तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी जी, उप-मुख्यमंत्री ओपीएस, माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, तामिळनाडू सरकारमधील मंत्री, वेलुमणी जी, इतर मान्यवर, भगिनी आणि सज्जन हो,

वणक्कम!!

आज कोइंबतूरला भेट देताना मला आनंद वाटतोय. ही एक नवसंकल्पना अंमलात आणणारी उद्योग नगरी आहे. आज आपण अनेक विकास कामांचा प्रारंभ केला आहे, त्याचा लाभ कोइंबतूर आणि संपूर्ण तामिळनाडूला होणार आहे.

मित्रांनो,

भवानीसागर धरणाच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी आज केली आहे. या कामामुळे दोन लाख एकर जमिनीचे सिंचन होऊ शकणार आहे. इरोड, तिरूप्पूर आणि करूरविल या जिल्ह्यांना त्याचा विशेष लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे आमच्या या भागातल्या शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा होणार आहे. येथे मला महान कवी तिरूवल्लुवर यांच्या शब्दांचे स्मरण होत आहे. ते म्हणाले होते....

உழுதுண்டு வாழ்வாரே வாழ்வார்மற் றெல்லாம்

தொழுதுண்டு பின்செல் பவர்ण्

याचा भावार्थ असा आहे की, जो कोणी खरोखरीच जगतो, तो म्हणजे शेतकरी आहे आणि इतर सर्वजण आपले जीवन जगू शकतात, कारण अन्नदात्याची ते पूजा करतात.’’

मित्रांनो,

भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये, वृद्धीमध्ये तामिळनाडूचे खूप मोठे योगदान आहे. कोणत्याही उद्योगांच्या वाढीसाठी सर्वात महत्वाच्या मूलभूत गरजांपैकी एक आवश्यक गोष्ट म्हणजे निरंतर सुरू राहणारा वीज पुरवठा आहे. आज, दोन प्रमुख ऊर्जा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करताना मला आनंद होत आहे. तसेच यावेळी आणखी एका ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणीही केली जात आहे. नेय्यवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडने विकसित केलेल्या 709 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी आज केली आहे. तिरूनेलवेली, तूतुकुडी, रामनाथपूरम आणि विरूधुनगर जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प कार्यरत होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तीन हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. आणखी एक 1000 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एनएलसीच्यावतीने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास सात हजार आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे तामिळनाडूला खूप मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण करण्यात येणा-या विजेपैकी 65 टक्क्यांपेक्षा जास्त वीज तामिळनाडूला मिळू शकणार आहे.

मित्रांनो,

तामिळनाडूला सागरी व्यापार आणि बंदराच्या माध्यमातून विकास करण्याचा समृद्ध, वैभवशाली इतिहास आहे. तूतुकुडी इथल्या व्ही.ओ.चिदंबरनर बंदराशी संबंधित विविध प्रकल्पांचा प्रारंभ करताना मला आज खूप आनंद होत आहे. व्ही.ओ.सी यांच्यासारख्या महान स्वातंत्र्य सेनानीने केलेल्या अनेक कामांचे स्मरण आज केले जात आहे. भारताच्या सळसळत्या जहाज उद्योगाविषयी आणि सागरी क्षेत्राच्या विकासासंबंधी त्यांचा दूरदृष्टी आपल्या सर्वांना खूप प्रेरणादायी आहे. आज प्रारंभ करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे आगामी काळात बंदराच्या मालवाहतुकीची क्षमता अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. त्याचबरोबर हरित बंदर उपक्रमालाही चांगला पाठिंबा मिळू शकणार आहे. याशिवाय, आता पुढचे पाऊल म्हणजे, पूर्व किनारपट्टीवर मोठे वाहतूक बंदर बनविण्यासाठी उचलण्यात येणार आहे. ज्यावेळी आमची बंदरे अधिक कार्यक्षम बनतील, त्यावेळी ती भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि देशाला वैश्विक केंद्र बनविण्यासाठी मोठे योगदान देऊ शकणार आहेत.

 

बंदरांना केंद्रबिंदू ठेवून विकास साध्य करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. यासाठी सागरमाला योजना आखण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 575 प्रकल्पांचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा लाख कोटींपेक्षाही जास्त खर्चाची तरतूद करण्यात आली असून हा निधी 2015 ते 2035 या कालावधीत खर्च करण्यात येणार आहे. या कामांमध्येच बंदरांचे आधुनिकीकरण, नवीन बंदरांचा विकास, बंदरांच्या संपर्क मार्गांचा विस्तार करणे, बंदरांशी निगडित औद्योगिक वसाहती तयार करणे आणि सागरी किनारपट्टीवर वसाहती विकसित करण्याची कामेही करण्यात येणार आहे.

चेन्नईमध्ये श्रीपेरूंबुदूरजवळ मप्पेडू येथे लवकरच ‘मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क’ सुरू करण्यात येणार आहे, हे नमूद करताना मला आनंद होत आहे. आठ मार्गिका असलेला कोरामपल्लम सेतू आणि रेल ओव्हर ब्रिज’ यांची कामेही सागरमाला योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे बंदराला जाण्या-येण्यासाठी विनाअडथळा आणि वाहतुकीची कोंडी न होता- गर्दीमुक्त वाहतूक सुलभतेने होऊ शकणार आहे. त्यामुळे माल वाहून नेण्यासाठी सध्‍या लागणा-या वेळेमध्ये बचत होऊ शकणार आहे.

मित्रांनो,

विकास आणि पर्यावरणाची काळजी घेणे, या दोन्हीमध्ये खूप जवळचा संबंध आहे. व्ही.ओ.सी बंदरामध्ये यापूर्वी छप्परावर 500 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केला आहे. याशिवाय आणखी 140 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. व्ही.ओ.सी बंदराने जवळपास वीस कोटी खर्चून 5 मेगावॅटच्या भू-स्थित सौर ऊर्जा प्रकल्पाशी ग्रिड जोडण्यात आले आहे, याचा मला आनंद वाटतो. या प्रकल्पांमुळे बंदराच्या एकूण विजेच्या गरजेपैकी 60 टक्के वीज निर्मिती होऊ शकणार आहे. हे खरोखरीच भारताला ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी केलेल्या कामाचे उत्तम उदाहरण आहे.

प्रिय मित्रांनो,

विकासाचा मूळ गाभा म्हणजे, प्रत्येक व्यक्तिला प्रतिष्ठा, सन्मान मिळवून देणे. प्रत्येकाला स्वतःचे घरकुल देऊन प्रतिष्ठा मिळणे सुनिश्चित करणे. आपल्या लोकांच्या स्वप्नांना आणि आशा-आकांक्षांना पंख देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

मित्रांनो,

आज 4144 घरकुलांचे उद्घाटन करण्याचा बहुमान मला मिळाला आहे. तिरूप्पूर, मदुराई आणि तिरूचिरापल्ली या जिल्ह्यांमध्ये या घरकुलांची बांधणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 332 कोटी रूपये खर्च झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही ज्यांना आपल्या हक्काचे घर मिळू शकले नाही, अशा लोकांना ही घरकुले देण्यात येत आहेत.

मित्रांनो,

तामिळनाडू राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. भारत सरकार आणि तामिळनाडू सरकार या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत. संपूर्ण तामिळनाडूमध्ये स्मार्ट सिटींच्या सर्वंकष, एकात्मिक विकासासाठी ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’चा शिलान्यास करताना मला आनंद होत आहे. या एकात्मिक केंद्रामुळे शहरांमध्ये विविध सेवांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणि एकात्मिक माहिती तंत्रज्ञान आधारित समाधान व्यवस्था तयार होऊ शकणार आहे.

मित्रांनो,

आज प्रारंभ करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे तामिळनाडूतल्या लोकांचे जीवन आणि जीवनमान उंचावणार आहे, याची मला खात्री आहे. ज्या परिवारांना आज नवीन घरकुले मिळाली आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. आम्ही अशाच प्रकारे लोकांची स्वप्ने, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी कार्यरत राहणार आहोत.

धन्यवाद!

खूप-खूप धन्यवाद!!

वणक्कम!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
10 Years of Jan-Dhan Yojana: Spurring Rural Consumption Through Digital Financial Inclusion

Media Coverage

10 Years of Jan-Dhan Yojana: Spurring Rural Consumption Through Digital Financial Inclusion
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives in drowning incident in Dehgam, Gujarat
September 14, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives in drowning incident in Dehgam, Gujarat.

The Prime Minister posted on X:

“ગુજરાતના દહેગામ તાલુકામાં ડૂબી જવાની ઘટનામાં થયેલ જાનહાનિના સમાચારથી અત્યંત દુઃખ થયું. આ દુર્ઘટનામાં જેમણે પોતાનાં સ્વજનોને ગુમાવ્યા છે એ સૌ પરિવારો સાથે મારી સંવેદના વ્યક્ત કરું છું. ઈશ્વર દિવંગત આત્માઓને શાંતિ અર્પણ કરે એ જ પ્રાર્થના….

ૐ શાંતિ….॥”