शेअर करा
 
Comments
"स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0" चे ध्येय शहरांना पूर्णपणे कचरामुक्त करणे हे आहे
"मिशन अमृतच्या पुढील टप्प्यात देशाचे लक्ष्य 'सांडपाणी आणि मैला व्यवस्थापन सुधारणे, आपल्या शहरांना जल-सुरक्षित शहर बनवणे आणि आपल्या नद्यांमध्ये कुठेही सांडपाणी वाहणार नाही याकडे लक्ष देणे" हे आहे
"स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनच्या प्रवासात एक मिशन आहे, आदर आहे, प्रतिष्ठा आहे, देशाची महत्वाकांक्षा आहे आणि मातृभूमीसाठी अतुलनीय प्रेम देखील आहे."
"असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून बाबासाहेब आंबेडेकर यांचा शहरी विकासावर विश्वास होता. स्वच्छ भारत अभियान आणि मिशन अमृतचा पुढचा टप्पा बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे"
“स्वच्छता ही प्रत्येकासाठी , दररोज, प्रत्येक पंधरवडा, प्रत्येक वर्ष , पिढ्यानपिढ्या चालणारे महा अभियान आहे . स्वच्छता ही जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनाचा मंत्र आहे ”
"2014 मध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली. आज आपण दररोज सुमारे 70 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करत आहोत. आता

नमस्कार ! कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी,  हरदीप सिंह पुरी जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, कौशल किशोर जी, बिंश्वेश्वर  जी, सर्व राज्यांचे उपस्थित मंत्री, नागरी स्थानिक मंडळांचे महापौर आणि अध्यक्ष, महापालिका आयुक्त, स्वच्छ भारत मिशनचे, अमृत योजनेचे सर्व सारथी, पुरुष आणि महिलावर्ग ! 

स्वच्छ भारत अभियान आणि अमृत अभियानाच्या पुढच्या टप्यात प्रवेश केल्याबद्दल मी देशाचे अभिनंदन करतो.  2014 मध्ये भारताला हागणदारीमुक्त - ओडीएफ करण्याचा देशवासीयांनी संकल्प केला होता. 10 कोटीहून अधिक शौचालयांच्या उभारणीसह देशवासीयांनी या संकल्पाची पूर्तता केली. आता स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 चे उद्दिष्ट आहे कचरा मुक्त शहर, कचऱ्याच्या ढिगापासून शहर पूर्णपणे मुक्त करणे. अमृत अभियान यामध्ये देशवासियांना अधिक मदत करणार आहे. शहरातल्या सर्वांना म्हणजेच शंभर टक्के नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, शहरांमध्ये सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन असावे या दिशेने आमची आगेकूच सुरु आहे. अमृत अभियानाच्या पुढच्या टप्यात देशाचे उद्दिष्ट आहे – सांडपाणी आणि मैला व्यवस्थापन वाढवणे, आपल्या शहरांना जल सुरक्षित शहरे करणे आणि आपल्या नद्यांमध्ये सांडपाण्याच्या नाल्याचे पाणी येणार नाही याची दक्षता घेणे.

मित्रहो, 

स्वच्छ भारत अभियान आणि  अमृत अभियानाचा आतापर्यंतचा प्रवास देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असाच आहे. यामध्ये सेवाव्रत (मिशन) आहे, आदर, प्रतिष्ठा आहे, एका देशाची महत्वाकांक्षा आहे आणि मातृभूमीसाठीचे प्रेमही आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमाचे फलित आपल्याला आश्वस्त करते की प्रत्येक देशवासी आपल्या कर्तव्याप्रती किती संवेदनशील आहे, किती सतर्क आहे. याच्या यशात प्रत्येक नागरिकाचे योगदान आहे, सर्वांचे परिश्रम आहेत आणि सर्वांची मेहनत आहे. आपले स्वच्छता कर्मचारी, सफाई मित्र, दररोज झाडू घेऊन रस्ते सफाई करणारे आपले बंधू-भगिनी, कचरा कुंड्यांची दुर्गंधी सहन करत कचरा साफ करणारे खऱ्या अर्थाने या अभियानाचे महानायक आहेत. कोरोनाच्या खडतर काळात त्यांचे योगदान देशाने जवळून पाहिले आहे आणि अनुभवले आहे.

या कामगिरीबद्दल प्रत्येक देशवासीयाचे अभिनंदन करतानाच ‘स्वच्छ भारत अभियान –शहरी  2.0 आणि अमृत 2.0 साठी शुभेच्छा देतो. गांधी जयंतीच्या एक दिवस आधी याची सुरवात होत आहे हे सुखकारक आहे. पूज्य बापूजींच्या प्रेरणेचा परिणाम म्हणजे हे अभियान आहे आणि बापूंच्या आदर्शानुसार वाटचाल करत पूर्ततेच्या दिशेने पुढे जात आहे. स्वच्छतेबरोबरच आपल्या माता- भगिनींच्या सुविधांमध्ये किती भर पडली आहे याची आपण कल्पना करा. पूर्वी, बाहेर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे अनेक महिला घराबाहेर पडत नसत, कामावर जाऊ शकत नसत. शाळांमध्ये शौचालय नसल्याने अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागत असे. आता परिस्थिती बदलत आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाचे हे यश, आजचे नवे संकल्प, पूज्य बापूंच्या चरणी मी अर्पण करतो आणि नमन करतो. 

 

मित्रहो,

आपणा सर्वाचे हे भाग्य आहे की आजचा हा कार्यक्रम बाबासाहेबांना समर्पित या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आयोजित होत आहे. शहर विकास हे  असमानता दूर करण्याचे मोठे माध्यम आहे असे बाबासाहेब मानत असत. उत्तम जीवनमानाच्या आकांक्षेने अनेक जण गावाकडून शहरांकडे धाव घेतात. त्यांना रोजगार तर मिळतो पण त्यांचा जीवन स्तर गावापेक्षाही कठीण अवस्थेत राहतो हे आम्ही जाणतो. एका परीने दोन्ही बाजूने मार अशी त्यांची स्थिती असते. एक तर घरापासून दूर आणि त्यात अशा कठीण स्थिती मध्ये राहणे. ही परिस्थिती बदलण्यावर, ही  असमानता दूर करण्यावर बाबासाहेबांचा मोठा भर होता. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत अभियानाचा पुढचा टप्पा बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनेही एक महत्वाचे पाऊल आहे.

 

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या या 75 व्या वर्षात देशाने  ‘सबका साथ, सबका विकास, आणि  सबका विश्वास’ यासह ‘सबका प्रयास’ हे आवाहनही केले आहे. सबका प्रयास, अर्थात सर्वांचे प्रयत्न ही भावना स्वच्छतेसाठी तितकीच आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेक लोक दूर-दुर्गम ग्रामीण भागात पर्यटनासाठी गेले असतील, आदिवासी समुदायाची पारंपरिक घरे त्यांनी नक्कीच पहिली असतील. अल्प संसाधने असूनही त्यांच्या घरांमधली स्वच्छता आणि सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करते. आपण ईशान्येकडे, हिमाचल किंवा उत्तराखंडच्या डोंगरी भागात गेलात तर डोंगरावरच्या छोट्या-छोटया घरातल्या स्वच्छतामुळे  एक वेगळीच सकारात्मक उर्जा आपल्याला जाणवते. त्यांच्यासह राहून स्वच्छता आणि सुख यांचा किती जवळचा संबंध आहे याची शिकवण आपल्याला मिळते.

म्हणूनच मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर प्रगतीसाठी पर्यटनाच्या संधीचा शोध घ्यायला सुरवात केली तेंव्हा सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले ते स्वच्छता  आणि यामध्ये सर्वाना सामावून घेण्यावर. निर्मल गुजरात अभियानाला, जेंव्हा जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले तेंव्हा त्याचे उत्तम परिणाम दिसून आले. यातून गुजरातला नवी ओळख तर मिळालीच त्याच बरोबर राज्यात पर्यटनातही  वाढ झाली. 

 

बंधू-भगिनीनो,

लोक चळवळीची ही भावना स्वच्छ भारत अभियानाच्या यशाचा आधार आहे. पूर्वी शहरात कचरा रस्त्यावर असे, गल्लीबोळात असे, मात्र आता घरोघरी कचरा गोळा करण्याबरोबरच त्याच्या वर्गीकरणावरही भर देण्यात येत आहे. बऱ्याच घरांमधून आपण पाहतो की लोक ओला आणि सुका कचरा यासाठी वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवतात. घरातच नव्हे घरा बाहेरही कुठे अस्वच्छता आढळली तर लोक स्वच्छता अ‍ॅपवर ते कळवतात, इतरांनाही जागरूक करतात. स्वच्छता अभियानाला बळकटी देण्याचे काम आपली आजची पिढी करत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. चॉकलेटचा कागद आता जमिनीवर नव्हे तर आपल्या खिशात ठेवला जातो. कचरा कुठेही टाकू नका असे लहान-लहान मुलेही आता सांगतात. आजोबा, आजी यांना सांगतात की कचरा कुठेही टाकू नका. शहरातले युवा वेगवेगळ्या प्रकारे स्वच्छता अभियानात मदत करत आहेत. कोणी कचऱ्यातून संपत्ती निर्माण करत आहे तर कोणी याविषयी जागरूकता वाढवत आहे.

स्वच्छ भारत क्रमवारीत आपले शहर अग्रस्थानी असावे यासाठी लोकात चढाओढ आहे. शहर जरा मागे पडले तर लोकांचा दबाव येतो की काय झाले? ते शहर तर पुढे गेले आपण मागे का राहिलो ? आपल्यात काय उणीव राहिली ? माध्यमातले लोकही चर्चा करतात की पाहा, हे शहर तर पुढे जात आहे, तुम्ही मागेच राहिलात. एक प्रकारचा दबाव निर्माण होत आहे. आपले शहर स्वच्छता मानांकनात पुढे राहावे, अस्वच्छ शहर म्हणून आपली ओळख असू नये यासाठी वातावरण निर्माण होत आहे. इंदूरमधून सहभागी झालेले किंवा दूरचित्रवाणीवर जे लोक पाहत आहेत  ते माझ्याशी जास्त सहमत होतील. आज प्रत्येक जण जाणतो की इंदूर म्हणजे स्वच्छतेतले सर्वोत्तम शहर. इंदूरच्या जनतेचे हे यश आहे. आता अशाच कामगिरीने देशाच्या प्रत्येक शहराला आपल्याला जोडायचे आहे. 

देशातल्या प्रत्येक राज्य सरकारांना, स्थानिक प्रशासनांना, शहरांच्या महापौरांना माझा असा आग्रह आहे की, स्वच्छतेच्या या महाअभियानामध्ये पुन्हा एकदा सहभागी व्हावे. कोरोनाच्या काळामध्ये थोडा सुस्तपणा या अभियानामध्ये भले आला असेल  तरीही, आता नव्या जोमाने, उत्साहाने आणि नव्या शक्तीने आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, स्वच्छता ही एका दिवसासाठी, एका आठवड्यासाठी किंवा एका वर्षासाठी करायचे काम आहे किंवा काही लोकांनी करायचे काम आहे असे अजिबात नाही. स्वच्छता प्रत्येकाचे, प्रत्येक दिवशी, प्रत्येक सप्ताहामध्ये आणि दरवर्षी, पिढ्यांपिढ्या चालणारे महाअभियान आहे. स्वच्छता ही जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनमंत्र आहे.

ज्याप्रमाणे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला दात स्वच्छ करण्याची, घासण्‍याची सवय असते ना, तसेच साफ-सफाई, स्वच्छतेलाही आपल्या जीवनाचा भाग बनविलाच पाहिजे. आणि मी हे जे काही बोलतोय ते फक्त व्यक्तिगत स्वच्छतेविषयी बोलत नाही. मी सामाजिक स्वच्छतेविषयी बोलतोय. आपण जरा विचार करा, रेल्वेच्या डब्यामध्ये स्वच्छता राखणे, करणे, रेल्वे फलाटावर स्वच्छता राखणे काही अवघड काम नाही. थोड्या प्रयत्नांनी सरकारने हे काम केले आहे. काही गोष्टी लोकांच्या सहयोगामुळे शक्य  झाल्या आहेत. आणि आता रेल्वेचे रूपच पालटून गेले आहे.

मित्रांनो,

शहरामध्ये वास्तव्य करणा-या मध्यम वर्गातल्या, शहरी गरीबांचे जीवन, ईज ऑफ लिव्हिंग ठरावे, यासाठी आमचे सरकार विक्रमी गुंतवणूक करीत आहे. जर 2014 च्या आधीच्या सात वर्षांविषयी बोलायचे झाले तर, शहरी विकास मंत्रालयासाठी जवळपास सव्वा लाख कोटींची तरतूद केली गेली होती. तर आमच्या सरकारने सात वर्षांमध्ये शहरी विकास मंत्रालयासाठी जवळपास 4 लाख कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली आहे. या गुंतवणुकीतून शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन,  सांडपाणी प्रक्रियेच्या नवीन प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे. या गुंतवणुकीतून शहरी गरीबांसाठी घरकुले, नवीन मेट्रो मार्ग आणि स्मार्ट सिटीशी संबंधित प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. आपण भारतवासी मिळून आपले लक्ष्य प्राप्त करू शकतो. असा मला पूर्ण विश्वास आहे. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृत यांचा वेग आणि मापदंड पाहिले तर विश्वास अधिक वाढतो.

आज भारत प्रत्येक दिवशी जवळपास एक लाख टन कच-यावर प्रक्रिया करीत आहे. 2014 मध्ये ज्यावेळी देशाने हे अभियान सुरू केले होते, त्यावेळी देशामध्ये प्रत्येक दिवशी निर्माण होणा-या कच-यापैकी 20 टक्क्यांपेक्षाही कमी कच-यावर प्रक्रिया होत होती. आज आपण दररोज जवळपास 70 टक्के कच-यावर प्रक्रिया करीत आहोत. 20 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत पोहोचलो आहोत. मात्र आता आपल्याला ही टक्केवारी 100 पर्यंत न्यायचीच आहे. आणि हे काम केवळ कचरा नष्ट करण्याने होणार नाही, संपणार नाही. तर कच-यातून संपत्ती निर्माण करण्याच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी देशाने प्रत्येक शहरामध्ये 100 टक्के कचरा वर्गीकरणाबरोबरच त्यासाठी आवश्यक असणा-या आधुनिक साहित्य जमा करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या आधुनिक सुविधेमुळे कच-याचे वर्गीकरण, पृथःकरण होवू शकणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये बनलेले कच-यांचे डोंगर लक्षात घेवून त्या कच-यावर प्रक्रिया करून ते संपूर्ण डोंगर साफ करण्यात येतील. हरदीप जी, ज्यावेळी मी, असे कच-याचे प्रचंड ढीग साफ करण्याविषयी बोलतो, इथे दिल्लीतही असाच एक डोंगर, अनेक वर्षापासून आहे, हा डोंगरही कोणीतरी हटविण्याची प्रतीक्षा करीत आहे.

 

मित्रांनो,

आजकाल जगामध्ये हरित क्षेत्रातल्या नोकरीच्या संभावनांविषयी  चर्चा सुरू आहे. भारतामध्ये सुरू होत असलेल्या अभियानामध्ये अनेक हरित रोजगारही निर्माण होईल. देशामध्ये शहरांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सातत्याने वाढत आहे. अलिकडेच ऑगस्ट महिन्यामध्येच देशाने अॅटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण जाहीर केले आहे. या नवीन स्क्रॅपिंग धोरणामुळे कचरा ते संपत्ती अभियानाला आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. हे धोरण देशातल्या शहरांमधले प्रदूषण कमी करण्यामध्येही मोठी आणि महत्वाची भूमिका बजावेल. याचा सिद्धांत आहे - रीयूज, रीसायकल आणि रीकव्हरी! सरकारने रस्त्यांच्या कामातही कच-याचा उपयोग करण्यावर जास्त भर दिला आहे. ज्या सरकारी इमारती बनत आहेत, सरकारी निवासस्थानांच्या योजनांमध्ये जी घरकुले बनविण्यात येत आहेत, त्यामध्ये रिसायक्लिंगला प्रोत्साहन दिले जात आहे.

 

मित्रांनो,

स्वच्छ भारत आणि संतुलित शहरीकरणाला एक नवीन दिशा देण्यामध्ये राज्यांची खूप मोठी भागीदारी आहे. आत्ताच आपण काही सहकारी मुख्यमंत्र्यांचे संदेशही ऐकले. मी देशातल्या प्रत्येक राज्य सरकारचे आज विशेष आभार व्यक्त करतो. सर्व राज्यांनी आपल्या शहरांच्या मूलभूत गरजा स्पष्ट केल्या आहेत. पाणी पुरवठ्यापासून ते सांडपाणी व्यवस्थेपर्यंत नियोजन केले आहे. अमृत मिशनअंतर्गत 80 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. यामुळे शहरांच्या अधिक चांगल्या भविष्याबरोबरच युवकांना नवीन संधी मिळत आहेत. पाण्याची जोडणी असो, सांडपाण्याची सुविधा असो, आता आपल्याला या सुविधांचा लाभ शहरातल्या शंभर टक्के  म्हणजे सर्वच्या सर्व कुटुंबांपर्यंत पोहचवायचा आहे. आपल्या शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वाढविण्यात आले तर शहरांचे जल स्त्रोत, साधने स्वच्छ होतील. आपल्या नद्या स्वच्छ राहतील, होतील. आपल्या देशातल्या कोणत्याही नदीमध्ये अगदी थोडेसेही पाणी प्रक्रिया केल्याविना सोडले जाणार नाही, असा दृढ संकल्प करूनच पुढे जावे लागणार आहे. कोणतीही घाण, अस्वच्छ नाल्याचे पाणी नदीमध्ये सोडले जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

 

मित्रांनो,

आज शहरी विकासाशी संबंधित या कार्यक्रमामध्ये,  मी कोणत्याही शहरातल्या सर्वात महत्वाच्या सहका-यांपैकी एकाविषयीची चर्चा करू इच्छितो. हे साथीदार आहेत, आपल्या रस्त्यावरचे विक्रेते, हातगाडी, ठेल्यावर व्यवसाय करणारे आहेत. या लोकांसाठी पीएम स्वनिधी योजना, एक आशेचा किरण बनून आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या दशकांमध्ये आपल्या या साथीदारांविषयी कोणी साधा विचारही केला नाही. अगदी थोड्या पैशासाठी त्यांना कोणाकडून तरी खूप जास्त व्याज चुकते करून कर्ज घ्यावे लागत होते. तो श्रमिक कर्जाच्या बोझ्याखाली दबून जात असे. दिवसभर परिश्रम करून कमवत होता, परिवारासाठी त्याला जितका खर्च येत असे, त्यापेक्षा जास्त त्याला व्याज द्यावे लागत होते. ज्यावेळी अशा देण्या-घेण्याचा कोणताही हिशेब ठेवले जाणारे दस्तऐवज नसायचे, त्यावेळी त्याला बँकांकडून मदत मिळणे अशक्य होते.

या अशक्य गोष्टीला  शक्य केले आहे, ते पीएम- स्वनिधी योजनेने! आज देशातले  46 लाखांपेक्षा जास्त पदपथ विक्रेते, हातगाडी, ठेले चालक बंधू-भगिनी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आले आहेत. यापैकी 25 लाख लोकांना जवळपास अडीच हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. पदपथ विक्रेत्यांच्या खिशात अडीच हजार कोटी रूपये पोहोचवणे ही काही लहानसहान  गोष्ट नाही. आता हे लोक डिजिटल व्यवहार करीत आहेत. आणि बँकांकडून त्यांनी कर्जही घेतले आहे. जे पदपथ विक्रेते निश्चित केलेल्या कालमर्यादेत आपले कर्ज फेडत आहेत, त्यांना व्याजामध्ये सवलतही दिली जात आहे. अतिशय कमी काळामध्ये या लोकांनी सात कोटींपेक्षा जास्त व्यवहार केले आहेत. कधी-कधी आपल्या देशातले  बुद्धिमान लोक म्हणतात की, या गरीब लोकांना असे  सगळे व्यवहार करणे कसे काय जमणार;  मात्र असे डिजिटल व्यवहार करणारे सगळे हेच गरीब लोक आहेत. त्यांनी हे करून दाखवले आहे. याचा अर्थ पैसे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी त्यांनी सात कोटीवेळा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे डिजिटल माध्यम वापरले आहे. या माध्यमाला त्यांनी स्वीकारले आहे.

हे लोक काय करतात, त्यांनी घाऊक विक्रेत्यांकडून त्यांच्या मोबाईलवरून डिजिटल पद्धतीने खरेदी करत असलेल्या मालाचे पैसे भरण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांनी विकल्या जाणाऱ्या किरकोळ वस्तूंसाठी नागरिकांकडून डिजिटल पद्धतीने पैसे घेणे सुरू केले आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे त्यांच्या व्यवहाराचा डिजिटल इतिहास देखील तयार झाला आहे. आणि या डिजिटल इतिहासामुळे बँकांना कळले की, त्यांचा व्यवसाय हा असा असा आहे आणि इतक्या प्रमाणात सुरु आहे, त्यामुळे बँकेला त्यांना पुढील कर्ज देणे सोपे आहे.

 

मित्रांनो,

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत, पहिल्या कर्जाच्या 10 हजार रुपयांच्या परतफेडीवर, 20 हजारांचे दुसरे कर्ज आणि दुसऱ्या कर्जाच्या परतफेडीवर, 50 हजारांचे तिसरे कर्ज रस्त्यावरच्या विक्रेत्यांना अर्थात फेरीवाल्यांना दिले जाते. शेकडो फेरीवाले आज बँकांकडून तिसरे कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. मला अशा प्रत्येक सहकाऱ्याला बँकांबाहेर जाऊन उच्च व्याजाने कर्ज घेण्याच्या दुष्ट चक्रातून मुक्त करायचे आहे. आणि आज देशभरातील महापौर माझ्याशी जोडलेले आहेत, शहरांचे अध्यक्ष जोडलेले आहेत. हे खऱ्या अर्थाने गरिबांची सेवा करण्याचे काम आहे, खऱ्या अर्थाने हे सर्वाधिक गरीबांना सक्षम करण्याचे काम आहे. हे खऱ्या अर्थाने गरीबांना व्याजांच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्याचे कार्य आहे. माझ्या देशाचा कोणताही महापौर, कोणताही जोडलेला नगरसेवक, समुपदेशक असा नसावा की ज्याच्या मनात ही भावना नसेल आणि तो या पीएम स्वनिधीला यशस्वी करण्यासाठी काहीही प्रयत्न करणार नाही.

जर तुम्ही सर्व मित्र सामील झालात, तर या देशातील आपली गरीब व्यक्ती ... आणि आपण कोरोना मध्ये पाहिले आहे, जर आपल्या सहकारी संस्था, चाळ, परिसरातील भाजीपाला पुरवठादार पोहोचला नाही तर आपण किती संकटातून जातो. जर दूधवाला आला नाही तर आपल्याला खूप त्रास व्हायचा. कोरोनाच्या काळात समाजातील प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनात किती किंमत आहे हे आपण पाहिले आहे. जेव्हा आपण हे अनुभवले, तेव्हा एवढी मोठी योजना ही आपली जबाबदारी नाही का? त्याला व्याजात मदत मिळत आहे, त्याला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सतत पैसे मिळत आहेत. तुम्ही त्याला डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण देऊ शकत नाही का? तुम्ही आपल्या शहरात हजार, दोन हजार, 20 हजार, 25 हजार, याप्रमाणे आपले मित्र असतील, तुम्ही त्यांचे जीवन बदलण्यासाठी पावले उचलू शकत नाही का?

मला खात्री आहे मित्रांनो, जरी हा प्रकल्प भारत सरकारचा असला, जरी तो पीएम स्वनिधीचा असला तरी, जर तुम्ही ते केलेत, तर तुमच्यासाठी त्या गरिबांच्या हृदयात एक स्थान निर्माण होईल. तो त्या शहराच्या महापौरांचा जयजयकार करेल, तो त्या शहराच्या नगरसेवकाचा जयजयकार करेल.  ज्याने त्याला मदतीचा हात पुढे केला आहे तो त्याला आनंद देईल. तुमचा जयजयकार व्हावा अशी माझी इच्छा आहे.  माझ्या देशातील प्रत्येक शहराचा महापौर, माझ्या देशाचा प्रत्येक नगरसेवक, माझ्या देशाचा प्रत्येक नगरसेवक..  हा जयजयकार तुमचा होवो जेणेकरून जे गरीब रस्त्यावर गाडी आणि ठेला घेऊन बसले आहेत ते सुद्धा आपल्यासारखे सन्मानाने जगू शकतील. ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महत्त्वाचे निर्णय देखील घेऊ शकतील.

मित्रांनो, हे खूप सहजपणे करता येईल, पण या कामात आपल्या सर्वजणांचं योगदान हवं ... मला सर्व आयुक्तांना सांगायचे आहे, हे मानवतेचे कार्य आहे, हे तळागाळातपर्यंत आर्थिक स्वच्छतेचे काम देखील आहे. ही स्वाभिमानाची कृती आहे. देशाने तुम्हाला अशा प्रतिष्ठित पदावर नेमले आहे. हा पीएम स्वनिधी कार्यक्रम मनापासून राबवा.  त्याच्याशी मनापासून एकरुप व्हा. बघा, तुमच्या गावातील प्रत्येक कुटुंब डिजिटल पेमेंटने भाज्या खरेदी करतंय, डिजिटल पेमेंटने दूध खरेदी करतंय, जेव्हा तो मोठ्या प्रमाणात खरेदी करायला जातो तेव्हा तो डिजिटली पैसे देतोय. मोठी क्रांती येणार आहे. या इतक्या कमी लोकांनी 7 कोटी रुपयांचे व्यवहार केले. जर तुम्ही सर्व त्यांच्या मदतीला पोहचलात, तर आम्ही कोठून पोहोचू शकतो?

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शहरी विकासाशी संबंधित सर्व घटकांना मी वैयक्तिकरित्या विनंती करतो की तुम्ही या कामात मागे राहू नका. आणि जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असलेल्या इमारतीतून बोलतोय, तेव्हा गरिबांसाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य बनते.

 

 

मित्रांनो,

मला आनंद आहे की, देशातील दोन मोठी राज्ये, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सर्वात जास्त फेरीवाल्यांना बँकांकडून कर्ज देण्यात आले आहे. परंतु मी सर्व राज्यांनाही यात स्पर्धा करावी असा आग्रह  करेन, यात कोणते राज्य सर्वात आघाडीवर आहे, कोणते राज्य सर्वाधिक डिजिटल व्यवहार करते, कोणत्या राज्याने तिसऱ्या क्रमांकाच्या कर्जाच्या फेरीवाल्यांना तिसऱ्या कर्जापर्यंत नेले आहे. 50 हजार रुपये त्याच्या हातात आले आहेत, कोणत्या राज्याने हे केलं आहे, कोण राज्य सर्वात जास्त काम करत आहे?  मला वाटतं यासाठी एक स्पर्धा घ्यायला हवी. दर सहा महिन्यांनी, तीन महिन्यांनी, त्या राज्यांना यासाठी बक्षीस दिले पाहिजे, त्या शहरांना बक्षीस दिले पाहिजे. गरीबांचे कल्याण करण्यासाठी एक निकोप स्पर्धा, गरीबांचे भले करण्यासाठी एक निकोप स्पर्धा, गरीबांना सक्षम करण्यासाठी एक निकोप स्पर्धा. चला या स्पर्धेत सहभागी व्हा. सर्व महापौरांनी सामील व्हा, सर्व शहराध्यक्षांनी सामील व्हा, सर्व नगरसेवकांनी सामील व्हा, सर्व सल्लागारांनी सामील व्हा.

 

मित्रांनो,

आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की,

आस्ते भाग असीनाः ये उर्द्वः तिष्ठती तिष्ठः।

शेटे निपद्य मनस्य चरती चरतो भागः चरैवेति॥

म्हणजेच जर तुम्ही कर्माच्या मार्गावर थांबलात तर तुमचे यशही थांबेल. जर तुम्ही झोपलात तर यश देखील झोपेल.  जर तुम्ही उभे राहिलात तर यश देखील वाढेल. जर तुम्ही पुढे गेलात तर यश त्याच मार्गाने पुढे जाईल. आणि म्हणून, आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या शहराला या सर्व त्रासांपासून मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्याला स्वच्छ, समृद्ध आणि जगाला शाश्वत जीवनाकडे मार्गदर्शन करणारा भारत निर्माण करायचा आहे.

मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व देशवासीयांच्या प्रयत्नांनी देश निश्चितपणे आपला संकल्प सिद्ध करेल. या शुभेच्छांसह सर्वांचे मनापासून आभार! 

खूप खूप अभिनंदन!

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Retired Army officers hail Centre's decision to merge Amar Jawan Jyoti with flame at War Memorial

Media Coverage

Retired Army officers hail Centre's decision to merge Amar Jawan Jyoti with flame at War Memorial
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles the deaths in the building fire at Tardeo, Mumbai
January 22, 2022
शेअर करा
 
Comments
Approves ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed sorrow on the deaths in the building fire at Tardeo in Mumbai. He conveyed condolences to the bereaved families and prayed for quick recovery of the injured.

He also approved ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF to be given to the next of kin of those who have lost their live. The injured would be given Rs. 50,000 each:

The Prime Minister Office tweeted:

"Saddened by the building fire at Tardeo in Mumbai. Condolences to the bereaved families and prayers with the injured for the speedy recovery: PM @narendramodi

An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the building fire in Tardeo, Mumbai. The injured would be given Rs. 50,000 each: PM @narendramodi"