भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे नेहमीच शिक्षणाचे स्रोत मानले गेले आहेत
हवामानाबद्दलची कृती ही अंत्योदयाला म्हणजे समाजातील सर्वात दुर्लक्षित व्यक्तीच्या विकासाला अनुसरुन असावी"
"2070 पर्यंत 'नेट झिरो' गाठण्याचे लक्ष्य भारताचे लक्ष्य"
“प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाचा परिणाम म्हणून आज भारतातील वाघांची संख्या जगातील संख्येच्या 70 टक्के”
“भारताने घेतलेल्या पुढाकारांना जनसहभागाचे बळ मिळते”
“Mission LiFE द्वारे जागतिक स्तरावरील लोकचळवळ वैयक्तिक आणि सामूहिक कृतीतून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन”
“वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” याची निसर्ग निवड करतो

महामहिम,

महोदय आणि महोदया

नमस्कार !

वनक्कम !

इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या चेन्नई शहरात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो!  मला आशा आहे की ममल्लापुरम या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढाल. सुंदर दगडी कोरीव काम आणि उत्कृष्ट सौंदर्यासह, हे एक "भेट द्यायलाच हवे" असे ठिकाण आहे.

 

मित्रांनो,

मी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या थिरुकुरलचा संदर्भ देऊन  सुरुवात करतो.  महान संत थिरुवल्लुवर म्हणतात, नेडुंकडलुम तन्नीर मै कुंडृम तडिन्तेडिली तान नल्गा तागि विडिन” याचा अर्थ, जर ढगाने सागराकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने परत दिले नाही तर महासागरही सुकून जातील.” भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे शिकण्याचे नियमित स्त्रोत आहेत. हे अनेक धर्मग्रंथांमध्ये तसेच मौखिक परंपरांमध्ये आढळतात. आपण शिकलो आहोत, पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ:, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:। नादन्ति सस्यं खलु वारिवाहा:, परोपकाराय सतां विभूतय:।।

म्हणजे, “ना नद्या स्वतःचे पाणी पितात ना झाडे स्वतःची फळे खातात. ढग देखील आपल्या पाण्यावर पिकलेले धान्य खात नाहीत." निसर्ग आपल्याला देतो. आपण देखील निसर्गाचे देणे परत दिले पाहिजे. धरणी मातेचे संरक्षण करणे आणि काळजी घेणे ही आपली मूलभूत जबाबदारी आहे. या कर्तव्याकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले गेले. आज, याने "हवामाना संदर्भात कृती" चे स्वरूप घेतले आहे. भारताच्या पारंपारिक ज्ञानाच्या आधारावर मी यावर भर देईन की, हवामान संदर्भातील कृतीने "अंत्योदय" चे अनुसरण केले पाहिजे. म्हणजेच, आपण समाजातील शेवटच्या व्यक्तीची उन्नती आणि विकास सुनिश्चित केला पाहिजे. ग्लोबल साउथचे देश विशेषतः हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांमुळे प्रभावित आहेत. आपल्याला "संयुक्त राष्ट्र हवामान परिषद" आणि "पॅरिस करार" अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या वचनबद्धतेवर कृती वाढवण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल साउथला त्याच्या विकासाच्या आकांक्षा हवामान अनुकूल मार्गाने पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल.

 

मित्रांनो,

मला सांगायला अभिमान वाटतो की, भारत आपल्या महत्त्वाकांक्षी "राष्ट्रीय निर्धारीत योगदान" च्या माध्यमातून वाटचाल करत आहे. भारताने 2030 च्या निर्धारित उद्दिष्टाच्या नऊ वर्षे आधीच, गैर-जीवाश्म इंधन स्त्रोतांमधून स्थापित विद्युत क्षमता गाठली आहे. आम्ही आमच्या अद्ययावत उद्दिष्टांद्वारे मानकांना आणखी उंचीवर नेले आहे. स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आज भारत जगातील पहिल्या 5 देशांपैकी एक आहे. 2070 पर्यंत 'निव्वळ शून्य कार्बन” गाठण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, सीडीआरआय आणि "उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गट” यासह सहयोग करत आहोत.

 

मित्रांनो,

भारत हा विशाल वैविध्यता असणारा देश आहे. जैवविविधता संवर्धन, संरक्षण, सुधारणा आणि संपन्नता यावर कृती करण्यात आपण सातत्याने अग्रस्थानी आहोत. "गांधीनगर अंमलबजावणी मानचित्र आणि व्यासपीठ" याद्वारे जंगलातील आग आणि खाणकामामुळे प्रभावित झालेले प्राधान्यक्रमित भूप्रदेश पुनर्संचयित केले जात आहेत याचा मला आनंद आहे. आपल्या पृथ्वीवरील सात मोठ्या मांजरवर्गीय प्राण्यांच्या संवर्धनासाठी भारताने नुकतीच “आंतरराष्ट्रीय मांजरवर्गीय प्राणी संवर्धन संघटना' सुरू केली आहे. हा उपक्रम 'प्रोजेक्ट टायगर' या एका अग्रगण्य संवर्धन उपक्रमातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित आहे. प्रोजेक्ट टायगरच्या यशाची परिणिती म्हणून, आज जगातील 70% वाघ भारतात आढळतात. आम्ही 'प्रोजेक्ट लायन' आणि 'प्रोजेक्ट डॉल्फिन' वर देखील काम करत आहोत.

 

मित्रांनो,

भारतातील सर्व उपक्रम लोकसहभागाने चालतात. “मिशन अमृत सरोवर” हा जलसंधारणाचा अनोखा उपक्रम आहे. या अभियानांतर्गत अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत 33 हजारांहून अधिक जलकुंभ विकसित करण्यात आले आहेत. हा उपक्रम संपूर्णपणे जनसहभागातून आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबवला जात आहे. आपल्या "पावसाचे पाणी अडवा" मोहिमेने देखील उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणासाठी दोन लाख ऐंशी हजारांहून अधिक जलसंचय संरचना बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय सुमारे अडीच लाख पुनर्वापर आणि पुनर्भरण जल संरचनाही बांधण्यात आल्या आहेत. स्थानिक माती आणि पाण्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत लोकसहभागातून चालवलेल्या चळवळीमुळे हे सर्व साध्य झाले आहे. आम्ही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या “नमामि गंगे मिशन” मध्ये समाजाच्या सहभागाचाही प्रभावीपणे उपयोग करून घेतला आहे. या उपक्रमामुळे गंगा नदीच्या अनेक भागांमध्ये डॉल्फिन मासे पुन्हा दिसण्याची शक्यता वाढली आहे. पाणथळ जमीन संवर्धनातील आमच्या प्रयत्नांनाही यश लाभले आहे. रामसर क्षेत्र म्हणून नियुक्त केलेल्या पंचाहत्तर पाणथळ प्रदेशांसह, आशियातील रामसर क्षेत्रांचे सर्वात मोठे जाळे भारतात आहे.

 

मित्रांनो,

आपले महासागर जगभरातील तीन अब्जाहून अधिक लोकांच्या उपजीविकेचा आधार आहेत. हे महासागर विशेषत्वाने "छोटी द्वीप राज्ये” ज्यांना मी “मोठे महासागरी देश” म्हणू इच्छितो, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक संसाधन आहेत. हे महासागर विस्तृत जैवविविधतेचे केंद्र देखील आहेत. म्हणूनच, महासागर संसाधनांचा जबाबदार वापर आणि व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. मी “शाश्वत आणि लवचिक निळ्या तसेच महासागर-आधारित अर्थव्यवस्थेसाठी जी 20 उच्च स्तरीय तत्त्वे” स्वीकारण्यास उत्सुक आहे. या संदर्भात, मी जी 20 समूहाला प्लास्टिक प्रदूषण समाप्त करण्यासाठी प्रभावी आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधन निर्मितीसाठी रचनात्मकपणे काम करण्याचे आवाहन करतो.

 

मित्रांनो,

गेल्या वर्षी, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांबरोबर, मी मिशन LiFE - पर्यावरणासाठी जीवनशैली या मोहिमेचा प्रारंभ केला. मिशन LiFE, एक जागतिक जनचळवळ बनून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृतीला चालना देईल. कोणत्याही व्यक्ती, कंपनी किंवा स्थानिक संस्थेच्या पर्यावरण संवर्धन कृती भारतात दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत. नुकत्याच जाहीर केलेल्या "ग्रीन क्रेडिट प्रोग्राम" अंतर्गत आता ते ग्रीन क्रेडिट मिळवू शकतात. याचा अर्थ असा की, वृक्ष लागवड, जलसंधारण आणि शाश्वत शेती यासारख्या उपक्रमांमुळे आता व्यक्ती, स्थानिक संस्था आणि इतरांनाही महसूल मिळू शकेल.

 

मित्रांनो,

भाषणाच्या समारोपात, मी पुनरुच्चार करू इच्छितो की आपण निसर्गाप्रती असलेले आपले कर्तव्य कधीच विसरू नये. निसर्ग कदापि खंडित दृष्टिकोन स्वीकारत नाही तर तो "वसुधैव कुटुंबकम" - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य पसंत करतो. मी तुम्हाला संपूर्ण फलदायी आणि यशस्वी बैठकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.

नमस्कार!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions