पंचायतींना सक्षम करण्यासाठी गेल्या दशकात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायतींचे बळकटीकरण करण्यात आले आहे: पंतप्रधान
गेल्या दशकामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी गती लाभली आहे: पंतप्रधान
गेले दशक हे भारताच्या पायाभूत सुविधांचे दशक ठरले: पंतप्रधान
मखाणा हे देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी आज सुपरफूड झाले आहे, पण मिथिला येथे तो इथल्या संस्कृतीचा भाग आणि येथील समृद्धीचा स्त्रोत आहे: पंतप्रधान
140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल: पंतप्रधान
दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, न्याय मिळणे सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, या निर्धारावर संपूर्ण देश ठाम आहे: पंतप्रधान

माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे, आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, उभे राहण्याची आवश्यकता नाही, बसल्या बसल्याच 22 तारखेला ज्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण गमावले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही क्षण आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, मौन बाळगत, आपल्या आराध्य देवतांचे स्मरण करत, त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करू , त्यानंतर मी आज माझे भाषण  सुरू  करेन.

ओम शांती-शांती-शांती.

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री, माझे मित्र नितीश कुमार जी, मंचावर उपस्थित इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि बिहारमधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

आज पंचायत राज दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देश मिथिलाशी जोडला गेला आहे, बिहारशी जोडला गेला आहे. आज इथे देशाच्या, बिहारच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले आहे. वीज, रेल्वे, पायाभूत सुविधांच्या या विविध कामांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची पुण्यतिथी देखील आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

 

मित्रहो,

बिहार ही ती भूमी आहे जिथून पूज्य बापू यांनी सत्याग्रहाच्या मंत्राचा प्रसार केला होता. पूज्य बापूंचा ठाम विश्वास होता की, जोपर्यंत भारतातील गावे मजबूत होणार नाहीत, तोपर्यंत भारताचा जलद गतीने विकास होऊ शकणार नाही. देशात पंचायत राजची संकल्पना मांडण्यामागे  हीच भावना आहे. गेल्या दशकभरात, पंचायतींना सक्षम करण्यासाठी एकामागोमाग एक पावले उचलली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही पंचायतींना बळकट केले गेले आहे. गेल्या दशकभरात 2 लाखांपेक्षा जास्त  ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. साडेपाच लाखांपेक्षा जास्त सामाईक सेवा केंद्रे गावांमध्ये उभारली गेली आहेत. पंचायती डिजिटल झाल्यामुळे आणखी एक फायदा झाला आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, जमीन धारण प्रमाणपत्र, असे अनेक दस्तऐवज सहज मिळवू शकणार आहात. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतर जिथे देशाला संसदेची नवीन इमारत मिळाली, तिथे देशात 30 हजार नवीन पंचायत भवन देखील उभारली गेली. पंचायतींना पुरेसा निधी मिळावा, याला देखील सरकारने प्राधान्य दिले आहे. गेल्या 10 वर्षात पंचायतींना 2 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे. हा सर्व पैसा गावाच्या विकासासाठी वापरला जात आहे.

मित्रहो,

ग्रामपंचायतींची आणखी एक मोठी समस्या, जमीनींच्या वादांशी संबंधित आहे. कोणती जमीन लोकवस्तीची आहे, कोणती शेतीची आहे, पंचायतीची जमीन कोणती आहे, सरकारी जमीन कोणती आहे, आणि या सर्व मुद्यांवर कायम वाद होत असत. यावर उपायोजना करण्यासाठी जमिनींचे डिजिटलायझेशन केले जात आहे. जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन केल्याने अनावश्यक वाद मिटवण्यात मदत झाली आहे.

मित्रहो,

आपण पाहिले आहे की पंचायतींनी कशारितीने सामाजिक सहभागाला सक्षम केले आहे, बिहार हे देशातील पहिले राज्य होते, जिथे महिलांना यामध्ये 50 टक्के आरक्षणाची सुविधा देण्यात आली, आणि यासाठी मी नितीशजींचे अभिनंदन करतो. आज गरीब, दलित, महादलित, मागास, अतिमागास समाजातील अनेक भगिनी-कन्या बिहारमध्ये लोकप्रतिनिधी बनून सेवा करत आहेत, आणि हाच खरा सामाजिक न्याय आहे, हीच खरी सामाजिक भागीदारी आहे. लोकशाही जास्तीत जास्त सहभागातूनच समृद्ध होते, सक्षम होते. याच विचाराने लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदाही करण्यात आला आहे. याचा फायदा देशातील प्रत्येक राज्यातील महिलांना होईल, आपल्या भगिनी-कन्या यांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल.

 

मित्रहो,

देशातील महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, रोजगार-स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या जीविका दीदी या कार्यक्रमामुळे अनेक भगिनींचे जीवन बदलले आहे. आजच इथे बिहारमधील भगिनींच्या स्वयं-सहायता गटांना सुमारे एक हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामुळे भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ मिळेल. यामुळे देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आणखी मदत होईल.

मित्रहो,

गेल्या दशकभरात ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे. गावांमध्ये गरिबांची घरे बांधली गेली, रस्ते बांधले गेले, पक्के रस्ते बांधले गेले आहेत. गावांमध्ये गॅस जोडणी पोहोचली, पाण्याची जोडणी पोहोचली, शौचालये बांधली गेली आहेत. अशा प्रत्येक कामातून गावांमध्ये लाखो कोटी रुपये पोहोचले आहेत. रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. मजुरांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत  आणि फेरीवाल्यांपासून ते दुकानदारांपर्यंत, सर्वांना कमाईच्या नवीन संधी मिळाल्या आहेत. यामुळे समाजातल्या त्या घटकाला सर्वाधिक फायदा होत आहे, जो पिढ्यान पिढ्या वंचित राहिला होता. मी तुम्हाला  प्रधानमंत्री आवास योजनेचे उदाहरण देतो. या योजनेचे उद्दिष्ट आहे की, देशात कोणतेही गरीब कुटुंब बेघर राहू नये, प्रत्येकाच्या माथ्यावर पक्के छप्पर असावे. आता जेव्हा मी या माता-भगिनींना घराची चावी देत होतो, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, त्यांच्यात जो नवीन आत्मविश्वास दिसत होता, तो खरोखरच या गरिबांसाठी काम करण्याच्या प्रेरणेचे कारण ठरतो. आणि याच ध्येयाने गेल्या दशकभरात 4 कोटींपेक्षा जास्त पक्की घरे बांधली गेली आहेत. बिहारमध्ये देखील आतापर्यंत 57 लाख गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. ही घरे गरीब, दलित, मागास-अतिमागास, पसमांदा कुटुंबांना, अशा समाजातील वंचित कुटुंबांना मिळाली आहेत. येत्या काही वर्षांमध्ये आणखी 3 कोटी पक्की घरे गरिबांना मिळणार आहेत. आजच बिहारमधील सुमारे दीड लाख कुटुंबे आपल्या नवीन पक्क्या घरात गृहप्रवेश करत आहेत. देशभरातील 15 लाख गरीब कुटुंबांना नवीन घरांच्या बांधकामाची मंजुरी पत्रेही देण्यात आली आहेत. यातलेही साडेतीन लाख लाभार्थी हे आपल्या बिहारमधीलच आहेत. आजच सुमारे 10 लाख गरीब कुटुंबांना त्यांच्या पक्क्या घरांसाठी आर्थिक मदत पाठवली गेली आहे. यामध्ये बिहारमधील 80 हजार ग्रामीण कुटुंबे आणि एक लाख शहरी कुटुंबांचा समावेश आहे.

मित्रहो,

गेले दशक हे भारताच्या पायाभूत सुविधांचे दशक राहिले आहे. या आधुनिक पायाभूत सुविधा विकसित भारताचा पाया मजबूत करत आहेत. देशातील 12 कोटींपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांच्या घरात प्रथमच नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. अडीच कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये वीज जोडणी पोहोचली आहे. ज्यांनी कधी विचारच केला नव्हता, की गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करू,  त्यांना गॅस सिलेंडर मिळाले आहेत. आता अलीकडेच तुम्ही बातम्या वाचल्या असतील. लडाख आणि सियाचीनमध्ये, जिथे सामान्य सुविधा पोहोचवणेही कठीण आहे, तिथे आता फोर-जी आणि फाइव्ह-जी मोबाईल जोडणी पोहोचली आहे. यातून दिसते की आज देशाचे प्राधान्य कशाला आहे.

 

आरोग्यासारख्या क्षेत्राचे उदाहरणही आपल्यासमोर आहे. एक काळ असा होता की एम्ससारखी रुग्णालये फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरातच होती. आज दरभंगा येथे एम्स बांधले जात आहे. गेल्या दहा वर्षांत, देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. झंझारपुर येथे एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय देखील बांधले जात आहे.

मित्रहो,

गावांमध्ये चांगली रुग्णालये उभी राहावीत यासाठी, देशभरात दीड लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. बिहारमध्ये अशी 10 हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, जनऔषधी केंद्रे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा दिलासा ठरली आहेत. येथे तुम्हाला 80% सवलतीत स्वस्त औषधे मिळू शकतात. बिहारमध्ये 800 हून अधिक जनऔषधी केंद्रे बांधण्यात आली आहेत. यामुळे बिहारमधील लोकांचे औषधांवर खर्च होणारे  2 हजार कोटी रुपये वाचले आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गतही बिहारमधील लाखो कुटुंबांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामुळे या कुटुंबांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत.

मित्रांनो,

आज भारत रेल्वे, रस्ते, विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधांशीही खूप वेगाने जोडला जात आहे. पाटण्यात मेट्रोचे काम सुरू आहे, देशातील दोन डझनहून अधिक शहरे मेट्रो सुविधेने जोडलेली आहेत. आज, पाटणा आणि जयनगर दरम्यान नमो भारत रॅपिड रेल देखील सुरू करण्यात आली आहे. यामुळे पाटणा ते जयनगर दरम्यानचा प्रवास खूप कमी वेळेत पूर्ण होईल. नमो भारत रॅपिड रेलद्वारे समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी आणि बेगुसराय येथील लाखो लोकांना लाभ  होणार आहे.

मित्रांनो,

आज येथे अनेक नवीन रेल्वे मार्गांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. सहरसा ते मुंबई दरम्यान  आधुनिक अमृत भारत ट्रेन सुरु झाल्यामुळे, आपल्या  कामगार कुटुंबांना खूप सुविधा मिळतील. आमचे सरकार बिहारमधील मधुबनी आणि झंझारपुरसह अशा डझनभर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करत आहे. दरभंगा विमानतळाद्वारे मिथिला आणि बिहारची हवाई कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. पाटणा विमानतळाचाही विस्तार केला जात आहे. या विकासकामांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

 

मित्रांनो,

आपले शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. हा कणा जितका मजबूत असेल तितकी गावे मजबूत होतील आणि देश तितकाच शक्तिशाली होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मिथिला, कोसी या  परिसराला पुराचा नेहमीच फटका बसतो.  बिहारमधील पुराचा तडाखा  कमी करण्यासाठी सरकार अकरा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यातुन बागमती, धार, बुढी गंडक आणि कोसीवर धरणे बांधली जातील. तसेच कालवे बांधले जातील आणि नदीच्या पाण्याचा वापर करून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवण्याची व्यवस्था देखील केली जाईल. म्हणजेच  पुराची समस्या कमी होईल आणि शेतात पुरेसे पाणी पोहोचेल.

मित्रांनो,

मखाणे  आज देश आणि जगासाठी एक सुपरफूड आहे, परंतु मिथिलामध्ये तर मखाणे संस्कृतीचा एक भाग आहे. आपण या संस्कृतीला येथील समृद्धीचे स्रोत बनवत आहोत. आम्ही मखाण्याला जीआय टॅग दिला आहे. याचा अर्थ असा की मखाणे हे याच जमिनीचे उत्पादन आहे ही बाब अधिकृत झाली आहे. मखाणे संशोधन केंद्राला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मखाणा बोर्डाची स्थापना मखाणा शेतकऱ्यांचे नशीब बदलणार आहे. बिहारचा मखाणा सुपरफूड म्हणून जगाच्या बाजारपेठेत पोहोचेल. बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था देखील बांधली जाणार आहे. यामुळे येथील तरुणांना अन्न प्रक्रियेशी संबंधित लघु उद्योग सुरू करण्यास मदत होईल.

मित्रांनो,

शेतीबरोबरच, बिहार मत्स्य उत्पादनातही सतत प्रगती करत आहे. आमचे मच्छीमार मित्र आता किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मासेमारीचा व्यवसाय करत असलेल्या अनेक कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, बिहारमध्ये शेकडो कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

 

मित्रांनो,

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश आणि कोट्यवधी नागरिक दुःखी आहेत. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना लवकर बरे वाटावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

मित्रांनो,

या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा गमावला, कोणी आपला भाऊ गमावला तर कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला. त्यापैकी काही बंगाली भाषिक होते, काही कन्नड भाषिक, काही मराठी भाषिक, काही उडिया भाषिक होते, काही गुजराती भाषिक होते, तर काही बिहारचे होते. आज, त्या सर्वांच्या मृत्यूबद्दल कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, आपले दुःख आणि राग सारखाच आहे.

हा हल्ला केवळ निःशस्त्र पर्यटकांवर झालेला नाही; देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे दुःसाहस  केले आहे. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी हा कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल. त्यांना शिक्षा नक्कीच मिळेल. आता दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. 140  कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवादाच्या म्होरक्यांचे  कंबरडे मोडेल.

 

मित्रांनो,

आज, बिहारच्या भूमीतून , मी संपूर्ण जगाला सांगतो: भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. आपण अगदी पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन त्यांना शोधून काढू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देशाचा हा दृढ निर्धार  आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. या काळात आमच्यासोबत ठामपणे उभे राहिलेल्या विविध देशांच्या जनतेचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो.

मित्रांनो,

जलद विकासासाठी शांतता आणि सुरक्षितता ही सर्वात आवश्यक बाब आहे. विकसित भारतासाठी विकसित बिहार आवश्यक आहे. बिहारमध्ये विकास व्हावा आणि विकासाचे लाभ येथील प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक प्रदेशापर्यंत पोहोचावेत हा आमचा  सर्वांचा प्रयत्न आहे. पंचायत राज दिनानिमित्त या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत म्हणा -

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s GDP To Grow 7% In FY26: Crisil Revises Growth Forecast Upward

Media Coverage

India’s GDP To Grow 7% In FY26: Crisil Revises Growth Forecast Upward
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 डिसेंबर 2025
December 16, 2025

Global Respect and Self-Reliant Strides: The Modi Effect in Jordan and Beyond