पंतप्रधानांनी केले स्कायरूटच्या पहिल्या उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या ॲर्बिटल रॉकेट विक्रम-I चे अनावरण
आपली युवाशक्ती, नवोन्मेष, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकतेसह नवीन शिखरे गाठत आहे: पंतप्रधान
इस्रोने अनेक दशके भारताच्या अंतराळ प्रवासाला नवीन उंची गाठण्यासाठी बळ दिले आहे, आपली विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्याद्वारे भारताने जागतिक अंतराळ क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे: पंतप्रधान
मागील केवळ सहा ते सात वर्षांमध्ये , भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राचे एका खुल्या, सहकारी आणि नवोन्मेष-संचालित परिसंस्थेत रूपांतर केले आहे: पंतप्रधान
जेव्हा सरकारने अंतराळ क्षेत्र खुले केले , तेव्हा आपले युवक आणि विशेषतः जनरेशन झेड संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुढे आले: पंतप्रधान
भारताकडे अंतराळ क्षेत्रात अशा क्षमता आहेत ज्या जगातील काही मोजक्या देशांकडे आहेत: पंतप्रधान

मंत्रिमंडळातील माझे सहकारी,  जी. किशन रेड्डीजी, आंध्र प्रदेशचे उद्योग मंत्री,  टी.जी. भरतजी, इन-स्पेसचे अध्यक्ष, पवन गोएंकाजी, टीम स्कायरूट, इतर मान्यवर, आणि सभ्य  स्त्री-पुरूषहो!

मित्रहो,

आज देश अंतराळ क्षेत्रातील  एका  अभूतपूर्व संधीचा साक्षीदार बनत आहे. आज भारताच्या अंतराळ परिसंस्थेत खाजगी क्षेत्र मोठी झेप घेते आहे. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताच्या नवीन विचारसरणीचे, नवोपक्रमाचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युवा शक्तीचे प्रतिबिंब आहे. आपल्या युवा वर्गाचे नवोपक्रम, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता यशाची नवीन शिखरे गाठत आहे. आणि भविष्यात भारत जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत एक नेतृत्व म्हणून उदयास येईल, या  वस्तुस्थितीचे प्रतिबिंब आजच्या कार्यक्रमात दिसते आहे. मी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना अनेकानेक शुभेच्छा देतो. तुम्ही दोघेही तरुण देशातील अनेक युवा अवकाश उद्योजकांसाठी, प्रत्येक तरुणासाठी एक उत्तम प्रेरणा आहात. तुम्ही दोन्ही तरूणांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि जोखीम घेताना टाळाटाळ केली नाही. आणि आज संपूर्ण देश त्याचे उत्तम परिणाम पाहत आहे. देशाला तुमचा अभिमान आहे.

मित्रहो,

भारताचा अंतराळ प्रवास अतिशय मर्यादित स्रोतांसह सुरू झाला. मात्र आपल्या महत्त्वाकांक्षांना  कधीही मर्यादा नव्हती. एक काळ असा होता, जेव्हा भारताने सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेले होते, तेव्हापासून, ते जगातील सर्वात विश्वासार्ह प्रक्षेपण वाहनापर्यंतच्या या प्रवासातून भारताने हे सिद्ध केले आहे की, स्वप्नांची उंची स्रोतांवर नाही तर दृढनिश्चयावर अवलंबून असते. गेल्या अनेक दशकांपासून, इस्रोने भारताच्या अंतराळ प्रवासाला नवीन पंख दिले आहेत. विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्य अशा प्रत्येक बाबतीत भारताने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

 

मित्रहो,

आजच्या बदलत्या काळात अवकाश क्षेत्र किती वेगाने विस्तारत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अवकाश क्षेत्र हे आजघडीला दळणवळण, शेती, सागरी देखरेख, शहरी नियोजन, हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया बनले आहे. म्हणूनच आम्ही भारताच्या अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक ठरतील, अशा सुधारणा घडवून आणल्या. सरकारने अवकाश क्षेत्र खाजगी नवोपक्रमांसाठी खुले केले आणि एक नवीन अवकाश धोरण तयार केले. आम्ही स्टार्टअप्स आणि उद्योगांना नवोपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही ‘IN-SPACE’  ची स्थापना केली आणि इस्रोच्या सुविधा आणि तंत्रज्ञान आमच्या स्टार्टअप्सना उपलब्ध करून दिले. अर्थात, गेल्या 6-7 वर्षांत, भारताने आपल्या अवकाश क्षेत्राचे एका खुल्या, सहकारी आणि नवोपक्रम-चालित परिसंस्थेत रूपांतर केले आहे. आजचा कार्यक्रम हे याचेच प्रतिबिंब आहे आणि हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो आहे.

मित्रहो,

भारताची युवा पिढी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देते. आमचे युवा प्रत्येक संधीचा हुशारीने वापर करतात. जेव्हा सरकारने अवकाश क्षेत्र खुले केले तेव्हा देशातील युवा, विशेषतः आपले ‘जेन-झी’  तरुण त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुढे सरसावले. आज भारतातील 300 पेक्षा जास्त अवकाश स्टार्टअप्स भारताच्या अवकाश भविष्याला नवीन आशा देत आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे बहुतेक अंतराळ स्टार्टअप्स, खूप लहान चमुपासून सुरू झाले. गेल्या पाच-सहा वर्षांत मला त्यांना नियमितपणे भेटण्याची संधी मिळाली आहे. कधी दोन लोक, कधी पाच सहकारी, कधी भाड्याने घेतलेली खोली. चमू लहान होता, स्रोत मर्यादित होते, परंतु नवीन उंची गाठण्याचा दृढनिश्चय होता. याच भावनेने भारतात खाजगी अंतराळ क्रांतीला जन्म दिला आहे. आज, हे जेन-झी अभियंते, जेन-झी डिझायनर्स, जेन-झी कोडर्स  आणि जेन-झी शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान तयार करत आहेत. मग ते प्रोपल्शन सिस्टम असो, कंपोझिट मटेरियल असो, रॉकेट स्टेज असो किंवा उपग्रह प्लॅटफॉर्म असो, भारतातील तरुण अशा क्षेत्रात काम करत आहेत, ज्यांची काही वर्षांपूर्वी कल्पनाही करता येत नव्हती. भारताची खाजगी अवकाश प्रतिभा जगभरात आपला प्रभाव तयार करते आहे. आज भारताचे अवकाश क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरते आहे.

मित्रहो,

आज, जगात लहान उपग्रहांची मागणी सतत वाढत आहे. उपग्रह आणि इतर गोष्‍टींच्या प्रक्षेपणाची  वारंवारता सुद्धा वाढत आहेत. नवीन कंपन्या उपग्रह सेवा देत आहेत. आणि अवकाश आता एक धोरणात्मक मालमत्ता म्हणून उदयास आले आहे. म्हणूनच, येत्या काही वर्षांत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास सज्ज आहे. ही भारतातील युवा वर्गासाठी एक मोठी संधी आहे.

मित्रहो,

अवकाश क्षेत्रात भारतासारखी क्षमता जगातल्या काही मोजक्याच देशांकडे आहे. आपल्याकडे तज्ञ अभियंते आहेत, उच्च दर्जाची उत्पादन परिसंस्था आहे, जागतिक दर्जाची प्रक्षेपण स्थळे आहेत आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणारी मानसिकता आहे. भारताची अंतराळ क्षमता किफायतशीर आणि विश्वासार्ह आहे. म्हणूनच जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जागतिक कंपन्या भारतात उपग्रह तयार करू इच्छितात, भारताकडून प्रक्षेपण सेवा मिळवू इच्छितात आणि भारतासोबत तंत्रज्ञान भागीदारी करू इच्छितात. आणि म्हणूनच, आपण या वेळेचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे.

 

मित्रहो,

आज आपण अवकाश क्षेत्रात पाहत असलेले बदल हे भारतात घडत असलेल्या नवउद्योजक क्रांतीचाच एक भाग आहेत. गेल्या दशकात विविध क्षेत्रांमध्ये नवउद्योजक संस्थांची नवी लाट निर्माण झाली आहे. वित्ततंत्र, कृषितंत्र, आरोग्यतंत्र, हवामानतंत्र, शिक्षणतंत्र किंवा संरक्षणतंत्र असो, भारतातील तरुण, आपली नवपीढी प्रत्येक क्षेत्रात नवे उपाय सुचवत आहे. आणि आज मी जगातील नवपीढीला आत्मविश्वासाने सांगू शकतो की, खरी प्रेरणा हवी असल्यास ती भारताच्या नवपीढीकडून मिळू शकते. भारताच्या नवपीढीची सर्जनशीलता, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांची क्षमता-विकासाची ताकद ही जगातील नवपीढीसाठी एक आदर्श ठरू शकते.

आज भारत देश हा जगातील तिसरा सर्वात मोठा नवउद्योजक परिसंस्था बनला आहे. एक काळ असा होता की, नवउद्योजक संस्था काही मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होत्या. पण आज भारतातील अगदी लहान शहरांमधून आणि गावांमधूनही नवउद्योजक संस्था उभ्या राहत आहेत. आज देशात 1.5 लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत नवउद्योजक संस्था आहेत आणि अनेक संस्था अब्ज-मूल्य संस्थांच्या स्तरावर पोहोचल्या आहेत.

मित्रहो,

आज भारत केवळ अनुप्रयोग आणि सेवा पुरता मर्यादित नाही. आपण सखोल तंत्रज्ञान, उत्पादनक्षेत्र आणि साधननिर्मितीतील नवकल्पना याकडे वेगाने वाटचाल करत आहोत. सेमीकंडक्टर अर्थात अर्धवाहक क्षेत्राचे उदाहरण घ्या, सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळे भारताच्या तंत्रज्ञान भविष्याची पायाभरणी अधिक मजबूत होत आहे. अर्धवाहक निर्मिती केंद्रे, सूक्ष्मचिप निर्मिती आणि रचना-केंद्रे देशात वेगाने विकसित होत आहेत. सूक्ष्मचिपपासून संपूर्ण प्रणालीपर्यंत भारत एक मजबूत विद्युत-उपकरण मूल्य साखळी उभारत आहे. हे आत्मनिर्भरतेच्या आपल्या संकल्पाचा भाग आहे आणि यामुळे भारत जागतिक पुरवठा-साखळीतील एक मजबूत व विश्वासार्ह आधारस्तंभ बनेल.

मित्रहो,

आपल्या सुधारणा सतत व्यापक होत आहेत. जसे आपण अवकाश क्षेत्रातील नवकल्पना खाजगी क्षेत्रासाठी खुल्या केल्या, तसेच आता आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात पावले उचलत आहोत. आपण अणुऊर्जा क्षेत्रही खुले करण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. या क्षेत्रातही खाजगी क्षेत्रासाठी सशक्त भूमिका निर्माण करण्याची पायाभरणी करत आहोत. यामुळे लघु संयोजित अणुभट्टी, प्रगत अणुभट्टी आणि अणुऊर्जा नवकल्पना यामध्ये नवी संधी उपलब्ध होणार आहेत. ही सुधारणा आपल्या ऊर्जा-सुरक्षेला आणि तंत्रज्ञान नेतृत्वाला अधिक बळ देईल.

 

मित्रहो,

भविष्य कसे असेल हे आज होत असलेल्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. म्हणूनच युवकांना जास्तीत जास्त संशोधन-संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा विशेष भर आहे. तरुणांना आधुनिक संशोधनात मदत करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. एक देश, एक सदस्यता या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांचा प्रवेश सुलभ झाला आहे. एक लाख कोटी रुपयांचा संशोधन, विकास आणि  नवकल्पना निधी देशभरातील युवकांना मोठा हातभार लावणार आहे.

आम्ही 10,000 पेक्षा अधिक अटल चिंतन प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवकल्पनेची प्रेरणा जागृत करत आहेत. लवकरच 50,000 नवीन अटल चिंतन प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. सरकारचे हे प्रयत्न भारतात नव्या नवकल्पनांची भक्कम पायाभरणी करत आहेत.

मित्रहो,

येणारा काळ भारताचा आहे, भारताच्या युवकांचा आहे आणि भारताच्या नवकल्पनांचा आहे. काही महिन्यांपूर्वी अवकाश दिनाच्या निमित्ताने मी आपल्या अवकाश-ध्येयांविषयी बोललो होतो. पुढील पाच वर्षांत भारत आपल्या प्रक्षेपण क्षमतेला नव्या उंचीवर नेईल, असा आपण संकल्प केला होता. भारताच्या अवकाश क्षेत्रातून पाच नवीन युनीकाॅर्न अर्थात अब्ज-मूल्य संस्था उदयास येतील, असेही आपण निश्चित केले होते. आणि स्कायरूटच्या कार्यसंघाची प्रगती पाहता भारत आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करणार हे निश्चित आहे.

मित्रहो,

प्रत्येक भारतीय युवकाला, प्रत्येक नवउद्योजक संस्थेला, प्रत्येक शास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजकाला मी  ठाम हमी देतो – सरकार तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभे आहे. पुन्हा एकदा संपूर्ण स्कायरूट कार्यसंघाचे हार्दिक अभिनंदन करतो. भारताच्या अवकाश प्रवासाला नवी गती देणाऱ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. चला, या पृथ्वीवर आणि अवकाशातही 21 वे शतक भारताचे बनवूया.

आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार. हार्दिक शुभेच्छा!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's electronics exports cross $47 billion in 2025 on iPhone push

Media Coverage

India's electronics exports cross $47 billion in 2025 on iPhone push
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जानेवारी 2026
January 19, 2026

From One-Horned Rhinos to Global Economic Power: PM Modi's Vision Transforms India