प्रत्येक क्षेत्रात सहकारावर भर देत आहे. यासाठी लाखो गांवांमध्ये सहकारी समित्यांची, सहकारी संस्थांची स्थापना केली जात आहे.

प्रयत्न हाच आहे की शेती असो, पशुपालन असो, मधुमक्षिका पालन असो, कुक्कुटपालन असो किंवा मत्स्यपालन असो, प्रत्येक प्रकारे गावांचे उत्पन्न वाढावे.

मित्रांनो,

गावांच्या विकासामध्ये भूतकाळात आणखी खूप मोठी समस्या होती. गावाची जमीन असो किंवा गावाची मालमत्ता असो त्या संदर्भात अनेक वाद असत. जमिनीशी संबंधित छोट्या छोट्या कामांसाठी गावकऱ्यांना तालुक्याला फेऱ्या माराव्या लागायच्या. आता आमचे दुहेरी इंजिन असलेले सरकार पंतप्रधान स्वामित्व योजनेच्या माध्यमातून अशा समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधत आहे. आणि मध्य प्रदेश तर स्वामित्व योजनेअंतर्गत खूप चांगली कामगिरी करत आहे. मध्य प्रदेशात शंभर टक्के गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक स्वामित्व कार्डे देण्यात आली आहेत. ही जी गावातील घरांची कागदपत्रे मिळत आहेत, यामुळे गरीब अनेक प्रकारच्या वादांपासून वाचेल. गरिबांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करणे हीच तर मोदींची गॅरंटी आहे. आज मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये सायबर तहसील कार्यक्रमाचाही विस्तार केला जात आहे. आता नाव बदलणे, नोंदणीशी संबंधित प्रकरणांचे निरसन डिजिटल पद्धतीने केले जाईल. यामुळे ग्रामीण कुटुंबांचा वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल.

मित्रांनो, 

मध्य प्रदेश हे देशातील आघाडीच्या औद्योगिक राज्यांपैकी एक व्हावे अशी मध्य प्रदेशातील तरुणांची इच्छा आहे. मी मध्य प्रदेशातील प्रत्येक तरुणाला, विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना सांगेन की, भाजप सरकार तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडत नाही आहे. तुमची स्वप्ने हा मोदींचा संकल्प आहे. मध्य प्रदेश हा आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचा एक मजबूत स्तंभ बनेल.

मुरैनाच्या सीतापूर येथील चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे निर्माण संकुल (मेगा लेदर आणि फूटवेअर क्लस्टर), इंदूरमधील तयार कपड्यांच्या उद्योगासाठीचे संकुल, मंदसौरमधील औद्योगिक नगरीचा विस्तार, धार औद्योगिक नगरीचे नवीन बांधकाम ही सर्व पावले याच दिशेने टाकलेली आहेत. काँग्रेस सरकारांनी आपली पारंपरिक उत्पादन क्षमता देखील नष्ट केली होती. खेळणी बनवण्याची किती मोठी परंपरा आपल्याला येथे लाभली आहे. पण परिस्थिती अशी होती की काही वर्षांपूर्वीपर्यंत आपले बाजार आणि आपली घरे परदेशी खेळण्यांनीच भरलेली होती. आम्ही देशातील आमच्या पारंपरिक खेळणी बनवणा-या  मित्रांना, विश्वकर्मा कुटुंबांना मदत केली. आज परदेशातून खेळण्यांच्या आयातीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उलट, जितकी खेळणी आपण आयात करायचो त्यापेक्षा अधिक खेळणी आज आपण निर्यात करत आहोत. आपल्या बुधनी येथील खेळणी तयार करणाऱ्या कारागिरांसाठीही अनेक संधी निर्माण होणार आहेत. बुधनीमध्ये आज ज्या सुविधांवर काम सुरू झाले आहे, त्यामुळे खेळण्यांच्या निर्मितीला चालना मिळेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांना मोदी विचारतात. देशातील अशाच पारंपरिक कामांशी संबंधित सहकाऱ्यांच्या मेहनतीचा प्रचार करण्याची जबाबदारीही आता मोदींनी घेतली आहे. मी तुमच्या कलेचा, तुमच्या कौशल्यांचा देशात आणि जगात प्रचार करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन. जेव्हा मी कुटीर उद्योगात बनवलेल्या वस्तू परदेशी पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून देतो, तेव्हा मी तुमचाही प्रचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. जेव्हा मी ' व्होकल फॉर लोकल ' बद्दल बोलतो, तेव्हा मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी घरोघरी जाऊन एक प्रकारचे तुमचा प्रचार  करतो .

मित्रांनो,

गेल्या दहा वर्षांत जगभरात भारताची प्रतिष्ठा खूप वाढली आहे. आज जगातील देशांना भारता बरोबर मैत्री करायला आवडते. आज परदेशात जाणाऱ्या कोणत्याही भारतीयाला खूप आदर मिळतो. भारताच्या या वाढलेल्या प्रतिष्ठेचा थेट फायदा गुंतवणुकीत, पर्यटनात होतो आहे. आज अधिकाधिक लोकांना भारतात यायचे आहे. भारतात आले म्हणजे मध्य प्रदेशात येणे तर अतिशय स्वाभाविक आहे. कारण मध्यप्रदेश आश्चर्यकारक आहे , मध्य प्रदेश तर अनोखे आहे, मध्य प्रदेश तर कमाल आहे. गेल्या काही वर्षांत ओंकारेश्वर आणि ममलेश्वर येथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ओंकारेश्वर येथे आदि शंकराचार्य यांच्या स्मरणार्थ विकसित होत असलेल्या एकात्म धामच्या निर्माणाने ही संख्या आणखी वाढेल. उज्जैन येथे 2028 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचेही आयोजन होणार आहे. इच्छापूर ते इंदूरमधील ओंकारेश्वरपर्यंतच्या 4 पदरी रस्त्यामुळे भाविकांना आणखी सुविधा मिळेल. आज उद्घाटन झालेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशची संपर्क व्यवस्थाही बळकट होईल. जेव्हा संपर्क व्यवस्था चांगली असते, तेव्हा शेती असो, पर्यटन असो किंवा उद्योग , याचा सर्वांनाच फायदा होतो.

मित्रांनो,

गेली 10 वर्षे आपल्या नारी शक्तीच्या उत्थानाची राहिली आहेत. माता आणि भगिनींच्या जीवनातील प्रत्येक असुविधा, प्रत्येक कष्ट दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी हमी मोदींनी दिली होती. ही हमी  प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण पुढची पाच वर्षे आपल्या बहिणी आणि मुलींच्या अभूतपूर्व सक्षमीकरणाची असतील. येणाऱ्या पाच वर्षांत प्रत्येक गावात अनेक लखपती दीदी बनतील. येणाऱ्या पाच वर्षांत गावातील बहिणी नमो ड्रोन दीदी बनून शेतीतील नव्या क्रांतीचा आधार बनतील. येणाऱ्या पाच वर्षांत बहिणींच्या आर्थिक स्थितीत अभूतपूर्व सुधारणा होईल. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, गेल्या 10 वर्षांत गरीबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांमुळे गावातील गरीब कुटुंबांचे उत्पन्न झपाट्याने वाढत आहे. अहवालानुसार, ग्रामीण उत्पन्न शहरी उत्पन्नापेक्षा वेगाने वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत 25 कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर आले आहेत. म्हणजेच भाजप सरकार योग्य दिशेने काम करत आहे. अशा वेगवान पावलांसह मध्य प्रदेश विकासाची नव्या उंची गाठत राहील, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे विकास कार्यासाठी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आज आपण इतक्या मोठ्या संख्येने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालात. एक नवीन इतिहास रचलात. यासाठी मी तुम्हा सर्व बंधू भगिनींचे हृदयापासून आभार व्यक्त करतो. 

धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India and France strengthen defence ties: MBDA and Naval group set to boost 'Make in India' initiative

Media Coverage

India and France strengthen defence ties: MBDA and Naval group set to boost 'Make in India' initiative
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi prays to Goddess Chandraghanta on third day of Navratri
October 05, 2024

Prime Minister, Shri Narendra Modi today prayed to Goddess Chandraghanta on third day of Navratri.

The Prime Minister posted on X:

“नवरात्रि में आज मां चंद्रघंटा के चरणों में कोटि-कोटि वंदन! देवी मां अपने सभी भक्तों को यशस्वी जीवन का आशीष प्रदान करें। आप सभी के लिए उनकी यह स्तुति...”